संपादकीय

१० ऑगस्ट २०२२

ऑगस्ट १९८९ मध्ये सुरू झालेल्या संस्थापक संपादक विद्या बाळ ह्यांच्या ‘मिळून सार्‍याजणी’ या मासिकाने वीस वर्षे पूर्ण केली; ही एक विशेष नोंद घेण्यासाठी गोष्ट आहे. एखादे मासिक चालवणे, ही किती कष्टप्रद गोष्ट आहे, याची आपण कल्पना करू शकतो. मात्र भाषेच्या आणि समाजाच्या जपणुकीसाठी नियतकालिकांची नितांत गरज असते. समाजाची केवळ जपणूक करणेच नव्हे, तर समाजाला वेळोवेळी वास्तवाभिमुख करणे, यासाठी त्याची नव्याने उभारणी करणे, हे कामही नियतकालिकांतून घडत असते. मराठी भाषेचे आणि त्या माध्यमातून मराठी समाजाचे वैचारिक चलनवलन चालू राहण्यासाठी ‘मिळून सार्‍याजणी’ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे मासिक स्त्रियांसाठी असले तरी स्त्रियांच्या प्रश्नांबाबत सार्वत्रिक जनमत तयार करण्यासाठी गरज ओळखून मासिकाने स्त्री-पुरुष सर्वांपर्यंत आपले वैचारिक आवाहन पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. शहरी मध्यमवर्गीय वाचकांबरोबरच ‘झुंजूमुंजू’, ‘मैतरिणी ग मैतरिणी’ या सदरांच्या माध्यमातून ग्रामीण वाचकांशीही आपले नाते जोडले आहे. मासिकाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे मासिकाला वाचकांचा प्रतिसाद मिळत गेला आहे आणि चोखंदळ वाचकांची पसंतीही त्याला मिळाली आहे. याबद्दल विद्या बाळ व डॉ. गीताली वि. मं. आणि त्यांचे आजपर्यंतचे सहकारी अभिनंदनास पात्र आहेत. या मासिकाने कलात्मकता आणि प्रबोधनपरता या दोन्ही प्रेरणा गृहीत धरून लेखन प्रकाशित केले. हा मध्यममार्ग मासिकाच्या स्वरूपाला स्थैर्य देण्यास उपयुक्त ठरला. कथा, कविता, अनुभवकथन, ललित लेख या प्रकारच्या ललित साहित्याचे आकर्षण सर्वसामान्य वाचकवर्गाला असतेच. ‘मिळून सार्‍याजणी’ने या साहित्याला मासिकात स्थान दिले, मात्र कलात्मकतेशी तडजोड न करताही आधुनिक जीवनमूल्यांचा आशयसंपन्न असा आविष्कार त्यातून होत आहे ना; यालाही महत्त्व दिले. स्त्रीच्या विकासाचा प्रश्न हा तिच्या उमलून येणार्‍या नि उजळून टाकणार्‍या आत्मभानाशी जसा निगडीत असतो, तसाच तो तिच्या विस्तारणार्‍या विचार-भावना-संवेदनविश्वाशीही निगडीत असतो. त्यामुळे ‘मिळून सार्‍याजणी’ने परिवर्तनवादी विचार-जाणिवांचे संस्कार वाचकांवर सातत्याने करण्यालाही महत्त्व दिले. जाणीव-जागृती आणि अनुभवविश्वाचा विस्तार ही उद्दिष्टे ठेवून ‘मिळून सार्‍याजणी’ ने वाचकांना आजवर दिलेल्या ठेव्यामध्ये अनेक अनमोल रत्ने आहेत. त्यांची झळाळी संवेदशील वाचकांच्या मनाला सतत जाणवत राहते. सानिया, गौरी देशपांडे, आशा बगे या प्रथितयश मराठी लेखिकांबरोबरच महाश्वेतादेवी. चित्रा मुद्गल, एम. के. इंदिरा यांच्या अनुवादित कथा या मासिकातून प्रकाशित झाल्या आहेत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या कवींच्या अनुवादित कवितांनाही प्रादेशिक कवितांबरोबरच सातत्याने स्थान मिळाले आहे. उत्कृष्ट अनुवादित साहित्य हे नवा आशय पोहोचवतानाच मराठी भाषेतील त्या त्या वाङ्मय प्रकारांच्या विकासाच्या नव्या शक्यताही सुचवत असते. त्यामुळे भाषा, साहित्य आणि संस्कृती (जाणीव विकसन) या सर्व पातळ्यांवरून हे काम महत्त्वाचे ठरते. आपल्या वाचकांच्या विचारांचे क्षितिज उंचावण्यासाठी मासिकाने अनेक लेखमाला, मुलाखती, परिसंवाद, वाचकचर्चा तसेच विविध सदरे यांचे आयोजन केले आहे. स्त्रीविश्वाशी संबंधित पैलू निवडतानाही विषयाचे ताजेपण जपले आहे. जसे सौंदर्यविषयक सल्ला हा स्त्रियांच्या मासिकाचा एक अनिवार्य भाग असतो. पण या मासिकातील डॉ. श्यामला वनारसे यांच्या ‘सुंदराचा वेध लागो’ या सदरातील लेखन असांकेतिक सौंदर्यदृष्टी जागवणारे आहे. प्रा. पुष्पा भावे यांचे ‘राजकारणाच्या अंगणात’ हे सदर स्त्रीच्या घर-अंगणाच्या संकुचित कल्पनेतून तिला बाहेर काढणारे व घराभोवती हवेसारखे सर्वत्र पसरलेले राजकारण ओळखायला लावणारे आहे. डॉ. विजया साठे यांची आहारविषयक व डॉ. संजीवनी कुलकर्णी यांची एड्सविषयक लेखमालाही स्त्रीला डोळस करणारी आहे. नोकरी करणार्‍या महिलांचे अनुभव सांगणारी ‘मिळवतीची पोतडी’ ही अशीच ‘स्त्रीधना’ने भरगच्च आहे. मंगला गोडबोले यांची ‘लिहिणार्‍या बोलतात तेव्हा’ ही लेखमाला भारतीय भाषांतील सिद्धहस्त लेखिकांच्या मुलाखतींवर आधारित आहे. त्यातून वाचकांना आणि अनुवादकर्त्यांनाही इतर भाषांमधील उत्तम कलाकृतींची माहिती मिळते. आजच्या माहितीच्या युगात नेमकी माहिती सहज उपलब्ध होणे, ही सुवर्णसंधीच ठरते. ‘मिळून सार्‍याजणी’ने लिंगभावावर आधारित विषमतेला नकार देण्यासाठी पोषक अशा संशोधनप्रकल्पांचे स्वागतच केले आहे. त्यामुळे टाटा समाजविज्ञान विभाग, स्पार्क, युनिक फीचर्स इत्यादी विविध संस्थांमार्फत झालेल्या पाहण्या, सर्वेक्षण अहवाल आदींमधून यशवंत सुमंत, डॉ. मिलिंद बोकील, डॉ. शर्मिला रेगे, संजय संगवई, रा. प. नेने, डॉ. गीताली वि. मं., आदी मंडळींचे स्त्रीप्रश्नाचा वेध घेणारे अभ्यासपूर्ण लेखन मासिकाला वैचारिक बैठक देतात, तर संपादक विद्या बाळ यांचे ‘संवाद’ हे सदर वाचकांशी भावनिक नाते जोडून त्यांना विचारप्रवृत्त करते. मनाच्या मातीत विचारांचे बीज रुजण्यासाठी असा भावनेचा ओलावा आवश्यकच असतो. मासिकाला एकाच वेळी प्रासंगिक आणि सार्वकालिक अशा दोन्ही पातळ्यांवरचे भान जागे ठेवण्यासाठी संपादकांना कसरत करावी लागते. त्यामुळे जळगाव वासनाकांडाचा; तसेच वेश्यागृहातून सोडवलेल्या मुलींचा प्रश्नही त्यात असतो. तसेच नोबेल पुरस्कारविजेत्या शिरीन इबादीच्या कार्याचा परिचयही असतो. ‘तरुण डॉट कॉम’, ‘पाणबुडी’ या सदरांमधून तरुण पिढीशी जवळीक साधलेली असते, तर ‘आम्ही मुलींकडे राहतो’, सारख्या वाचकचर्चेतून प्रौढांच्या जीवनानुभवांना जागा दिलेली दिसते. ‘बापलेकीचे नाते’, ‘पुरुषांचे माहेर’ असे विषय पुरुषवाचकांनाही लिहितं करतात. ‘आरसा’सारख्या सदरातून छोट्याशा प्रसंगांकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची सवय वाचकांना लागावी, अशी अपेक्षा दिसते आणि ‘स्वत:शी नव्याने संवाद साधायची’ सवय लावून वाचकांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्नही दिसतो. नवीनवी सदरे, संवेदनशील वाचकाला आवाहन करणारी मुखपृष्ठे (उदा. मे २००८चे दगडखाण महिला कामगारांचे दर्शन घडवणारे मुखपृष्ठ तसेच दशकपूर्ती विशेषांकाचे मुखपृष्ठ) संगीत-साहित्य-पत्रकारिता-विज्ञान- लोककला अशा संपन्न सांस्कृतिक जगाचे दर्शन आणि वाचकांना बोलते करण्याची हातोटी ही ‘मिळून सार्‍याजणी’ची वैशिष्ट्ये आहेत. मासिकाने वेळोवेळी न्यायसंस्था, राजकारण, अर्थकारण, जागतिकीकरणाचे संभाव्य परिणाम, चंगळवादातील धोके अशा विषयांवर जनजागरण घडवले आहे. नर्मदा धरणग्रस्तांचा लढा, भंवरीदेवीचा लढा, अण्वस्त्रबंदीसाठीचे लढे, महिला आरक्षण प्रश्न अशा महत्त्वाच्या प्रश्नांकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे. वाचकांची ‘बोलकी पत्रं’ वाचताना वाचकही मासिकाकडे अभिव्यक्तीसाठीचे हक्काचे ‘व्यासपीठ’ म्हणून पाहत असल्याचे लक्षात येते. ‘मिळून सार्‍याजणी’चा दशकपूर्ती विशेषांक व त्या निमित्ताने त्यातील निवडक साहित्यावर आधारित पुष्पा भावे यांनी तयार केलाला व दीपा श्रीराम यांनी नाट्यरूपात सादर केलेला कार्यक्रम हा वाटचालीचा एक टप्पा होता. दरवर्षीचे वैचारिक मंथन घडवणारे, परिसंवादांनी बोलके वाटणारे दिवाळी अंक, गौरी देशपांडे विशेषांक (ऑगस्ट २००३) यांनाही आजपर्यंतच्या वाटचालीत महत्त्वाचे स्थान आहे. विसाव्या वर्षापर्यंतची ही वाटचाल पुढेही अशीच अथक चालू राहील, असा वाचकांना विश्वास आहे. कारण तळागाळातल्या महिलांना बोट धरून पुढे आणणे नि लिहिते करणे आणि दिग्गज लेखकांनाही मासिकाकडे वळवणे, ही अवघड कसरत संपादकांना जमते आहे. अशा टोकाच्या जीवनानुभवांना एकत्र गुंफण्याचा हा मार्ग म्हणजे एक आगळीवेगळी संस्कारदायी चळवळच आहे. समाजमने सांधणारी चळवळ! या संदर्भात ‘मिळून सार्‍याजणी’त डॉ. फ्रॅन्सिस मारिया यासास यांची सरिता पदकी यांनी अनुवादित केलेली एक कविता आठवते. ‘विटांची ओझी वाहणार्‍या दोन स्त्रिया’ या कवितेत एक आहे दलित मजूर स्त्री आणि दुसरी आहे डोक्यात नि काळजात शब्दांच्या त्या विटा बांधणारी अभिजन वर्गातील स्त्री. त्यांच्यातला मूक संवाद कवितेतून व्यक्त होतो तो असा :

