निर्वासितांची माउली : मंगेशी मून
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात, आपल्याला भीक मागणारी मुलं दिसतात. त्यांचे दिनवाणे चेहरे, खपाटीला गेलेली पोटं, मळके कपडे आणि चेहऱ्यावरच्या त्या अगतिकतेला पाहून सहजच आपला हात खिशात जातो, बोटं नाणी चाचपडत एक-दोन रुपयांच्या नाण्यांच्या शोध घेतात, खिशातला हात बाहेर येतो आणि समोरच्या त्या भीक मागणाऱ्या पोराच्या चेहऱ्यावर आशेची लकेर दिसते... एक-दोन रुपये तरी पदरात पडले या आनंदात तो त्याचा डबा वाजवत तिथून निघून जातो. तो निघून जाताना, दीनवाणा होऊन आपल्याकडे बघत असतात, रेल्वेच्या डब्यात भीक मागत असताना, सहजच विचार येतो, केवढंसं पोर आहे हे, याला सांभाळणारे आई-वडिल असतील का, घर असेल का स्वत: चे, शाळा, शिक्षण, करिअर, पुढे जाऊन काही वेगळं बनण्याचं ध्येय...असं काही असतं असा विचार तरी असेल का यांच्या जगण्याच्या गणितामध्ये... अशी किमान स्वप्नं तरी पडत असतील का याला झोपेमध्ये... की स्वप्नं पडावीत इतकी गाढ झोपही नसेल यांच्या नशिबात...
स्टेशन येतं. भीक मागणारा पोरगा, पोरगी खाली उतरतात, गर्दीत नाहीसे होतात आणि त्यांच्या सोबतच आपले विचारही इतर विचारांच्या गर्दीत नाहीसे होतात.
पण ती...आपल्या सर्वांपेक्षा वेगळी होती... विचारांच्या गर्दीतही त्यांच्या त्या दिनवाण्या डोळ्यांनी तिला काबिज केलं. आणि आपण या मुलांसाठी काहीतरी करायला हवं या विचाराने ती पेटून उठली आणि वर्ध्याशेजारी ५ किलोमीटर अंतरावर ‘उमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट’ स्थापून त्या अंतर्गत ‘उमेद संकल्प युनिवर्सल मोटिव्हेशनल आणि एज्युकेशनल डेव्हलपमेंट (युएमएचडी)’ हा प्रकल्प उभा केला.
मंगेशी मून लहानपणापासून वर्धा शहरात वाढली, लहानपणापासून वडिलांना इतरांना मदत करताना, गरिबांसाठी झटताना ती पाहत होती. लग्न झालं आणि मग नवऱ्याबरोबर ती मुंबई शहरात स्थायिक झाली. लग्न, संसार, मुलं या चाकोरीबद्ध रहाटगाडग्यात जरी ती गुरफटून गेली असली, तरी ‘काहीतरी वेगळं करायचं आहे’ हा विचार तिच्या डोक्यात धूमकेतूसारखा चमकून जायचा आणि त्या चाकोरीबद्ध आयूष्यात तिला स्वत:च्या स्वतंत्र आयुष्याची, क्षमतांची जाणीव व्हायची. मुलं शाळेत जायला लागली तसं त्यांना आणायला, सोडायला, जाताना, तिची पण शाळेची वारी व्हायची. मग, तिथल्या पालकांचा एक गट तिने तयार केला. कल्याणमध्ये आधारवाडी जेलच्या मागे तिच्या मुलांची शाळा होती. तिथे जवळच एक वीट-भट्टी होती. शाळेतून येता-जाताना ती मुलं काम करताना दिसायची, रस्त्यावर भीक मागताना, कधी कचरा गोळा करताना दिसायची. आपल्या मुलांना तर आपण चांगल्या शाळेत पाठवतो आहे, शिकवतो आहे; पण या मुलांसाठी मात्र कोणीही काम करत नाहीये. असं लक्षात आल्यानंतर, मंगेशी ताईंनी आपल्या पालकांच्या समूहासमोर ’स्ट्रीट स्कूल’ची कल्पना मांडली. शाळेच्याच मागे एका मंदिराच्या आडोशाला अकरा ते चार या वेळात ही शाळा चालायची. पालकांनी आपल्या घरचे धान्य एकत्र करून त्या मुलांसाठी मध्यान्हभोजन सुरु केले. २०१२ साली सुरू झालेली ती शाळा पुढे तीन-चार वर्ष कार्यरत राहिली.
