साम्या कोरडे: जेन-झी आंदोलनातील एक आश्वासक चेहरा
धारावीतून पुढे आलेली साम्या कोरडे ही तरुण कार्यकर्ती आपल्या स्पष्ट पुरोगामी भूमिका, सामाजिक प्रश्नांची जाण आणि संघर्ष करण्याच्या तयारीमुळे लक्ष वेधून घेतेय. निवडणुकीपासून विद्यार्थी आंदोलनांपर्यंतचा तिचा प्रवास, महिलांचे प्रश्न, शिक्षणातील विषमता, कामगारांचे हक्क आणि तरुण पिढीच्या राजकारणाकडून असलेल्या अपेक्षा याबद्दल शिल्पा शिवलकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत साम्या मनमोकळेपणाने बोलते. घरातल्या सामाजिक-राजकीय वातावरणातून मिळालेली शिकवण आणि सामान्य माणसांच्या संघर्षातून मिळणारी प्रेरणा यांची सांगड घालत साम्या स्वतःची राजकीय वाट घडवतेय. विचारांशी प्रामाणिक राहून, लोकांमध्ये जाऊन आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन नेतृत्व कसं उभं राहू शकतं, याची झलक तिच्या प्रवासातून दिसते. जेन-झी पिढीच्या आंदोलनांमध्ये आणि राजकारणात नव्या नेतृत्वाच्या शक्यता शोधणाऱ्यांसाठी ही मुलाखत नक्कीच वाचनीय आहे.
लीड:
साम्या राजेंद्र कोरडे, जन्म ११ मे, २०००. कॉकरोच जनता पार्टीच्या अभूतपूर्व आंदोलनात मुंबईच्या विद्यार्थी संघटनांमधून तडफदार नेतृत्व उभे राहिलेले पाहायला मिळाले. त्यापैकी एक ठळक चेहरा. १७ जुलै २०२६ या दिवशी साम्या जंतर-मंतरवर हजर होती. अभिजीत दिपके आणि तेथील प्रमुख विद्यार्थी नेत्यांना भेटत होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने जंतर-मंतरवरून पोलिसांनी उचलले. आणि त्यानंतर तरुण विद्यार्थ्यांमधील ऊर्जेचा लोळ उसळला. २० जुलै रोजी दिल्लीत विद्यार्थ्यांचा 'चलो संसद' मोर्चा होऊ दिला जाणार नाही अशी अटकळ होती. सोनम वांगचुक यांना बेकायदा अटक करून सरकारने ज्याप्रकारे आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केला, याच्या निषेधार्थ देशभरात अनेक विद्यार्थी संघटनांनी २० जुलैला आपापल्या शहरात निषेध मोर्चाची हाक दिली. पुरोगामी विद्यार्थी संघटनेची राज्यस्तरीय अध्यक्ष असलेल्या साम्या कोरडेचे 'चलो चैत्यभूमी' हे आवाहन सोशल मीडियावर झळकत होते.
प्रत्यक्षात २० जुलैच्या सकाळी प्रमुख आंदोलकांना त्यांच्या घरातच स्थानबद्ध करण्यात आले. त्यावेळी अत्यंत चिडून दारातल्या पोलिसांना या कारवाईचा जाब विचारतानाचा साम्याचा व्हिडिओ काही वृत्तवाहिन्यांमार्फत लोकांपर्यंत पोचला. नंतर ती जितक्या बेधडकपणे मूठ उंचावून, घोषणा देत पोलिसांच्या गाडीत जाऊन बसली, तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. तिला अटक करण्यासाठी पोलिसांचा ताफा आला होता, त्या सर्वांचे चेहरे तिच्यासमोर अगदी निष्प्रभ झाल्याचे बघायला मिळाले. मुंबईतील अनेक निषेध मोर्चात जे विद्यार्थी सहभागी झाले, त्यांना पकडून त्यांच्यावर एफ.आय.आर. दाखल करण्यात आले. नंतरच्या आठवड्यात या प्रकरणांचा पाठपुरावा करून, त्यांना कायदेशीर मदत मिळवून देण्याच्या कामात ती गुंतलेली होती. याच काळात ती पत्रकारांपुढे बोलत होती. बीबीसी, साम, न्यूज एटीन, पुढारी अशा वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत होती. आणि त्यात प्रश्नांची चांगली मांडणी करत होती. शेवटी २६ जुलै रोजी आपल्यावर दाखल केलेल्या एफ.आय.आर.च्या प्रती छातीवर पदकासारख्या मिरवत आणि हातात तिरंगा उंचावत या विद्यार्थ्यांनी चैत्यभूमीवर विजयी रॅली काढली.