‘‘शब्दांच्या विटांनी मी बांधत असते एक नवीन गाणं, तुझ्या माझ्या जगण्यातून, झगडण्यातून आनंदातून आणि दु:खातून नव्या स्त्रीची प्रतिमा आणि स्वप्न घडवणारं’’ (दिवाळी १९९५, पृ. ४०)

असा संवेदनशीलतेला आवाहन करत, संवादाचा पूल उभारत जाणीवसंपन्न, मूल्यनिष्ठ जगण्याचा पाया बळकट करण्याचा प्रयत्न हे मासिक सातत्याने करीत आले आहे. ‘संवाद’ म्हटला की त्यात ‘वाद’ही असतोच. ‘मिळून सार्‍याजणी’त काही विषयांवर वादही झडले आहेत. त्याच वेळी आपल्या विरोधकांची सविस्तर मते प्रकाशित करण्याचा मनाचा उमदेपणाही त्यांनी दाखविला आहे. मतामतांच्या अशा आंतरक्रियेतूनच विचारांची जडणघडण हाते असते, यावर संपादकांनी नेहमीच विश्वास ठेवला आहे.

‘स्त्रीमिती’ची निर्मिती

वीस वर्षांच्या वाटचालीच्या टप्प्यावर ‘मिळून सार्‍याजणी’तील वीस वर्षांतील स्त्री विषयक निवडक लेखांचे पुस्तक करण्याची कल्पना समोर आली. लेखांची निवड करतानाचे निकष ठरवणे आणि पुस्तकाचा आराखडा तयार करणे या प्रकियेत पुष्पा भावे, डॉ. मिलिंद बोकील यांच्याबरोबरच मासिकाच्या संपादक विद्या बाळ व डॉ. गीताली वि. मं. यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य लाभले. ‘स्त्रीकेंद्री विविधांगी वैचारिक लेखन’ हे पुस्तकाचे स्वरूप ठरल्यावर अर्थातच मासिकातील ललित लेख, कथा, कविता, मुलाखती, व्यक्तिपरिचयात्मक लेखन इत्यादी सदरे बाजूला ठेवली. अभ्यासपूर्ण लेख, संस्थांचे शास्त्रीय पाहण्यांवर आधारित असे प्रकल्प, महत्त्वाचे परिषदवृत्तांत अषा लेखनाबरोबरच काही महत्त्वाच्या विषयांवरील अनुवादित लेखही निवडले. लेखांची निवड करताना जाणवलेली एक अडचण म्हणजे दिवाळी अंकातील लेख सविस्तर स्वरूपाचे होते, एरवीच्या अंकातील काही लेख सुविधांच्या अभावी (सुरुवातीच्या वर्षांमधील अंकांतील तर विशेषच) स्फुट स्वरूपाचे होते. मासिकाच्या पृष्ठसंख्येचीही मर्यादा होती. त्यामुळे विषयाला प्राधान्य देऊन काही तुलनेने छोटे लेखही स्वीकारले. स्त्रीच्या जगण्यातील स्थितिगतीचे सम्यक् भान व्यक्त करणारे, विचारप्रवण करणारे लेख निवडण्याचे उद्दिष्ट कायम समोर ठेवले. (लेख साधारणत: आहेत त्या स्वरूपातच समाविष्ट केले असल्यामुळे त्यांच्याशेवटी प्रसिद्धीचा कालनिर्देश केला आहे. संपादन करताना काही लेखांना आवश्यक तिथे टिपा दिल्या आहेत.) ही सर्व निर्मितिप्रक्रिया आम्हा सर्वांसाठी चैतन्यदायी ठरली आहे. लेखांची निवड करताना एकाच विषयाशी संबंधित वेगवेगळे पैलू मांडणारे अनेक लेख समोर येत होते. अशा वेळी अस्वीकृत पण महत्त्वाच्या लेखांची नोंद घ्यायचे ठरवले. (तशी नोंद पुढे घेतली आहे.) ‘मिळून सार्‍याजणी’तील वीस वर्षांतील लेखनाची सूची तयार करण्याचे काम डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचयावर सोपवले होते. ही दोन्ही कामे परस्परपूरक असल्यामुळे एकाच वेळी चालू होती. मासिकाची वर्णनात्मक सूची प्रकाशित झाल्यावर अभ्यासकांची सोय होईल, हा उद्देश त्यामागे होता. कारण अभ्यासपूर्ण लेखांखेरीज इतर सदरांमधील लेखन, ललित लेखन, अनुभवकथन, वाचकचर्चा या सार्‍यांमध्येही स्त्रीकेंद्री, तसेच स्त्रीवादी विचारमंथन विखुरलेल्या रूपात समाविष्ट आहेच. सूचीमुळे विविध अभ्यासप्रकल्पांतर्गत स्वरूपात या कामाची दखल घेण्याची प्रेरणा काहींना होईल आणि अभ्यासकांसाठी एक संदर्भसाधन उपलब्ध राहील. आता ‘स्त्रीमिती’मधील विचारसूत्रांची मांडणी समोर ठेवते. मुख्यत: सहा विचारसूत्रे लक्षात घेऊन पुस्तकाची आखणी केलीआहे; ती अशी :

