Our Souls at Night
"माझ्या घरी रात्री झोपायला यायला तुला आवडेल का? It’s not about sex. मला एकटं वाटतं. तुलाही वाटत असेल कदाचित. It's about getting through the night you know. Nights are the worst. मला फक्त कोणीतरी सोबत हवंय. बोलायला, बोलत बोलत झोपायला". सत्तरीच्या जवळपास पोहोचलेली अॅडी तिच्याच वयाचा तिचा शेजारी ल्युईसशी बोलत होती. दोघे वर्षानुवर्षे शेजारी, पण कधी बोलणे नाही. दोघांचे जोडीदार आता या जगात नाहीत, मुले मोठी झाली आणि आपापल्या संसारात, आयुष्यात रमली. आपापल्या घरात एकटेपणाचं आयुष्य जगणारे हे दोन म्हातारे. ल्युईसला अॅडीने अचानक केलेली ही विनंती खूप विचित्र वाटते. तो विचार करायला वेळ घेतो आणि काही दिवसांनी मागच्या दराने रात्री अॅडीच्या घरी झोपायला जायला लागतो. एकमेकांच्या आवडीनिवडी, मुलंबाळं, तरुणपणीचे दिवस यावर बोलत दोघे रोज एकाच बेडरूममध्ये झोपायला लागतात. मागच्या दराने सुरु झालेला ल्युईस आणि अॅडीचा हा प्रवास कसा हळू हळू पुढच्या दराने होतो आणि अनेक वर्षे एकाकी आयुष्य जगणाऱ्या या दोन म्हाताऱ्याचं नातं कसं खुलत जातं यावर हा सिनेमा 'Our Souls at Night'.
काही दिवसांपूर्वी मित्रमंडळींच्या एका ग्रुपमध्ये या सिनेमाबद्दल कोणीतरी थोडं लिहिलं होतं. अनेक वर्ष एकटं राहून आलेला एकटेपणा जावा आणि घरात आपल्यासोबत रात्री कोणीतरी आहे, आपण एकटे नाही, केवळ ही भावना यावी म्हणून आपल्या शेजाऱ्याला 'रात्री फक्त झोपायला ये' अशी विनंती करणाऱ्या अॅडीचे फीलिंग्स किती साहजिक आहेत आणि या भावनेतून आपणदेखील किती वेळा गेलो आहोत याची जाणीव हा सिनेमा पाहताना अनेकांना होईल. गेली जवळपास दोन वर्ष आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी ही भावना मनात आली असेल. वेगात चालणारी शहरंच्या शहरं कशी एकदम बंद होतात, रस्ते सुनसान होतात, रात्री भयाण शांत होतात, आपल्याच लोकांना भेटायची भीती वाटते, खूप वर्षांनी भेटणाऱ्या प्रेमाच्या व्यक्तीला एअरपोर्ट किंवा रेल्वेतून उतरल्यावर घट्ट मिठी मारण्याची कितीही इच्छा असली तरी ती मारता येत नाही, हातात हात घेण्याची पण भीती वाटते, म्हाताऱ्या आई बाबांना आपल्यामुळे इन्फेक्शन नको म्हणून भेटी टाळाव्या लागतात आणि हे सगळं होत असताना मृत्यूची एक टांगती तलवार डोक्यावर फिरते. कोरोनाच्या काळात आलेला एकटेपणा नेहमीच्या, रोजच्या एकटेपणापेक्षा नक्कीच वेगळाय. लोकडाऊन आणि त्या नंतरच्या काळात घरात बंद झालेल्या आणि एकट्या राहणाऱ्या लोकांच्या मनात होणारी गलबल भयानक आहे. मी त्यातून गेली आहे म्हणून त्याची तीव्रता मला जास्त कळतीये. 'आर्मि ऑफिसरशी लग्न केलंस तेव्हाच तुला माहित होतं एकटं राहावं लागेल', असं खूपवेळा ऐकायला मिळतं पण या काळात एकटं राहणं किती अवघड आहे हे केवळ एकटं राहणारा माणूसच समजून शकेल. अर्थात आर्मि वाइफ म्हणून एकटं राहणं, नवऱ्याला सहा महिन्यातून एकदा भेटणं, सतत डोक्यात नवरा सुरक्षित आहे ना, बॉर्डरवर सगळं शांत आहे ना याचं टेन्शन असणं या वेगळ्या गोष्टी असतातच, पण कोरोनाच्या काळात हे सगळं अधिक प्रकर्षानं जाणवलं. त्याच काळात मला कोरोना झाला आणि नवरा नेटवर्कमध्ये नाही, मला काही झालं तर तो येऊ शकेल का? तो जवळ असता तर गोष्टी किती सोप्या आणि bearable झाल्या असत्या अशा अनेक गोष्टी डोक्यात नाचत होत्या. अर्थात अशावेळी आई, बाबा, बहीण, तिची मुलं, मावश्या या सगळ्यांचा आधार असतोच पण as they say, we all have our own battles. आणि या लढाईत तुमच्या माझ्यासारखे अनेक आहेत.