मिळून साऱ्याजणीच्या जेन-झी विशेषांकाबाबत चर्चा झाली होती, त्यावेळी कॉकरोच जनता पार्टीचा उदय झालेला नव्हता. मुंबईत धारावी कोळीवाडा वॉर्डातून साम्या कोरडे या मुलीने यंदा महापालिकेची निवडणूक लढवली होती. पुरोगामी भूमिका आणि स्पष्ट राजकीय महत्त्वाकांक्षा घेऊन उभ्या राहिलेल्या या तरुण कार्यकर्तीवर एक फीचर करण्याचा विचार होता. त्यासाठी १३ मे, २०२६ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या माहीम येथील कार्यालयात साम्याची प्रथम भेट झाली. मुंबईत शेकापचा वैचारिक वारसा सांगत, आणि धारावीसारख्या अनेक अर्थांनी गुंतागुंतीच्या जागेतून राजकारणाची सुरुवात करणे हे एक विशेष. आणखी विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे तिला उमेदवारीची ऑफर देण्यात आली होती.
साम्याने ती स्वीकारली नाही. ती म्हणाली, "ही माझी पहिलीच निवडणूक. ठाम विचार घेऊन मी उभी आहे, हे बिंबणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. पदार्पणातच वैचारिक तडजोडी करणारी प्रतिमा मला नको होती." या वॉर्डातून शिवसेना (उबाठा)चा उमेदवार जिंकला. निवडणुकीच्या वेळी तिची सोशल मीडिया मोहीम तिने आणि तिच्या मित्र-मैत्रिणींनीच चालवली. व्हिडिओ एडिटिंग, बूथ कार्यकर्त्यांसाठी ॲप या गोष्टी बाहेरून विकत घ्याव्या लागल्या, त्याचं सर्व नियोजन तिच्या धाकट्या भावाने आणि मित्र-मैत्रिणींनी विना मोबदला केलं. मतदारांच्या उंबऱ्यापर्यंत जाऊन त्यांना भेटणं, प्रचार पत्रकं वाटणे, सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या रॅलीज, जाहीर सभा या सर्वाची आखणी त्यांनी व्यवस्थित केली. तिच्या मते आपण कमी कुठे पडतो, तर त्या जोडीने ग्राउंडवर यंत्रणा, इलेक्टोरल बेरजा, आणि मोठ्या पातळीवर नॅरेटीव्ह उभे करणे. साम्याला पाचव्या क्रमांकाची मते पडली. तिच्यासारख्या नवख्या उमेदवाराला मत देणाऱ्या सगळ्यांचे तिने आभार मानले. अनेक जण असंही म्हणाले की 'तुमच्यात क्षमता आहे, तुम्ही सातत्य ठेवा.' परंतु त्यांनी तिला मत दिलं नाही.
मुळात तिचं काम वॉर्ड क्रमांक १८३मध्ये होतं. तेथील आरक्षण बदलल्यामुळे तिला १८७मधून निवडणूक लढवावी लागली. तेथील स्थानिक प्रश्न वेगळे होते. तिच्या मते या सगळ्या गोष्टींमुळे तिला मोलाचा अनुभव मिळाला. ती जाणीवपूर्वक स्वतःवर काम करतेय, हे लक्षात येतं. "माझ्या सुरुवातीच्या भाषणांमध्ये आशय कमी, उत्साह जास्ती असल्याची प्रतिक्रिया वडिलांनी दिली होती. माझा सूर कसा लागतोय त्यापेक्षा मी काय बोलतेय ते महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी पुष्कळ वाचलं पाहिजे. आपला तेवढा अभ्यास पाहिजे. म्हणजे मग आपलं बोलणं शार्प होतं. निवडणुकीच्या वेळची माझी काही भाषणं चांगली झाली. कुठेही जाताना मी तयारी न करता कधी बाहेर पडत नाही. काही मुद्दे हाताशी ठेवते." साम्या समोरच्याचा प्रश्न शांतपणे ऐकून घेते. सावकाश आणि विचारपूर्वक उत्तर देते. आपला अनुभव कमी असल्याचे सुरुवातीला मान्य करून, स्वतःचे जे मुद्दे असतील ते समोर ठेवते. नवीन संदर्भ समजून घेण्याविषयी कृतज्ञ असते. नीटच्या परीक्षेतील स्पर्धा, सामाजिकदृष्ट्या मागास जाती-जमातींसाठीच्या आरक्षणाबाबतची भूमिका, कॅम्पसमधील विखारी रॅगिंग रोखण्यासाठीच्या यूजीसीच्या गाईडलाईन्स, नवीन शैक्षणिक धोरणातील उणिवा... विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील अशा या सर्व विषयांवर ती जागरूकपणे आणि उदाहरणांसहित ठोस बोलते.
