सामाजिक समतेच्या मार्गे तलाव जीविधा संवर्धन
शालू कोल्हे ही भंडाऱ्यातल्या नवेगाव बांध गावातली ढीवर समाजातल्या एका सामान्य परिवारातली तरूण महिला. बारावीपर्यंत शिकलेली म्हणजे ढीवर समाजाच्या मानाने बऱ्यापैकी शिकलेली. शिक्षणातून आलेल्या सामाजिक जागरूकतेतून तिच्या समाजाला अन्य समाजांकडून मिळणाऱ्या विषमतापूर्ण वागणुकीची तिला जाणीव झाली. ढीवर समाजातल्या महिलांना योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी मार्ग शोधत असता ती ‘भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ’ संस्थेचे मनीष राजनकर यांच्या संपर्कात आली. त्यांच्या जीविधा संवर्धनाच्या कामाविषयी समजून घेत असताना ढीवरांचे जीवन ज्यावर अवलंबून आहे ते तलाव हे किती महत्त्वाचं संसाधन आहे आणि त्या नैसर्गिक संसाधनाचं जतन ढीवर कशा प्रकारे करू शकतात हे तिच्या लक्षात आलं. तलावांची जीविधा जपताना ढीवर महिलांच्या सामाजिक समतेसाठीचा लढा शालू कोल्हेच्या शब्दांत -
तलाव आणि तलावाचं व्यवस्थापन यात लक्ष घालून पाहिल्यावर लक्षात आलं की मासेमारी सहकारी संस्था आणि ग्रामपंचायत सगळीकडे पुरूषांचंच वर्चस्व होतं. ते मला खूप खटकलं. महिला हुशार आहेत, कमी शिकलेल्या आहेत, पण पुरूष तरी कुठे शिकलेले आहेत? तरीपण त्यांना मान मिळतो, मग महिलांना का बरं नाही? पुरूष साधारण दहावी-बारावी शिकेलेले, महिला पाचवी-सहावी. पण आता माझ्याबरोबरच्या मुली दहावी-बारावी शिकलेल्या आहेत. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की पुरूष कमी शिकलेले असूनही त्यांचं वर्चस्व असतं तर महिलांचं का बरं नाही? माझ्या मनात एक जिद्द होती. मी ढीवर समाजाची आहे तर मी कुठला गुन्हा केलेला आहे की काय? बाकीच्या महिलांना मान भेटतो. मला ग्रामपंचायतीमध्ये कधी बोलावलं जात नाही. हे आधीपासून खटकायचं तेव्हा मी मनात ठरवलं होतं की मीपण पुढे जाईन आणि आमच्या समाजाच्या महिलांनाही पुढे नेईन. आमचा समाज इतकं पण खराब नाहीये की तो ग्रामपंचायतीत जाऊन बसणार नाही. गावात कोहळी, कलार, तेली, कुणबी या जाती आहेत. कोहळी सगळ्यात मोठी आणि ढीवर सगळ्यात खालची. कोहळी म्हणजे शेतकरी, ढीवर म्हणजे भूमिहीन. त्यांच्याकडेच शेतमजुरी करायची. पारंपरिकरित्या जेव्हा ह्या लोकांकडे काही कार्य असेल तेव्हा ढीवर समाजाच्या बायकांनीच भांडी घासली पाहिजेत, पाणी भरलं पाहिजे हे पाळलं जायचं. ते मला अपमान झाल्यासारखं वाटायचं. मी लग्न करून सासरी गेले तेव्हा माझी सासू तेच काम करायची. ते मला आवडत नव्हतं. मी म्हणायचे घरची भांडी घासयला लागली की तुम्ही सुनेला शिव्या देता आणि तिकडली भांडी घासायला लागली की तुम्हाला चांगलं वाटतं. त्या म्हणायच्या की ‘तिथे पैसे भेटतात.’ मी म्हणलं की पैसे मिळवण्यासाठी आपण दुसरीकडेही मजुरी करू शकतो. तेव्हा मी जास्त बोलू शकत नव्हते पण मनीषभाऊंच्या संपर्कात आल्यावर लक्षात आलं की महिलांची ही परिस्थिती आपण बदलू शकतो. मी स्वत:पासून सुरूवात करायची ठरवून मनीषभाऊंसोबत काम करायला लागले. मला दिसलं की महिला active आहेत पण त्यांना support करायला कोणी हवं. तेव्हा मी स्वत: ढीवर समाजाची असूनही पहिल्यांदी ग्रामसभेला गेले.
