भटक्या-विमुक्त जमातींतील स्त्रियांचे शोषण आणि जातपंचायत

०१ मे २०२०

महाराष्ट्रासह देशभरात भटक्या-विमुक्त जमाती दोन वेळच्या पोटाची भूक भागवण्यासाठी भटकत आहेत. भाकरीच्या शोधात भटकताना, लाचार, आगतिक अवमानित जीवन जगत आहेत. भारतीय समाजव्यवस्थेतील वर्णव्यवस्थेच्या आणि जातीव्यवस्थेच्या उतरंडीमध्ये या जमातींचा समावेश केलेला नाही. त्यामुळे या जमाती अवर्ण राहिल्या आहेत. गावगाड्याच्या उत्पादनव्यवस्थेमध्ये या जमातींना सामावून घेतले गेले नसल्याने, या जमातींना उत्पादन प्रकियेतील कुठलेच कौशल्य आत्मसात करता आलेले नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी या भटक्या-विमुक्त जमाती हजारों वर्षांपासून स्थिर समाजाच्या दयाबुद्धीवर, त्यांच्याकडून मिळणार्‍या भिक्षेवर गुजराण करीत आल्या आहेत. गावगाड्याच्या रचनेमध्ये या जमातींना स्थान नसल्याने, या जमाती कोठेच स्थिर राहिल्या नाहीत. गावगाड्याच्या तत्कालिक गरजांची पूर्तता करून, त्या बदल्यात मिळणार्‍या मूठभर धान्यावर या जमाती गुजराण करीत होत्या. या तत्कालिक गरजा म्हणजे स्थिर समाजाच्या मनोरंजानाची गरज भागवणे. उदाहरणार्थ, डोंबारी, गोपाळ या जमाती कसरतीचे खेळ करीत. अस्वलवाले, माकडवाले, सापगारूडी, अस्वलांचा, माकडांचा, सापाचा खेळ करीत. या मनोरंजनाच्या बदल्यात मिळणार्‍या भिक्षेवर आपली गुजराण करीत. वैदूसारखी जमात वनस्पती औषधे, कंदमुळे देऊन वैद्यकीय गरज भागवत होती आणि त्या बदल्यात मिळणार्‍या भिक्षेवर जगत होती. कुडमुडे जोशी, नंदीवाले, पोपटवाले जोशी यासारख्या जमाती भविष्य सांगून जगत होत्या. गोंधळी, आराधी या जमाती अंबाबाईच्या नावाने गोंधळ, जागरण घालून स्थिर समाजाची अध्यात्मिक गरज भागवत होत्या. त्या बदल्यात मिळणार्‍या भिक्षेवर जगत होत्या. गाडीलोेहार, घिसाडी यासारख्या जमाती शेतीला उपयुक्त अवजारे तयार करून देणे यासारखी कामे करून जगत होत्या.

या जमाती भागवत असलेल्या या गरजा स्थिर समाजाच्या, गावगाड्याच्या कायमस्वरूपी गरजा नव्हत्या. विशिष्ट कालखंडात - शेतीमध्ये कामे नसताना, सणावाराच्या काळात अशा गरजांची आवश्यकता गावगाड्यातील स्थिर समाजाला भासत होती. इतर दिवसांत या जमातींना कोणतेच काम नसल्याने या जमातींना एका ठिकाणी स्थिर राहून उदरनिर्वाह करणे शक्य झाले नाही. त्यामुळे या जमाती सतत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी भटकत राहिल्या. आपल्या पारंपरिक कलाकौशल्यांच्या आधाराने, स्थिर समाजाची दयाबुद्धी जागृत करून, भिक्षा मागून गुजराण करीत राहिल्यामुळे या जमातींना स्वत:चे गाव नाही. स्वत:चे घर नाही. आपली म्हणून भूमी नाही. या देशात राहात असूनही या जमातींमधील माणसांची या देशाचे नागरिक म्हणून नोंद नाही. परिणामी मतदार म्हणून त्यांची गणना झालेली नाही. देशातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित समाज घटकांसाठी शासनाने राबवलेल्या योजनांपासून या विविध जमातींमधील बारा ते चौदा कोटी माणसं अद्यापही शेकडो मैल दूर आहेत. यासंबंधी बाळकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने स्थापन केलेल्या रेणके आयोगाने सविस्तर अहवाल सादर केलेला आहे.