१. स्त्रीत्वाचे भान आणि ऐतिहासिक - सामाजिक परंपरा

‘स्त्रीमिती’त सुरुवातीला निवडलेले लेख या विषयाचा वेध घेणारे आहेत. कारण, स्त्रीच्या आत्मभान जागृतीची वाटचाल सर्वात प्रथम जाणून घ्यायला हवी. स्त्रीचे आत्मभान म्हणजे स्त्रीत्वाचे भान. हे भान जागे होताना तिला स्वत:च्या अस्तित्वाची नव्याने जाणीव होत गेली. आपल्या स्त्रीत्वाचे जन्मदत्त व व्यक्तिगत पैलू कोणते आणि समाजदत्त पैलू कोणते, याचे तिला आकलन होऊ लागले. हे आकलन तिला आजून उजळून टाकणारे होते, तसेच भोवतालच्या समाजाकडे नव्या दृष्टीने पाहायला लावणारे होते. अर्थात, या वाटचालीचे टप्पे जगाच्या रंगमंचावर देशकालस्थितीनुसार वेगवेगळ्या वळणांवरून पार पडले. या वाटचालीवर प्रकाशझोत टाकणारे काही लेख पुस्तकात सुरुवातीला घेतले आहेत. डॉ. मिलिंद बोकील यांचा सुरुवातीचा लेख प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत स्त्रीजीवनात घडलेली स्थित्यंतरे समोर ठेवतो. हा लेख स्त्रीअभ्यासाला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देतो. मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, दैवतशास्त्र इत्यादी विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासातून आलेली मर्मदृष्टी या लेखातून व्यक्त होते. स्त्रीत्वाचे भान म्हणजे स्त्रीचे वैयक्तिक आत्मभान नव्हे, तर समस्त स्त्रीपरंपरेचे स्त्रीत्वाचे भान होय; हे बोकीलांचे विचारसूत्र आहे. म्हणूनच त्यांचा लेख ‘स्त्रीवादाचे देशी प्रतिमान’ उभे करताना महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या लेखाचे शीर्षकही अर्थपूर्ण ठरते. ‘स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास’ ही संत जनाबाई यांच्या अभंगातील ओळ आहे. तेराव्या शतकात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानामुळे जे सांस्कृतिक वातावरण तयार झाले होते, त्या तत्त्वज्ञानाची मूस या उद्गारामागे आहे. त्यामुळेच अनाथ, शूद्र दासी आणि स्त्री अशी चहूबाजूंनी गांजलेली जनाबाईही आपला आत्मसन्मान राखू शकली. जनाबाईचा हा उद्गार म्हटलं तर स्वगतासारखा, स्वत:ला उभारी देणारा आहे आणि त्याच वेळी समस्त स्त्रीजातीला धीर देणाराही आहे. प्रागैतिहासिक काळानंतरच्या पुढचा टप्पा दुसर्‍या लेखात येतो. इ. स. पूर्व सहाव्या शतकातील ‘थेरीगाथा’ या बौद्ध धर्मग्रंथामधील स्त्रियांचे जीवनदर्शन घडविणारा हा लेखही ऐतिहासिक वास्तवाचे भान जागे करतो. त्या काळात मोक्षाचे म्हणजेच ज्ञानाचे द्वार स्त्रीसाठी खुले असणे आणि स्त्रीने विपरीत परिस्थितीला तोंड देताना आत्मज्ञान आणि विश्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करणे; ही स्त्रीत्वाची आंतरिक ताकद लक्षात घेण्याजोगी आहे. डॉ. लता छत्रे यांचा हा लेख छोटा असला, तरी विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन समाविष्ट केला आहे. भारतीय परिप्रेक्ष्यात स्त्रीवादी मांडणी करताना एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे शैक्षणिक कार्य पायाभूत महत्त्वाचे ठरते. आशा साठे यांच्या लेखातून सावित्रीबाईंचे कार्य कसे काळाची चौकट ओलांडणारे आहे, याची कल्पना येते. सावित्रीबाईंच्या जगण्यातील सत्त्व आणि परंपरेचा धागा जपण्यासाठी स्वीकारले पाहिजे, हे त्यातून सुचवायचे आहे. सावित्रीबाईंविषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेमुळे या लेखाला आत्मीयतेचा स्पर्श झाला आहे. ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ आपल्याकडे १८८२ मध्ये प्रसिद्ध झाला, ही घटना जागतिक पटलावरही नोंद करण्याजोगी आहे. डॉ. विद्युत भागवत यांनी आपल्या लेखात या पुस्तकातील विचारविश्वाचे दर्शन प्रभावीपणे घडवले आहे. ताराबाईंनी स्त्रीच्या दुय्यमत्वाची जाणीव तर व्यक्त केलीच, शिवाय जनमानसात आणि म्हणूनच लोकप्रिय साहित्यात रूढ असलेल्या स्त्रीप्रतिमेवर घणाघाती हल्ला चढवला. मिथकांकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी, वक्तृत्वशैली आणि वास्तवाचे सखोल आकलन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. विद्युत भागवत यांनी या ग्रंथाचे ऐतिहासिक मोल लक्षात आणून दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याकडे जे प्रबोधनपर्व सुरू झाले होते, त्यासाठी महात्मा फुले यांच्याबरोबरच गोपाळ गणेश आगरकर यांचेही वैचारिक योगदान महत्त्वाचे होते. १८८८ मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या ‘सुधारक’ या साप्ताहिकातून स्त्रियांच्या लेखनासाठी खास जागा राखलेली होती. स्त्रीप्रश्नाचा विचार करताना आगरकरांनी दाखवलेली दूरदृष्टी, अंगीकारलेला नि:स्पृह ध्येयवाद आणि पत्करलेले वैचारिक धाडस यांची ओळख विद्या बाळ यांच्या लेखातून होते. आपल्या सामाजिक परंपरेत लिंगभावनिरपेक्षता हे मूल्य रुजणे हे किती कठीण आहे; याची कल्पना वीणा आलासे यांच्या ‘दोन तेजस्विनी’ या लेखातून होते. सामाजिक सुधारणाविषयक चर्चेने गजबजलेल्या काळातील - १८८० ते १८९० मधील - एक घटना त्यातील सूक्ष्म कंगोर्‍यासंकट यात उलगडून दाखवली आहे. बंगालमधील ‘भारती’च्या संपादक स्वर्णकुमारीदेवी, पंडिता रमाबाई आणि रवींद्रनाथ ठाकूर यांच्या संदर्भात घडलेली ही सत्यघटना आहे. स्त्रियांना दर्शनी मोठेपणा देत प्रत्यक्षात कमी लेखण्याची मनोवृत्ती या लेखातून उघड होते. रवींद्रनाथांसारखे संवेदनशील मनाचे समाजधुरीणही याला अपवाद ठरत नाहीत. या लेखातून महाराष्ट्र व बंगाल या प्रांतातील सुधारणावादी विचारांच्या स्त्रियांमधील ‘भगिनीभाव’ही व्यक्त होतो. तसेच एकोणिसाव्या शतकातील स्त्रीपत्रकारितेचे योगदानही लक्षात येते. प्रस्तुत विषयाला पूरक असे इतरही लेख ‘मिळून सार्‍याजणी’मधून प्रकाशित झाले आहेत. त्यांपैकी काहींचा उल्लेख करावासा वाटतो. डॉ. मिलिंद वाटवे यांची जीवनशास्त्रीय अभ्यासावर आधारित (‘नरमादी ते स्त्रीपुरुष’, १९९४) लेखमाला व आपल्याकडील सामाजिक प्रबोधनातील विविध स्वरूपाचे ताणतणाव चित्रित करणारी डॉ. अरुणा ढेरे यांची ‘सुधारकांची साहसे’ ही १९९९ मधील लेखमाला यांचा उल्लेख आवश्यक ठरतो. तसेच डॉ. विद्युत भागवत यांनी सुरुवातीच्या काळात लिहिलेले संशोधनावर आधारित लेखही महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ - अ) ‘विधवापुनर्विवाह, स्त्रीशिक्षण आणि स्त्रियांच्या लैंगिकतेचा प्रश्न’ (डिसेंबर, १९८९).

ब) ‘पुन्हा एकदा स्त्रीशिक्षण’ (फेब्रुवारी १९९०)

क) १८५२चा ‘स्त्री विद्याभ्यास निबंध’ (जून, १९९०)

या आणि अशा विविध लेखांमुळे सर्वसामान्य वाचकाला स्त्रीप्रश्नाची पार्श्वभूमी जाणून घेणे शक्य होते.