मनीषभाऊ मासेमारांच्या सहकारी संस्थेसोबत काम करत होते. सहकारी संस्थेचे सचिव माझे सासरेच आहेत. २०१३ मध्ये त्यांनी आमच्याच घरी मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगला मी होते आणि जी गोष्ट मला नाही पटली ती मी बोलले. नंतरच्या सहकारी संस्थांच्या मीटिंगमध्ये मी सहभागी होऊ लागले. तेव्हा लक्षात आलं की नेहमी पुरूषच बोलतात. मनीषभाऊंनी प्रश्न केला की ढीवर समाजाच्या महिला काही बोलत नाहीत का? तेव्हा काही महिलांनी उत्तर दिलं की ‘महिला लोकांच्याकडे मजुरीला जातात.’ त्यांच्याकडे शेती नाही त्यामुळे त्या कोहळी समाजाकडे शेतमजुरीवर जातात. त्या गुलामपण आहेत असे मी बोलले तेव्हा महिलांना खूप वाईट वाटलं. मनीषभाऊंनी तलावाबद्दल माहिती विचारली तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, ‘निमगावच्या सहकारी संस्थेला चार तलाव आहेत. पण ते तलाव काही फायद्याचे नाहीत कारण ते खूप कमी उत्पन्न देतात.’ तेव्हा भाऊंनी सांगितलं की त्या तलावांवर आपण काम करू शकतो. तेव्हा सर्वांच्या लक्षात आलं की हा माणूस आपल्या चांगल्यासाठी सांगत आहे. मला आधीपासूनच तलावांमध्ये interest होता. तेव्हा मी एका साठी-पासष्ठीच्या वृद्ध माणसाला विचारलं की आपल्या तलावांमध्ये उत्पन्न का येत नाही? आधी कसे होते आणि आत्ता कसे आहेत? त्यांनी सांगितलं आधी तलावात मुलकी मासोळ्या होत्या. त्यांचं उत्पन्न खूप चांगलं होतं आणि तलावामध्ये खूप जैवविविधता होती. पण आता रोहू, कटला यासारखे सरकारी मासे असल्यामुळे ते खूप वेगाने वनस्पती खातात. कोहळी समाजाचं वर्चस्व असल्यामुळे ते तलाव त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या ताब्यात जमीन आणि मालगुजारी तलाव दोन्ही होते. तेव्हा आमच्या लक्षात आलं की पहिल्यांदा तलाव बांधला तेव्हा कोहळी समाजाच्या लोकांनीच नाही बांधला, ढीवर समाजाच्या लोकांनीही बांधला. त्यांच्याजवळ पारंपरिक ज्ञान आहे. तेव्हा या कामाची सुरूवात मी महिलांपासून केली. सर्वात पहिला उद्देश हा होता की महिलांना निर्णय प्रक्रियेत कसं सहभागी होता येईल, पुरूषांचं वर्चस्व कसं कमी करता येईल. मी महिलांसोबत मीटिंग बोलवायचे तेव्हा येत नव्हत्या महिला. त्या दिवसभर काम करायच्या आणि रात्री घरी यायच्या. मी त्यांच्याकडे रात्री जायची. घरचे दारू पिऊन असायचे, काहीही बोलायचे. ते मी ऐकून घ्यायची. उलटा जवाब नव्हती देत. कधीकधी रडत पण घरी येत होते मी. आमच्या घरचे म्हणायचे ‘सोडून दे!’ मी म्हणलं ‘एकदा पुढे पाऊल टाकलं तर मागे नाही हटत आता!’ मी महिलांना हळूहळू सांगायला लागले की आपण एक बचत गटच तयार करू. मी स्वत: बारा महिलांचा बचतगट तयार केला. त्यातून महिला मीटिंगला यायला लागल्या. मी समाजाबद्दल थोडं बोलणं चालू केलं मग. आपली आर्थिक स्थिती, गावाची राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती याबद्दल मीटिंगांमध्ये बोलायला सुरूवात केली. पुढे ग्रामसभा होती. मी त्यांना सांगितलं की आपल्याला ग्रामसभेला जायचंय. सगळ्या महिलांना आश्चर्य वाटलं. त्यांनी हो म्हणलं मला पण एकही आली नाही. मी एकटीच गेली. ग्रामपंचायतीत विचारलं “तू कशाला आलीस?” म्हणलं “आज ग्रामसभा आहे” मी पंचायत राजचं थोडं वाचलं होतं. मी म्हणलं “आज महिला ग्रामसभा आहे, मग महिला नाही येणार तर कोण येणार?” त्यांना आश्चर्य वाटलं की ढीवर समाजाची महिला आज ग्रामपंचायतीत आली. तिथे मला लक्षात आलं की मी एकटी आली तरी त्यांना इतकं वेगळं वाटलं. माझ्यामागे दहा महिला उभ्या झाल्या तर यांचं खरंच काहीतरी होईल. तेव्हा मी सांगितलं होतं की ग्रामपंचायतीत महिलांसाठी १०% निधी येतो, अपंगासाठी ३% निधी येतो. महिलांना पंचायतीत स्वत:चा निर्णय मांडता येतो. हे सगळं ऐकून लोक माझ्या सासऱ्याकडे गेले होते. ते माझ्याशी खूप भांडले होते. सासऱ्यांनी सांगितलं की “राजनकर सरांसोबत काम नाही करायचं”. मी सांगितलं की, “आता मी घर सोडीन पण काम नाही सोडणार.” खरं तर माझे सासरे त्याकाळात दहावी झालेले. संस्थेचे सचिव होते. तरीही त्यांना आवडत नव्हतं की कोहळी समाजाच्या लोकांसोबत मी का बोलते? त्यांच्यासमोर आपण खाली मान करूनच बोललं पाहिजे. तिथे मी ग्रामपंचायतीत जाऊन बोलले होते. ते घरी आले तर आपण खाली बसायचं आणि त्यांना खुर्ची द्यायची हे मला पटत नव्हतं. मी घरापासूनच सुरूवात केली. आमच्याकडे कोहळी समाजाचे लोक यायचे. बाबा (सासरे) खुर्चीवरून उठायचे. मी तशीच बसलेली राहायची. तू पण माणूस आहे, मी पण माणूस आहे. ते घरी आले की मी चायही नाही बनवायचे. आपण त्यांच्या घरी गेलो की साधं पाणीसुद्धा नाही पुसत, मग आपण का बर त्यांना द्यायचं? माझ्या लक्षात आलं की हे काम करण अत्यंत गरजेचं आहे. काही वर्षानी त्यांच्या लक्षात आलं की माझं काम महत्त्वाचं आहे. पूर्वी ढीवर समाजाचे लोक ग्रामपंचायतेचे सदस्यही नव्हते. आता माझे सासरे उपसरपंच आहेत.
बायांना मी सांगितलं की ढीवर समाजाची मी एकटी गेले तेव्हा त्यांना इतका धक्का बसला, ढीवर समाजाच्या दहा महिला गेल्या तर किती बदल होईल? जानेवारी २०१४ चीच गोष्ट आहे. पहिली ग्रामसभा २६ जानेवारीची होती. आमच्या गावामध्ये महिला पहिल्यांदाच सहभागी झाल्या होत्या. तेव्हा ग्रामसभेला १५ महिला होत्या. त्यावेळी मला फारसं माहिती नव्हतं, थोडंथोडं माहिती होतं की महिलांच्या ग्रामसभेला कोरमची अट नसते. त्यांनी म्हटलं ‘कोरम पूर्ण झाल्याशिवाय महिला ग्रामपंचायत होऊ शकत नाही.” मी सहज म्हणून म्हणलं “महिला ग्रामसभेला कोरमची अट नसते. दाखवा कुठेय GR कायद्यामध्ये.” मी सहज म्हणून दिलं. ते यशस्वी झालं आणि महिलांची मीटिंग झाली. महिलांना खूप छान वाटलं. महिलांना नेण्यासाठी इतकी मेहनत घ्यायला लागली की रात्र रात्र त्यांच्यासोबत बोलून बोलून त्यांना पटवलं. पहिल्यांदा हो म्हणून बायका आल्या नाहीत. यावेळेला मी सकाळी सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना सोबत घेऊन गेले. त्यांना हे समजावून सांगितलं की ‘तुम्हाला जाऊन काही करायचं नाहीये फक्त जाऊन बसायचं आहे. तुम्हीही काही बोलू नका, मीही काही बोलणार नाही. फक्त ते जे प्रश्न विचारतील ते ऐकायचे आहेत.’ बोलायचं आहे असं मी म्हणलं असतं तर त्या आल्याच नसत्या. खरोखर त्या काहीच बोलल्या नाहीत. पण त्या ग्रामसभेत महिलांचे काय अधिकार असतात ते थोडं थोडं कळलं. त्यांनी परत येऊन आणखी पंधरा महिलांना सांगितलं. त्यांना पहिल्यांदाच ग्रामपंचायतमध्ये जाऊन बघितलं होत. सरपंच कोहळी समाजाचा दादागिरी करणारा होता. महिला तिथे जाऊन बसल्या खऱ्या पण कोणाकडे बघत नव्हत्या. मी सहज म्हणून दिलं होतं की, “महिला ग्रामपंचायतीला पुरूष नसतात.” त्यामुळे तिथे ग्रामसेविका होत्या त्यांनी सरपंचासह सर्वांना बाहेर जायला सांगितलं. मग महिलांची चर्चा सुरू झाली. गावातल्या महिला एकदा सुरू झाल्या की थांबत नाहीत. त्या मला म्हणल्या की ‘आम्ही ग्रामपंचायत आत्तापर्यंत पाहिलीही नव्हती. त्याच्या दाराच्या आत जाण्याचा तर विचारही केला नाही. जे काही प्रश्न होते ते आमचे नवरे बघून घ्यायचे. पण तू आम्हाला पहिल्यांदी ग्रामपंचायत दाखवली.’ त्यांना खुर्चीवर बसवलं. भाऊंनी मला सांगितलं होतं की आपण खाली बसलो आणि पुढची व्यक्ती खुर्चीवर बसलेली असेल तेव्हा आपल्याला वेगळं वाटतं. पण आपणही खुर्चीवर बसलो म्हणजे आपल्यात हिम्मत येते. त्यामुळे मी महिलांना सांगितलं की मी खाली बसले तरी चालेल पण तुम्ही खाली नाही बसायचं. महिलांना सगळ्यात पुढे केलं, सगळ्यात मागे मी उभी होते. ग्रामसेविका जेव्हा प्रश्न विचारत होत्या तेव्हा ह्या बोलू शकत नव्हत्या. ग्रामसेविकांना मी सांगितलं, "यांची ही पहिली ग्रामसभा आहे. तुम्ही इतकी वर्षं निमगावात काम करताय तुम्ही कधी महिलांना पाहिलं नाही? आत्ता त्यांना काही प्रश्न विचारू नका. त्यांना फक्त माहिती सांगा आणि मलाही काही माहिती नाहीये की मी तुम्हाला काही प्रश्न करू शकेन. पण तुम्ही मला सहकार्य केलं तर मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे.” पण ती सरपंचाच्या दबावाखाली होती म्हणून तिनी मला काही सहकार्य केलं नाही. मी बायकांना म्हणलं की ‘तुम्ही पंधरा जणी ग्रामसभेला आलाय, माझ्यासाठी एवढंच खूप आहे.’ पुढचं काम मी स्वत: पाहते, जिथे अडचण लागेल तिथे तुम्हाला मदतीला बोलवीन. पण प्रत्यक्षात पंधरा महिलांनी वीस महिला जमवल्या. पहिल्यांदा महिलांच्या आरोग्याविषयी- मासिक पाळी, अंगावरून पांढरे जाणे, हिमोग्लोबिन यावर चर्चा झाली. महिलांना इतकं विशेष वाटलं की आजपर्यंत आमच्या नवऱ्यांनी आम्हाला नाही विचारलं आणि ग्रामपंचायतीत याविषयी विचारलं.
