राजकीय विनोद आणि राजकीय बदल
राजकीय व्यंगचित्राच्या रूपाने राजकीय विनोद आपण अनेक वर्षे बघत आहोत. राजकीय विनोदात समकालीन परिस्थितीवरील व्यंगात्मक आणि प्रतीकात्मक भाष्य कलात्मक पद्धतीने सादर होते. याचा अर्थ राजकीय विनोद करणाऱ्या व्यक्तीकडे राजकारणाविषयीची जाण, ज्यातून विनोद निर्माण होत आहे असा विरोधाभास शोधण्याची दृष्टी आणि ज्या माध्यमातून हा विनोद सादर करायचा आहे त्याचे कौशल्य अशा तीनही गोष्टी असणे गरजेचे असते. परिस्थितीतील विनोदी धागे शोधण्याची नजर असली आणि राजकीय जाण नसेल तर विनोद उथळ वाटू शकतात. सादरीकरणाचे कौशल्य नसेल तर परिणामकारकता साधली जाणार नाही. या दृष्टीने कोणत्याही माध्यमातील राजकीय विनोद सादर करणारी व्यक्ती ही हरहुन्नरी असते असे समजायला हरकत नाही. अलीकडच्या काही वर्षात भारतात राजकीय विनोदांसाठी स्टँड-अप कॉमेडीचे माध्यम मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याचे दिसते. एकूण राजकीय बदलाच्या प्रक्रियेच्यासंदर्भात अशाप्रकारच्या राजकीय स्टँड-अप कॉमेडीचे काय मोल असते याविषयी प्रस्तुत लेखात काही निरीक्षणे नोंदविली आहेत.
स्टँड-अप कॉमेडीमध्ये विनोद नृत्य-नाटक किंवा इतर कोणत्या सादरीकरणाचा एक भाग म्हणून येत नाही. सादरीकरणांच्या केंद्रस्थानी केवळ विनोद आणि विनोदच असतो. कलाकार केवळ विनोद करण्यासाठी उभा असतो आणि प्रेक्षक फक्त विनोद ऐकून हसण्यासाठीच जमलेला असतो. आलेल्या प्रेक्षकाला पूर्णवेळ खिळवून ठेवत हसवणारा विनोद करणे हे स्टँड-अप कॉमेडियनपुढील मोठे आव्हान असते. स्पॉट-लाईटच्या प्रकाशात हातात माईक घेऊन उभे राहून केलेली कॉमेडी हा स्टँड-अप कॉमेडीचा पारंपरिक ढाचा झाला. आजच्या डिजिटल युगात स्टँड-अप कॉमेडी नव्यानव्या रुपात अवतरताना दिसते. सादरीकरणाचा काळ कमी कमी होत आहे. मीम्सपेक्षा मोठे आणि पारंपरिक स्टँड-अप कॉमेडीपेक्षा छोटे सादरीकरण डिजिटल माध्यमावर येत आहे. यूट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्रामवरच्या छोट्या व्हिडिओच्या रुपातही आज राजकीय आशय असलेली कॉमेडी केली जात आहे. बातम्यांचे विश्लेषण करताना त्यात मीम्स आणि कॉमेडीची सरमिसळ केली जात आहे. राजकीय मुलाखतींचे सादरीकरण अधिक परिणामकारक करण्यासाठी अध्येमध्ये विनोद निर्मिती करतील असे ग्राफिक्स, साउंड इफेक्ट्स, नेत्यांच्या भाषणाच्या क्लिप्स यांचा वापर होत आहे. अशा प्रयोगांमुळे भारतातील स्टँड-अप कॉमेडीचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे आणि त्याचा प्रेक्षकवर्गही रुंदावला आहे.
अलीकडच्या काळात राजकीय आशय असलेली कॉमेडी करणाऱ्यांच्यात वरुण ग्रोव्हर, संजय राजौरा, राजीव निगम, कुणाल कामरा, सलौनी गौर ही थोड्या काळात लोकप्रिय झालेली नावे आहेत. वरुण ग्रोव्हर हा मुळात हिंदी चित्रपटांचा पटकथा लेखक आहे. त्याची स्टँड-अप कॉमेडी उपहासात्मक आहे. रेल्वेतील संडासात चोरी टाळण्यासाठी साखळीने बांधून ठेवलेला मग त्याला भारतीय समाज जीवनातील विश्वासाच्या अभावाचे प्रतीक वाटते. निवडणुकीच्या प्रचाराला भुलून मतदान करणारा मतदार हा त्याला एस.टी.तल्या फिरत्या विक्रेत्याने केलेल्या ‘एका संत्र्यातून तीन ग्लास ज्यूस निघेल’ अशा जाहिरातीला भुलून ज्यूसर विकत घेणारा आणि प्रत्यक्षात त्या ज्यूसरने एक ग्लास ज्यूसही निघत नाही हे अनुभवणाऱ्या गिऱ्हाइकासारखा वाटतो. २०१४ मध्ये केंद्रात भाजपा आणि दिल्ली राज्यात आम आदमी पार्टी निवडून देणारा दिल्लीचा मतदार त्याला तोच ज्यूसर दुसऱ्या वेळी विकत घेणारे बावळट गिऱ्हाईक वाटते.