२. स्त्रीमुक्ती चळवळ : स्वरूप आणि परिणाम

एकोणिसाव्या शतकाच्या पाश्चात्त्य देशांमध्ये स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू झालाी. त्यामागील प्रेरणा जाणून घेताना काही व्यक्ती, काही ग्रंथ, तसेच ऐतिहासिक घटनांची शृंखलाबद्ध प्रक्रिया हे घटक लक्षात घ्यावे लागतात. स्त्रीमुक्ती चळवळ म्हटले की, ‘सीमॉं द बोव्हा’ आणि तिचे ‘द सेकंड सेक्स’ हे पुस्तक साधारणत: सर्वांना माहीत असते. पण त्यापलीकडेही काही ग्रंथ आहेत. अर्थात स्त्रीमुक्ती चळवळीचा इतिहास सांगणयाची भूमिका येथे नाही. मात्र त्या चळवळीचे सर्वसाधारण स्वरूप आणि तात्कालिक तसेच दूरगामी परिणाम यांवर प्रकाश टाकणारे ‘मिळून सार्‍याजणी’तील काही लेख पुस्तकासाठी निवडले आहेत. डॉ. यशवंत सुमंत यांचा ‘स्त्रीमुक्तीची पहाट’ हा लेख एकोणिसाव्या शतकाला स्वत:चे रंगरूप देणार्‍या युरोपियन उदारमतवादाचा परिचय करून देताना काळाचे जिवंत स्पंदनच जणू शब्दांकित करतो. ब्रिटिशांच्या राजवटीमुळे आपल्याकडेही प्रबोधनाचे वारे पोहोचले होते. व्यक्तिस्वातंत्र्य, समता या मूल्यांच्या उद्घोषातून निर्माण झालेला रेटा पाश्चात्य जगात अपरिहार्यपणे स्त्रीमुक्तीला गती देत होता. सुमंतांच्या लेखातून त्य काळातील विचारमंथनाची कल्पना येते आणि आपल्याकडील फुले-आगरकरांच्या विचारांमुळे विविध समाजगटांमध्ये झिरपत गेलेले आधुनिकतेचे भान लख्खपणे जाणवते. ‘स्त्रीच्या दुय्यमतेची बोचणारी जाणीव’ हा स्त्रीमुक्ती चळवळीमागील स्फुल्लिंग होता. या चळवळीचा परिणाम पुरुषी मनोवृत्तीवर वेगवेगळ्या प्रकारे झाला. चळवळीविषयी टोकाचे गैरसमज हा एक परिणाम, तर पुरुषांच्या मानसिकतेत नकळत होऊ पाहणारे परिवर्तन हा दुसरा परिणाम. डॉ. गीताली वि. मं. यांनी लिहिलेला ‘निमित्त : अमेरिकन पुरुषांची नि:शब्द चळवळ’ हा लेख या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. स्त्रीचळवळीची प्र्रणेती बेटी फ्रीडन हिच्या ‘सेकंड स्टेज’ या पुस्तकातील एक प्रकारची ओळख यातून होते. मुलाखतींवर आधारित आशा निरीक्षणांची नोंद या प्रकरणात आहे. आपल्याकडेही असे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे, हे यातून लक्षात येते. डॉ. जर्मेन ग्रीअर हेही चळवळीतील एक महत्त्वाचे नाव. हिच्या ‘फिमेल युनुक’ या पुस्तकाने खळबख माजवली होती. त्यानंतर तीस वर्षांनी तिचे ‘द होल वुमन’ हे पुस्तक आले. प्राजक्ता महाजन यांनी या पुस्तकाचा परिचय घडवला आहे. स्त्रीवादी स्त्रीने ‘पुरुषासारखे’ व्हावे; हे ग्रीअर यांना अभिप्रेत नाही. बाईपण नाकारणे आणि बाईवरील अन्याय नाकारणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यातून स्त्रीमुक्ती चळवळीतील तात्विक संघर्षाची कल्पना येते. चळवळीतील एक कार्यकर्ती ग्लोरिया स्टायमन आणि अँड्रिया जॉनस्टन यांचे ‘गर्ल्स स्पीक आऊट’ हे पुस्तक म्हणजे चळवळीच्या निमित्ताने घडलेल्या ‘जाणीवजागृतीचा जल्लोष’ आहे. प्रा. लीला पाटील यांनी स्त्रीच्या नि:शब्दतेला वाचा फोडणार्‍या या प्रकल्पाची संवेदनशील मनाने ओळख करून दिली आहे. आपल्याकडेही स्त्रीची समाजमान्य अशी ‘मूक, सोशीक’ ही प्रतिमा कालांतराने बदलू लागली. समाजमनाची मशागत करणार्‍या अशा पुस्तकातून विचारांची धगही पोहोचते आणि कृतीसाठी प्रेरणाही रुजते. अशा लेखाद्वारे दूरचे वारे आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याकडील स्त्रीच्या अंतर्मनाचा वेध घ्यायला प्रवृत्त करतात. स्त्रीमुक्ती चळवळीमुळे जगभर जी जागृतीची लाट आली, त्यातून स्त्रियांमध्ये आत्मशोधाची प्रक्रियाही सुरू झाली. १९७५ हे वर्ष ‘युनो’ने ‘आंतरराष्ट्रीय स्त्रीवर्ष’ म्हणून जाहीर केल्यामुळे या प्रक्रियेला अधिक चालना मिळाली. स्त्रियांच्या संघटना प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये सक्रीय होऊन सहभागी होऊ लागल्या. अशा परिषदांमधून स्त्रीप्रश्न ऐरणीवर आला. अशा काही परिषदांमधील विचारमंथन आपल्यापर्यंत पोहोचणारे काही लेखही यात समाविष्ट केले आहेत. डॉ. नीलम गोर्‍हे यांचा ‘मेक्सिको ते बीजिंग : स्वयंसिद्धतेची खडतर पाऊलवाट’ हा लेख जागतिक स्तरावर स्त्रीप्रश्नाची दखल कसकशी घेतली गेली, याचा आलेखच समोर ठेवतो. विविध स्त्रीप्रश्नांच्या मांडणीतील ऐतिहासिक क्रम त्यातून लक्षात येतो. ‘ब्रायटनची आंतरराष्ट्रीय परिषद’ हा १९९६ मधील परिषदेविषयीचा विद्या बाळ यांचा लेख त्यातील विषयामुळेही महत्त्वाचा आहे. विषय आहे ‘स्त्रियांवरील हिंसाचार, स्त्रीचा गैरवापर आणि स्त्रियांच्या नागरिकत्वाची प्रतिष्ठा’. विद्या बाळ यांनी आपल्या वाचकांसाठी केवळ तटस्थपणे लिहिलेला वृत्तांत असे लेखाचे स्वरूप नाही. परिषदेतील मनोगते ऐकताना कार्यकर्ती या नात्याने स्वत:च्या भावविश्‍वात उमटलेले विचार-भावनांचे तरंगही त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. ‘मुस्लिम महिला अधिकार परिषद’ हा डॉ. रझिया पटेल यांचा लेख १९९९ मध्ये झालेल्या परिषदेतील चर्चेची माहिती तर देतोच, शिवाय १९६६ पासूनच्या घडामोडी सांगतो, व विविध परिषदांमुळे बदलत गेलेल्या मुस्लिम स्त्रीप्रश्नाच्या स्वरूपाचा इतिहासच थोडक्यात समोर ठेवतो. भारतीय समाजात स्त्रीच्या प्रश्नांना विविध जातीधर्माची कुंपणे कशी आहेत, याची जाणीव या लेखातून होते. या परिषदवृत्तांतामुळे वाचकांना समकालीन वास्तवाचे भान येते आणि प्रश्नांच्या बदलत्या परिणामांची कल्पनाही येते. स्त्री-प्रश्नाचे आकलन करून घेण्यासाठी सामाजिक वास्तवाचे विविध स्तर उलगडून पाहता यावे लागतात. आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक असे हे स्तर असतात. डॉ. शर्मिला रेगे यांनी ‘स्त्री : असलेली, घडवलेली आणि दाखवलेली’ या लेखात हे काम सखोल चिकित्सक दृष्टीने केले आहे. ‘स्त्री-प्रतिमा’ कशी घडवली जाते, हे कळल्याशिवाय स्त्रीला तिच्या आतील निखळ माणूसपणाचा शोध लागणे शक्य नाही. लेखिकेने या लेखात स्त्रीवरील अन्यायांचे चित्रण करतानाच स्त्रियांच्या लढ्यांचीही नोंद घेतली आहे. स्त्रियांच्या चळवळीमुळे ‘स्त्री-पुरुष’ हा समास ‘स्त्री आणि पुरुष’ याऐवजी ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ असा समास बनू लागला होता. अशा वेळी या चळवळीतील विधायक गाभा समजल्यावर गैरसमज दूर करायला सुजाण पुरुषच पुढे येऊ लागले. सतीश तराणेकरांचा ‘स्त्रीमुक्ती : समज-गैरसमज’ हा लेख याची प्रचीती देणारा आहे. ‘मिळून सार्‍याजणी’चा वाचक कसा विचारशील आहे, लिंगभावाच्या प्रश्नाकडे स्वनिरपेक्ष दृष्टिकोनातून पाहू शकणारा आहे; याचे प्रत्यंतर या लेखातून येते. ‘मिळून सार्‍याजणी’ने विविध भाषांमध्ये उमटलेले आत्मविश्वाससंपन्न स्त्रीचे उद्गार वेळोवेळी आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवले आहेत. शशी देशपांडे या प्रख्यात इंग्रजी कादंबरीकारांचा लेख त्यातील ठाशीव भूमिकेमुळे लक्षात राहतो. स्त्रीवादाच्या विरोधकांचे आक्षेप त्यात खोडले आहेत, शिवाय प्रतिपक्षाला निरुत्तर करणारी युक्तिवादसंपन्न शैली वापरल्यामुळे हा लेख प्रभावी ठरला आहे. ‘होय! मी स्त्रीवादीच आहे’, हे लेखाचे शीर्षकच बोलके आहे. स्त्री चळवळीविषयीचे आणखीही लेखन अंकात मोठ्या प्रमाणात आढळते. त्यातले काही उल्लेखनीय लेख पुढीलप्रमाणे आहेत : क) ‘पाश्चात्य स्त्रीवादी राजकारण’ डॉ. विद्युत भागवत, दिवाळी १९९९ ख) ‘स्त्रियांचे जागरण - २०००’, डॉ. पुष्पा भावे, फेब्रुवारी २००० ग) ‘नव्या निकाहनाम्याच्या निमित्ताने’, रझिया पटेल, जुलै २००५ घ) ‘ब्लुमरिझम : पारंपरिक स्त्री पोशाखाविरुद्ध अमेरिकन स्त्रियांची चळवळ - सन १९५०’, मंगला सामंत, ऑगस्ट २००५