स्ट्रीट स्कूल मध्ये शिकत असलेल्या मुलांना मंगेशी ताईंनी म्युनिसिपाल्टीच्या शाळेत दाखल केलं आणि त्यांना रीतसर शिक्षण प्रवाहाला जोडून दिलं. याचं काळात मंगेशी ताईंनी प्लॅटफॉर्म स्कूलदेखील सुरू केलं. यात प्लॅटफॉर्मवर काम करणारी, भीक मागणारी अशी मुले होती. आता केवळ शाळा सुरू करून उपयोग नव्हता, तर ही मुलं भीक का मागतात, यांची घरची परिस्थिती काय आहे, मुळात ही मुलं कुठली आहेत, याचा शोध लावणं गरजेचं होतं.
मुलांना शिकवत असताना, त्यांच्याशी गप्पा मारताना मंगेशी ताईंनी हळूहळू त्यांची माहिती घ्यायला सुरुवात केली. तर त्यांच्या लक्षात आलं की, ही मुलं मराठवाडा, विदर्भ या भागातली आहेत. यांचे आई-वडिल तिकडे दारू गाळतात आणि कधीतरी पोलिसांची रेड पडल्यानंतर, झालेलं नुकसान भरून काढायला इथे मुंबईमध्ये येतात. इथे आल्यानंतर लहान मुलांना भीक मागायला पाठवून, आलेल्या पैशातून मुलांचे पालक व्यसनाधीन होतात. त्यामुळे, शिकायला पाठवलं तर मुलगा कमवणार नाही या भीतीने ते आपल्या मुलांना कधीही शिकायला पाठवत नाहीत.
ही परिस्थिती समजल्यानंतर, मंगेशीताईंना जाणवलं की, आपल्याला जर या मुलांसाठी खरंच काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी वरवरची मदत करून चालणार नाही. या संपूर्ण साखळीमधून त्यांना बाहेर काढायचे असेल तर त्यांना घातलेल्या ’बेड्यां’पासून दूर केलं पाहिजे, अगदी लहानपणापासून शिक्षणाचा, नीटनेटकेपणाचा संस्कार त्यांच्यावर व्हायला पाहिजे.
आपण या मुलांसाठी पूर्ण वेळ काम करायचं असा विचार केल्यानंतर २०१६ साली मंगेशीताई वर्ध्याला आपल्या माहेरी परत आल्या. घरच्यांना भेटून त्यांनी आपल्या मनातली कल्पना त्यांना सांगितली. पारधी मुलांसाठी एक वसतीगृह बांधून, किमान सात-आठ वर्षांसाठी तरी त्यांची जबाबदारी घेणं म्हणजे एक अग्निदिव्यच होतं. घरामध्ये सुरुवातीला अर्थातच त्यांना विरोध झाला, पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. वर्ध्यातील पारधी बेड्यांवर जाऊन त्यांनी तिथली परिस्थिती जाणून घेतली.
मंगेशीताईंच्या वडिलांची अकरा एकर शेती वर्ध्यापासून पाच किलोमीटर लांब असलेल्या रोठा या गावामध्ये होती. तिथेच आपण प्रकल्प उभा करायचा असा विचार त्यांनी केला. बांधकाम करण्यासाठी लागणारा खर्च त्यांनी आपले सोन्याचे दागिने गहाण टाकून केला. प्रकल्प तर उभा केला; पण आता महत्त्वाचे काम होतं की, या प्रकल्पात मुलं आणणं. मग मंगेशी ताईंनी दोन वर्ष तरी वर्ध्यालाच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या धामधुमीत त्यांचा मुलगा दहावीला होता आणि मुलगी आठवीला शिकत होती. आईची तगमग, या मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा पाहून दोन्ही मुलांनी आपल्या अभ्यासाचा बाऊ न करता आईला कामावर लक्ष केंद्रित करण्याची मोकळीक दिली. साधारण, सहा-सात महिन्यांच्या काळात मंगेशी ताई मुंबई, वर्ध्यामधील अनेक पारधी बेड्यांवर गेल्या, मुलांच्या पालकांना भेट दिली, त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून दिलं, अगदी, ‘तुम्ही तुमच्या चार मुलांपैकी दोन फक्त शिकायला पाठवा, बाकी दोघं तुम्हाला रोजगारासाठी ठेवा’ असं सांगून, कधी चार मधली दोन, तीन मधला एक असं करत करत त्यांनी अठरा मुलं जमा केली आणि ’संकल्प’वर राहायला आणली.