वरूण ग्रोव्हरची स्टँड-अप कॉमेडी -
वरूण ग्रोव्हरचा विनोद संसदीय राजकारणापासून सांस्कृतिक राजकारणापर्यंत अनेक गोष्टींना स्पर्श करतो. चित्रपट सृष्टीतील बाजारूपणा आणि अभिरुचीहीनता, चित्रपटाच्या निमित्ताने उभे रहाणारे राजकारण, त्यातील प्रतीकांचा वापर यातील विसंगती शोधत आणि त्यावर उपहासात्मक भाष्य करत वरुण ग्रोव्हरचा विनोद प्रेक्षकांना हसवतो. वरुण ग्रोव्हरच्या मांडणीत सादरकर्ता म्हणून तो आणि समोरचे प्रेक्षक हे द्वंद्व नाही. आपण स्वतःदेखील त्याच ढोंगी संस्कृतीचा भाग आहोत हे त्याचा विनोद नाकारत नाही. आपल्या भवतालच्या या वास्तवाचा पर्याय माहीत असल्याचा दावाही तो करत नाही. पर्याय माहीत नाही म्हणून संकोचही बाळगत नाही. ‘आहे हे असं आहे, कारण तुम्ही-आम्ही असेच आहोत’ हे त्या विनोदातले सूत्र आहे.
राजीव निगम यांच्या राजकीय विनोदात सावधपणा फार आहे. आपण राजकीयदृष्ट्या तटस्थ आहोत हे ठसवण्याची आत्यंतिक निकड त्यांच्या सादरीकरणात असते. त्यामुळे एका विनोदी विधानामागे दोन डिसक्लेमर्स आणि तीन स्पष्टीकरणे, शिवाय एक विनोद भाजपावर केला तर एक राहुल गांधींवर असे सावध संतुलन राखण्याच्या प्रयत्नात बरेचदा त्यांचा विनोद हरवून जातो. तो सावधपणा संजय राजौराच्या विनोदात नाही. त्यातील भाष्य हे अधिक थेट आणि बोचरे आहे. त्याच्या विनोदाच्या मुळाशी स्वतःवर हसण्याच्या वृत्तीपेक्षा आपल्या जगण्यातल्या ढोंगीपणाविषयीचा संताप अधिक आहे. परंपरेच्या नावे विषमता, शोषण यांचे समर्थन करण्याच्या वृत्तीविषयीचा राग त्यांच्या सादरीकरणात खदखदतो. हा विनोद जगण्यातील विसंगती पकडतो आणि ही विसंगती हसण्यावारी नेल्याबद्दल प्रेक्षकाला जाबही विचारतो. राजौराच्या विनोदाचा संदर्भ तात्कालिक घटनेचा असला तरी त्याचे भाष्य अधिक खोलवर जाऊन या घटनेच्या मुळाशी असलेल्या राजकीय मूल्यव्यवस्थेचा धांडोळा घेते. उदाहरणार्थ, राजकारणावर टोलेबाजी करत दारू पिऊन झिंगलेल्या पुरुषांवर विनोद करताना राजौरा मर्दानगीच्या पुरुषसत्ताक संकल्पनेवर टीका करतो. ‘लग्न होणे म्हणजे सेटलमेंट’ या धारणेचा पगडा असलेल्या समाजाच्या जगण्यातील विसंगतीतून निर्माण होणारा विनोद दाखवताना तो लग्नसंस्थेच्या मुळाशी रुजलेल्या जातीयवादी मानसिकतेकडेही लक्ष वेधतो. राजौरा यांच्या सादरीकरणाची वैचारिक बाजू अधिक व्यापक असते, त्याचाच परिणाम म्हणून की काय, परंतु त्यातील रंजकता कमी होते. रंजकता आणि वैचारिकता यांचे संतुलन साधणे हे राजकीय स्टँड-अप कॉमेडीपुढील मोठे आव्हान आहे.