मागच्या महिन्यात अनिकेत भेटला. बोलता बोलता विषय निघाला आणि तो म्हणाला, "मला कोरोना होऊन गेला. मुंबईत एकटाच राहतो अशा वेळी आई बाबांना पुण्याला सांगितलं असतं तर त्यांना टेन्शन आलं असतं म्हणून नाही सांगितलं. इतकं अवघड होतं ते १५ दिवस घरात डांबून राहणं. मी रोज रडायचो, संध्याकाळ झाली की रडू यायचं. रिकामं घर खायला उठायचं. एरव्ही कसाही वेळ निघून जातो ग, घराच्या त्या रिकाम्या भिंती अंगावर येत नाहीत. पण त्या पंधरा दिवसात मी पुरता हलून गेलो होतो. कोणीतरी यावं आणि मिठी मारावी अगदी असं वाटत होतं". अनिकेत सांगत होता आणि त्याच्या त्या सगळ्या भावना मला माझ्या वाटत होत्या कारण हेच सगळं माझ्यासोबत झालं होतं. संध्याकाळ झाली की एकटं वाटणं, काही कारण नसताना डोळ्यात पाणी येणं. कोणीतरी हात धरावा, जवळ बसावं असं वाटणं. आणि किती साहजिक आहे हे. After all we humans are social animals. आपल्या सगळ्यांना कोणा ना कोणाची गरज आहे. जवळ बसायला, हात धरायला, ऐकायला, बोलायला, अगदी नुसतं घर शेअर करायला! मी तर कधी संध्याकाळी पण घरात बसत नाही. संध्याकाळी बाहेर पडणं, आकाशाचा सेकंदा सेकंदाला बदलत जाणार रंग पाहणं, अगदीच काही नाही तर रस्त्यावरची गर्दी, घरी जाणारी लोकं पण पाहायला आवडतं मला. अशा माणसाला हे दिवस किती भयानक वाटत असतील.
लहानपणाची मैत्रीण शाल्वी, सध्या अमेरिकेत असते. दोन वर्षांपूर्वी तिला मुलगी झाली. बाळ सहा महिन्यांचं असताना ती भारतात येऊन गेली आणि मग कोरोना आला आणि लॉकडाऊन लागलं. आता तिची मुलगी अडीच वर्षांची झाली पण शाल्वीच्या आईला काही केल्या नातीला भेटता येत नाहीये. फ्लाईट बंद झाल्या आणि शाल्वी अमेरिकेत आणि काकू भारतात अडकल्या. एकुलत्या एका मुलीला, नातीला भेटता न येणं हे किती अवघड आहे; आणि अशा काळात जेव्हा आजूबाजूला इतकी जीवितहानी आहे, कशाचीच शाश्वती नाही, तेव्हा हे सगळं अधिक कठीण वाटतं. माझा भाचा आणि भाची तीन वर्षांचे आहेत. शाळेत जायची वेळ आली पण शाळेत जात येत नाही. बाहेरच्या जगात हे नक्की चाललंय काय याची काहीच कल्पना नसलेले ते दोघे चिमुकले घरात बसून बसून आता चिडचिडे झाले आहेत. कुठे फिरायला घेऊन जायची, सोसायटीमध्ये खाली मुलांमध्ये खेळायला घेऊन जायचीपण भीती वाटते. कुठून बाहेरून आलं की दोघे घरात येताच सेनिटायझर हाताला लावायला हात पुढे करतात. इतकं अंगवळणी पडलंय दोघांच्या ते. आजूबाजूला मास्क लावून फिरणारे लोक पाहून हे असंच असतं, बाहेर जाताना मास्क लावतातच असा समज झालाय त्यांचा. या काळात लहान मुलांचं झालेलं नुकसान न भरून निघणारं आहे. आणि याला कोणत्याच देशाचा अपवाद नाही. सगळ्या देशांची सारखीच परिस्थिती. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या एका मोठ्या वर्तमानपत्राच्या एका महिला पत्रकाराने लिहलेली पोस्ट वाचली. अमेरिकेत मास्क न घालणारे लोक, गर्दी करून फिरणारे लोक, वाढत चाललेले रुग्ण आणि घरात सतत कोरोनाचाच विषय यातून आलेली हतबलता तिने या पोस्टमध्ये लिहली होती. ते वाचलं आणि वाटलं ही निराशा केवळ आपली नाही. आपल्यासारखे अनेक आहेत जे या त्रासातून, हतबलतेतून जात आहेत.