नंतर पुन्हा ५ जून २०२६ या दिवशी धारावी फाउंडेशनच्या कार्यालयात तिच्याशी सविस्तर गप्पा झाल्या. या काळात कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियाचा फोकस काबीज केला होता. अभिजीत दिपके अमेरिकेहून भारतात यायला निघाला होता. अजून भारतात दाखल झाला नव्हता. मागे वळून पाहताना तिच्याशी त्यावेळी झालेली चर्चा महत्त्वाची वाटते. जेन-झी मधल्या अस्वस्थतेविषयीची तिची निरीक्षणं अचूक ठरली. नंतर त्यांनी रस्त्यावर उतरून जे घडवलं, तो आता इतिहास आहे. प्राणी हक्क आणि पर्यावरण अशा दोन-तीन विषयांचा अपवाद वगळता, तरुण पिढी व्यवस्थेतल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरायला तयार नसते. यावर तिचे म्हणणे होते की, "ज्येष्ठ डावे कार्यकर्ते ज्याला चळवळ म्हणतील, तशी चळवळ आज भोवती दिसत नसली तरी सोशल मीडियावर राजकीय विरोध (डिसेंट) व्यक्त होतो आहे. अनेक मुलीदेखील सडेतोड राजकीय मते मांडतायत. या सर्वांना प्रत्यक्षात एकत्र आणणे आव्हानात्मक असले, तरी हा जो हुंकार आहे तो चळवळीतूनच आलेला आहे. जोवर प्रश्न आहेत, विचार आहेत, तोवर चळवळ आहेच. ती म्हणाली होती, "हवामान बदलाचा मुद्दा शाश्वत विकासाच्या भूमिकेपर्यंत जातोच. आजची तरुण पिढी अतिशय संवेदनशील आहे. त्यांना दांभिकतेची चीड आहे. शिव्या -शापांचे असंस्कृत राजकारण ते सहन करणार नाहीत. ते राजकारणात मूल्यांनाच महत्त्व देतील".
कॉकरोच जनता पार्टीविषयी बोलताना “त्यांना जज करण्याची घाई करता कामा नये; ही तरुणांमधून उमटलेली अतिशय उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिक्रिया आहे. मुळात बेरोजगारी आहे, म्हणून सीजेपीच्या नावातील उपहास तरुणांच्या मनाला भिडला. सरन्यायाधीशांकडून झालेला अपमान त्यांना झोंबला. या काळात 'आय ॲम अ कॉक्रोच, ॲड्रेसिंग द इशू ऑफ धिस लोकॅलिटी... इथे खड्डा झालाय....' किंवा बिहारमध्ये एका पुलाला तडे गेलेत... अशा पोस्ट मोठ्या प्रमाणावर करायला लागले. नीटच्या मुद्द्याचे टायमिंगही बरोबर आले. अस्वस्थतेला त्यामुळे एक चेहरा, एक ओळख मिळाली. आणि लोक या पिढीकडे आशेने बघायला लागले...” हे सर्व साम्याच्या तेव्हाच्या बोलण्यात आलेलं आहे. या नंतर साम्याची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. घडामोडी एकदम वेगाने घडत गेल्या. आणि ती सीजेपीच्या आंदोलनात जोरदारपणे सक्रिय झाली. तिची खबर-बात सोशल मीडियावरूनच मिळू लागली.
हे सर्व कोठून येते साम्याचा जन्म धारावीत न्यू म्युनिसिपल चाळीतला. ती सातवीत असेपर्यंत आई-वडील, धाकटा भाऊ साहिल आणि आजी असं सर्व कुटुंब तिथेच राहायला होतं. सार्वजनिक नळ, सार्वजनिक संडास इत्यादी. परिस्थितीत थोडी प्रगती झाल्यावर वडिलांनी प्रतीक्षा नगरला घर घेतलं. इथे चोवीस तास पाणी होतं. त्यामुळे आईचं आयुष्य सोपं झालं. साम्यालाही अभ्यासाला बरं आणि शांत वातावरण मिळालं. ती सायनच्या डी.एस. हायस्कूलमध्ये मराठी माध्यमातून शिकली. नर्सरी ते दहावीपर्यंत शाळा एकच होती. सातवीपासून तिथे सेमी इंग्लिश होतं. मातृभाषेतून शिकण्याचा एक फायदा म्हणजे ताराबाई शिंदे यांचा 'स्त्री पुरुष तुलना' हा निबंध... असे महत्त्वाचे सांस्कृतिक संदर्भ अभ्यासाच्या निमित्ताने वाचनात आले. घरी लोकवाङ्मय प्रकाशनाच्या पुस्तिका असायच्या. मार्क्सवादाची तोंडओळख, किंवा शिवाजी कोण होता...
"त्यावेळी हे सर्व फार वाचलं असं नव्हे, पण शाळकरी वयात ही पुस्तकं सारखीच दिसण्यात असायची. 'जीवनमार्ग'चा अंक यायचा. आचार्य अत्रेंचं 'कऱ्हेचं पाणी' वाचलेलं होतं. नंतर विश्वास पाटील यांची 'लस्ट फॉर लालबाग' ही कादंबरी मिळवून वाचली. त्यामुळे गिरणी कामगारांचं आंदोलन, युनियन, मुंबईतले प्रश्न कळले."
