स्वत:ला रचितच जावे!

माध्यमांतर
या लेखात मिळून साऱ्याजणी मासिकाचे प्रतिनिधी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं झोकून देऊन काम करणाऱ्या प्रा. संदीप गिरासे यांनी एक वेगळी आणि आत्मपरीक्षणात्मक वाट उघडली आहे. स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोलताना ते स्वतःच्या अनुभवातून पुरुषी अहंकाराचे सूक्ष्म पैलू उलगडतात आणि पुरुषांना ‘पुरुषभान’ जागवण्याचं आवाहन करतात. समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी कायदे, चळवळी आणि उपक्रम महत्त्वाचे असले तरी प्रत्येक व्यक्तीनं स्वतःमध्ये बदल घडवून आणणं अधिक आवश्यक आहे, हे ते ठामपणे सांगतात. नारायण सुर्वेंच्या ओळींचा आधार घेत ते अधोरेखित करतात की सतत स्वतःला ‘रचित’ ठेवणे हीच खरी समतेकडे नेणारी शाश्वत वाट आहे. (पुरुष उवाच, दिवाळी 2024 मधून साभार.)
एका शाळेने ‘लिंगभावसमानता’ या विषयावर शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा घेण्यासाठी शाळेने दर्शनाताई पवार यांना निमंत्रित केले होते. या विषयावर माझं चांगलं लेखन-वाचन, असल्याने, तसेच या विषयांवर माझे विविध उपक्रमांचे संयोजन दर्शनाताई बघत असतात, म्हणून या कार्यशाळेत पुरुष सहकारी म्हणून माझ्या नावाची शिफारस ताईंनी केली होती. मला या विषयावर कार्यशाळा घेण्याची प्रथमच संधी मिळाली होती. ‘स्त्री-पुरुष समता’, ‘लिंगभावसमानता’ या विषयांवर प्रबोधन करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्या अशी संपूर्ण खानदेशात दर्शनाताईंची ओळख आहे. लोक त्यांना ऐकायला उत्सुक असतात. म्हणून कार्यशाळा घेतेवेळी मी ठरवून दर्शनाताईंना जास्त माईक देत होतो. अगदी एखादा फार्मात असलेल्या बॅटसमनला त्याचा पार्टनर स्ट्राईक देतो तसं! कारण विषय प्रभावीपणे समोर नीट पोहचणं हे जास्त महत्त्वाचं.
कार्यशाळेत या विषयावरचं माझं कंटेंट दर्शनाताईंना त्यांचा विषय प्रभावी समजवण्यासाठी पूरक असं छान जमत होतं. थोडक्यात, मी साथ जरी उत्तम देत होतो, तरी साहजिकच श्रेय दर्शनाताईंचं अधिक होतं. शिवाय कार्यशाळेत मला दर्शनाताईंच्या वलयाचं दडपण होतं हेही तितकंच खरं! आमचे सादरीकरण, नंतरच्या गटचर्चा, प्रश्नोत्तरे सर्वच प्रभावशाली झालं होतं.