या भटक्या-विमुक्त जमातींना स्थिरता नसल्याने त्यांना शिक्षण नाही, शिक्षण नसल्याने त्यांच्यामध्ये आत्मभान आलेले नाही. आपण माणूस आहोत याचीच जाणीव नाही. याउलट आपण भिकारी आहोत, गुन्हेगार आहोत अशी त्यांची घट्ट मानसिकता बनलेली आहे. आदिम, रानटी, परंपरांना कवटाळून या जमाती पशूंसारखे जीवन जगत आहेत. दलित समाजामध्ये शिक्षणामुळे जाणीव जागृती आलेली आहे. आपल्या अस्मितेसाठी दलित जाती संघर्ष करीत आहेत. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंडाची भाषा बोलताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे आणि कार्यामुळे दलित जमातीमध्ये स्वाभिमान जागृत झाला. अस्मितेसाठी, सामाजिक समतेसाठी आंदोलने झाली. त्यातून दलित जातींमधील शिकणार्‍यांना नोकरीमध्ये, राजकारणामध्ये संधी मिळाली. भटक्या-विमुक्त जमाती मात्र मध्ययुगीन टोळी संस्कृतीचे रानटी, नरकप्राय जीवन अद्याप जगत आहेत.

भटक्या-विमुक्त जमातींमधील प्रत्येक जमातींमध्ये आणि तिच्या पोटजातींमध्ये जातपंचायतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या जमातींचा संपूर्ण व्यवहार या जातपंचायतीमार्फतच नियंत्रित केला जातो. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व व्यवहार ही जातपंचायतच आपल्या ताब्यात ठेवते. आपल्या जमातीचे स्वतंत्र व वेगळे अस्तित्व टिकवून ठेवण्यात या जातपंचायतीचा महत्त्वाचा वाटा आहे. भटक्या-विमुक्त जमातींमधील माणसांवर या जातपंचायतीची दहशत असते. जमातीत संकर घडू नये, जमातीचे कायदेकानू कोणी तोडू नयेत म्हणून ही जातपंचायत कठोरात कठोर आणि अघोरी शिक्षा करीत असते. अशा भयावह शिक्षेच्या भीतीपोटी या जमातीमधील माणसं जातपंचायतीचे नियम मोडत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जमात बंदिस्त बनत गेली आणि आपल्या कोषात गुरफटत गेली आहे.

या भटक्या-विमुक्त जमातींच्या आदिम, रानटी परंपरा आजही अवशेष रूपाने जमा करून ठेवलेल्या आहेत. बहुसंख्य जमाती नात्यागोत्यांच्या टोळींनी गावोगावी भटकत असतात. त्या त्या पालांच्या टोळीचा प्रमुख असतो. या जमाती गावाच्या बाहेर दर्‍या-डोंगरात, जंगलात पालं मारतात. आदिमतेशी नाते सांगणार्‍या या परंपरा या जमाती आजही जोपासताना दिसतात. या प्रत्येक जमातींची स्वतंत्र जातपंचायत म्हणजे आदिम, रानटी परंपरेचे ठसठशीत द्योतक आहे.

अशा या जमातींमधील स्त्रियांच्या समस्या अतिशय विदारक, भयावह आहेत. मानवतेला काळिमा फासणार्‍या प्रथा-परंपरांच्या दुष्टचक्रात या जमाती आणि विशेषत: या जमातींमधील स्त्रिया अडकलेल्या आहेत. या देशातील पुरूषप्रधान व्यवस्थेने घडलेली मानसिकता या जमातीतील पुरूषांचीही आहेच, त्यामुळे या जमातींमधील स्त्रिया मध्ययुगीन पुरूषप्रधान वर्चस्वाच्या बळी ठरलेल्या आहेत. त्याशिवाय अज्ञान, अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, गतानुगतिक मानसिकता यांचाही या स्त्रिया बळीठरलेल्या आहेत. त्यामुळे या जमातींमधील स्त्रियांचे दुहेरी-तिहेरी पातळीवरून शोषण होते आहे. परंतु आपलं शोषण होत आहे, आपल्यावर अन्याय-अत्याचार होत आहेत, आपली मानवता कलंकित होत आहे, याबाबतची जाणीव या जमातीमधील स्त्रियांना अद्याप झालेली नाही. असलं जगणं आपल्या नशिबाने आपल्या वाट्याला दिलेले आहे, ते आपण निमूटपणे जगलं, भोगलं पाहिजे. अशा विचारांनी या स्त्रियांची मानसिकता घट्ट बनलेली आहे.