दोन दिवसच राहिल्यानंतर, एके दिवशी झोपायला जातो, असं सांगून अठराच्या अठरा मुलं पळून गेली. मुख्य वस्तीपासून काही किलोमीटर लांब असलेल्या त्या शेतात त्या एकट्या उभ्या होत्या. ही आठवण सांगताना त्या म्हणाल्या, “साडेदहाच्या सुमारास मुलं पळून गेली हे माझ्या लक्षात आलं, रात्र खूप झाली होती, अंधार फार होता आणि मी एकटी अशावेळी मुलांना शोधायला जाणार तरी कुठे, शिवाय माझ्या वर विश्वास ठेऊन त्यांनी मुलांना पाठवलं होतं, कुठे काही बरं वाईट झालं असतं तर.... नाना विचार डोक्यात आले, काहूर माजलं होतं. या मुलांसाठी मी सगळं काही सोडून इथे आले होते... पण आता काय... डोळ्यासमोर काही पर्यायच येत नव्हता.”
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलांना शोधायला बाहेर पडल्या आणि पंधरा दिवसांच्या धावपळीने त्यांनी २८ मुलं संकल्पात आणली. मुलांशी बोलताना लक्षात आलं की, यांच्याकडे जन्मदाखला किंवा जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड अशी कुठलीच कागदपत्र नाही आहेत, सरकार दरबारी त्यांची नोंद नाहीये. त्यामुळे, मुलांना शाळेत दाखल करणं शक्य नव्हतं. आणि मुलांना शाळेत तर पाठवयाचं होतं. मग त्यांनी बालशिक्षणाचा जीआर वाचून काढला आणि वयाप्रमाणे मुलांना वेगवेगळ्या इयत्तांमध्ये बसवता येतं या नियम त्यांना समजला. नियमानुसार रोठा गावच्या शाळेत त्यांनी मुलांची नावं दाखल केली. आणि शाळेत जाण्याचा पहिला दिवस उजाडला...
शाळा कशी असेल, मित्र-मैत्रिणी कसे असतील या विचाराच्या आनंदातच मुलं शाळेत गेली आणि पाच वाजता परत आली ती मात्र हिरमुसलेल्या चेहऱ्याने शाळेत परत न जाण्याचा निश्चय करूनच. त्यांचे पडलेले चेहरे बघून मंगेशी ताईंनी मुलांना कारणं विचारली तर समजलं की, शाळेमध्ये खुद्द शिक्षकांनीच या मुलांना सगळ्यांच्यासमोर तुम्ही चोरी कशी करता, भीक कशी मागता, हे चोरून दाखवा अशी काहीबाही प्रात्याक्षिक करून दाखवायला सांगितली. ज्या शिक्षकांनी मुलांना समानतेचे धडे द्यायचे, त्यांचं हे वर्तन पाहिल्यावर मात्र ताईंच्या लक्षात आलं की, मार्ग अजून खडतर होतं जाणार आहे. ताई शाळेमध्ये तक्रार घेऊन गेल्यानंतर, आम्ही त्या मुलांना भरती करणार नाही शाळेमध्ये, असं सरळ सांगून मुख्याध्यापकाने हात झटकले. मग, वर्ध्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्याला मंगेशी ताईंनी भेट दिली आणि घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दटावले आणि मुलं शाळेमध्ये शिकू लागली.
