भारतातील आरोग्य क्षेत्राची पायाभरणी करणाऱ्या राजकुमारी अमृत कौर
न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध 'टाइम' नियतकालिकाने पहिली ७२ वर्षे 'मॅन ऑफ द इयर' म्हणून मुखपृष्ठ केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की हा महिलांबाबत भेदभाव होत आहे.१९९९पासून त्यांनी 'पर्सन ऑफ द इयर' असा बदल केला.अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी त्यांनी १९२०ते २०२० मधील जागतिक स्तरावरील प्रभावशाली १०० महिलांची यादी जाहीर केली.त्या यादीत दोन भारतीय महिलांचा समावेश होता.१९४७ साली राजकुमारी अमृत कौर व १९७६ साली इंदिरा गांधी यांना गौरविण्यात आले. कोण होत्या या राजकुमारी अमृत कौर?
भारतीय संविधान सभेत विशेष भूमिका बजावणाऱ्या पंधरा महिलांमध्ये राजकुमारी अमृत कौर होत्या. त्या एक स्वातंत्र्यसैनिक, स्त्रीवादी कार्यकर्त्या, दिल्लीतील 'एम्स' (ऑल इंडिया इंस्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स) या प्रसिद्ध पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या व वैद्यकीय संशोधन करणाऱ्या अव्वल संस्थेच्या संस्थापक होत्या.
राजकुमारी अमृत कौर यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८९ रोजी 'नवाबोंका शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनौमध्ये झाला. कपूरथला येथील राजपुत्र सर हरनामसिंग अहलुवालिया व रानी लेडी हरनामसिंग हे त्यांचे आई-वडील. पंजाबमधील कपूरथला या संस्थानाचे राजपुत्र हरनामसिंग यांनी वारसा हक्काच्या वादातून कपूरथला सोडले. बंगाली मिशनरी गोलकनाथ चटर्जी यांच्या आग्रहाखातर ख्रिश्चन धर्म स्वीकारला .गोलकनाथ यांची मुलगी प्रिसिला हिच्याशी त्यांनी विवाह केला.या जोडप्याला झालेल्या आठ मुलांपैकी सात मुलगे व एक मुलगी - राजकुमारी अमृत कौर. या सर्वात लहान अपत्य होत्या.
राजकुमारी अमृत कौर ख्रिश्चन वातावरणात वाढल्या. त्यांंचे बालपण राजेशाही थाटात गेले. त्या काळातील राजेशाही पद्धतीप्रमाणे त्यांना शिक्षणासाठी इंग्लंडला डॉरसेट येथील शेरबोर्न स्कूल फॉर गर्ल्स या शाळेत घालण्यात आले.अभ्यास व खेळ दोन्हींत ही त्या प्रवीण होत्या. शाळेत त्या हेड गर्ल होत्या. टेनिसमधे त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली. टेनिस, हॉकी, क्रिकेट हे खेळ तर त्या खेळतच पण व्हायोलिन व पियानोही वाजवीत. जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी एम.ए.ची पदवी मिळवली. १९१५ मध्ये त्या भारतात परत आल्या.
भारतात आल्यावर येथील सामाजिक विषमता, बालविवाह,पडदा पद्धत, आरोग्य विषयक अनास्था पाहून त्या अस्वस्थ झाल्या. त्यांचे वडिल हरनामसिंग अहलुवालिया यांचा कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांशी परिचय होता. राजकुमारी अमृत कौर विशेष प्रभावित झाल्या त्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारांनी.त्या म्हणत "The flames of my passionate desire to free India from foreign domination was framed by him".
१९१९ मध्ये त्यांची महात्मा गांधींशी मुंबईत भेट झाली. त्याचाही त्यांच्या मनावर परिणाम झाला. तशात पंजाबमध्ये जालीयनवाला बाग हत्याकांड घडले. शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या ४०० लोकांवर क्रूरपणे चालवलेल्या गोळ्यांनी त्या व्यथित झाल्या. ब्रिटिशविरोधी आंदोलनात भाग घेण्याची त्यांची इच्छा होती. परंतु त्यांच्या आई-वडिलांना ते मान्य नव्हते.