लोकांना रोजगार हाती नव्हता. गावामध्ये घरोघरी जाऊन मी रोजगार हमी योजनेविषयी बोलले. गावात माझ्या घरासमोर चौक आहे, त्या चौकामध्ये मी पोस्टर प्रदर्शन केलं. मला त्यातलं काही माहिती नव्हतं पण पोस्टर वाचून मी सांगू शकत होते. गावातले शिकलेले लोक म्हणायचे की ढीवर समाजातल्या लोकांना काही माहिती नाही. नंतर मी रोजगार हमीचं काम बाजूला ठेवून तलावांचं काम हाती घेतलं. तलावांविषयी पारंपरिक ज्ञान फक्त ढीवरांकडेच होतं
ढीवरांच्या सहकारी संस्थेमध्ये १६१ सभासद आहेत. ते ग्रुपमध्ये मासेमारी करतात. कुठल्या हंगामात कुठले मासे मारायचे हे त्यांचं ठरलेलं असतं. पण तलावात मासेच मिळत नव्हते आणि रोजगारासाठी लोक बाहेरगावात जात होते. गावात रोजगाराचा प्रश्न गंभीर होता. त्यामुळे तलावाकडे कोणाचं लक्षच नव्हतं. मासे मारणे, त्यांची विक्री करून पैसे घरी आणणे हे सर्व पुरूषाचंच काम होतं. बायकांची यात काही भूमिका नव्हती. गावामध्ये मी सर्व्हेच्या निमित्ताने चर्चा केली तेव्हा लक्षात आलं, तलावांमध्ये पूर्वी पडसूळ (देवधान तांदूळ) मिळायचा तो आम्ही मोठ्या प्रमाणात खायचो. त्यासोबत करमू आणि पातूर या पालेभाज्या मिळायच्या; कचरकांदे, कडूकांदे, भिसेकांदे, कमळकांदे, पवनकांदे असे कंद होते. यांचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न येत होतं. पवनकांद्याच्या चिप्स आवडीने खाल्ल्या आणि विकल्या जात होत्या. या सर्व भाज्या-कंद इतर कुठे मिळत नव्हते. ४३ प्रकारचं पशुखाद्य गवत होतं. तलावाकाठी त्या संपत चालल्या होत्या कारण तलावांभोवती खुप बेशरम (ipomea) उगवली होती. त्यांनी या सगळ्या वनस्पतींची जागा घेतली होती. महिलांशी बोलून माझ्या असं लक्षात आलं की ह्या सर्व वनस्पती आपल्या तलावात पुन्हा उगवून येऊ शकतात. त्यांना लावायचीही काही गरज नाही, केवळ बेशरम उखडून भागणार होतं. माझ्यासोबतच्या महिलांच्या गटाला घेऊन आम्ही ३ दिवस श्रमदान केलं कारण आमच्याकडे पैसे नव्हते. सहकारी संस्थेला मागू शकत नव्हते कारण तेच कर्जबाजारी झाले होते. आम्ही महिलांनी श्रमदानाने काम केलं आणि पुरूषांच्या गटाने रोजी घेऊन काम केलं. एकाच तलावामध्ये एका बाजूला महिलांनी तर दुसऱ्या बाजूला पुरूषांनी काम केलं. श्रमदानाने केलेलं काम चांगलं झालं होतं. महिलांनी मुळापासून उपटलं तर पुरूषांनी वरवरून कापलं होतं. पुरूषांनी रोजीसाठी काम केलं तर महिलांनी ‘माझी तलावावर उपजीविका आहे’ या भावनेने काम केलं. मुळापासून झाड उपटून ते तिथेच वाळवून मुळावरच जाळलं. कपडे धुवायला महिला तलावावर जातात तेव्हा एखादं झाड दिसलं तरी लगेच त्यांनी उपटलं. सहा-सात महिन्यांनी आम्हाला ते लक्षात आलं कारण तिथे पडसूळ धान मोठ्या प्रमाणात आपोआप आलं. देवधान आणि हे कंद सेंद्रिय पद्धतीने नैसर्गिकपणे वाढलेले असतात. खायला तर ते चांगले आहेतच पण त्यांच्या विक्रीतूनही चांगले पैसे महिलांना मिळू शकतात हे महिलांना पटलं. पण हे बेशरम निर्मूलनाचं काम श्रमदानाने किती दिवस करणार? म्हणून मी ग्रामपंचायतमध्ये जाऊन सरपंचाशी बोलले की, “हे काम यशस्वी होत आहे तर आम्हाला रोजगार हमीच्या अंतर्गत हे काम करू द्या.” तर त्यांनी नकार दिला. मी पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये जाऊन आले आणि हे ‘सफाई’ अंतर्गत येऊ शकते असं लक्षात आलं. परंतु त्यालाही नकार मिळाला. पण तोपर्यंत या कामाचा फायदा लक्षात आल्यावर महिला-पुरूषांनी ते श्रमदानानेच काढलं.