तरी देखील त्यांना समतेची सोडाच; पण साधी माणूसकीची देखील वागणूक मिळत नव्हती. कधी ते पारधी आहेत म्हणून त्यांच्याकडून बाथरून-संडास साफ करून घेतले जायचे, कधी वर्गात झालेल्या चोरीचा आळ त्यांच्यावर घेतला जायचा, कधी त्यांच्या जातीवरून त्यांना टाकून बोललं जायचे, गावात कुठेही चोरी झाली तरी भर चौकात मुलांची दप्तर उघडून बघणे, त्यांची झडती घेणे असे प्रकार चालूच होते. एकदा तर चक्क त्या तीस मुलांना भर उन्हात पूर्ण वेळ बाहेर बसवण्यात आलं, रणरणतं उन, डोक्यावर छप्पर नाही अशा परिस्थितीत ती मुलं उभं अंग भाजून निघत असताना तिथे बसून होती.
अशा परिस्थितीतच संकल्पच्या पहिल्या बॅचने सातवी पूर्ण केली. ती मुले बाहेर शिकायला गेल्यानंतर, तुमच्या बाकीच्या मुलांना आम्ही इथे शिकू देणार नाही असं सरळ सांगत तीस मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले शाळेने मोहीनी ताईंच्या हातात ठेवले. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात येऊनसुद्धा इतकी संकुचित बुद्धी, पदवीमुळे आलेला उद्धटपणा बघून ताईंनी सरळ तिथल्या (सीईओ) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार केली. संबंधित हेडमास्टर आणि सहशिक्षक निलंबित होत नाहीत तोपर्यंत आपल्या मुलांना घेऊन त्यांनी आंदोलन सुरू ठेवलं. या काळात त्यांनी मुलांना इतर कोणत्याही शाळेत टाकलं नाही. हा लढा चालू असताना वर्ध्यामधील वर्तमानपत्रांनी ताईंच्या कामाची आणि मुलांवर होणाऱ्या अन्यायाची नोंद घेतली. मुलांचा हक्काच्या शिक्षणासाठी चाललेला संघर्ष बघून मानस मंदिर आणि वर्धा कन्या शाळा या दोन शाळांनी त्या मुलांना आपल्या शाळेत प्रवेश दिला आणि शाळेत यायला आणि जायला बस सुरू करून दिली. आता प्रकल्पातील मुलं आनंदाने शाळेत जातात आणि मन लावून शिक्षण घेतात.
पहिले काही खडतर दिवस
मुलं प्रकल्पात राहायला आली तरी एका दिवसात त्यांच्यात बदल होणं शक्य नव्हते. सवयच नसल्यामुळे आंघोळ करायला कंटाळा करायची. तर ताई सरळ पाण्याचा पाईप धरून मुलांच्या अंगावर मारायच्या जेणेकरून कपडे ओले होतील आणि ते बदलले जातील. मग, मुलांसाठी स्वच्छ, चांगले कपडे आणायला त्यांनी सुरुवात केली. या कामात त्यांच्या मुंबईमधील मैत्रिणींनी त्यांना चांगली साथ दिली कधी शालेय साहित्य, अंतर्वस्त्रं, शाळेचे कपडे, औषधं वगैरे त्यांनी प्रकल्पासाठी पुरवली.
कोविड काळ आणि संकल्प
कोविड काळामध्ये सर्व आश्रमशाळांना मुलांना घरी पाठवण्याची नोटीस सरकारने दिली होती. संकल्पमधील जवळपास चाळीस एक मुलं अनाथ आहेत, त्यांना स्वत:चे घर नाही. अशा परिस्थितीत त्यांना कोणाकडे पाठवायचे हा प्रश्न होता. पण तरीही लांबचे नातेवाईक शोधून मुलांना घरी पाठवण्यात आलं आणि काही दिवसातच दोन- दोन भुकेली राहिलेली मुले, केविलवाणा चेहरा करून परत आली. कोरोनाकाळातही ताई मुलांकडे पूर्ण लक्ष देत आहेत म्हटल्यावर कलेक्टरने त्यांना कोविड किट्स उपलब्ध करून दिले. आणि या दीड वर्षाच्या कालावधीत ५० जणाचं कुटुंब संकल्पमध्ये ताईंनी जगवलं.