भटक्या-विमुक्त जमातींमधील प्रत्येक जमातीची एक स्वतंत्र ‘जातपंचायत’ असते. ही जातपंचायत फक्त पुरूषांची असते. पुरूषप्रधान व्यवस्थेचा ‘अर्क’ म्हणजे ही जातपंचायत असते. जातपंचायतीचे सर्व नियम, सर्व कायदे, सर्व शिक्षा स्त्रियांसाठीच केलेल्या आहेत की काय, अशी शंका यावी इतपत हे नियम व कायदे स्त्रियांच्या बाबतीत अमानुष आहेत. चारित्र्यशुद्धतेबाबत सर्व शिक्षा स्त्रीलाच असतात आणि या शिक्षा भयावह, अमानुष असतात. जमातीचे नियम तोडण्याचे धाडस निर्माणच होऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेतलेली असते. उदा. चारित्र्य शुद्धतेसाठी उकळत्या तेलातून पैसा काढणे, विस्तवावरून चालणे, केस, नाक आणि स्तनदेखील कापणे आणि आणखी काही. या जमातींमध्ये जिवंतपणीच चारित्र्य सांभाळावे असे नाही, तर तिच्या मृत्यूनंतरदेखील तिचे चारित्र्य तपासले जाते. उदा. घिसाडी या जमातीत स्त्रीच्या मृत्यूनंतर तिसर्‍या दिवशी राख सावरताना त्यामध्ये बांगड्या, दागिने सापडले नाहीत, तर ती स्त्री बदफैली होती असे मानून तिच्या राखेवर थुंकले जाते. राखेवर लाथा मारल्या जातात आणि त्या कुटुंबाला वाळीत टाकले जाते. त्यामुळे या जमातींमधील स्त्रियांना स्वत:ला अतिशय काटोकोरपणे जपावे लागते. आपल्यावर जर काही डाग पडला तर आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांच्या नावावर काळिमा फासला जाईल, त्यांना जातीतून वाळीत टाकलं जाईल. याची भीती कायमपणे उराशी बाळगून या स्त्रियांना जगावे लागते. पारधी जमातीमध्ये स्त्रीला आपले निर्दोषपण सिद्ध करण्यासाठी जातपंचायत पोतंभर वाळल्या शेण्या (गोवर्‍या) गोळा करायला सांगते. त्या शेण्या रचून पेटवल्या जातात. त्या पेटलेल्या जाळात लोखंडाची पहार टाकली जाते. ती पहार लालभडक होईपर्यंत तापवली जाते. त्या तापलेल्या पहारेवरून जिच्याविषयी आरोप आहेत, त्या स्त्रीला चालून दाखवायला सांगितलं जातं. तिने तापलेल्या पहारेवरून चालायला नकार दिला किंवा चालल्यानंतर भाजली तर ती दोषी आहे, असा निर्णय जातपंचायत घेते. म्हणजे तिने कोणतीही कृती केली तरी ती दोषीच ठरेल, अशी व्यवस्था केलेली असते. किंवा दोन किलो गोडेतेल आणायला सांगितलं जातं. ते तेल एका कढईमध्ये घालून जातपंचायतीसमोर खळखळा उकळलं जातं आणि त्यात एक किंवा दोन रुपयांचे नाणं टाकलं जातं. ज्या स्त्रीविषयी आरोप आहेत, त्या स्त्रीला अशा उकळत्या तेलातून ते नाणं काढण्यास सांगितलं जातं. हाताला कोणतीही जखम न होता तिने ते नाणं काढून दाखवलं तरच ती निर्दोष ठरते. अशा या अमानुष, अशास्त्रीय प्रथा आजही सुरू आहेत.