या सगळ्याला कोहळी समाजाचा विरोध व्हायला लागला कारण जमिनीचे मालक ते होते. पण ते तलावांकडे फक्त सिंचनाच्या दृष्टीने बघत होते. पण जेव्हा आम्ही गावाचा सर्व्हे केला तेव्हा लक्षात आलं की फक्त १०% लोक तलावांचा सिंचनासाठी उपयोग करतात. बाकी तलावांचा वेगवेगळा उपयोग आहे. ते आम्ही लोकांना समजावून सांगितलं. मग लोकांनी या तलावांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तलावांच्या खोलीकरणासाठी JCB आले, ज्याचा या सगळ्या वनस्पतींवर परिणाम झाला असता आणि रोजगारही बुडाला असता. तेव्हा मी लोकांना सांगितलं की “तुमची इच्छा असेल तर JCB येऊ दे. पण नसेल तर JCB समोर आपण आडवे होऊ.” मी पुढे झाले आणि सगळेच उभे राहिले. मला खात्री होती की मी उभी राहिले की माझ्यामागे दहा लोक उभे राहतील. लोकांना या तलावाच्या खोलीकरणासाठी रोजगार हमीतून ४८० दिवस काम मिळालं. एकेका माणसाला दहा हजार रुपये रोजी मिळाली. ही रोजी फक्त ढीवर समाजालाच नाही तर इतर समाजालाही मिळाली. कारण रोजगार हमीचं काम काही एका समाजासाठी नाही. यातून लोकांना एका बाईने उभं राहण्याची ताकद लक्षात आली. आणि अख्खं गावच सोबत उभं झालं. तेव्हापासून सहकारी संस्थेसोबत बाराही तलावांमध्ये काम सुरु केलं. एका वर्षी चार तलाव हाती घेतले. निमगावमध्ये हे काम सुरू केलं.
त्यांनी एक वर्षभर तलावात अजिबात मासेमारी केली नाही. त्या सहकारी संस्थेने एका पगारी माणसाला ठेवून देखरेख करायला ठेवलं. तलाव राखीव ठेवून तिथे बंगाली मासे अजिबात सोडायचे नाहीत असं मी आणि मनीषभाऊंनी म्हणलं. त्याला लोक राजी झाले नाहीत कारण बंगाली माशांमुळे त्यांना उत्पादन मिळत होतं. एक वर्ष असे करण्यासाठी त्यांना मनवलं. त्यामुळे नंतर त्यांना चांगल्या दर्जाची वाईप, सिंगूर, वाघुळ, डाळप अशी मुलकी मासोळी मिळाली जी ३०० ते ४०० रुपये प्रति किलो विकली जाते. बंगाली मासे १२०-१५० रुपये किलो जात असत. मुलकी माशातून दोन लाखांच्यावर उत्पन्न एकाच तलावातून मिळालं. त्यातून लोकांना प्रश्न पडला कि आम्ही तिथे बीज सोडलं नाही तर मासोळ्या आल्या कुठून? मग कळलं की त्या मासोळ्या तलावात होत्याच पण त्या बारीक असतानाच मारल्या जायच्या. बंगाली मासे न टाकल्यामुळे आणि एक वर्ष विश्रांती दिल्यामुळे त्या मोठ्या झाल्या. यातून कर्जबाजारी असलेल्या सहकारी संस्थेच्या खात्यात ४-५ लाख रुपये जमा झाले. यातून लोकांना विश्वास वाटू लागला. या सगळ्या कामामुळे आता गावात ढीवर समाजाला मान दिला जातो, त्यांना गावातल्या कार्यक्रमाला सन्मानाने बोलावलं जातं.