इथपर्यंत माझा पुरुषी अहंकार सुप्तावस्थेत होता. कार्यशाळा आटोपल्यावर सहभागी पुरुष आणि महिला शिक्षक दर्शनाताईंना भेटून प्रतिक्रिया देत होते. ‘व्वा दर्शनाताई,खूप छान मांडणी केली तुम्ही!’, ‘जेंडर इक्विलीटीवर यापूर्वी आम्ही इतकं छान ऐकलं नव्हतं!’, ‘खरंच, तुम्ही सांगतात त्याप्रमाणे जर सर्व वागायला लागले तर स्त्रीपुरुष समता दूर नाही’, वगैरे वगैरे. नंतर माझ्याही जवळ येऊन, ‘सर, तुमचेपण मुद्दे छान होते हं!’ अशा कॉम्प्लिमेंटस देत होते. मी प्रत्येकाला तोंडदेखले ‘थॅँक्स’ म्हणत होतो. प्रत्येक कॉम्प्लिमेंटनंतर मला कॉम्प्लेक्स येत हेता. ‘तुमचेपण छान झाले’ या वाक्यामधला ‘तुमचेपण’ हा शब्द बोचत होता. आपण कुठेतरी दुय्यमस्थानी आहोत हे शल्य आणि त्याहून ‘पुरुष’ म्हणून कमीपणा वाटावी अशी किंचितशी शरम म्हणजे आपल्या पुढे एक स्त्री आहे! कार्यशाळेतल्या पुरुष शिक्षकांना आपल्याबद्दल काय वाटलं असेल असा अतिशयोक्त विचारही क्षणार्धात मनात येऊन गेला. कार्यशाळेत आपण थोडा स्वार्थीपणा करून, थोडे कौशल्य वापरून स्वतःला वरचढ सिद्ध करण्याचे पॉलिटीक्स करायला हवे होते, हाही अविवेक क्षणभर डोके वर काढून गेला.

स्वतःला थोडं भानावर आणलं. आपण स्वतःला फेमिनिस्ट म्हणवतो. लिंगभावसमानता आपल्याला पूर्ण कबूल आहे अशा तोऱ्यात वागतो - बोलतो, पण तरीही पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे पिढ्यान् पिढ्या हा पुरुष नावाचा ‘व्हायरस’ हा आपल्या व्यक्तिमत्वात सुप्तावस्थेत घर करून राहतो, जराही या व्यवस्थेच्या विरुद्ध वातावरण मिळताच, हा व्हायरस आपले अस्तित्व दाखवतो आणि पुरुषी अहंकाराचे व्हायरल इन्फेक्शन उमळते! अशा वेळी ‘पुरुषी अहंकाराला जाणीवपूर्वक शमवणे’, ही 'अँटीव्हायरस थेरपी’च डॅमेज कंट्रोलिंगचे काम करते. मग एखाद्या वकिलाप्रमाणे स्वतःच स्वतःची उलटतपासणी करुन घेऊन, स्वतःमधले दोष शोधून, स्वतःला दोषी ठरवून, असे दुर्वर्तन पुन्हा होणार नाही, अशी स्वतःची हमी घेत, स्वतःच जामीन देत, स्वतःला माफही करुन टाकले! नेहमीप्रमाणे! स्वतःची फेमिनिस्ट म्हणून घडण करताना, पिढ्यादरपिढ्या स्वभावात भिनलेलं ‘प्रथम पुरुषी राजकारण’ आपल्या आचरणातून धीरेधीरे का होईना पण निघत चाललंय याचा सुखद साक्षात्कार मला झाला, आणि मग मीच मला ‘शाब्बास’ अशी कॉम्प्लिमेंट दिली!
असो, तर एक पुरुष म्हणून दीर्घकाळापर्यत आपली झालेली जडणघडण ही आपल्यातला पुरुष जागं करण्याचं आणि आपला विवेक खिळखिळा करण्याचं काम नियमित करीत असते. कारण कुठल्याही क्षेत्रातल्या स्त्री-स्त्री स्पर्धा, स्त्री स्पर्धा या सर्व वरवर सारख्याच वाटणाऱ्या स्पर्धाच असल्या तरी प्रत्येक स्पर्धेतले डावपेच मात्र वेगवेगळे असतात, यशापयश पचविण्याचा समजूतदारपणा हादेखील सारखा नसतो. विशेषत: पुरुष आणि स्त्री यांच्यामधील स्पर्धेच्या नियमांमध्ये पुरुषसत्ताक व्यवस्था बळकट करणारे अदृष्य दहशतीचे राजकारण हस्तक्षेप करत असते. पुरुष-स्त्री स्पर्धेत पुरुष जिंकल्यावर त्याला विशेष गौरविले जात नाही, पुरुषाची सरशी झाल्यावर स्त्रीची फारशी नाचक्की होत नाही. याउलट स्त्री सरस ठरत असेल तर ‘पुरुषासारखा पुरुष असूनही’ अशी हेटाळणी होईल, ही भिती पुरुषाला असते. शिवाय, पुरुषापेक्षा सरस ठरलेल्या अशा स्त्रीचा ‘लार्जर दॅन अचिव्हमेंट’ गौरवही केला जातो. एकाच क्षेत्रात दोन्हीच्या क्षमतांचे अशा प्रकारे मूल्यमापन करणं म्हणजे स्त्री-पुरुष समतेमधील दरी आणखी वाढवणं होय.