ऑफिसमधली माझ्याच वयाची सहकारी पूजा. पुण्यात एकटी राहणाऱ्या पूजाला कोव्हिडच्या सगळ्यात भयानक दुसऱ्या लाटेत कोरोना झाला आणि काही दिवसातच दिल्लीत राहणाऱ्या तिच्या आई बाबांनादेखील कोरोनाची लागण झाली. आई व्हेंटिलेटर होती आणि काही दिवसातच गेली. सख्खा भाऊ अमेरिकेत असल्याने येऊ शकला नाही मग पूजाच पुण्याहून दिल्लीला गेली. दोन वर्ष ती आईला भेटली नव्हती आणि आईच्या शेवटच्या काळातदेखील ती आईला भेटू नाहीच शकली. कधी वेळ मिळाला आणि आम्ही दोघीच असू तेव्हा ती मन मोकळं करून बोलते. आणि मग मला इरफानचा Life of Pie मधला डायलॉग अगदी लख्ख आठवतो,
I suppose in the end, the whole of life becomes an act of letting go. But what always hurts the most is not taking a moment to say goodbye.
जाणाऱ्या माणसाला आपण शेवटचं बघूच नाही शकलो, भेटूच नाही शकतो हे दुःख कदाचित माणसं जाण्याच्या दुःखापेक्षा भयानक असावं. आपल्या आजूबजूला पूजासारखे अनेक आहेत. या काळात प्रत्येकाने काही ना काही गमावलंय. हा काळ आपल्या सगळ्यांसाठी भयानक होता. मानसिक आरोग्याच्या कधी नव्हे इतक्या समस्या या काळात पुढे आल्या आहेत आणि येत राहतील. बाहेरून सुदृढ, आनंदी आणि अगदी नॉर्मल दिसणारी व्यक्ती आत किती वादळं घेऊन जगतीये याची कल्पना नसते आपल्याला. काही दिवसांपूर्वी तन्मय त्याच्या संस्थेने कोव्हिड काळात सुरू केलेल्या मानसिक आरोग्य हेल्पलाईनबद्दल सांगत होता. मनात जे काही आहे ते आमच्याशी बोला. भीती, दुःख, राग सगळं बोलून टाका, अशा विचारातून सुरू केलेली ही मोफत हेल्पलाईन. फक्त शहरी भागातून नाही तर ग्रामीण भागातूनही या हेल्पलाइनला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सगळ्या वयोगटातील लोकांनी संपर्क साधला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. घर सांभाळणारी गृहिणी असेल, म्हातारा माणूस असेल किंवा हॉस्पिटलमध्ये रोज होणारे मृत्यू पाहणारा वार्डबोय. कोणीतरी आपण जे बोलतोय ते ऐकणार आहे, समजून घेणार आहे, धीर देणार आहे, केवळ आणि केवळ इतकंच अपेक्षित आहे, पण ते पण किती महत्त्वाचं आहे! लढाया शेवटी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. तुझी लढाई तुझीच आहे, माझी माझीच आहे, ती माझी मला आणि तुझी तुलाच लढायची आहे पण या प्रवासात मी तुझ्या सोबत आहे, तू एकटा नाहीस, हा विश्वासचं हवा असतो कदाचित आपल्याला. We all need that outlet.