त्यामुळे भटक्या जमातींमधील स्त्रियांना आपले अस्तित्व टिकवून जगणे शक्यच होताना दिसत नाही. पुरूषप्रधान, संस्कृतीची पाठराखण करणार्‍या जातपंचायतीने पुरुषी वर्चस्व कायम राखण्यासाठी आणि स्त्रीला गुलाम, दासी बनवण्यासाठी कायदे, नियम तयार केले आहेत. जातपंचायतीच्या नियमानुसार वस्तूप्रमाणे स्त्रीला गहाण ठेवण्याची प्रथा काही जमातींमध्ये आहे. आपण ‘माणूस’ आहोत, माणसाप्रमाणे जगण्याचा आपल्याला हक्क आहे, याची पुसटशी कल्पनाही तिच्या मनाला स्पर्श करू नये, याची काळजी जातपंचायतीने घेतलेली आहे.

भटक्या-विमुक्त जमातीमधील जातपंचायतीच्या या अमानुष, अशास्त्रीय कायद्यामुळे विविध तरुण मुलींच्या, स्त्रियांच्या जीवनाची भयावह वाताहत झालेली दिसून येते. जळणफाटा गोळा करण्यासाठी भटकंती करताना, भीक मागण्यासाठी किंवा काही वस्तू विकण्यासाठी दारोदार फिरताना स्थिर समाजातील काही समाजकंटंकांकडून अशा तरुणींच्या किंवा स्त्रियांच्या बाबतीत काही बरं-वाईट घडलं तर या तरुणींना आणि स्त्रियांना परत पालांवर जाणं अशक्य होऊन जातं. त्यांना आपल्या जामातींपासून दूर जावं लागतं. शहराचा किंवा मोठ्या गावांचा आधार शोधावा लागतो आणि दिशाहीन वार्‍याप्रमाणे भरकटत राहावं लागतं. प्रसंगी शरीरविक्रयही करावा लागतो. या सगळ्याला पुरुषप्रधान जातपंचायतीने घालून दिलेले नियमच मुख्यत्वेकरून जबाबदार असतात.

दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे उघड्यावरच्या, असुरक्षित जगण्यातून या सर्वच जमातींमध्ये दैववाद मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे आणि तो जोपासला गेलेला आहे. असा दैववाद जोपासण्यामध्ये जातपंचायतींचा सर्वांत मोठा सहभाग आहे. या जमाती दैववादी, अंधश्रद्धाळू राहिल्या तरच जातपंचायतीला महत्त्व राहणार. या भूमिकेतून जातपंचायत या जमातींच्या दैनंदिन जीवनाचे नियंत्रण करत असते. या अफाट निसर्गाच्या सान्निध्यात, पाऊस, वारा, ऊन, वादळ अशा नैसर्गिक आपत्तीत उघड्यावर जगताना, ‘आपल्याला फक्त देवाचा आधार आहे’ ही भावना या जमातींमध्ये रूजली आहे. इथल्या अंधश्रद्धेचा सर्वात मोठी बळी ठरली आहे ती स्त्री. भटक्या-विमुक्त जमातींमधील स्त्रीचं  एकूण जगणंच अंधश्रद्धेच्या कोेषात गुरफटलेलं आहे. स्थिर समाजातील स्त्रियांच्या वाट्याला अंधश्रद्धेमुळे जे जे येतं ते ते या जमातीमधील स्त्रियांच्या वाट्याला येतंच. आणि त्याशिवाय जगण्यातली भीषणताही या स्त्रियांना सोसावी लागते. एक-दोन उदाहरणं वानगीदाखल देणं उचित ठरेल. घरात विटाळ चालत नाही, शिवता शिवत होऊ नये म्हणून नंदीवाले जमातीत गरोदर स्त्रीला दिवस भरण्यापूर्वी काही दिवस अगोदर स्वतंत्र ‘पाल’ करून दिलं जातं. त्या पालांकडे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत कुणीही फिरकत नाही. त्या स्त्रीने स्वत:चं बाळंतपण स्वत:च करायचं. उदरातून नुकतंच बाहेर पडलेलं बाळ हातात घ्यायचं, दगडाने ठेचून नाळ तोडायची. बाळ हातात घेऊन आपणच पालाजवळ कुठे ओढा, नाला, डबकं आहे का ते बघायचं. त्या नवजात अर्भकासह आपणही थंड पाण्यात बुचकळायचं. स्वत:ला व बाळाला स्वच्छ करायचं आणि ते मूल पदरात घेऊन घरोघर भाकरीचा तुकडा मागत फिरायचं. असं सव्वा महिना त्या स्त्रीला स्वतंत्रपणे जगावं लागतं. हे केवळ कुटुंबातील आणि इतर पालांतील माणसांना शिवता-शिवत होऊ नये म्हणून. त्यांना विटाळ चालत नाही म्हणून!