समता साधण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची, सोबत नेण्याची, निकोप बरोबरी मानण्याची प्रगल्भता येणे गरजेचे आहे. पण हे बोलायला जेवढे सोपे आहे, तेवढेच आचरणे कठीण. विशेषत: पुरुषांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजे. सर्वात आधी त्याला आपण पुरुषप्रधान व्यवस्थेचे लाभार्थी असलो तरी ही व्यवस्था आपल्याला समृद्ध जीवन जगण्यापासून दूर नेणारी, स्त्रियांच्या शोषणावर आणि आपल्याही दमणावर आधारलेली व्यवस्था आहे, याची नम्र जाणीव असायला हवी. आपल्याला पुरुष म्हणून मिळणारे लाभ हे स्त्रियांच्या शोषणावर किती अवलंबून आहेत याचं चिंतन प्रत्येक पुरुषानं करायला हवं. त्यासोबत आपल्याला असणाऱ्या मानसिक ताणांपैकी किती ताण हे आपण केवळ पुरुष आहोत म्हणून आहेत हेही त्याने शोधायला हवेत. पूर्वापार चालत आलेली स्त्री-पुरुषांच्या कामांची आणि जबाबदाऱ्यांची विगतवारी आहे तशीच पुढे नेताना आपण विषमतेचे वाहक तर होत नाही ना, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. रुढी, परंपरा, संस्कृती वगैरे गोंडस नावाखाली आपण आपली आई, बहीण, बायको, मुलगी आणि एकूणच समस्त स्त्रियांकडून आचार-विचार- पेहरावाच्या कोणत्या फाजील अपेक्षा ठेवतो, देवाधर्माच्या नावाखाली त्यांना किती अंधश्रद्धांचे निरर्थक पालन करायला लावतो, त्यांच्या शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक शोषणाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती जबाबदार आहोत या सर्वांची प्रामाणिक उत्तरे पुरुषांना अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ही अस्वस्थताच तुमच्यातल्या पुरुषाला संवेदनशील माणूस बनवेल! मग यावरचे उपाय शोधणे आणि त्यानुसार आचरण सुरु करणे तुमचे आयुष्य समृद्ध करतील. शेवटी समृद्ध आयुष्य म्हणजे असते तरी काय, आयुष्यात येणाऱ्या समस्यांना विवेक शाबूत ठेवून तोंड देत राहणे, व्यवहार्य उपाय शोधत राहणे, परिणामांचा सहज स्वीकार करणे, आणि अस्वस्थता कमी करून मनःशांती मिळवणं होय.