संजय राजौरा यांची स्टँड-अप कॉमेडी -
राजकीय तटस्थेचा आव न आणत केलेला विनोद कुणाल कामराच्या स्टँड-अप कॉमेडीत आहे. कामराने त्याची राजकीय भूमिका कधी लपवली नाही. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ‘डोन्ट वोट फॉर मोदी’ असा बॅनर हातात घेऊन उभा असलेला स्वतःचा फोटो वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवर फोटोशॉप करून जवळपास रोज तो स्वतःच्या इस्टाग्रामवर पोस्ट करत होता. कामरा त्याच्या सादरीकरणात कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये ज्या सहजेने शिव्या येत राहतात त्याचप्रकारे मुबलक शिव्यांची पेरणी करतो. त्याने शिवी उच्चारली की प्रेक्षकांचा हशा वाढल्याचेही त्याच्या कार्यक्रमात दिसते. प्रस्थापित माध्यमाने ‘टुकडे -टुकडे गँग’ म्हणून शिक्कामोर्तब केलेल्यांपैकी कन्हैय्या कुमारवरील देशद्रोही असण्याच्या आरोपाचे खंडन करताना ‘ये लोग स्टुडंट्स है, इन की कँटीन में उधारी है’ हे त्याचे वाक्य असो किंवा ‘मैं अंबानीजी को डायरेक्टली वोट क्यूँ नही दे सकता, मेरे और अंबानीजी के बीच में मोदीजी क्या कर रहे हैं’, ही त्याची पंचलाईन किंवा ‘सियाचीन में हमारे जवान मर रहें हैं’, म्हणत नाणेबंदीची भलावण करणाऱ्या जेष्ठ नागरिकाला ‘अंकल, मैं ही हूँ वो जवान, पहले बॉर्डर पे खडा था, अब नोट बदलने के क्यू में खडा हूँ’ असे सुनावणारं त्याच्या प्रहसनातलं पात्र, अर्णब गोस्वामीच्या पत्रकारितेची त्याचे नाव न उच्चारता उडवलेली टर यासारख्या स्टँड-अप कॉमेडीत स्पष्ट राजकीय आशयासोबत भरपूर मनोरंजन आहे.
कुणाल कामराची स्टँड-अप कॉमेडी –
स्टँड-अप कॉमेडी करणाऱ्या अदिती मित्तल, कनीज सुरखा, प्रशस्ती सिंग या काही स्त्रियाही प्रसिद्ध आहेत. मात्र बऱ्याचदा त्यांच्या विनोदांचा भर सेक्स, सेक्शुअॅलिटी, ऑरगॅझम, पुरुषांचा सेक्शुअल परर्फॉर्मन्स यावर असतो. काही वेळा लिंगभावात्मक भेदाभेदाच्या इतर सामाजिक पैलूंचेही संदर्भ येतात पण त्यांचे प्रमाण तुलनेने कमी असते. भारतीय राजकारणावर भाष्य करणारे विनोद करणाऱ्या स्त्रिया तर अधिकच कमी आहेत. (अलीकडे अग्रीमा जोशुआच्या स्टँड-अप कॉमेडीवरून मोठा वाद झाला. वास्तविक अग्रीमाची इतर कॉमेडी आवर्जून दखल घ्यावी अशी फार वेगळी किंवा प्रगल्भ नाही. तिच्या कॉमेडीवर कुणाल कामराच्या कॉमेडीचा मोठा प्रभाव दिसतो. ज्यावरून वाद झाला त्या सादरीकरणावरही ती छाप आहे. या वादाची चर्चा या लेखाच्या शेवटी आहे.) यापैकी सलौनी गौर आवर्जून उल्लेख करावा अशी कलाकार आहे. सलौनी ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली अवघ्या वीस वर्षाची मुलगी आहे, ती ‘नझमा आपी’ या नावाने सादरीकरण करते. तिचे व्हिडिओ कदाचित पारंपरिक स्टँड-अप कॉमेडीच्या कल्पनेशी सुसंगत नसतील, पण ते मीम्सएवढे छोटेही नाहीत.
सलौनीच्या निमित्ताने डिजिटल प्लॅटफॉर्म किती सर्जकशीलतेने वापरला जातो त्याचा नमुनाही पाहायला मिळतो. गेल्या वर्षभरापासून हिजाब घेतलेली नझमा आपी बनून इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर साधारण ५५ सेकंदाचे स्वतःचे व्हिडीओ सलौनीचे पोस्ट करते आहे. तिचे हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये नझमा आपीशिवाय इतर कोणी नसते, पण तिच्या भवतालच्या निम्नमध्यमवर्गीय वातावरणाचा उल्लेख सतत येत रहातो. तिच्या बऱ्याच मुलांपैकी सतत उल्लेख होणारे आफ्रिदी आणि फातिमा, शकरकंदीचा ठेला चालवणारा आफ्रिदीचा अब्बू म्हणजेच तिचा नवरा, तिच्याशी छत्तीसचा आकडा असलेली तिची शेजारीण सलमा ही काल्पनिक पात्रे नझमाचे राजकारणाविषयीचे भाष्य पुढे घेऊन जातात. आफ्रिदी हा प्रधानमंत्री कौशल विकास केंद्रात जातो पण अजूनही त्याच्याकडे अमित शहांसारखं खरेदी-विक्रीचं कौशल्य आलेलं नाही. लॉक-डाऊन असूनही अर्णबला मारायला हल्लेखोर जाऊ शकतात तर मी बाहेर का जाऊ शकत नाही म्हणत तिचा नवरा तिला भंडावून सोडतो. मोदीजींनी तिसऱ्या लॉक-डाऊनला टास्क न दिल्याने ती नवऱ्याशी लावलेली दहा रुपयाची पैज हारते आणि रडत रडत ‘हमारे उपर का भरौसा उठ गया क्या मोदीजी?’ असा प्रश्न विचारते. तिच्या दैनंदिन आयुष्यातले किस्से सांगता सांगता ती राजकारणावर नेमकं भाष्य करते. तिच्या सगळ्यात टोकदार पोस्ट्स या नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात शाहीन बागेत चालू असलेल्या धरण्याचा वेळी आल्या. ‘मी हल्ली घरी पाणी भरतच नाही, पोलीस वॉटर कॅनन घेऊन येतात तिथेच मुलांना आंघोळीला आणि पाणी भरायला पाठवून देते’, ‘आम्ही मृतांना जाळत नाही, पुरतो हे खरं असलं तरी आमच्या नागरिकत्वाच्या पुरावा मागण्यासाठी आम्ही काही आमच्या पूर्वजांना कबरीतून उठवू शकत नाही’, ‘जो माणूस १८-१८ तास काम करतो त्याची झोप पुरी न झाल्याने त्याला दुसऱ्याला सतावण्याचे असले उद्योग सुचतात’ यासारख्या बोचऱ्या भाषेत ती राजकारणावर थेट भाषेत बोलत असते. तिचा विनोद हा प्रस्थापिताला आणि सत्ताधाऱ्यांना बोचकारणारा आहे. तिच्या नझमाकडे सुसंस्कृतपणाच्या नावाखाली पोसलेली मध्यमवर्गीय औपचारिकता नाही. पण तिला हशा मिळविण्यासाठी कामरासारखी शिव्यांची पेरणीही गरजेची वाटत नाही. ती आपले सादरीकरण एकांगी होणार नाही याची खबरदारी घेते मात्र त्यात निगमसारखा सावधपणाही नाही. अर्थात बोचरेपणा अती झाला की आक्रस्ताळेपणाकडे झुकतो याचे भानही तिला असल्याचे दिसते. त्यामुळे राजकारणावर थेट भाष्य करणाऱ्या पोस्ट्सच्या अध्येमध्ये ती कंगना राणावतची मिमिक्री करत चित्रपट आणि प्रसार माध्यमांची समीक्षा करते. सास-बहूच्या तक्रारी, प्रौढ स्त्रियांमधील शिळोप्याच्या गप्पा, घरकाम सांभाळत ऑनलाइ न तास घेताना होणारी शिक्षिकेची तारांबळ अशा विविध विषयांवरील विनोदही ती अधूनमधून सादर करत असते. तिचा मूळ धागा मात्र कधी सुटत नाही. परिस्थितीचे तिचे निरीक्षण सखोल असते आणि तरीही तपशीलांचा उल्लेख तिच्या विनोदाला वरचढ धरत नाही. अर्थात तिचे हे सादरीकरण सध्या तरी एक मिनिटाहूनही कमी कालावधीचे असते. पारंपरिक स्टँड-अप कॉमेडीच्या मोठ्या अॅक्टला झेपेल एवढा राजकीय विनोद ती पुढच्या काळात निर्माण करू शकेल का हे बघणे रोचक ठरेल.
सलौनी गौरची स्टँड-अप कॉमेडी -
ज्याला सरसकटपणे स्टँड-अप कॉमेडी म्हणता येणार नाही अशा राजकीय आशय असलेल्या आणखीही एका विनोदी सादरीकरणाची दखल या निमित्ताने घ्यायला हवी. अलीकडच्या काळात राहुल राम यांनी राजकीय पॅरोडी असलेली अनेक गाणी गायली आहेत. राहुल राम यांचा मूळ परिचय गायक-गिटारवादक असा आहे. पूर्वी ‘इंडियन ओशन’ या म्युझिक बँडमध्ये ते होते. या बँडने सरदार सरोवर प्रकल्पाच्या विरोधात राजकीय भूमिका घेऊन काही गाणी केली होती. सध्या राहुल राम, वरूण ग्रोव्हर आणि संजय राजौरा एकत्र येऊन ‘ऐसी तैसी डेमॉक्रसी’ हा कार्यक्रम करतात. त्यामध्ये राहुल राम राजकीय विडंबन गीते सादर करतात. ‘हम नेहरू को दबा कर, पटेल को उठ लेंगे’, ‘चुनाव का महिना, है मच गया शोर, फिर आया है टाईम टू चुज, हू विल स्क्र्यू अस मोअर’, ‘मेरी सामनेवाली सरहद पे, कहते है के दुष्मन रहता है, पर गौर से देखा जब उसको वो तो मेरे जैसा दिखता है’ यासारखी त्यांची गाणी भारताच्या राजकीय संस्कृतीवर मार्मिक भाष्य करतात.