राजकुमारी अमृत कौर यांनी विवाह न करण्याचे ठरवले. त्यांच्या घरच्यांनी विरोध केला नाही. १९२४ मध्ये त्यांच्या आईचे तर १९२९ मध्ये वडिलांचे निधन झाले. त्या पूर्वी पडदा पद्धत, बालविवाहअशा रूढींच्या विरोधात काम करण्यासाठी ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स या संस्थेच्या स्थापनेत सहभागी झाल्या होत्या. १९३० मध्ये त्या संस्थेच्या सचिव आणि १९३३ मध्ये अध्यक्ष बनल्या.
१९३० मध्ये राजकुमारी अमृत कौर कॉंग्रेस पक्षात सामील झाल्या. दांडी यात्रेत त्या महात्मा गांधींबरोबर सहभागी झाल्या होत्या. त्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकले. महात्मा गांधींच्या असे लक्षात आले की राजकुमारी अमृत कौर या राजेशाही वातावरणात आणि लाडाकोडात वाढल्या आहेत. ते त्यांना सेवाग्राम च्या आश्रमात घेऊन गेले. राजकुमारींना तिथल्या हरिजनांची सेवा करायचे, संडास साफ करायचे काम सांगितले. वापरायला खादीचे कपडे दिले. राजकुमारी ही सारी कामे उत्तम प्रकारे करून गांधीजींनी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर सतरा वर्षे त्यांनी महात्मा गांधी यांच्या वैयक्तिक सचिव म्हणून काम केले. १९३४ मध्ये आपलीं राजेशाही जीवन शैली सोडून त्या सेवाग्राम आश्रमात दाखल झाल्या.साधे जीवन, शाकाहारी भोजन याचा त्यांनी अंगीकार केला.त्या अतिशय निर्भीड होत्या. कॉंग्रेस वर्किंग कमिटीमध्ये महिलांना सहभागी न केल्याबद्दल त्यांनी जवाहरलाल नेहरूंवर टीकाही केली होती.
ब्रिटिशांनी राजकुमारी अमृत कौर यांना अॅडव्हायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन या संघटनेच्या पदाधिकारी म्हणून नेमले होते. पण' चले जाव' चळवळीत सामील झाल्यावर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी ब्रिटिश संसदेत भारताचे प्रतिनिधित्व केले व संविधानिक सुधारणा सुचवल्या होत्या. १९३७ मध्ये कॉंग्रेसतर्फे राजकुमारी अमृत कौर बन्नू येथे सदिच्छा दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करत त्यांना तुरुंगात टाकले. तिथे त्यांची तब्येत बिघडली. मग त्यांना जेलमधून सिमल्याच्या त्यांच्या घरी, मनोरव्हिले येथे तीन वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले.
राजकुमारी अमृत कौर यांनी अनेक पदे भूषवली. त्या नवी दिल्लीच्या लेडी आयर्विन कॉलेजच्या कार्यकारिणी सदस्य होत्या. युनेस्को कॉन्फरन्ससाठी भारताच्या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्य म्हणून १९४५ मध्ये लंडनला व १९४६ मध्ये पॅरिसला गेल्या होत्या. १९४६ मध्ये स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा निवडली गेली, तेव्हा निवडून आलेल्या पंधरा महिलांपैकी राजकुमारी अमृत कौर या एक होत्या. मध्य प्रांत आणि वऱ्हाडमधून त्यांची निवड झाली. संविधान सभेत राजकुमारी अमृत कौर अल्पसंख्याकांसाठीच्या उपसमितीच्या आणि मुलभूत हक्कांच्या उपसमितीच्या सदस्य होत्या. तिथे त्या आपली मते ठामपणे मांडत.
सामाजिक कार्य
राजकुमारी अमृत कौर यांच्या मते बहुसंख्य शहरातील लोकांना सेवा पुरवणाऱ्या हरिजनांना झोपडपट्टीत, दारिद्र्यात रहावे लागते ही अतिशय लज्जास्पद बाब आहे. बालविवाह ही आपल्या राष्ट्रीय जीवनाला लागलेली कीड आहे. स्वत:चे बालपण संपण्याआधीच मुली मातृत्वाला सामोरे जातात.त्यामुळे जन्माला येणारी मुले ही मुळातच आजारी असतात व आरोग्यापासून वंचित असतात.