साम्याचे वडील ॲड. राजेंद्र कोरडे हे शेतकरी कामगार पक्षाचे राज्य स्तरावरचे कार्यालयीन चिटणीस आहेत. डाव्या विचारांबरोबर त्यांच्या राजकारणात माणुसकी नेहमी महत्त्वाची राहीली. धारावीत सातत्याने काम केलेला, आणि तेथील प्रश्नांची सखोल जाण असलेला कार्यकर्ता - नेता म्हणून लोक त्यांना ओळखतात. साम्याने वडिलांचं सामाजिक आयुष्य लहानपणापासून बघितलेलं आहे. "वडिलांचं नेहमी सांगणं असतं की आयुष्यात रडायचं नाही, खंबीर राहायला शिक. मुलीने अमुक-तमुक केले पाहिजे, हे घरात कधी नव्हतंच." त्यांनी आपल्या मुलीचं नाव साम्या ठेवावं, यातच पुष्कळ आलं.
साम्या सुरुवातीपासून तल्लख होती. लहानपणी १ ऑगस्टचं 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत' या भाषणापासून ते आयत्या वेळेस दिलेल्या विषयावर बोलण्यापर्यंत, तिला कधी स्टेज फियर नव्हतंच. "संगीताच्या बाईंनी मला निवडलं नाही म्हणून, नाहीतर मी तिथेही चमकले असते," असा आत्मविश्वास तिच्यात सुरुवातीपासून होता. भरतनाट्यम, चित्रकलेच्या परीक्षा अशा सगळ्यात तिचा सहभाग असायचा. विज्ञान प्रदर्शनात त्यांची टीम राष्ट्रीय स्तरापर्यंत पोचली होती. "फक्त इंग्रजी सुरुवातीला थोडं वीक होतं. त्याचा कॉम्प्लेक्स होता. पण ते सुधारलं हळूहळू!"
चौथी आणि सातवीच्या दोन्ही शिष्यवृत्त्या, दहावीत ९३ टक्के. म्हणजे अभ्यासातही ती हुशारच होती. "मी दहावीत असताना रोहित वेमुलाची आत्महत्या, कन्हैया कुमारची भाषणं, जिग्नेश मेवानीसारख्या तरुणांचा उदय हे सर्व भोवताली घडत होतं. घरात त्याबद्दल चर्चा चालायच्या. आपण बोलणं का महत्त्वाचं आहे, हे तेव्हा कळायला लागलं."
साम्याने रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावीतही तिला ७८ टक्के मार्क होते. एकीकडे पॉलिटिकल सायन्स आणि दुसरीकडे यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी, ही दिशा तिने निवडली. "रुईयात बहुतेक सगळा अभ्यासू क्राउड होता, दहा टक्के कलासक्त, नादीष्ट वगैरे. एकूणच सामाजिक, राजकीय चर्चेची संस्कृती मुंबईच्या कॉलेजात कमीच दिसते. जे.एन.यु. सारखी पॅशन इथल्या वातावरणात दिसत नाही. वादविवादाची तंत्रे घोटवली जातात, परंतु प्रत्यक्ष भूमिका घेणे टाळतात. तिथे प्रस्थापित पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचं कामही जेमतेमच होतं. अभाविपची उपस्थिती होती. ते काहीतरी करत राहायचे."
अशा परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाची 'पुरोगामी विद्यार्थी संघटना' होती, तिची मुंबईत नव्याने बांधणी करण्याचे ठरले. "आम्ही कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांना मदत पाठवली. आरेतील झाडे तोडण्याच्या निर्णयावर मुंबईतून जोरदार प्रतिक्रिया उमटली. त्यावेळी आम्ही कॉलेजात सह्यांची मोहीम राबवली. 'सिटीझनशिप अमेंडमेंट ॲक्ट अँड नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स' (सी.ए.एन.आर.सी.) याच्या विरोधात आंदोलन उभे राहिले, त्यात आम्ही सहभागी झालो. ऑगस्ट क्रांती मैदानात मोठी सभा झाली, त्यावेळी आम्ही कॉलेजचं पूर्ण युनिट आणि बॅनर घेऊन गेलो होतो; कारण हा मूलभूत अधिकारांवरचा घाला होता."
"माझ्या आईला चिंता वाटायची की ही मुलगी या गोष्टी करत राहिली तर तिच्या अभ्यासाचं काय होईल. वडिलांनी तिला समजावलं की हे सर्व तिच्या अभ्यासाला पूरकच आहे म्हणून."