राहुल राम यांचे गाणे -
राजकारणावर विनोदी भाष्य करण्याला लाभलेल्या लोकप्रियतेमुळे म्हणा किंवा डिजिटल माध्यमाचा वापर करताना उपलब्ध असलेल्या तंत्रांचा परिणामकारक वापर करायच्या हेतूने म्हणा, गेल्या काही वर्षात राजकारणाचे आणि वृत्तवाहिन्यांचे विश्लेषण करताना विनोदाच्या वापराचे प्रमाण वाढलेले दिसते. सॅटेलाईट वृत्तवाहिन्यांवर ‘गुस्ताखी माफ’सारख्या कार्यक्रमातून राजकीय मीम्स प्रसारित होतात. याशिवाय पीईंग ह्यूमन , न्यूजलॉंड्री डॉट कॉम, द देशभक्त, द लल्लनटॉप यासारख्या यूट्यूब वाहिन्यांवर तर राजकीय विनोदांचा मोठा वापर होत असतो. समकालीन ज्वलंत विषयाचे प्रस्थापित माध्यमातील सादरीकरण, माध्यमातील असंवेदनशील वृत्ती आणि सरकारधार्जिणा दृष्टीकोन, त्यांच्यातील अपारदर्शकता आणि खोटेपणा यासारख्या बाबींची खरमरीत समीक्षा या यूट्यूब वाहिन्यांवरील सादरीकरणात होते. अभिनंदन सेक्री, मधु त्रेहान यांनी इतर काहीजणांच्या सोबतीने सुरु केलेल्या न्यूजलॉंड्री डॉट कॉमवर वेगवेगळ्या रिपोर्ट्ससोबत प्रसार माध्यमांतील फेक न्यूजचा तसेच भडकावू आणि आक्रस्ताळ्या सादरीकरणाचा समाचार घेतला जातो. त्यासाठी कधी उपहास केला जातो तर कधी त्यावरून संबंधितांना तिरकस टोमणे मारले जातात. मनीषा पांडे आणि संदीप पै हे कार्यक्रम सादर करतात. या सगळ्या प्रयोगांना काही स्टँड-अप कॉमेडी म्हणता येणार नाही मात्र भविष्यातली राजकीय स्टँड-अप कॉमेडी अशा प्रकारच्या डिजिटल अवतारात वावरेल असे वाटते.
न्यूजलॉंड्री डॉट कॉमवर मनीषा पांडे –
न्यूजलॉंड्रीसारख्या कार्यक्रमांचा प्रतिवाद करणारे अनेकजण यूट्यूबवर सक्रीय आहेत. मोदी विरोधकांसाठी लिबरँडू हा शब्द ते वापरतात. आपल्या सादरीकरणात तेही मुबलक शिव्यांचा वापर करतात. फेक न्यूजचे जनक रवीश कुमार, राजदीप सरदेसाई हे लिबरँडू पत्रकार आहेत अश्या उलट्या बोंबा मारणारी ‘आज की ताजा खबर (ए.के.टी.के.) ही यूट्यूब वाहिनी त्यात सर्वात आघाडीवर आहे. अनुज भारद्वाज आणि गर्वित भारद्वाज हे दोघे भाऊ ही वाहिनी चालवतात असे म्हटले जाते. मात्र आश्चर्य म्हणजे त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या या वाहिनीविषयी कोणतीही औपचारिक माहिती उपलब्ध नाही. आपल्या सादरीकरणात ‘हमें चोमू समझा है क्या, हां, ये हमें चोमू समझता है’ हे पालुपद पेरून विनोद निर्मितीचा प्रयत्नही त्यांचा निवेदक करत असतो. त्यातून फारशी विनोद निर्मिती होते असे खरे तर दिसत नाही तरीही यांच्या पोस्ट्सना लाख-दीड लाख ‘लाईक्स’ असतात. या वाहिनीचा येथे आवर्जून उल्लेख करण्याचे कारण म्हणजे डिजिटल माध्यमाचे खुले स्वरूप पहाता कामरा-ग्रोव्हर, मनीषा पांडे-आकाश बॅनर्जी-ध्रुव राठी आदी जे करतात तेच विरोधी राजकीय भूमिका असणारेही करू शकतात. या क्षणाला त्यांची कॉमेडी ही कदाचित उत्कृष्ट दर्जाची नसेल, तिच्यात कामरा-ग्रोव्हर एवढी रंजकता नसेल पण ती कधीच असणार नाही असे सांगता येणार नाही. रंजक सादरीकरणाच्या राजकीय परिणामकारकतेचा विचार करताना ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.
