थोडे जनातले, थोडे मनातले
जागतिकीकरण, वाढतं स्वकेंद्रित जगणं, नात्यांमधला दुरावा, समाजात वाढत चाललेली असहिष्णुता आणि माणसाच्या संवेदनशीलतेवर येत असलेला ताण या सगळ्या वास्तवाकडे अत्यंत डोळसपणे पाहणारे डॉ. अश्विनी धोंगडे यांचे ‘थोडे जनातले, थोडे मनातले’ हे वैचारिक ललित लेखांचं पुस्तक वाचकांना अंतर्मुख करणारं आहे. नीना भेडसगावकर यांनी लिहिलेल्या या परीक्षणात ‘जाऊ दे मला काय त्याचं’, ‘काही बोलायचे आहे’, ‘आई बदलते आहे’, ‘ऐसी कळवळ्याची जाती’ यांसारख्या लेखांमधून लेखिकेने सार्वजनिक बेफिकिरी, मोबाईलमुळे कमी होत चाललेला संवाद, बदलतं पालकत्व आणि माणसाच्या हरवत चाललेल्या संवेदनशीलतेचा घेतलेला वेध उलगडून दाखवला आहे. सामाजिक वास्तव, मानवी नातेसंबंध आणि प्रेम, करुणा, सहानुभूती यांसारख्या मूल्यांची गरज नव्याने जाणवून देणारं हे लेखन वाचकांना स्वतःकडे आणि समाजाकडे अधिक सजगपणे पाहायला भाग पाडतं.
डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या वैचारिक ललित अशा १२ लेखांचा हा संग्रह वाचकांच्या भेटीला आला आहे.
अश्विनी धोंगडे या प्रामुख्याने स्त्रीवादी कवयित्री-लेखिका म्हणून ओळखल्या जातात. ‘स्त्रीसूक्त’, ‘अपौरुषेय’, ‘बाई डॉट कॉम’ असे अनेक कवितासंग्रह तसेच कथा, कादंबरी, समीक्षा, प्रवासवर्णन अशा साहित्याच्या अनेक प्रांतांतील विपुल आणि दर्जेदार लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
प्रस्तुत वैचारिक ललित लेखांच्या संग्रहातील त्यांचे सामाजिक विषयांवरील लेखन वाचकांना विचारप्रवृत्त करणारे आहे.
जागतिकीकरणानंतर आपले सर्वांचे आयुष्य झपाट्याने बदलले असून शांतता, माणुसकी, सहकार्याची भावना समाजातून ओसरली आहे व माणसे स्वयंकेंद्री झाली आहेत, असा अनुभव आपल्याला येतो.
वृत्तपत्रातून किंवा इतर माध्यमांतून येणाऱ्या बातम्यांमधून धार्मिक आणि जातीय संबंधातील तेढ, विद्वेषाची तीव्र भावना, विध्वंस, अत्याचार, बलात्कार, हिंसाचार यांचे थैमान दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात चालू आहे, हे आपण वाचतो, पाहतो आहोत. जगात सुरू असलेल्या युद्धांच्या भग्नावशेषांचे फोटो आणि मृतांच्या चार-पाच आकडी संख्या ऐकताना मन दुःखाने आणि भीतीने अगतिक होऊन जाते.
या सर्व पार्श्वभूमीवर ‘दुरितांचे तिमिर जावो’ या भावनेतून वाचकांच्या संवेदना जागृत करण्यासाठी हे लेखन केल्याचे लेखिकेने प्रस्तावनेत सांगितले आहे.
‘ऐसी कळवळ्याची जाती’, ‘संस्कृती कूस बदलते आहे’, ‘जाऊ दे मला काय त्याचं’, ‘असहिष्णुतेच्या फुफाट्यात आजची स्त्री’ असे यातील लेखांचे विषय जरी वेगवेगळे असले तरी एकाच अंतःसूत्राने ते एकमेकांशी जोडलेले आहेत.
‘जाऊ दे मला काय त्याचं’ या लेखात सार्वजनिक जीवनातील आपल्या बेफिकीर व बेजबाबदार वागण्याकडे लेखिकेने आपले लक्ष वेधले आहे; तर ‘काही बोलायचे आहे’ सारख्या लेखात मोबाईलच्या आहारी जाऊन आभासी जगात रमणाऱ्या आणि प्रत्यक्ष माणसांशी, कुटुंबियांशी, घरातील ज्येष्ठांशी संवाद टाळून त्यांना एकटे करणाऱ्या मोबाईलधारकांनाही तिने सावध केले आहे.
‘आई बदलते आहे’ या लेखात आजची आई वरकरणी कितीही पोशाखी झालेली दिसत असली, तरी पूर्वीच्या आयांपेक्षाही सक्षमपणे आणि डोळसपणे मुलांचे पालकत्व करताना दिसते आहे, असे निरीक्षण लेखिकेने नोंदवले आहे.
‘ऐसी कळवळ्याची जाती’ हा या संग्रहातील एक महत्त्वाचा लेख असून त्याचा रोख माणसाच्या संवेदनशीलतेकडे आहे. दुसऱ्याच्या सुख-दुःखाची जाणीव होऊन दया, करुणा, सहानुभूती, प्रेम यांनी मन भरून येणं, अशी माणसाच्या मनातील संवेदनशीलता नष्ट होऊन केवळ स्वार्थ आणि सूडबुद्धी उरली आहे की काय, असे रोजच्या बातम्यांतून दिसते आहे.
असंवेदनशील माणसे किंवा त्यांचा समूह हा त्यांच्या मनातील कटुता, मत्सर आणि स्वसामर्थ्याच्या दुराभिमानामुळे युद्धे कशी उभी करतो आणि युद्धे सर्वनाश कसा घडवून आणतात, हेही यातून समोर येते.
म्हणून संवेदनशीलतेच्या पायावर माणसाने पुन्हा एकदा प्रेम करायला शिकले पाहिजे. कारण शेवटी जग हे प्रेमावर चालते, द्वेषावर नाही. हा जुना पण खरा निष्कर्ष लेखिकेने वाचकांपर्यंत पोहोचवला आहे.
यातील प्रत्येक लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. कारण त्या त्या विषयातील नेमकी व विस्तृत माहिती वाचकांना मिळते.
पुस्तकात निरनिराळ्या ठिकाणी अर्थपूर्ण अशा सुभाषितांपासून ते आधुनिक कवितेच्या ओळी गरजेप्रमाणे आल्या आहेत. तसेच, लेखिका इंग्रजीच्या प्राध्यापक असल्यामुळे प्रसंगोपात इंग्रजी साहित्यातील संदर्भही सहजपणे आले आहेत. उदा. शेक्सपिअरच्या ‘ज्युलियस सिझर’ या नाटकातील प्रसंग किंवा सुप्रसिद्ध कृष्णवर्णीय कवयित्री माया अँजेलो, कॅनडातील नोबेल पारितोषिक विजेत्या कथालेखिका ॲलिस मन्रो. अशा माहितीपूर्ण संदर्भांमुळे वाचकाचा वाचनानंद नक्कीच द्विगुणित होतो.
--
‘थोडे जनातले, थोडे मनातले’ - अश्विनी धोंगडे पृष्ठसंख्या : १६० प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे किंमत : रु. २४०/-