त्यानंतर झालेल्या ग्रामसभेत मी मुद्दामहून गेले नाही. मी गेले नाही तरी काम चालू राहावं या इच्छेने. परंतु ग्रामसभेत ढीवर समाजाचे २८१ लोक आले, आपल्या अधिकारांसाठी मागणी केली. आता ढीवर समाजाला ४१ घरकुल मिळाले, प्रत्येक घरी संडास मिळाले. आधी अख्ख्या गावाला मिळूनही आमच्या समाजाला मिळाले नव्हते. रेशन कार्ड असून रेशन मिळत नसे. तेव्हा लोकांनी तहसीलदाराकडे जाण्याची हिंमत बांधली. तेव्हापासून कलेक्टरसाहेब खूप मदत करतात. हे काम करताना महिलांना ‘पंचायत राज’चं ट्रेनिंग दिलं. गावाबाहेर काम करणाऱ्या तरूण मुलांना मनीषभाऊंनी जैवविविधतेच ट्रेनिंग दिलं. ती मुलं आधी जास्त पगारावर काम करायची पण तिथे पैसे जास्त खर्चही व्हायचे आणि कधी व्यसनंही लागायची, घरी कमी पैसे पाठवू शकायची. त्या मुलांनी रोजगार हमीतून मिळालेलं उत्पन्न पहिलं. गावात राहून आपणच नियोजन करून आपणच काम करणं त्यांना फायद्याचं वाटलं. ती मुलंही गावात परत आली, मासेमारी करू लागली. मग माझ्या लक्षात आलं की निमगावमध्ये आता खूप लीडर तयार झालेत, तिथे आता माझी काही गरज नाही. तेव्हा मी तिथून बाहेर पडले.
दुसऱ्या गावात जाऊन काम करणं अवघड होतं कारण तिथले लोक म्हणायचे की बाहेरची महिला येऊन इथल्या लोकांना भडकावते. मग मी त्या गावातल्या घरात जाऊन महिलांशी बोलून त्यांना तयार करू लागले. सावरटोलामध्ये संहिता मेश्राम तयार झाली. तिला निमगावची सगळी कहाणी सांगितली. तिला सोबत घेऊन गेले. दुसऱ्या गावांमध्ये राहावं लागायचं तर जाताना माझ्या लहान मुलालाही सोबत घेऊन जाऊ लागले. यातून लोकांचा विश्वास वाढला. माझा काही स्वार्थ नाही हे त्यांच्या लक्षात आलं. अशा अठरा महिला चालना, खामखोला, ताडगाव, कोकना, कणेरी, खोबा, दहेगाव पारडी, मुरझा या गावातून उभ्या झाल्या. त्या गावात आणि नवीन गावात काम सुरू करत आहेत. कामाची सुरूवात परिवाराच्या सर्व्हेमधून होते. आता कोहळी समाजाच्या महिलाही आमच्या सोबत येत आहेत. त्यातून ३३ महिलांची संघटना तयार केली. त्यात प्रत्येक समाजाची महिला सामील होईल याची खबरदारी घेतली.
ढीवर समाज जाळी विणतो, मासेमारी करतो आणि शेतमजुरी करतो.
बाकी ठिकाणीही लोकांच्या सहभागाने तलाव स्वच्छ झाले आणि तिथलं स्थानिक उत्पन्न वाढलं. या साऱ्या प्रक्रियेतून आणखीही एक गोष्ट घडली. आधी सहकारी संस्थांमध्ये केवळ पुरूष होते. आता प्रत्येक संस्थेत पाच महिला आहेत. मासेमारी पुरूष करणार आणि विक्री महिला करणार. त्यामुळे हिशोबही व्यवस्थित लावले जातात. आधी भांडणं, दारूत पैसे जाणे असं होत होतं. महिला एकेक रूपयाचा हिशोब देते. सामूहिक विक्री करण्याचा निर्णय घेतला गेला. कमीत कमी दहा लोक मासेमारीला बसतात. ठेकेदारी बंद केली. लोकांनी स्वत: विक्रीला सुरूवात केल्यानंतर उत्पन्न वाढलं. आता तलावात माशांची बिजाईही तयार होते. आधी बाहेरून आणावे लागत होते.
त्याशिवाय प्रत्येक पुरूषाच्या बँक अकाउंटला त्याच्या पत्नीचं किंवा आईचं नाव जोडलं. महिलेच्या बँक अकाउंटला मुलीचं नाव जोडलं. आधी ढीवर समाजात मुला-मुलींमध्ये भेदभाव करायचे. आता दोघांना एकच शिक्षण देतात. वीस वर्षांपर्यंत लग्न लावून देत नाहीत.
शालू कोल्हे (भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ)
मुलाखत व शब्दांकन : ओजस सु. वि., वर्धा
meetojas@gmail.com