भटक्या-विमुक्त जमातीमधील सर्वच जमातीतील स्त्रियांच्या वाट्याला हे असं बाळंतपण येतं. काही जमातीतील स्त्रियांना बाळंतपण झालं की, मूल पदरात घेऊन धावावं लागतं. दुसर्‍या गावाला रात्री-अपरात्री पळावं लागतं. असं अघोरी जीवन या स्त्रियांच्या वाट्याला सतत येतं आहे. मूल जन्मालाघालणं हे निसर्गाचं सृजन आहे. म्हणून स्थिर समाजामध्ये स्त्रीचा गौरव केला जातो. तिला मखरात बसवलं जातं. तिचं कोडकौतुक होतं. त्याच वेळी भटक्या-विमुक्त जमातीमधील स्त्रीला मात्र असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागतं. हा विरोधाभास या जमातींमधील स्त्रीची अवहेलना करणारा आहे. शिवाय पाळण्याला बाशिंग बांधून लग्न करण्याची प्रथा तर अनेक जमातींमध्ये आहे. बालपणातच एखाद्या मुलीचा ‘नवरा’ मरण पावला, तर दुसरं लग्न करायचं नाही, कारण ते आपल्या जमातीमध्ये चालत नाही, अशी बंधनं जातपंचायतीने घातलेली आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या त्या जमातीमधील स्त्रियांनी आपली जमात-पोटजात सोडून अन्य जमातीमधील, पोटजातीमधील पुरूषांशी लग्न करू नये, संबंध ठेवू नयेत. त्यातून जातीसंकर होईल आणि आपल्या जमातीचे अस्तित्व संपुष्टात येईल. परिणामी जातपंचायतींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल. म्हणूनच जातपंचायतींने असे अमानुष नियम बनवले आहेत. त्याचा परिणाम म्हणून त्या मुलीने बालपण, तरूणपण विधवा म्हणून जगायचं. आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं. काही जमातींमध्ये पुरूषांनादेखील केस कापायाला बंदी घातली आहे.

भटक्या-विमुक्त जमातींपैकी बहुसंख्य जमातींमध्ये ‘मुलगी’ जन्माला आली की, कुटुंबावर संकट कोसळल्यासारखं वाटतं. या जमातींची परिस्थिती तशीच असते. मुलगी मोठी होईपर्यंत, वयात येईपर्यंत आपल्या उघड्यावरच्या असुरक्षित जीवनामध्ये काय घडेल, याची त्यांना सतत भीती असते. मुलीच्या बाबतीत काही भलतंसलतं घडलं तर जातपंचायत वाळीत टाकील याची दहशत असते. त्यामुळे ‘मुलगी’ म्हणजे गळ्याला फास अशी या जमातींची धारणाच झालेली आहे. याउलट डोंबारी, कोल्हाटी या जमातींमध्ये मुलगी जन्माला येणं म्हणजे त्या कुटुंबाचा आनंदोत्सव असतो. हा आनंदोत्सव स्त्रीत्वाच्या गौरवाचा नसतो, तर ती मुलगी उद्या नाचून, खेळ करून आपल्या कुटुंबाला जगवणार असते. वयात आली की लग्नासाठी नवर्‍याकडून भरमसाठ पैसे मागता येतात. म्हणून हा आनंदोत्सव साजरा केला जातो. मुलगी जितकी देखणी तितकी तिची किंमत जास्त. विक्रीची वस्तू म्हणूनच त्या मुलीकडे पाहिलं जातं. ही स्त्री जातीची अवहेलना आहे. तिची विटंबना आहे. पण विविध जमातींच्या बंदिस्त आणि पोलादी चौकटीत जगणार्‍या या स्त्रियांच्या व्यथा, वेदना दडपल्या जात आहेत. त्यांचा मानसिक कोंडमारा तसाच सुरू आहे.