सध्या तर दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना बघून महिला सक्षमीकरण, स्त्रीमुक्ती या प्रयत्नांसोबत समाजात पुरुषभान रुजविण्याचे महत्त्वही तेवढ्याच तोलामोलाचे वाटते. कुठेही महिला अत्याचाराची घटना घडल्यावर त्यातील सहभागी पुरुष आरोपींबद्दल समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटतात. एक पुरुष म्हणून माझी मान खाली जाते. कारण या घटनेतील आरोपी पुरुष ज्या व्यवस्थेत घडवला आहे, मीही पुरुष म्हणून त्याच व्यवस्थेचा लाभार्थी आहे. या व्यवस्थेने पुरुषांना स्त्रियांपेक्षा तुलनेने अधिक आराम, अमर्याद अधिकार आणि वर्चस्व बहाल केलेले आहेत. म्हणून सदैव पुरुष म्हणूनच वावरणं ही पुरुषांनी पुरुषांसाठी केलेली सोय आहे. जन्माने पुरुष आहे या एकमेव निकषावर सर्व पुरुषांची जडणघडण होतांना स्पेशल ट्रीटमेंट मिळत आली आहे, त्यामुळे त्यांचा मेल इगो देखील बळावतो. सदैव लाभार्थी झोनमध्ये वावरतांना पुरुषांचे पुरुष म्हणून साचणे आणि बिघडणे सुरुच आहे. कुठेतरी या घटनांमधील आरोपींमध्ये पुरुषाला निव्वळ पुरुष म्हणून साचवणारी संस्कृती मुळाशी आहे हे जाणवते. पुरुषाची गुणवत्ता आणि क्षमता विचारात न घेता सरसकट त्याला मिळालेल्या लाभांसोबत अनेक जबाबदाऱ्यांचे दडपणही त्याच्यावर आहे. बऱ्याचदा या जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता नसल्याने तो पुरुषपणाच्या ओझ्याखाली दाबला जातो. त्याची ही घुसमट व्यसनाधीनतेने आणि हिंसेने तो शमन करु पाहतो, नाही तर आत्महत्या करून व्यवस्थेला शरण जातो. पुरुषाला ‘मर्द’ म्हणून घडवू पाहणारी व्यवस्था पुरुषाला कमजोर करून संपविते. आत्महत्या करण्यात स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण कितीतरी अधिक आहे हे जेवढे विदारक सत्य आहे, तेवढेच या व्यवस्थेने आजपर्यंत कितीतरी स्त्रियांच्या व्यक्तिमत्वांची हत्या केली आहे हे वास्तव त्यापेक्षा भीषण आहे.

प्रत्यक्षात स्त्री अत्याचाराच्या घटनांनंतर त्या पुरुष आरोपीवर जेवढी कठोरातली कठोर कायदेशीर कलमे लावण्याची मागणी केली जाते, तेवढीच कठोर अपेक्षा समाज स्त्रियांनी अजून बंधनात राहण्याची करतो. आरोपी पुरुषांना शिक्षा होणे रास्त आहेच, पण निरपराध स्त्रियांवर बंधनांची अपेक्षा करणं म्हणजे त्यांनाही ती एक प्रकारची शिक्षाच असते. पुरुषभान जागवण्याच्या ऐवजी नेमक्या याच वेळी पुरुष मानसशास्त्र दुर्लक्षलं जातं. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली स्त्रियांना सवलती देण्याचा फार्स करणं, स्त्रियांचा प्रासंगिक सन्मान करणं, लेडीज फर्स्टचा शहाजोगपणा करणं, हे सर्व तकलादू आणि विस्कळीत उपचार म्हणजे स्त्रीचे दुय्यमत्व सिद्ध करण्याचे पुरुषी राजकारणाचे कावे आहेत. अशा घटनानंतर स्वतःमध्ये कुठलाही वर्तन बदल न करता, तिचे गुणगाण करून तिचेच शोषण करत, आपले वर्चस्व अबाधीत ठेवण्याची सोय पुरुषच करून घेतो आणि स्वतःचे बिघडणे सुरूच ठेवतो.