"त्यानंतर धारावी फाउंडेशनच्या माध्यमातून लॉक डाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, त्यांना रेशनची किट्स वाटणे... मुलं शाळांमधून डिजिटली शिकतायत, त्यांच्याकडे रिचार्ज भरायला पैसे नाहीत अशी परिस्थिती होती. आम्ही मुलांमध्ये टॅब्स वाटले होते. कोविडनंतर शाळेची फी भरायला पैसे नव्हते, त्यावेळी शाळांशी बोलून फी कमी करून घेतली. एकीकडे धारावीच्या महिलांमध्ये काम चालू होतं. त्यामुळे घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांशी बोलावे लागे. इथे चांगली हवा, पाणी असे हक्क नाकारलेले असतात. मग कुठे पाणी साठत असेल, टॉयलेट शेडची दुरुस्ती असेल, त्यासाठी प्रशासनाला पत्र लिहिणे, या पातळीवर काम सुरू झालं."
या दरम्यान साम्याने न्यू लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. "हा कॉलेजात आणि कॉलेजच्या बाहेर दोन्हीकडे शिकण्याचा काळ होता. यावेळी मला वाटू लागलं की यूपीएससी प्रमाणे हे देखील एक माध्यम आहे. शेवटी कायदेबदल संसदेत होतो. तिथे जाऊन प्रश्न मांडणं, हा धोरणाला दिशा देण्याचा प्रभावी मार्ग आहे. तेच उद्दिष्ट आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी हा दुवा आहे. आपण निवडणूक लढवली पाहिजे. कॉलेजमध्ये असतानाही मी जी.एस. साठी निवडणूक लढवण्याचा विचार केलेला होता. माझ्या मते राजकीय कोणी नाही असं नाही. जे अ-राजकीय, तेही पॉलिटिकल आहे."
२०१९मध्ये साम्याने पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या मुंबई युनिटचं काम सुरू केलं, ते शेतकरी कामगार पक्षाशी संलग्नच होतं. तेव्हापासून पक्षाच्या कार्यक्रमांना देखील तिने हजेरी लावायला सुरुवात केली. तुझ्या दृष्टीने नेतृत्वाची व्याख्या काय, या प्रश्नावर तिचं उत्तर होतं, "तुम्हाला माणसांची सफरिंग कळली पाहिजे. ते काय सोसतायत, ते तुम्हाला जाणवलं पाहिजे. तुम्हाला ते कळलं तर तुम्ही मार्ग शोधू शकाल. लोकप्रतिनिधी हा लोकांचा तारणहार नाही. त्याचं कामच आहे ते. तो ज्या पदावर आहे, त्याची ती जबाबदारी आहे."
"धारावीच्या राजीव गांधी नगर परिसरात मिठी नदी रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तिथली राहती घरं पाडण्यासाठी लोकांना नोटीसा बजावल्या होत्या. ६७१ घरांचा प्रश्न होता. हे करताना पुनर्वसनाचा शब्दही त्यात नव्हता. त्यावेळेचं आंदोलन हे माझं पहिलं आंदोलन होतं. ही सप्टेंबर, २०२३ची गोष्ट. पोलिसांनी त्यावेळी मोर्चा निघू दिला नाही. सर्व आंदोलकांना अटक केली होती. त्यावेळी मला शाहूनगर पोलीस चौकीवर ठेवलं होतं. त्यानंतर जून, २०२५मध्ये इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सी.एस.टी.ला आंदोलन होणार होतं. पोलीस त्यावेळी आमच्या ऑफिसमध्ये आले होते. तेव्हाही मला अटक झाली होती. तेव्हा मला धारावी पोलीस स्टेशनला नेलं होतं. शेवटी उच्च न्यायालयातून या आंदोलनासाठी परवानगी मिळवावी लागली. हे आंदोलन नंतर आझाद मैदानावर झालं."
त्यामुळे सीजेपीच्या आंदोलनात साम्याला पोलिसांनी पकडून नेण्याची तिसरी वेळ होती. यावेळी तिला वडाळा सिटी पोलीस स्टेशनला ठेवलं होतं.
राजकारणात साम्यासमोरची रोल मॉडेल्स काय आहेत? या प्रश्नावर असं लक्षात आलं, की संसदेत उत्तम इंग्रजीत प्रभावी भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या महुवा मोईत्रासारख्या नेत्यांबरोबर साम्याची नाळ जुळत नाही. तिच्या मते हे एलिट नेते आहेत, आंदोलनातून आलेले नाहीत. उलट तिच्या ऑफिसशेजारी राहणाऱ्या महिलांच्या संघर्षातून तिला प्रेरणा मिळते. “त्यांचे इतके बेसिक प्रश्न असतात! तलाक घेऊन मुलांना वाढवणारी एक मुस्लिम बाई आहे, ती इतक्या खंबीरपणे जगते! लग्नानंतर नोकरी करायची की नाही, हा इथल्या बायकांपुढचा प्रश्न नाही. त्यांना जगण्यासाठी काम करण्याशिवाय पर्यायच नाही.”