ए.के.टी.के.वर अनुज भारद्वाज –
डिजिटल युगात राजकीय विनोद सादर करण्यासाठी स्टँड-अप कॉमेडीमध्ये खूप नवनवीन प्रयोग होत आहेत हे खरे असले तरी अशा प्रकारे विनोदाच्या माध्यमातून राजकीय मते मांडण्याचा राजकीय संस्कृतीवर काय परिणाम होतो हा कळीचा प्रश्न आहे. सरकारच्या धोरणांवर, सत्ताधारी नेतृत्त्वावर, राजकीय प्रक्रियेवर टीका करता येणे हा वास्तविक लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे. अशा व्यवस्थेची राजकीय संस्कृती ही सहभाग, समीक्षा, विरोध, प्रतिकार यांना पूरक असते. अशा समाजातील नागरिक देशात काय चालले आहे याविषयी अनभिज्ञ किंवा बेफिकीर नसणे ही त्यातील सर्वात पहिली अट असते. नागरिक व्यवस्थेला आपली मानतात आणि तिच्याविषयी जागरूक असतात. दुसरे म्हणजे ते स्वतःकडे निव्वळ आज्ञाधारक प्रजा म्हणून पहात नाहीत. आपण व्यवस्थेवर प्रभाव टाकू शकतो, तिच्यात बदल घडवून आणू शकतो याची त्यांना खात्री असते. तिसरे म्हणजे त्यांचा मेंदू शाबूत असतो. व्यवस्थेच्या वाटचालीचे मूल्यमापन करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. अशी लोकशाहीमूलक राजकीय संस्कृती टिकून रहावी यासाठी नागरी स्वातंत्र्ये शाबूत राहणे आवश्यक असते. भारतात सध्या झालेला राजकीय स्टँड-अप कॉमेडीचा सुकाळ म्हणजे नागरी स्वातंत्र्ये शाबूत आहेत याची पावती मानायची का? भारतीय लोकशाहीत सर्व आलबेल आहे असं समजायचं का? सामाजिक जीवनाच्या इतर अनेक पैलूंचा आढावा घेतला तर असे खात्रीलायक म्हणता येईल अशी परिस्थिती दिसत नाही. विरोधी मतांबद्दलची असहिष्णुता प्रचंड वाढलेली दिसते. वेगळे मत मांडणाऱ्याचा अँटी-नॅशनल, पाकिस्तान धार्जिणे, स्यूडो-इंटलेक्च्युअल अशा शेलक्या शब्दात धिक्कार करणे, त्याचे संघटित आणि सामूहिक ट्रोलिंग करणे, त्याच्याविरोधात झुंडशाही करणे ही आजच्या काळातील आम बाब आहे. मग राजकीय स्टँड-अप कॉमेडीमधील ही बोचरी टीका सहन कशी केली जाते? एका बाजूला असहिष्णू वृत्ती वाढत असताना दुसऱ्या बाजूला राजकीय स्टँड-अप कॉमेडीला बरे दिवस येणे या वरवर विसंगत वाटणाऱ्या वास्तवातील मेख म्हणजे राजकीय स्टँड-अप कॉमेडीकडे सामान्य माणूस फक्त करमणूक म्हणून पहातो.
हे समजून घेण्यासाठी अलीकडे अग्रीमा जोशुआच्या स्टँड-अप कॉमेडीवरून झालेला वाद थोड्या विस्ताराने पहाणे उपयोगी ठरेल. अग्रीमा जोशुआ ही काही फार नावाजलेली स्टँड-अप कॉमेडियन नाही. ‘राजकीय कॉमेडी करणे आपल्याला आवडत नाही, पण मोदींवर एक-दोन जोक केले तरच आपली कॉमेडी सादर करायची संधी मिळते’ असंही ती म्हणते. स्वतःच्या ट्विटर हँडलवर ‘पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची आपण फॅनगर्ल आहोत, त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहोत’ असे ट्वीट्स ती दिवसाला सात-आठ वेळा करत असते. या सर्वावरून तिचे ट्विटरवर बराच काळ ट्रोलिंग चालू होते. ‘मला असल्या ट्रोलिंगने फरक पडत नाही’ अशा अर्थाचे प्रतिसादही ती देत होती. मात्र अचानक एके दिवशी ती भाजपाच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटला टॅग करत ‘तुमचे भाडोत्री संघी ट्रोल्स मला त्रास देत आहेत’ अशा अर्थाचे ट्वीट करते. नंतर आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर अकाउंटला टॅग करत ‘स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणारे लोक भाजपाच्या आय.