संकल्प : एक कुटुंब
संकल्पमध्ये जवळपास सत्तर एक मुलं राहतात. प्रकल्पाची उभारणी ही शेतातच केली असल्याने, जेवणासाठी लागणारे गहू, तांदूळ, डाळ, भाजीपाला हा शेतात पिकवला जातो. गेल्या चार वर्षामध्ये मुलांनी जवळपास तीनशेहून अधिक झाडे लावली आणि जगवली आहेत. प्रकल्पातील प्रत्येक मुलाकडे तीन-चार झाडांची जबाबदारी असते. ते झाड वाढवणं त्याची काळजी घेणं, हे तो मुलगाच करतो. ताई म्हणतात, ‘या मुलांना पारधी समाजामध्ये वाढल्यामुळे झाडं कापण्याची सवय खूप होती. एक झाड वाढताना किती वेळ लागतो, किती मेहनत लागते हे त्या मुलांना आत्ता कळते आहे. म्हणूनच, निसर्गाबद्दल ते संवेदशील बनत आहेत’.
प्रकल्पाला चार वर्ष झाली तरी मनुष्यबळाची कमतरता आहे. मंगेशी ताई, त्यांचा मुलगा, मुलगी, त्यांची वहिनी आणि भाची हा प्रकल्प सांभाळतात. पारधी समाजतील दोन वृद्ध जोडपी देखील प्रकल्पावर राहतात. आणि सगळे मिळून हा संसार गुण्यागोविंदाने चालवतात.
संकल्पची समजाकडून काय अपेक्षा आहे?
आजही एखादा पारधी आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत नाही कारण त्याला वाटते की, शिकून सुद्धा त्याला कोणी नोकरी देणार, त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यांच्या मनातील हि भीती दूर करण्यासाठी शिकलेल्या या मुलांना मुख्य प्रवाहात आपण सामील करून घ्यायला हवं. आणि त्यासाठी आपल्या मनातील पूर्वग्रह दूर करायला हवेत. मंगेशी ताई म्हणतात की, ‘जर तुम्हाला या मुलांना गुन्हेगारीतून आणि गरिबीतून बाहेर काढायचे असेल तर आधी त्यांना भीक देणं बंद करा. तेच पैसे तुम्ही अशा एखाद्या संस्थेला द्या, जी त्या मुलांच्या सर्वांगीण विकासावर काम करते.’
’संकल्प’ला कशी मदत करू शकता?
’संकल्प’ला मदत करताना तुम्ही आर्थिकरीत्या म्हणजेच की, एखादी रक्कम संस्थेला देऊ शकता किंवा एखाद्या मुलीचा, मुलाचा शिक्षणाचा खर्च उचलू शकता. त्यासोबतच वस्तू स्वरूपात स्टेशनरी, शाळेचे कपडे वगैरे देऊन तुम्ही संस्थेची मदत करू शकता. एखाद्या वेळेस तुमचा वाढदिवस साजरा करून त्या दिवशी संस्थेला जेवण देऊ शकता. किंवा तुम्ही कोणत्या कलेमध्ये पारंगत असाल तर प्रकल्पाला भेट देऊन तुम्ही मुलांसाठी कार्यशाळा घेऊ शकता.
भविष्यातील योजना
येणाऱ्या २०२२मध्ये पुण्यामध्ये ’संकल्प’ची एक शाखा पुण्यामध्ये सुरू करणार आहेत. ’संकल्प’च्या पहिल्या बॅच मधली तीन मुलं आता मराठवाडा कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल टेक्निशिअनचा अभ्यासक्रम शिकत आहेत, तर मुली नर्सिंगचे शिक्षण घेत आहेत. या मुलांचं शिक्षण झाल्यानंतर मग त्यांना नोकरी मिळेपर्यंत संस्था त्यांच्या पाठीशी असणार आहे. म्हणजे ‘कमवा व शिका’ अशा पद्धतीने ते आपलं शिक्षण पूर्ण करून घराला हातभार लावू शकतील.
मदतीसाठी संपर्क
मंगेशी मून (संस्थापक, संकल्प प्रकल्प) मोबाइल : ७४९९४१६४१३
शब्दांकन : मेघना अभ्यंकर
meghanaabhyankar2698@gmail.com