आपल्या मागच्या पिढीतील स्त्रियांच्या संघर्षाची साम्याला जाणीव आहे. "माझी आई गृहिणी आहे. लग्नाआधी ती नोकरी करत होती. नंतर मग मुलं-बाळं, त्यांचा अभ्यास यात ती गुंतून गेली. अभ्यासाच्या बाबतीत ती स्ट्रिक्ट असायची. ती तशी स्ट्रॉंग आहे, सहन नाही करत! धार्मिक आहे, पण अंधश्रद्ध नाही. घरात दिवा-बत्ती तिच्यामुळे होते. लग्न होऊन आली असेल, त्यापेक्षा आता ती वेगळी आहे. तिला मी कधी वटपौर्णिमा करताना पाहिले नाही. नवरात्राचे घट बसतात, पण आता तिने उपवास कमी केले आहेत."
"पूर्वी आम्ही शाळेत असताना आई आजारी असायची. तिच्यात अशक्तपणा होता. आता ती योगासनं वगैरे करते. आता तिचा आमच्याशी संवाद वाढलेला आहे. मी निवडणुकीला उभी राहिले, त्यावेळी तिला वाटायचं की काय चालू आहे हिचं... मी तिला माझ्याबरोबर घेऊन जायचे, की प्रत्यक्ष बघितल्यावर कळेल. त्यामुळे निवडणुकीच्या काळात फक्त माझा डबा बनवणे एवढीच तिची भूमिका नव्हती. ती रॅलीजमध्ये देखील आली. आपल्या मुलांबद्दल तिला विश्वास आहे."
पोलीस दारात आले होते, त्यावेळी साम्याला आजीचा खंबीर पाठिंबा होता. आजीकडून तिने मृणाल गोरे आणि अहिल्याताई रांगणेकर या लाटणेवाल्या बायकांविषयी ऐकलं आहे. "आजीचं वय आता ८८. तिला अजूनही ३०पर्यंत पाढे पाठ आहेत. आजीला चार मुलं. धारावीत असल्यामुळे मुलींची लग्न लवकर करून दिली. एका आत्याचे यजमान लवकर वारले. तिने एकटीने मुलांना वाढवलं. तीही खूप हुशार आहे. त्यांना आयुष्याने संधी नाकारली. वडील कुटुंबातले पहिले पदवीधर. आत्याचा एक मुलगा इंजिनियर झाला, त्याच्यानंतर आम्ही. आमच्या पिढीत तो संघर्ष नाही. पण ज्यांच्यावर इतके दबाव असतात, ती माणसं मानसिकदृष्ट्या प्रचंड कणखरदेखील होतात. त्यांच्या संघर्षातूनच खरी प्रेरणा मिळते."
साम्याच्या वयाच्या मुलीच्या दृष्टीने स्त्रीमुक्ती म्हणजे काय?
तिने फार छान उत्तर दिलं. ती म्हणाली, "कळत नकळत आपल्या मनावर जे कंडिशनिंग झालेलं असतं, ते अन-लर्न करण्याची क्षमता म्हणजे मुक्ती. कुठलीही गोष्ट आंधळेपणाने न आचरणं, व्यवस्थेने सांगितलेलं असेल त्याला प्रश्न विचारणं, आपला आपण विचार करायला शिकणं, हे जमलं पाहिजे." त्याचबरोबर ती म्हणाली, की "अडकून पडण्यात तिच्याच मानसिकतेचा हिस्सा असतो, असं मला नाही म्हणायचं! डोक्यातले गोंधळ हा देखील व्यवस्थेचाच भाग आहे. आणि सर्वसमावेशक समाज बनवणं ही सर्वांची जबाबदारी आहे."
कार्ल मार्क्सचा भंडारा
अमेरिकेत ममदानीच्या विजयाची बातमी आली, त्यावेळी एक प्रतिक्रिया अशी उमटली, की विचारसरणीवर आधारित राजकारण संपले. त्याऐवजी इथून पुढचे राजकारण प्रश्नांवर होईल. आम आदमी पार्टी किंवा कॉकरोच जनता पार्टी या दोन्हीच्या बाबतीत कॉमन गोष्ट म्हणजे त्यांच्या मागे निश्चित मूल्य किंवा विचारसरणी नाही. त्याकडे तरुणांचा कल अधिक आहे. त्या तुलनेत साम्याने निवडलेला रस्ता अधिक क्लासिकल म्हणता येईल. ती निष्ठेने शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा घेऊन उभी आहे. यावर तिचं म्हणणं होतं की मूल्य आणि प्रश्न हातात हात घालूनच जातात. "डावा विचार समजावणं कठीण जातच नाही. न्यायाच्या बाजूने बोलणं, चांगले विचार हेच डावे विचार आहेत."