संविधान सभेत मुलीचे लग्नाचे वय १४ वरून १८ वर्षे करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव मांडला. महिलांना आरक्षण नको पण मताधिकार हवा असा त्यांचा आग्रह होता. समान नागरी कायद्याच्या त्या खंद्या समर्थक होत्या. 'पर्सनल लॉ'मुळे महिलांचे शोषण होते असे त्या म्हणत. विवाहाच्या वेळी महिलांना समान दर्जा मिळायला हवा असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या लोकसभेत राजकुमारी अमृत कौर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. जवाहरलाल नेहरुंच्या पहिल्या मंत्रीमंडळात त्या एकमेव महिला मंत्री होत्या. दहा वर्षे त्या भारताच्या आरोग्यमंत्री होत्या.
आरोग्य क्षेत्रातील योगदान
आपल्या मंत्रीपदाच्या काळात त्यांनी अतिशय भरीव कामगिरी केली. सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे एम्स' (ऑल इंडिया इंस्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स) ची उभारणी. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, प. जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेकडून त्यांनी अर्थसहाय्य घेतले. वैद्यकीय क्षेत्रातील आपला लौकिक आजही या संस्थेने टिकवला आहे. १९४६ च्या आरोग्य सर्वेक्षणातून अशा एखाद्या संस्थेची गरज जाणवली होती. संसदेत तसा ठराव पास करण्यात आला होता. 'आपल्या देशातील तरुण मुला-मुलींना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेता यावे आणि वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करता यावे यासाठी एखादी उत्तम संस्था असावी हे माझे स्वप्न आहे,' असे त्या म्हणत. त्यांनी ते स्वप्न साकारही केले.
ट्यूबरक्युलॉसिस असोसिएशन ऑफ इंडिया, सेंट्रल लेप्रसी टीचिंग अँड रीसर्च इंस्टिट्यूट, अमृत कौर कॉलेज ऑफ नर्सिंग, इंडियन कौन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर या संस्थांच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. मलेरियाच्या उच्चाटनासाठी त्यांनी प्रयत्न केले. टीबीचा प्रतिबंध करण्यासाठी देण्यात येणाऱ्या बीसीजी लसीसाठीही त्यांनी प्रयत्न केले. वंचित मुलांच्या पोषणासाठी, शिक्षणासाठी त्या प्रयत्न करत. इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या त्या चौदा वर्षे अध्यक्ष होत्या. त्या माध्यमातून त्यांनी दुर्गम ग्रामीण भागात आरोग्यासाठी कामे केली. सेंट जॉन अॅम्ब्युलन्स कॉर्पोरेशनच्या त्या अध्यक्ष होत्या.
क्षय, महारोग यांच्या उच्चाटनासाठी संस्था, 'एम्स'ची स्थापना यासारखी दूरदृष्टी ठेवून केलेली कामे नव्या भारताच्या पायाभरणीसाठी किती आवश्यक होती हे काळाने सिद्ध केले आहे.
वर्ल्ड हेल्थ असेंब्ली या संस्थेचे १९४ देश सभासद आहेत. या देशांच्या आरोग्यमंत्र्यांची ही सभा असून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची धोरणे येथून ठरवली जातात. या असेंब्लीच्या अध्यक्ष म्हणून राजकुमारी अमृत कौर निवडल्या गेल्या. हे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला व पहिल्या आशियाई होत्या.
खेळात रुची असल्याने त्यांनी 'द नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया'ची स्थापना केली. दिल्ली म्युझिक सोसायटीच्या त्या अध्यक्ष ही होत्या. १९५७ ते अखेरपर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. जागतिक स्तरावर सामाजिक कार्यासाठी मानाचे मानले जाणाऱ्या रेने सॅंड मेमोरियल पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
राजकुमारी अमृत कौर यांचे १९६४ मध्ये दिल्लीत निधन झाले.आयुष्यभर ख्रिश्चन धर्म अनुसरून त्यांनी अखेरीस त्यांचे दफन न करता दहन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांचे दहन करण्यात आले..त्यांना श्रद्धांजली वाहताना 'द न्यू यॉर्क टाइम्स'ने त्यांचा उल्लेख 'अ प्रिन्सेस इन हर नेशन्स सर्व्हिस' असा केला होता.
'एम्स' च्या रुपात त्यांचे स्मारक भारतीयांच्या मनात कायम राहील.
सुनीता भागवत