पारंपरिक गावगाड्याची रचना आज पूर्णपणे बदलली आहे. पारंपरिक कला कौशल्यांवर आधारलेले या जमातींचे व्यवसाय कालबाह्य झालेले आहेत. त्यामुळे या जमातींना खेड्यात जगणं अशक्य होऊ लागलं आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून या विविध जमाती शहरांकडे येऊ लागल्या आहेत. झोपडपट्ट्यांमधून, रेल्वे स्टेशनजवळ आपल्या राहुट्या उभ्या करत आहेत. उदरनिर्वाहासाठी वेगवेगळे मार्ग शोधू लागल्या आहेत. परंतु शिक्षण नाही. आधुनिक ज्ञान-विज्ञानाची कौशल्ये आत्मसात केलेली नाहीत. परिणामी शहरी संस्कृतीमध्ये गुजराण करणे या जमातींना कठीण होऊ लागलं आहे. देशी दारूची विक्री करणार्‍या दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये काम करणे, भंगार-प्लास्टिक गोळा करणे यासारखी कामं या जमातींमधील लोकांना करावी लागत आहेत. कुठे कामच मिळत नसल्याने लहान मुलांना अफू पाजून पाठीला बांधून रेल्वे स्टेशन, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी या जमातींमधील स्त्रियांना भीक मागत फिरावं लागत आहे. असं असलं तरी या विविध जमातींमधील लहान मुलांना नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा येथील प्राथमिक शाळांतून घातले जात आहे. त्यातून ही मुलं शिक्षण घेत आहेत, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण होत आहे. त्यांना भारतीय राज्यघटनेची, लोकशाहीची ओळख होऊ लागली आहे. जातपंचायतीची पकड थोडी सैल होऊ लागली आहे. ही चांगली लक्षणं आहेत. परंतु तरी जातपंचायतीचा प्रभाव एकूणात मोठ्या प्रमाणावर आहे. त्याची अनेक उदाहरणं आपल्यााला वर्तमानपत्रातून, समाजमाध्यमातून दिसतात. जातपंचायतीच्या मुख्य बळी असलेल्या विविध जमातींमधील स्त्रियांबाबत विविध माध्यमातून, सामाजिक चिंतनातून आणि प्रशासकीय व राजकीय पातळीवरून अद्याप म्हणावी तशी चर्चा होताना दिसत नाही याची खंत वाटते.

विमल मोरे

इ-मेल : more_dm@ycmou.digitaluniversity.ac

फोन : ९८५०८ ७७५९२

_विमल मोरे भटक्या-विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका आहेत. ऑगस्ट २०१४ मध्ये पुण्यात पार पडलेल्या, महाराष्ट्रातील पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. मोरे यांचे लिखाण गुलबर्गा, गोंडवाना, मुंबई आदी विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नेमेले गेले आहे. 'तीन दगडांची चूल' हे त्यांचं आत्मकथन प्रसिद्ध असून त्याला विविध पुरस्कार मिळाले आहेत. 'पालातील माणसं' हा त्यांचा ललित लेख संग्रह प्रकाशित झाला आहे.

महाराष्ट्रातील भटक्या जमातींना सध्याच्या लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. वैशाली भांडवलकर यांच्या 'निर्माण' या संस्थेमार्फत त्यासंबंधी मदतकार्य सुरू आहे. विमल मोरे या संस्थेशी जोडलेल्या आहेत. मदतीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी ८२०८६०२२८३ या क्रमांकावर अथवा nirmansocial@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. आर्थिक मदत देण्यासाठी बँक खात्याचा तपशील खालीलप्रमाणे -_

Account Name. : Nirman Bahuuddeshiya Vikas Sanstha Account No. : 10542191010644 Bank : Oriental Bank of Commerce IFSC : ORBC0101054

दान रक्कम 80 G नुसार करातून सूट मिळण्यास पात्र आहे.