३. स्त्री-विकास : समस्या आणि उपाय

स्त्रियांचा विकास ही संकल्पना त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक विकासाशी संबद्ध आहे. स्त्रियांना संपन्न सामाजिक जीवन लाभावे यासाठी खुले अवकाश उपलब्ध असणे गरजेचे आहे. स्त्री विकासाची स्वप्ने सुधारकांनी एकेकाळी पाहिली. पुढे स्त्री चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्या स्वप्नांना स्वत:च्या ध्येयदृष्टीने आकार दिला. मात्र तरीही स्त्री विकासाची वाट अजूनही खडतरच आहे. त्या वाटेवर अनेक संकटे दबा धरून बसलेली आहेत. हिंसा, बलात्कार यांचे भय तर स्त्री मनावर नकळत असतेच. प्रियकराच्या रागाची शिकार झालेल्या, हुंडाबळी झालेल्या अशा किती तरी स्त्रिया आठवतात. काही स्त्रियांना धर्मरूढी यांच्या अंतर्गत चालणार्‍या हिंसेला तोंड द्यावे लागते. प्रत्येक विवाहित स्त्रीही सुरक्षित असतेच असे नाही. कधी तिच्या वाट्याला मानसिक कुचंबणा येऊ शकते. स्त्रीचे शारीरिक, मानसिक, सामाजिक अशा पातळ्यांवर शोषण होत राहते, कारण तिचे गृहीत धरलेले दुय्यम स्थान हे होय. त्यामुळेच मिळवत्या स्त्रीचेही आर्थिक शोषण होतच नसेल असे म्हणता येत नाही. (पाहा : ‘प्रश्न तेरा कोटींचा’ (मिळवत्यांच्या घरातील वास्तव) डॉ. रोहिणी भट - साहनी, ऑगस्ट १९९९) अशा शोषणाच्या नाना तर्‍हा व त्यामागील गुंतागुंतीचे वास्तव या विषयीचे काही लेख पुस्तकात समाविष्ट केले आहेत. ‘पुरुषसत्ताकतेचं दमन हत्यार - बलात्कार’ हा मुक्त मनोहरांचा लेख वास्तवापुढे आरसा धरणारा आहे. या लेखात केवळ नजीकच्या घटनांची नोंद नसून ऐतिहासिक स्वरूपाच्या घटनांचे दाखलेही दिले आहेत. बलात्कारामागील मनोवृत्तीचे विश्लेषण करून लेखिकेने जणू समाजाला झापडबंद प्रवृत्तीतून बाहेर यायला सांगितले आहे. धर्मांतर्गत शोषणाविरुद्ध, स्त्रीने तक्रार करणे कठीणच असते. ‘देवानेच ज्यांची विटंबना केली’ हा डॉ. अरुणा ढेरे यांचा लेख देवदासींच्या जगण्याचे विदारक चित्र उभे करतो. या अन्याय्य प्रथेविरुद्ध जनमत तयार करणार्‍या, तसेच कायद्याच्या पातळीवर लढा देणार्‍या लहान-मोठ्या प्रयत्नांची नोंदही या लेखात घेतली आहे. डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या ‘ख्रिस्ती स्त्रियांचे प्रश्न’ या लेखात धर्मात स्त्रीला मिळणार्‍या दुय्यम वागणुकीचे स्पष्ट उल्लेख आहेत. काळाशी सुसंगत असे बदल धर्मातही व्हावेत, ही त्यांची मागणी लक्षात घ्यायला हवी. ‘स्त्रीसुंता : एक अमानुष परंपरा’ हा डॉ. प्रिया आमोद यांचा लेख काही आफ्रिकी देशांमधल्या हिंसक परंपरेची माहिती देतो. या आणि अशा रुढींमुळे स्त्रीप्रश्न अधिकाधिक बिकट होतो. विवाहित स्त्रीच्या वाट्याला येणारी मारझोड, कुचंबणा आणि त्याच्या उद्रेकातून स्त्रीकडून घडणारी हिंसक कृती हाही एक विपरीत अनुभव असतो. ‘मार्ग - हिंसेचा?’ या लेखात आशा दामले यांनी एका सत्यघटनेचे केवळ निवेदनच केले नसून त्यामागील स्त्रीची मानसिक कुचंबणा, भाषिक - सांस्कृतिक गळचेपी अशा दृश्यादृश्य घटकांचा वेध घेतला आहे. विवाहामध्ये स्त्रीच्या स्वयंनिर्णयाला महत्त्व द्यायला हवे, हा यातून लक्षात येते. स्त्रीला विवाहानंतर दुसर्‍या ठिकाणी सांस्कृतिकदृष्ट्या रुजणे या आव्हानालाच जणू तोंड द्यावे लागत असते. त्यासाठी आपली कुटुंबव्यवस्था संवेदनशील हवी. भावनेच्या भरात स्त्रीकडून घडणार्‍या गुन्हाची शिक्षा भोगताना तिला काय अनुभव येत असतील; याची कल्पना देणारे दोन लेख यात समाविष्ट आहेत. ‘गजाआडच्या स्त्रिया’ (प्रा. सनोबर शेखर) आणि ‘काळा भूतकाळ आणि शून्य भविष्यकाळ’ (इंदुमती चिपळूणकर) या लेखांचा आधार समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेल्या पाहण्या हा आहे. हे लेख कैदी स्त्रियांची निराश मन:स्थिती व्यक्त करतात, शिवाय तुरुंगातील कैद्यांच्या पुनर्वसनाबाबतही काही उपाय सुचवतात. काही स्त्रियांसाठी घर हेच तुरुंग बनते. ‘विवाहातील नैतिकतेची घुसमट’ हा करुणा गोखले यांचा लेख त्या नाजूक विषयाला वाचा फोडतो; आपल्याकडे कुटुंबसंस्थेचे विवाहसंस्थेशी असलेले नाते लक्षात घेता विवाहातील पेचप्रसंगाच्या वेळी कौटुंबिक न्यायव्यवस्था मजबूत ठेवणे गरजेचे असते. प्रकृती आणि संस्कृती यात आदिम संघर्ष चालू राहणार. अशा वेळी समुपदेशनाची गरज प्रकर्षाने जाणवते. स्त्रीला सामाजिक क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणावर वाव मिळू लागला आहे. पण अजूनही राजकारण हे क्षेत्र स्त्रीला जवळचे वाटत नाही. त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्यसंस्थांमध्ये स्त्रियांसाठी ३३% आरक्षण ठेवले. यातून एक नवी विकासाची वाट स्त्रीसाठी खुली झाली. तरीही स्त्रीला त्या क्षेत्रात अडथळेच जास्त आहेत. ‘मिळून सार्‍याजणी’च्या १९९९च्या दिवाळी अंकात ‘राजकारण गेलं चुलीत?’ या विषयावर मुलाखती व प्रश्नावलींवर आधारित डॉ. गीताली वि. मं. यांनी घेतलेल्या परिसंवादातील अनेक जणींचे अनुभव वाचनीय आहेत. त्यापैकी प्रा. सुलभा पाटोळे (सचिव, दलित महिला संघटना) यांचा अनुभव प्रातिनिधिक म्हणून समाविष्ट केला आहे. ‘मिळून सार्‍याजणी’मधून स्त्रीविकासाशी निगडित समस्या, अनुभव, निरीक्षणे, सर्वेक्षण अहवाल इत्यादी लेखन मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहे. त्यातील काही महत्त्वाच्या लेखांचा निर्देश करते.

गर्भाशयं मतिमंद मुलींची : काळजी तुमची आमची’ : विद्या बाळ, साधना वि. य., एप्रिल १९९४
संततिनियमन : हाही भोग बायकांच्याच वाट्याला?’ विनिता बाळ, सप्टेंबर १९९४.
कुटुंब नियोजनाचे ‘लक्ष्य’ ’ मनीषा गुप्ते, नोव्हेंबर १९९४.
लैंगिक छळ : एक अहवाल’ शुभदा कुलकर्णी, मार्च १९९७.
नश्वर शरीराची किंमत काय?’ दीनानाथ मनोहर, डिसेंबर १९९९.
अंधारातील तारका’ (शास्त्रज्ञ स्त्रियांवरील लेख) निर्मला लिमये, मार्च २००७.

स्त्रियांना सुरक्षित व समाधानी जीवन जगण्यासाठी अनुकूल कायदे तयार करणे, हा एक उपाय म्हणून सांगितला जातो. येथे भारतीय राज्यघटनेत स्त्री आणि पुरुष यांना समान दर्जा बहाल करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण मान्य करायला हवे. शांता बुद्धिसागर यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्री विषयक दृष्टिकोन’ (डिसेंबर १९९०) छोटेखानी लेखात याचा आढावा घेतला आहे. पण तो लेख डॉ. आंबेडकरांच्या कार्याची परिपूर्ण ओळख करून देणारा नसल्यामुळे नाइलाजाने समाविष्ट करता आला नाही. हा त्या लेखातील पुढील भाग वाचकांपर्यंत पोहोचवावासा वाटतो. तो असा, ‘११ एप्रिल १९४७ रोजी हिंदू कोड पार्लमेंटमध्ये मांडलं गेलं. पार्लमेंटच्या इतिहासातील ही एक अविस्मरणीय अशी देदीप्यमान घटना होती. या बिलासाठी बाबासाहेबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.’ तसेच याच लेखातील आणखी एक तपशील महत्त्वाचा आहे, तो म्हणजे १६ जून १९३६ला कामाठीपुर्‍यात गोलपिठा येथे बाबासाहेबांनी सभा घेतली. त्यात वेश्यांबरोबर, मुरळी, जोगतिणी अशा स्त्रियाही हजर होत्या. शोषित स्त्रीला न्याय देण्याची बाबासाहेबांची तळमळ व कृतिशीलता यातून लक्षात येते. डॉ. जया सागडे यांचा ‘समान नागरी कायदा’ हा लेख स्त्रियांसाठी धर्मनिरपेक्ष अशा कायद्याची गरज स्पष्टपणे प्रतिपादन करतो. धर्मव्यवहारातील स्त्री-पुरुष विषमतेवर अंकुश ठेवण्यासाठी असा कायदा करण्याची आवश्यकता आहे. लेखिकेने कायदा कसा असावा, याविषयीही मार्गदर्शन केले आहे. एकंदरीत समाजमन अनुकूल करणे, स्त्री खंबीर व संघटित होणे याबरोबरच स्त्री विकासाला पोषक असे कायदे होणे; हेही गरजेचे आहे. (‘कायदा : शहाणं व्हायचा वायदा’ ही अर्चना मेढेकर - मराठे यांची २००० मधील लेखमाला वाचनीय आहे.)