आत्मस्तुतीचा धोका पत्करून माझी पुरुषभानाची वाटचाल सांगावीशी वाटते. मी घरापासून सुरुवात केली. सर्व प्रकारची घरकामे करणं, स्वयंपाक करणं, मुलांच्या पालकत्वात सहभाग वाढवणं, स्त्रियांवरील विनोद टाळणं, मुलगा आणि मुलगी दोन्ही पाल्यांवर समताधिष्ठित संस्कार करणं, जोडीदारासोबत सर्व कामांची विभागणी समसमान करण्याचा प्रयत्न करणं, क्षमतामर्यादांमुळे अगदी तंतोतंत विभागणी जमत नाही, पण एकमेकांच्या कामांचा आदर बाळगणं, असे कितीतरी पुरुषभानाचे प्रयोग करता करता ते सर्व जीवनशैलीचा भाग बनले. घरात आपल्या नियंत्रणाखाली असणाऱ्या परिस्थितीमुळे या प्रयोगांचे मिळणारे सकारात्मक रिझल्ट सुखावत राहतात. आपल्या वागण्याबोलण्यातलं पुरुषी राजकारण हद्दपार होत जातं. घरापासून सुरु झालेली वाटचाल बाहेरच्या जगात आपल्याला सुजाण नागरीक बनवते. स्त्रियांच्या कामांची आणि कष्टांची अनुभूती घेतल्याने आपण संवेदनशील बनत जातो.
तसं बघायला गेलं तर प्रत्येक पुरुष हा संवेदनशील असतोच. आई, बहीण, बायको, मुलगी ही सर्व नाती त्याची संवेदनशीलता जपत राहतात. स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी तोही मनापासून रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलनात त्याचा आक्रोश व्यक्त होतो. त्याचा हा आक्रोश म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, वरवर रुक्ष भासणऱ्या त्याच्या हृदयात तुडुंब भरलेली संवेदनशीलता असते. या संवेदनशीलतेवर फक्त पुरुषभानाच्या मशागत केल्यास सगळं समाजशिवार स्त्री-पुरुष समतेने बहरल्याशिवाय राहणार नाही!
यामध्ये स्त्रियांचीही जबाबदारी महत्त्वाची आहे. स्त्रियांना आई म्हणून मुलाला बालपणापासून संस्कारीत करण्याची संधी मिळालेली असते. प्रत्येक स्त्रीने ‘श्यामची आई’ बनून मुलाला श्यामसारखं संवेदनशील पुरुष म्हणून घडवण्याचा गृहपाठ कसोशीने करायला हवा. मुलांना संवेदनशील घडवणे ही आता केवळ कौटुंबिक जबाबदारी राहिली नसून सामाजिक जबाबदारी बनली आहे.
समता प्रस्थापित करण्यासाठी कायदे, सरकार, पुरोगामी संघटना आणि स्त्रीवादी चळवळी यांचे विधायक प्रयत्न त्यांच्यापरीने कमीअधिक गुणदोषांसह सुरु आहेतच, पण केवळ त्यांच्यावर अवलंबून न राहता प्रत्येक स्त्री-पुरुष, प्रत्येकाने स्वतःमध्ये वर्तनबदल करणं गरजेचं आहे. पुरुषांना प्रयत्नांची अधिक गरज आहे, कारण पुरुषांना पुरुषसत्ताक व्यवस्थेचे लाभार्थीपण सोडावे लागेल आणि केवळ पुरुष म्हणून प्रवाहपतित आयुष्य जगणे त्यागावे लागेल. अशा वेळी नारायण सुर्वेच्या एका कवितेच्या ओळी हा प्रवाहपतितपणा नाकारण्याचा आणि स्वत:ला ‘रचत’ ठेवण्याचा विवेक शिकवतात- कळप करुन ब्रम्हांडात हंबरत हिंडलो नाही.
स्वतःला रचितच गेलो; ही सवय गेलीच नाही...! पुरुषभान जागवणं हा पुरुषाला स्वतःला माणूस रचण्याचा, समाजाला समतेच्या दिशेने नेण्याचा, दिवसेंदिवस विषमतेने खालावत जाणाऱ्या व्यवस्थेवर हमखास यशस्वी आणि शाश्वत उपचार आहे.