पाळंमुळं -एक अस्सल ग्रामीण निवेदन

१२ फेब्रुवारी २०२६

पाळंमुळं ही एका संवेदनशील, समाजभान सांभाळत संघर्षाबरोबरच आपली जीवनमूल्ये जोपासणाऱ्या एका अभियंत्याची आत्मकथा आहे. ह्या आत्मकथनाला जसा मातीचा अस्सल वास आहे तसाच ग्रामीण भागातील गावकीचा, भावकीचा बाज आहे. या कथनात जशी कौटुंबिक स्तरावरील घट्ट नात्यांची, आजीच्या ऊबदार वात्सल्याची, जिव्हाळ्याची आणि तिने केलेल्या संस्कारांची पाठराखण आहे, तशीच बापाने कष्टाने पेरलेल्या काळ्याशार मातीतून ऊगवणाऱ्या हिरव्याकंच ताजेपणाची निर्मळ जीवनेच्छाही आहे!! यातील नायक बहिणींच्या शिक्षणापासून लग्नकार्यापर्यंत व पुढे त्यांचा संसार मार्गी लावण्यासाठी धडपडतो.

आधुनिकतेपासून कोसो दूर असलेल्या संगमनेर तालुक्यातील झोळे नावाच्या अगदी छोट्या गांवातील एक शेतकरीपुत्र नानासाहेब खर्डे या तरूणाच्या संघर्षाची ही गोष्ट!! लहानपणापासून खडतर आयुष्याला भिडणाऱ्या पण तितक्याच ताकदीने समोर आलेल्या अडचणींवर जिद्दीने मात करत, शिक्षणाचं बीज जीवापाड जपतानांची या ध्येयवेड्या विद्यार्थ्याची शिकण्याची असोशी आणि त्याच्या पाठी खंबीरपणे उभं राहणारा त्याचा दादा, आपल्याला अंतर्मुख करतात.
शिक्षण घेताना ग्रामीण भागातील असंख्य अडथळे, करावी लागणारी तंगडतोड आणि ऊर फाटेस्तोवर करावे लागणारे कष्ट! ते पार करताना लाभलेले शिक्षक, त्यांची निरपेक्ष मदत, आजीची आणि बापाची कौटुंबिक स्तरावरची जगण्याची धडपड, फाटक्या संसाराला अपार कष्टांनी ठिगळं लावणारी बाई, सारं काही या लेखकाच्या संवेदनशील मनाने टिपलय. म्हणूनच त्याचं शिकण्याचं स्वप्न अधिकाधिक स्पष्ट होत गेलं! जगण्याची, शिकण्याची, सुशिक्षित होण्याची ही लढाई, हा संघर्ष यशस्वीपणे पार पाडत अभियंता होणारा हा उमदा तरूण, शासकीय सेवेतही तितक्याच उमेदीने, ताकदीने कार्यरत होतो!

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे (आता जलसंपदा) विभागात विविध पदावर काम करत नानासाहेबांनी निळवंडे धरणासारखे अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत. शासकीय सेवेत काम करताना समाजाप्रतिची जाणीव अखंडपणे सांभाळत, टक्के टोणपे खात, अनुभवांची शिदोरी गोळा करत यशस्वीपणे काम करणारा हा अभियंता आहे. आपलं कुटुंब सुसंस्कारित, सुशिक्षित आणि परिपूर्ण करून आपल्या भावकीसाठी, गावासाठी झटणारा हा तरूण आहे. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावरदेखील आपण समाजाचं, गावाचं, परिसराचं देणं लागतो ही कृतज्ञतेची जाणीव मनात ठेवून आपल्या गावी सर्व गावकऱ्यांना सहभागी करुन घेत झोळे गावातील मुलांसाठी शाळेची इमारत बांधतो! गावामध्ये अनेक सुधारणा करत ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करतो.

कादंबरीमधे उस्फुर्तपणे आलेली प्रवरा परिसरातील ग्रामीण नगरी भाषा हेही या आत्मकथेचे वैशिष्ट्य आहे. मिनानाथ खराटे यांचे मुखपृष्टावरील वटवृक्ष व पारंब्या हे चित्र त्याची पाळमुळं तेवढीच खोल रूजली असल्याने तो भक्कमपणे ऊभा असल्याचे दर्शवितो. पुण्यातील चपराक प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.