४. समकालीन बदलते वास्तव आणि स्त्रीप्रश्न

विसावे शतक हे विज्ञानतंत्रज्ञान क्षेत्रातील अचंबित करणार्‍या शोधांनी गजबजून गेले आहे. या शोधांमुळे सर्वसामान्य स्त्रीच्या जगण्यावर काय परिणाम झाला? स्त्रीचे जगणे वरवर पाहता भौतिकदृष्ट्या सुखी झाले, पण ते पूर्णपणे समाधानी - निरामय झाले का? जैवतंत्रज्ञानामुळे मूल जन्माला घालण्याची स्त्रीची नैसर्गिक जबाबदारी अनेकप्रकारे नियंत्रित होत आहे. यातून स्त्रीच्या जगण्यात नवनवे प्रश्न उपस्थित होत आहेत. ‘सरोगेट मदरहूड’मुळे स्त्रीला आपल्या शरीराची नव्याने जाणवणारी उपयुक्तता उपरोधाने सांगणार्‍या नीलम माणगावे यांची ‘भांडवली ज्ञान (?)’ (मार्च, २००३) ही कविता येथे आठवते. त्याचबरोबर इतरही भावनिक तसेच सांस्कृतिक स्वरूपाचे प्रश्नही आहेतच. आजच्या जाहिरातींचा मारा, चंगळवाद, भांडवलशाहीचा अतिरेक, पर्यावरण र्‍हास असे अनेक विषय आहेत. त्यातून स्त्री जीवनावर चिंतेचे सावट येत आहे. उदाहरणार्थ - प्रसारमाध्यमांतून घडवली जाणारी स्त्रीची सांस्कृतिक प्रतिमा कशा स्वरूपाची आहे? पर्यावरण चळवळीशी स्त्रीचे नाते काय हवे? - असे अनेक प्रश्न आहेत. आजच्या अशा गुंतागुंतीच्या वास्तवाला स्त्रीच्या दृष्टिकोनातून थेटपणे भिडणारे काही लेख आवर्जून निवडले आहेत. ‘प्रसारमाध्यमे आणि स्त्रीचे प्रश्न’ हे पत्रकार कल्पना शर्मा यांचे भाषण अनुवादित लेखाच्या रूपात दिले आहे. लिंगभावानिरपेक्षता हे मूल्य समाजमनात रुजवण्याचे काम करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा. प्रत्यक्षात माध्यमांचा दृष्टिकोन बाजाराच्या अर्थकारणाशी निगडित आहे. हा लेख मिस्कील शैलीत माध्यमांची खिल्ली उडवतो. हा लेख पत्रकारांना आत्मपरीक्षण करायला लावतो. ‘विज्ञानातून जन्मलेलं मातृत्व’ हा डॉ. मालिनी कारकल यांचा लेख कृत्रिम गर्भधारणातंत्रामुळे स्त्री ही ‘प्रजोत्पादनाचे साधन’ / एक वस्तू ठरते हे विदारक सत्य समोर ठेवतो. स्त्रीच्या अवयवांची विक्री, स्त्रीभ्रूणहत्या या गोष्टी पितृसत्ताकतेचे बळ वाढवतात. ‘स्त्री ही प्रयोगशाळेतील एक उपकरण बनत आहे’ हा या लेखात दिलेला धोक्याचा इशारा महत्त्वाचा आहे. डॉ. छाया दातार यांचा ‘सामाजिक संबंधाचा समतोल’ हा लेखही ‘स्त्रिया व तंत्रज्ञान’ या विषयाचा वेगळ्या कोनातून विचार करतो. प्रजननाचे तंत्रज्ञान वापरताना स्त्रीचे शरीर व मन यांची फारकत होत नाही का? प्रोसेस्ड फूडमुळे घरात स्त्री असण्याची आवश्यकता संपून तर जात नाही ना? मायक्रोवेव्ह संस्कृती यातून निर्माण तर होत नाही ना? असे प्रश्न यात उपस्थित केले आहेत. ‘स्पर्धा विश्वसुंदरी निवडण्याची’ हा रा. प. नेने यांचा लेख तात्कालिक निमित्ताने लिहिलेला असला तरी विषयाचा सखोल वेध घेणारा आहे. सौंदर्यस्पर्धांचा इतिहास व त्यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती यात झालेला बदल यांची माहिती लेखातून मिळते. स्त्रीच्या देहाला ‘एक उपभोग्य वस्तू’ म्हणून येणारे मोल लेखकाला अस्वस्थ करते. सौंदर्यस्पर्धांमुळे घडणारी स्त्रीची सौंदर्यकल्पना आणि त्यावर उभी असलेली किफायतशीर बाजारपेठ यांचे मतलबी नाते लेखक लक्षात आणून देतात. ‘पर्यावरण, विकास आणि स्त्रिया’ हा डॉ. सुनीती धारवाडकरांचा लेख विकासाचे प्रचलित प्रतिमानच तपासायला भाग पडतो. ‘इकोफेमिनिझम’- पर्यावरणीय स्त्रीवादाची परखड चिकित्सा करतो. विकासाची संरचना व प्रतिमान समतामूलक असण्याची गरज प्रतिपादन करून लेखिका आग्रहपूर्वक सांगते की, विकासाच्या निर्णय प्रक्रियेत स्त्रियांना स्थान असले पाहिजे. सुबोध वागळे यांचा ‘स्त्रिया, उपजीविका आणि ऊर्जा’ हा लेखही ऊर्जाक्षेत्रातील धोरणे ठरवताना स्त्रियांना केंद्रीय स्थान देण्याची मागणी करतो. ग्रामीण गरीब स्त्रियांना लाभदायक असे ऊर्जाप्रकल्प राबवले तर त्यातून स्त्रीच्यया जगण्याचा पोत सुधारणे शक्य होईल, असे लेखकाचे म्हणणे आहे. अशा मध्यवर्ती सूत्राची मांडणी करणारे आणखीही काही उल्लेखनीय लेख पुढीलप्रमाणे आहेत :

· सरोगेट मदरहूड’, मीना देवल, एप्रिल, १९९५.
· संगणकयुग व स्त्री अभिव्यक्ती’, डॉ. जया द्वादशीवार, ऑक्टोबर २००२.
· विकासाच्या सुंदर खुणा’, संजय संगवई, दिवाळी २००४.
· दूरदर्शन मालिका अर्थात आपली सांस्कृतिक दुकाने’, प्रा. वंदना भागवत, दिवाळी २००७