पण या काळात आपण जितकं गमावलं त्याहून अधिक कमावलं असं मला वाटतं. याच वेळी कदाचित आपल्याला कधी न समजलेली आपल्या लोकांची किंमत समजली असावी. कोणाला कोविड झाल्यावर मदतीला धावून येणारा मित्र नव्याने समजला असेल, कोणाला डबा देणारा, विचारपूस करणारा शेजारी मिळाला असेल तर कोणाला फोनवरून धीर देणारे डॉक्टर्स मिळाले असतील. रोज भेटणारे, एकाच घरात राहणारे आपण एकमेकाला किती ग्रांटेड घेतो याची जाणीव झाली असेल. वाट्याला येणारा प्रत्येक दिवस किती महत्वाचा आहे आणि तो किती छान जगता यायला पाहिजे याची जाणीव झाली असेल. ऑक्सिजन सिलेंडरसाठी लागलेल्या लांबच्या लांब रांगा बघून प्रत्येक श्वासाची किंमत समजली असेल. दुसरीकडे वर्षानुवर्षे लोकलच्या गर्दीत, रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये अडकून या सगळ्याला शिव्या घालणारे आपण, ते सगळं बरं होतं, त्यात कितीतरी स्वातंत्र्य होतं, त्यात शेजारी उभा माणूस खोकतोय, त्याने मास्क नाही लावला, रस्त्यावरची गर्दी अंगावर येतीये या सगळ्याची एक विचित्र भीती तरी नव्हती. एअरपोर्ट मधून बाहेर पडणाऱ्या नवऱ्याला बघताच क्षणी घट्ट मिठीत घेण्याची मुभा होती. घरातल्या लहान बाळांच्या मनसोक्त पप्प्या घेण्याआधी विचार करावा लागत नव्हता. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींतदेखील किती आनंद आणि स्वातंत्र्य होतं हे आता समजतंय.
या काळात ज्याने माणसे कमावली तो खरा श्रीमंत. हाकेला धावून येणारी, रात्री अपरात्री सोबत देणारी, खूप बोलायचंय म्हणून केवळ शांत बसून ऐकून घेणारी, धीराचे आणि प्रेमाचे चार शब्द बोलणारी, आणि काहीच नाही तर केवळ जवळ राहणारी. हे सगळंच अमूल्य आहे. इतकं साधं, सोपं पण खूप गरजेचं! कोरोनानंतरचं जग वेगळं असेल. कोरोनानंतरचे आपणही वेगळे असू. एकमेकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा असेल. कदाचित आपण अधिक सामावून घेणारे, समजून घेणारे, अधिक प्रेम करणारे, चूक झाली तर माफी मागणारे, माफ करणारे, उद्याची वाट न पाहता, जे आहे ते आज, आत्त्ता, इथे आहे म्हणून मनातलं बोलून टाकणारे असू. आणि असंच असायला हवं! प्रत्येक क्षण जगता यायला हवा, प्रेम व्यक्त करता यायला हवं. या अवघड काळातल्या एकटेपणाने मला खूप शिकवलं, माणसं कळली, कुटुंबाची ताकद आणि प्रेम किती सहज दुर्लक्षित करतो आपण, आई बाबांच्या काळजीपोटी येणाऱ्या फोनची किती पटकन चिडचिड व्हायची आपल्याला पण हेच तर खरं सुख आहे. फोन करणारी, काळजीने बोलणारी माणसे आहेत हे किती मोठं भाग्य आहे. या प्रवासात खूप जणं आपल्याला अर्ध्या रस्त्यात सोडून गेली आहेत. अनेकांनी जवळची माणसं गमावली आहेत. या जखमा भरून निघायला वेळ लागेल. म्हणूनच एकमेकांचा हात धरुया, प्रेमाचे चार शब्द बोलूया, उध्वस्थ झालेल्यांना धीर देऊया. इथे प्रत्येकजण आपापल्या लढाया लढतोय, ज्याची तुम्हाला मला काहीच कल्पना नसेल, म्हणून त्या प्रत्येकाशी प्रेमाने वागूया. कोणा ना कोणाचं outlet बनायचा प्रयत्न करूया!
अमृता शेडगे
amruta.shedge1989@gmail.com
चित्र : अमृता शेडगे