"शेतकरी कामगार पक्ष हा खऱ्या अर्थाने मूळ स्थानिक पक्ष आहे. या पक्षाने मार्क्सवादी विचारातील करुणेची सांगड शिव-शाहू आणि फुले-आंबेडकरांच्या वारशाबरोबर घातली. ही अनेक वर्ष काम केलेली पक्ष संघटना आहे. आमच्या पक्षातील नेत्यांमुळे रोजगार हमी योजनेसारख्या योजना आल्या. हा वारसा आहे त्यामुळे प्रेरणा मिळते. दि.बा. पाटील यांनी सिडकोविरुद्ध जो लढा दिला की भूमिपुत्रांना जमीन मिळाली पाहिजे, ही त्या वेळची लढाई होती. आता ही विविध प्रकल्पांच्या ठिकाणी प्रश्न तोच आहे. आताही शेतमजूर नाहीत काय? स्विगी आणि झोमॅटोमध्ये काम करणारे कामगार नाहीत काय? हे प्रश्न नाहीत असं नाही. तिथे काम करायला वाव आहे."
"मी नक्कीच विचारांशी जोडलेली आहे आणि मला तो विचार सांगायचाय लोकांना. पण फक्त चौकटीतून विचार नाही तयार होत; तो कृतीतून तयार होतो. लोकांच्या मनात काय आहे, ते लोकांमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. मला जर महिलांमध्ये काम करायचंय, तर मी त्यांच्यामध्ये जाईन. मग मला काही गोष्टी समजतील. माझा अभ्यास होईल. ज्यांचा तो प्रश्न आहे, त्यांच्याकडूनच ते आलं पाहिजे. मग त्या परिस्थितीत काय लागू होईल हा विचार आहे; आणि तो त्या परिस्थितीत महत्त्वाचा आहे."
ती हे कशा पद्धतीने करते आहे, त्याबाबतचे एक उदाहरण इथे सांगण्यासारखे आहे. ५ मे, २०२३ या कार्ल मार्क्सच्या जयंतीच्या दिवशी भंडारा करण्याची कल्पना पुढे आली. आपल्याला आपले आयकॉन लोकांपर्यंत घेऊन जायचे आहेत, त्यासाठी कार्ल मार्क्सचा भंडारा. भंडाऱ्याची मूळ कल्पना अशी की त्या परिसरातील खूप लोकांनी एकत्र आलं पाहिजे. तो आनंदाचा प्रसंग आहे, म्हणून त्यात जेवण असलंच पाहिजे. एरवी धार्मिक भंडारे होतात. मुस्लिमांची आमदावत असते. गुरुद्वारामध्ये लंगर असतो. तसं हे स्नेहभोजन.
"आम्ही कार्ल मार्क्सच्या फोटोची एक मोठी फ्रेम बनवून घेतली. छोटा मंडप घातला होता. समोर लोकांना बसायला थोडी जागा केली होती. इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीचे श्री नचिकेत कुलकर्णी यांना आम्ही बोलावलं होतं. त्यांची एक छोटी मुलाखत घेतली होती. कौन है कार्ल मार्क्स जिनका आज जन्मदिन है? मग त्यांनी त्यावर एक मिनिटाचं उत्तर द्यायचं. मग यांनी नक्की काय सांगितलं जगाला? सगळ्या मजुरांनी एक व्हा, म्हणजे काय सांगितलं? असे सात-आठ प्रश्न मी विचारले असतील. हे लोकांनी ऐकलं. लोक जेवले. सगळे लाल कपडे घालून आले होते. आम्ही गाणी लावली होती. 'जब मेहनत कसे इस दुनिया से अपना हिस्सा मांगेंगे...' अशा प्रकारची गाणी. जे लोक आले, त्यांना मार्क्सचा फोटो ओळखीचा झाला.
"आम्ही कार्यक्रमाचे बॅनर लावले होते. आमचे अनेक कार्यक्रम आम्ही सोशल मीडियावर टाकतो, तशी याचीही पोस्ट टाकली होती. अपेक्षा काहीच नव्हती. आमचे सतत काहीतरी कार्यक्रम चालूच असतात, त्यातला हा एक. आमचं आपल्या-आपल्यातच चालू होतं. त्यावर पाठिंबा आणि विरोध अशा दोन्ही बाजूंनी पुष्कळ प्रतिक्रिया आल्या. पण काही लोक प्रत्यक्ष आले तिथे. आणि त्यांना ते सगळं आवडलं. त्यांना आनंद झाला. हा सोशल मीडियामध्ये लक्ष वेधून घेण्याचा प्रकार नव्हता. ते प्रत्यक्ष कार्यक्रमाला आलेल्यांना जाणवलं. ते त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये दिसलं."
"त्याच्या पुढच्या वर्षी २०२४मध्ये निवडणुका होत्या. त्यावेळी नाही केला हा कार्यक्रम. पुन्हा २०२५मध्ये केला. आमची आमंत्रण तयार होत होती. आमचे एक कार्यकर्ते आहेत. इथला एक माणूस मशीदीत मुलांना शिकवायला जातो. त्याला ते सहज म्हणाले, अपना कार्यक्रम है. आना है आपको. त्यांनी माझ्याशी ओळख करून दिली, इनके पास बहुत बच्चे सीखते है. त्यांनी विचारलं, मॅडम बताओ ना, क्या कार्यक्रम है. मी म्हटलं, तुमच्या मुलांना काहीसुद्धा सादर करायचं असेल तर सांगा. ते म्हणाले, कौन है थिंकर, उनका मुझे आप नाम लिख के दो. मी डायरीत नाव लिहून दिलं. कार्यक्रमाच्या वेळी अचानक हा माणूस उगवला.