५. स्त्रीत्वाशी निगडित काही पैलू

स्त्रीच्या जगण्याचे काही पैलू स्वतंत्रपणे लक्षात घ्यायला हवेत. स्त्रीत्वाचे भान हे स्त्रीच्या समग्र अस्तित्वाचे भान असते. त्यामुळे जीवशास्त्रीय, मानसशास्त्रीय, सांस्कृतिक अशा विविध दृष्टिकोनांतून स्त्रीची जाणवणारी वैशिष्ट्ये आणि मर्यादा यांची कल्पना असणे आवश्यक आहे. या हेतूने काही लेखांची निवड केली आहे. स्त्रीची जीवशास्त्रीय ओळख लक्षात आणून देणारे तीन लेख यात समाविष्ट आहेत. चित्रा बेडेकरांचा ‘स्त्री, पुरुष आणि मेंदू’ हा लेख शास्त्रीय पाहण्यांच्या निष्कर्षावर आधारित आहे. स्त्री आणि पुरुष यांच्या मेंदूतील फरक म्हणजे स्त्रीचा कमीपणा नसून वेगळेपणा आहे, ही लेखिकेची भूमिका आहे. डॉ. अश्विनी धोंगडे यांचा ‘सर्जनातील सहजीवन’ हा लेख जीवशास्त्रीय आणि सांस्कृतिक अशा दुहेरी दृष्टिकोनांतून लिहिलं आहे. अपत्यजन्माची घटना जरी स्त्रीच्या जीवशास्त्रीय पैलंशी निगडित असली तरी पती-पत्नी व मूल यांचे भावनिक नाते दृढ होण्यासाठी सहजीवनात कोणते घटक आवश्यक आहेत, याची चर्चा या लेखात केली आहे. एका अभ्यासप्रकल्पाद्वारे विविध वयोगटातील, तसेच विविध आर्थिक, सामाजिक गटांतील स्त्रियांच्या अनुभवांतून काढलेले यातील निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ‘मेनोपॉज : वैद्यकीय प्रश्नांची सामाजिक बाजू’ हा मनीषा गुप्ते यांचा लेख स्त्रीच्या पाळी जाण्याच्या शारीर अवस्थेकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून, सकारात्मक मनोवृत्तीतून पाहण्याचा सल्ला देतो. या नैसर्गिक अवस्थेकडे ‘आजार’ म्हणून पाहिले की स्त्री ‘डॉक्टरांच्या हातातील बाहुले’ बनण्याचा धोका असतो; हे लेखिका लक्षात आणून देते. स्त्रीची काही वैशिष्ट्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून लक्षात येतात. ‘मिळून सार्‍याजणी’च्या पहिल्याच अंकात (ऑगस्ट १९८९) संस्थापक-संपादक विद्या बाळ यांनी स्त्रीच्या ओठांच्या उंबर्‍यात अडखळून थांबलेल्या शब्दांचे महत्त्व सांगितले आहे. ‘स्वत:शी नव्याने सतत संवाद साधणारे मासिक’ ही मासिकाची ‘ओळख’ असल्यामुळे स्त्रियांना आपल्या मनाचाच नव्हे तर अंतर्मनाचा कानोसा घ्यायलाही त्यात वेळोवेळी प्रवृत्त केले आहे. या संदर्भात ‘सिंड्रेलाची गोष्ट ऊर्फ स्त्रीच्या मनात दडलेले स्वातंत्र्यविषयचे भय’ हा परीकथेतील सिंड्रेलामध्ये भयगंड घेऊन वावरणारी वास्तवातील स्त्री आहे; हे सांगणारे संशोधन लेखिका आपल्यापर्यंत पोहोचवते. स्त्री विकासाच्या मार्गात असे स्त्रीमध्येच असलेले काही अडथळेही आहेत; हे यातून लक्षात येते. स्त्रीच्या जगण्यातील सांस्कृतिक पैलूंमध्ये अनेक घटक येतात. उत्सव, कला - क्रीडा - साहित्य - समाजकार्य या क्षेत्रांशी संबंधित पैलू त्यात मोडतात. ‘मिळून सार्‍याजणी’ने या पैलूंचे दर्शन घडवणारे लेखन सातत्याने प्रकाशित केले आहे. त्यातील डॉ. तारा भवाळकर यांची लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमेवर आधारित लेखमाला उल्लेखनीय आहे. स्त्रीची सांस्कृतिक प्रतिमा अलंकारजडित अशी असते. तिच्या या प्रतिमेमुळे सुवर्णालंकारांना स्त्रीच्या जीवनात अकारण महत्त्वाचे स्थान येते. स्त्रीने स्वत:कडे ‘पतीची तिजोरी’ या वृत्तीतून पाहणे बदलायला हवे, याची जाणीव प्रा. शालिनी मेनन यांचा ‘सोन्याला उपमा नाही’ हा लेख करून देतो. श्रीमंतीचे उथळ प्रदर्शन करण्यासाठी स्त्रीच्या नटण्याचे अवाजवी कौतुक करणे योग्य नाही; हे त्यातून लक्षात येते. स्त्रीची भाषा व साहित्य यांचीही खास वैशिष्ट्ये असतात. अलीकडे स्त्रीकेंद्री तसेच स्त्रीवादी साहित्य मोठ्या प्रमाणावर लिहिले जात आहे. स्त्रीचे विचारविश्व, भावविश्व जाणून घेताना भाषा ही प्रमाण ठरते. ‘स्त्रियांची भाषा’ या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या लेखात बोली आणि लिखित अशा दोन्ही रूपांतील स्त्रीच्या भाषेविषयीची निरीक्षणे टिपली आहेत. स्त्रियांच्या जगण्याची बदलती परिभाषा तिच्या भाषेमध्ये प्रतिबिंबित होत आहे; हा लेखाचा निष्कर्ष आहे. स्त्रियांनी मुख्यत: कविता, आत्मकथन या ललित साहित्याच्या माध्यमाद्वारे स्वत:ला अभिव्यक्त केले आहे. त्यातही स्त्रियांची आत्मचरित्रे ही स्त्री साहित्यातील एक उल्लेखनीय प्रवाह आहे. स्त्रीवादाची मांडणी करताना या साहित्याकडेही डोळसपणे पाहावे लागते. १९७५ नंतर विविध क्षेत्रांतील स्त्रियांची आत्मकथने मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होऊ लागली. स्त्रिया एके काळी ‘हूं की चूं’ न करणार्‍या होत्या. त्यामुळे आज त्यांची आत्मचरित्रे काहींच्या मते ‘कॅथार्सिस’ (भावनिक विरेचन) ही ठरली. प्रत्यक्षात स्त्री कितपत मोकळेपणाने लिहू शकते? तिच्या सत्यकथनावर कोणती बाह्य व आंतरिक दडपणे असतात? असे प्रश्न पडतातच. त्या पार्श्वभूमीवर डॉ. रेखा इनामदार-साने यांचा ‘पाध्ये आणि पाध्ये’ हा लेख महत्त्वाचा ठरतो. ज्येष्ठ पत्रकार पाध्या यांच्या पत्नी कमलताई यांचे ‘बंध-अनुबंध’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख पाध्ये पतिपत्नी यांच्या सहजीवनातील काही कंगोर्‍यांवर प्रकाश टाकतो आणि आत्मचरित्राकडे चिकित्सक दृष्टिक्षेपही टाकतो. ‘मिळून सार्‍याजणी’ने विवाह आणि सहजीवन यांमधील अनुभवांना सातत्याने स्थान दिले आहे. ‘लग्न : काही प्रश्न, काही उत्तरे’, ‘सकस सहजीवानाच्या शोधात’, ‘आम्ही दोघेही संसार करतो’ अशा विषयांवरील त्यांतील इतर अनुभवही वाचनीय आहेत. प्रा. पुष्पा भावे यांचा ‘गौरी देशपांडे यांची कथनशैली’ हा लेख स्त्री साहित्याच्या साक्षेपी समीक्षेचा एक नमुना आहे. स्त्री साहित्यातील कथनाला स्त्रीवादी समीक्षेत महत्त्व येते. गौरी देशपांडे या मान्यताप्राप्त कथा-कादंबरीकार, वेगळ्या संवेदनशीलतेचा आविष्कार घडविणार्‍या आणि १९७० पूर्वीचे स्त्रीचे भावानुभव साहित्यातून धीटपणे व चाकोरी ओलांडून सांगणार्‍या लेखिका! ‘मिळून सार्‍याजणी’शी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. या पार्श्वभूमीवर हा लेख महत्त्वाच ठरतो. याबरोबरच ‘गौरी देशपांडे विशेषांका’तील इतर लेख, तसेच प्रभा गणोरकरांची ‘गौरी देशपांडे : एका दिशेने सुरू असलेला प्रवास’ (१९९१) ही लेखमाला यांचाही विशेष उल्लेख करणे योग्य ठरते. क्रीडा हे विश्व स्त्रीच्या वाट्याला कितपत मोकळीक मिळवून देते; हाही एक प्रश्नच आहे. एके काळी फक्त बैठ्या खेळांतच रमणार्‍या स्त्रीच्या जगण्याचा वाढणारा परिघ आता जी काही नवी क्षेत्रे आपलीशी करत आहे, त्यात मैदानी खेळांचे क्षेत्र येते. ‘भारतातील खेळाडू स्त्रियांची अडथळ्याची शर्यत’ हा ज्योती मोकाशी - कानिटकर यांचा लेख एका संस्थेतर्फे केलेल्या प्रत्यक्ष पाहणीवर आधारलेला आहे. या पाहणीतून लक्षात आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी उपायही सुचवले आहेत. ‘मिळून सार्‍याजणी’मधून क्रीडाक्षेत्रातील स्त्रीसहभागाची नोंद नेहमी घेतलेली दिसते. ‘ऑलिंपिकमधील महिलांची झेप’ (ऑक्टोबर १९९५) हा हेमंत जोगदेवांचा लेखही वाचनीय आहे. ‘कार्यकर्त्यांच्या बायका’ हा प्रा. जयदेव डोळे यांचा लेख प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यकर्त्यांची चरित्रे, त्यांच्या बायकांची आत्मचरित्रे आणि वास्तव जीवनातील अनुभव या आधारे लिहिला आहे. कार्यकर्त्यांच्या बायकाही मुळात कार्यकर्त्याच असतात. त्यांचा ‘संसारी स्त्री’ या भूमिकेतील वावर, त्यांच्या सहजीवनातील गुंतागुंत यांचे चित्रण या लेखात केले आहे. स्त्रीकेंद्री भूमिकेतून लिहिलेला हा लेख वाचकाच्या मनावर परिवर्तनवादी दृष्टीचा ठसा उमटवतो.