टी. सेलने आपल्यावर धाडले आहेत’ अशी तक्रार करते. यानंतर तिच्या कॉमेडीवरून माजलेला गदारोळ टोकाला जातो. ट्विटरवर जे काय चालतं ते कधीकधी इतकं फसवं असतं की एखाद्या प्रकरणात नेमकी सुरुवात कोणी केली हे कळायला काही मार्ग नसतो. सुरुवात कोणीही केली असली तरी या सगळ्या प्रकरणात अग्रीमाला बलात्काराची धमकी देणारे व्हिडिओ, ट्वीट्स व्हायरल झाले आणि चित्र काहीसं पालटलं. कारण इतकं गलिच्छ, हिंसक आणि स्त्री देहाची विटंबना करण्याची धमकी देणारी विधाने करणाऱ्याचे समर्थन हे काही ‘पोलिटिकली करेक्ट’ ठरत नाही आणि ते कोणालाच राजकीयदृष्ट्या परवडणारं नसतं. तिथून पुढे अग्रीमा एकमेव फोकस न रहाता, राष्ट्रपुरूषांविषयी स्टँड-अप कॉमेडी करणाऱ्या सर्वांच्याच विरोधात ट्विटर आणि वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते सरसावले. अदर मलिक, साहिल शाह, सौरव घोष यांना मारहाण / धमकीचे व्हिडिओही व्हायरल झाले. ज्या इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये स्टँड-अप कॉमेडीचे नियमितपणे सादरीकरण होत असते, तिथे एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. सकाळपर्यंत भाजपा आय.टी. सेलला दोष देणाऱ्या आणि एरवी जीन्स-टीशर्ट घालणाऱ्या अग्रीमाने संध्याकाळी सलवार-कुडता घालून आणि कुंकू लावून सर्वांची माफी मागणारा व्हिडीओ ट्वीट केला. पाठोपाठ अदर मलिक, साहिल शाह यांचेही माफीनामे आले. सध्या हॅशटॅग बॅन अँटी-हिंदू स्टँड-अप कॉमेडी असा ट्विटर -ट्रेंड व्हायरल आहे. हा लेख प्रकाशित होईपर्यंत या प्रकरणात आणखी काय काय घडललं असेल ते सांगता येत नाही.
या सगळ्याकडे राजकीय स्टँड-अप कॉमेडीची मुस्कटदाबी म्हणून पहायचे का? एका दृष्टीने ती आहे कारण राजकीय कॉमेडीचा आशय काय असावा यावरून कलाकारांची दडपणूक केली जात आहे. असे असले तरी हा प्रकार निव्वळ राजकीय स्टँड-अप कॉमेडीच्या मुस्कटदाबीचा आहे असे म्हणता येणार नाही. हा प्रकार ट्विटर-युद्धाचे नियम मोडल्याची परिणती भासते. एक स्टँड-अप कॉमेडियन विनोदाचा भाग म्हणून नव्हे तर उघडउघड, मात्र कोणतेही पुरावे न देता एका राजकीय पक्षावर हेत्वारोप करते. तिच्या विनोदाच्या विरोधात राळ त्यानंतर उठते. कुणाल कामराने मोदी, भाजपा यांची आपल्या कॉमेडीतून कितीही खिल्ली उडवली असली तरी त्याच्या विमान प्रवासावरील बंदी ही त्याने अर्णब गोस्वामीला छेडल्यानंतर घालण्यात येते. हा घटनाक्रम लक्षात घ्यायला हवा. ‘कॉमेडियनचे सादरीकरण मजेशीर असते, तो भरपूर हसवतो, अधूनमधून बिनधास्त शिव्या देतो, घटकाभर मजा येते’ या पलीकडे जाऊन राजकीय प्रक्रियेविषयी कोणतीही समीक्षात्मक दृष्टी राजकीय स्टँड-अप कॉमेडी प्रेक्षकांकडे पोहोचवत नाही. अशी दृष्टी कॉमेडियनकडे किंवा त्याच्या कॉमेडीत नसते असे नाही, पण जेव्हा सादरीकरण अधिकाधिक रंजनकेंद्री बनत जाते तेव्हा त्याचा वैचारिकतेचा धागा हळूहळू सुटत जातो. अशा कॉमेडीचा राजकीय मतपरिवर्तन घडवून आणण्यात फारसा परिणाम होत नाही. संजय राजौरापेक्षा कुणाल कामरा अधिक लोकप्रिय असणे यात खरे तर बरेच काही येते. आपल्याला कामरा हा राजौराहून अधिक चांगल्या दर्जाचा कॉमेडियन वाटतो, कारण स्टँड-अप कॉमेडी या प्रकाराकडे आपण करमणूक म्हणून पहातो. ‘मेरे और अंबानीजी के बीच में मोदीजी क्या कर रहे हैं’ या वाक्याला हशा आणि टाळ्या मिळतात पण त्यातून भारतातील सत्ताधारी वर्ग आणि भांडवलशाही यांच्यातील साटेलोटे उमजण्याचे तसूभरही भान प्रेक्षकाला येते असे नाही. उलट अशा बाबी हसून सोडून देण्याच्या आहेत असा एक छुपा संदेश त्यातून मागच्या दाराने प्रसारित होत राहतो. त्यामुळेही व्यवस्थेसाठीही आपल्या सहिष्णुतेचा पुरावा म्हणून अशा प्रकारचे विनोद चालवून घेण्यात फारशी अडचण नसते. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी राजकीय स्टँड-अप कॉमेडीचे पेव फुटले होते. मोदी सरकारच्या विरोधकांना अशा प्रकारच्या स्टँड-अप कॉमेडीमध्ये जनतेची नाराजी प्रकट होताना दिसली. त्यांना ही सत्ताबदलाची नांदी वाटली. प्रत्यक्षात काय घडले ते आपण पाहिले आहे. इथे मुद्दा कॉमेडियन्सच्या व्यक्तिगत बांधिलकीचा नाही. ती वादातीत असू शकते. सातत्याने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणे ही सोपी गोष्ट नाही. कुणाल कामरा सातत्याने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून सरकारधार्जिण्या माध्यमांवर टीकास्त्र सोडत असतो. वरुण ग्रोव्हरने नागरिकता सुधारणा विधेयकाला खुला विरोध केला. शाहीन बाग आणि इतरत्र झालेल्या निषेध धरण्याच्या ठिकाणी जाऊन आंदोलनाला पाठींबा जाहीर दिला. त्याने लिहिलेली ‘हम कागज नही दिखायेंगे’ ही कविता आंदोलनाचे अँथेम बनली. अर्णब गोस्वामीला छेडल्याबद्दल सरकारने कुणाल कामरावर विमानप्रवास बंदी घातल्यानंतर एरवी आचरट विनोद करणाऱ्या तन्मय भटने कामराला उघड समर्थन देणारा कार्यक्रम प्रसारित केला. प्रचंड ट्रोलिंग, धमक्या आणि व्यवस्थेचा रोष पत्करून भूमिका घेणे याचे महत्व मोठे आहे. मात्र राजकीय विनोद कितीही प्रगल्भ असला तरी व्यापक राजकीय बदलाच्या दृष्टीने त्याची परिणामकारकता मर्यादित असते हा जगभरातला अनुभव आहे. जनरल परवेज मुशर्रफ यांच्या राजवटीत पाकिस्तानात कोणत्याही आडकाठीशिवाय राजकीय स्टँड-अप कॉमेडी होत असे. चीनसारख्या साम्यवादी राजवटीतही राजकीय विनोदांचे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याकडे व्यवस्थेला धोका म्हणून पाहिले जात नाही उलट रंजनात्मक विनोद कोंडलेली वाफ मोकळी करून ताण हलके करण्याच्या कामी येतात. राजकीय स्वरूपाची स्टँड-अप कॉमेडी प्रस्थापित व्यवस्थेला हवे असलेले मुद्दे चर्चेत ठेवण्यास मदतच करते असेही एक मत आहे.
व्यापक पातळीवर हा विषय सांस्कृतिक पातळीवरील हस्तक्षेपाचा आणि राजकीय बदलासाठी अशा हस्तक्षेपाच्या उपयुक्ततेचा आहे. सांस्कृतिक पातळीवरील लोकशाहीमूलक अभिव्यक्तीचे महत्व हे ते विशिष्ट क्षेत्र समृद्ध होणे आणि ते क्षेत्र बदलाच्या प्रक्रियेत अडसर नसणे एवढाच आहे. संस्कृतीच्या पातळीवरील राजकारणाला जगण्यामरण्याच्या प्रश्नांसाठी लढ्यांची जोड हवी. भक्कम संघटनात्मक पाया हवा. सामाजिक शक्तींची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न हवेत. कोणताही राजकीय बदल घडण्यासाठी सामाजिक शक्तींचे संघटन, पक्ष बांधणी, पर्यायी नेतृत्वाचा उदय यासारख्या अनेक राजकीय प्रक्रिया स्वतंत्रपणे घडणे गरजेचे असते. सांस्कृतिक हस्तक्षेप हा या सर्व बाबींना पूरक असू शकतो पण तो पर्याय असू शकत नाही. या विशिष्ट संदर्भात बोलायचे तर, राजकीय स्टँड-अप कॉमेडीतले हे नवे प्रवाह स्टँड-अप कॉमेडी हा प्रकार समृद्ध करतात. उद्या परिवर्तनासाठी आवश्यक अशी सामाजिक शक्तींची जुळणी झाली तर मनोरंजनाचे हे क्षेत्र त्या प्रक्रियेला पूरक ठरू शकते. मात्र जमिनीवरच्या राजकारणात होणारे प्रयत्न किनाऱ्यावर आदळून फुटणाऱ्या समुद्राच्या लाटांसारखे विखुरले जात असतील तर सांस्कृतिक क्षेत्रातला असा हस्तक्षेप कितीही नाविन्यपूर्ण, टोकदार आणि लोकशाहीमूलक असला तरी त्याची राजकीय उपयुक्तता फुटकळ ठरते हे कटू सत्य इथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
चैत्रा रेडकर
chaitra.redkar@gmail.com
(लेखिका भारतीय शिक्षण व संशोधन संस्था - आयसर, पुणे येथे मानव्य व सामाजिक शास्त्राच्या सहयोगी प्राध्यापक आहेत)