६. परिवर्तनाची नांदी

परिवर्तन ही एक प्रक्रिया असते. ही प्रक्रिया दर वेळी सरळ रेषेत घडत नसते. काही वेळा ती प्रक्रिया समाजमनातील विचारभावनांचे अंत:प्रवाह या रूपात अस्तित्वात असते. त्यामुळे भोवतालच्या काही घटनांमधून तिच्या गतिमानतेचे आश्वासन मिळत राहते. वर्तमानपत्रातील कितीतरी बातम्या जशा स्त्रीच्या शोषणाचे चित्र उभे करतात, तशाच दुसरीकडे स्त्रीच्या विकासाची नि:संदिग्ध रूपात ग्वाहीही देतात. ट्रॅक्टर चालक, बस कंडक्टर या पदांवर महिलांची नियुक्ती होणे, लोकसभेच्या सभापतीपदी व राष्ट्रपतीपदी महिला विराजमान होणे आणि कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात भरारी घेणे - या केवळ ठळक नोंदी नाहीत. यामागे परिवर्तनासाठी अनुकूल होणारे समाजमन अस्तित्वात आहे. या नोंदी म्हणजे समस्त स्त्री वर्गाच्या सर्वंकष विकासाचा पुरावा नव्हे, हे मान्य केले; तरीही अशा घटनांमागे एक ऊर्जाप्रवाह असतो आणि तो सामाजिक परिवर्तनाला चालना देत असतो. ‘मिळून सार्‍याजणी’ने अशा घटनांची दखल सातत्याने घेतली आहे. अंकातील ‘विशेष ओळख’, ‘मुलाखत’ इत्यादी सदरांमधून कर्तबगार स्त्रियांच्या कर्तृत्वगाथा वाचायला मिळतात. गीता साने, तस्लिमा नसरीन, महाश्वेतादेवी, मेधा पाटकर, कन्नड दलित लेखिका रूथ मनोरमा आदी स्त्रियांच्या जगण्यातील क्रांतिकारकत्व अंकाच्या पानांमधून उलगडलेले दिसते. तुलनेने एखाद्या लहान क्षेत्रातील लढा देणार्‍या स्त्रीची दखलही ‘मिळून सार्‍याजणी’ने घेतलेली दिसते. स्वत:च्या आत्मसन्मानासाठी लढा देणारी भंवरीदेवी असो किंवा रूपन देवल-बजाज असो, त्यांचे श्रेय अंकात नोंदवलेले दिसते. परमिट रूमविरोधी लढा देणार्‍या वसुधा सरदार आणि काच-पत्रा वेचणारी, विपरीत परिस्थितीला तोंड देत हिमतीने उभी राहणारी कुणी एक ग्रामीण महिला - अशा अनेकींचे सत्त्व ‘मिळून सार्‍याजणी’ने टिपून ठेवले आहे. दगडखाण महिला कामगारांचा मोर्चा, पंचायत विकासराज यात्रा, बचतगटातील महिलांची अवकाश झेप असे विषय मासिकाच्या ‘झुंजूमुंजू’ या पुरवणीत सातत्याने वाचायला मिळतात. त्यामुळे पुस्तकातील शेवटचे काही लेख ‘परिवर्तनाची नांदी’ म्हणून लक्षात घ्यावेसे वाटतात. ‘पांडवनगरचं धर्मयुद्ध’ हा मेधा थत्ते व मुक्ता मनोहर यांचा लेख तळागाळातील महिला संघटित होऊन आपली ताकद कशा दाखवू शकतात, याचा साक्षात्कार घडवतो. स्त्रियांनी दारूचे गुत्ते बंद पाडणे आणि तथाकथित मालकाच्या धाकदपटशाला भीक न घालता मोलकरीण संघटनेच्या माध्यमातून झुंझारपणे लढा देणे, ही घटना स्फूर्तिदायक आहे. अशा लहान लहान लढ्यांच्या गाथांमधून समकालीन इतिहासाचे एक प्रकरण लिहिले जात आहे. अशीच आणखी एक ‘सक्सेस स्टोरी’ वाटावी अशी हकिगत ‘आम्ही सत्तावीस जणी’ या अपर्णा राजवाडे यांच्या लेखात वाचायला मिळते. ‘झुंजूमुंजू’ हे (काही का नारी समतामंच तर्फे प्र्रायोजित) ‘मिळून सार्‍याजणी’तील सदर ज्याचे वर्णन ‘खेड्यापाड्यातले वाहते वारे जिथे भेटतात अशी जागा’ असे केलेले आहे. हे सदर पहाट होणारच याची ग्वाहीही देते. स्वत:च्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध झालेल्या पुण्याजवळच्या झोपडवस्त्यांमधील आरोग्यसेविकांची ही कर्तृत्वगाथा आहे. तळागाळातल्या स्त्रीपर्यंत विकासाची प्रेरणा झिरपत जात आहे, याचा आशावादी प्रत्यंतर या लेखातून येते. ‘स्त्रीवादी पुरुष : संकल्पना आणि वास्तव’ हा डॉ. विलास साळुंके यांचा लेख एका नव्या वळणाचे दर्शन घडवतो. स्त्रीवादी जीवनधारणा प्रत्यक्षात आणणारे पुरुष म्हणजे स्त्रीवादी पुरुष. स्त्री चळवळ ही स्त्रियांची, स्त्रियांसाठी व स्त्रियांकडून चालवलेली असून पुरणार नाही. स्त्री चळवळ ही समाजहिताची चळवळ आहे. ‘मिळून सार्‍याजणी’ने जानेवारी २००९ मध्ये आपले घोषवाक्य बदलले आहे, ते असे आहे : ‘स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वत:शी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी.’ या बदलामुळे मासिकाचे धोरण अधिक व्यापक होत असून सामाजिक अभिसरणाला गतीही मिळेल. या संदर्भात डॉ. साळुंके यांच्या लेखातील परिवर्तनशील आशय मनात ठसतो.

‘स्त्रीमिती’ची फलश्रुती

‘स्त्रीमिती’चे हे स्वरूप वाचकांना भावेल, असा विश्वास वाटतो. ‘मिळून सार्‍याजणी’ हे मासिक गेली वीस वर्षे प्रकाशित होत आहे. मासिकाच्या वाचकवर्गात स्त्रिया मुख्यत: गृहीत असल्या तरी पुरुषही अभिप्रेत आहेत. (मासिकाच्या लेखकवर्गात स्त्रियांबरोबर पुरुषही आहेत. स्त्रीमुक्ती विषयी गैरसमज दूर करण्यासाठी पुरुष वाचकांनी लेख लिहून पुढाकारही घेतला आहे. त्यातच जानेवारी २००९ पासून मासिकाने घोषवाक्य बदलले असून त्यात स्त्री आणि पुरुष यांच्या परस्पर संवादालाही स्थान दिले आहे.) पहिल्या अंकात दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे ‘स्वत:च्या विकासासाठी जाणीवपूर्वक जगणार्‍या, बाईपणाला सहज ओलांडू बघणार्‍या’ सार्‍याजणींसाठी हे मासिक आहे. यामुळे या अंकातील लेखन चाकोरीबद्ध, वाचकांचे निव्वळ मनोरंजन करणारे नाही. किंबहुना वाचकांचा अनुनय न करता त्यांचे प्रबोधन करण्याचे काम मासिकाने केले आहे. त्यामुळे या मासिकातील निवडक स्त्रीविषयक लेखन एका नव्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देणारे, विचार जागृतीवर भर देणारे आहे. तसेच समकालीन वास्तवाचा तल्लखपणे वेध घेणारे, वाचकांना काळाला सामोरे जाण्यासाठी तयार करणारे, नवनवीन विषयांच्या माहितीने संपन्न करणारेही आहे. अशा प्रकारचे लेखन मासिकांच्या पानांमध्ये बंदिस्त राहून उपयोगी नाही. त्यातील अर्थपूर्ण चिरस्थायी स्वरूपाच्या लेखनाचे आवाहन केवळ तत्कालिक स्वरूपाचे नाही. ते लेखन पुढच्या काळातील वाचकांच्या संवेदना - भावना - विचार यांच्यात जागृती घडविण्याची क्षमता असलेले आहे. ‘जाणीव जागृती’ हा एक चिरंतन प्रवास असतो. त्यासाठी अशा पुस्तकाची उपयुक्तता कायम वाटत राहणार. हे लक्षात घेऊन ‘स्त्रीमिती’ साकार होत आहे. त्याची भावी काळातील उपयुक्तता लक्षात घेऊन मौज प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित करण्याची जबाबदारी स्वीकारली, याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. ‘स्त्रीमिती’ मधून ‘मिळून सार्‍याजणी’ने स्त्रीच्या जगण्याला दिलेले नवे परिमाण लक्षात येईल. त्यामुळे सर्वसामान्य स्त्री वाचकांना स्वत:च्या जगण्याला नवे परिमाण देण्यासाठी ‘स्त्रीमिती’ वाचावेसे वाटेल. तसेच विचारवंत आणि अभ्यासकांना सामाजिक परिवर्तनाचा आलेख रेखाटताना ‘स्त्रीमिती’चा विचार करणे गरजेचे ठरेल. स्त्रीवादाची मांडणी करतानाही ‘स्त्रीमिती’चा उपयोग होईलच. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी सहकार्य करणार्‍या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करून मी ‘स्त्रीमिती’ वाचकांकडे सुपूर्द करते.

नीलिमा गुंडी

(चित्र सौजन्य : महिमा न्यूज)