यावर्षीचा आमचा फॉरमॅट असा होता, की नचिकेत कुलकर्णी यांनी मला काही परिच्छेद काढून दिले होते, साधारण तीन-तीन मिनिटांचे. मी सूत्रसंचालन करत होते. खूप छान छान गाणी ठेवली होती यावेळेस. गाणं झालं, की ब्रेक. त्यात मी एक परिच्छेद वाचून दाखवायचे. आणि हा माणूस आला, की ये मेरी बच्ची है, ये स्पीच बोलनेवाली है. मी म्हटलं काय बोलणार. (कारण ते नीट असलं पाहिजे ना!) ती झोकात इंग्रजीत तयारी करून आली होती. तिचं दोन-तीन मिनिटांचं भाषण मी आधी ऐकलं. लहान मुलींचा हिजाब घालून ती आली होती. पण जेव्हा ती स्टेजवर गेली, तेव्हा अतिशय आत्मविश्वासाने इंग्रजीत छान बोलली. ही मदरशात शिकणारी मुलं. पण त्या शिक्षकाने तिच्याकडून इंग्लिशमधून, गुगलवरून असेल, पण ते भाषण तयार करून घेतलं. हा बदल आहे.
"साधारण एक वर्ष आड करून आम्ही हा कार्यक्रम करतोय. आम्हाला ते इथल्या लोकांच्या पद्धतीने, त्यांचा सहभाग कसा वाढेल, त्या दृष्टीने ते करायचंय. काही कल्पना आहेत. कार्ल मार्क्स कोण होता यावर दोन मिनिटांच्या रिलची स्पर्धा घ्यायची. त्यावर छोटसं बक्षीस ठेवायचं. एक फोटोग्राफीची स्पर्धा ठेवायची. जिथे विषमता दिसतेय, असा फोटो काढून पाठवायचा. अशा अनेक कल्पना आहेत. बघूया."
साम्याला स्वतःला कार्ल मार्क्स रिलेव्हन्ट वाटतो. "माणूस म्हणून तुमच्या समाजातील स्थानाचा त्यांनी विचार केला आहे. त्याचा विचार सोपा आहे. हृदय असलेल्या कुणालाही तो पटेल. चांगल्या जगाची निर्मिती झाली पाहिजे हे त्याचे ध्येय आहे. त्यांच्याकडे वर्ग होता, आपल्याकडे त्याच्या जोडीने जात आहे. हा फोन कामगाराने तयार केला. पण हा ५०/६० हजारांचा फोन तो वापरू नाही शकत. हेच एलियनेशन आहे. याचं त्यांनी विश्लेषण केलं आहे आणि त्यावर उपाय सुचवले आहेत. आज कॉर्पोरेटमध्ये आठ तासांपेक्षा अधिक काम करावं लागतं. स्त्रियांचे प्रश्न आहेत. त्यासाठी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. संघटना बनवण्याची गरज आहे. समाजकारण आणि राजकारण
साम्या एल.एल.एम.ला प्रवेश घेणार आहे. चरितार्थासाठी वकिली करण्याचा तिचा विचार आहे. "राजकारण हे पैसे कमावण्याचं साधन नसलं पाहिजे! माझे वडील म्हणाले होते की राजकारणातून लोकांनी दुकान खोललेली आहेत. ते माझ्या डोक्यात कायम असतं. आर्थिकदृष्ट्या सध्या मी माझ्या वडिलांवरच अवलंबून आहे. मी करत असलेल्या कामाची मला आणि त्यांनाही जाणीव आहे. आणि त्यासाठी त्यांचा मानसिक आणि आर्थिक दोन्हीदृष्ट्या पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे दडपण येत नाही."
"मी वकिली करणार आहे. धारावी फाउंडेशन ही संस्था अधिक कार्यक्षमपणे चालेल याकडे लक्ष देणार आहे. या संस्थेमार्फत महिलांसाठी, मुलांसाठी काही प्रकल्प राबवायचे आहेत. याखेरीज प्रशासनाला, सरकारला विचारण्याचे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, शिक्षण इतकं महाग का आहे? खाजगी विद्यापीठांची फी लाखांमध्ये आहे. इथे पैसा हीच मुख्य स्पर्धा आहे, मग पुढची लढाई. त्यामुळे समाजकारणाबरोबर राजकारण चालूच राहील."
धारावी फाउंडेशन ही तिच्या वडिलांनी स्थापन केलेली नोंदणीकृत एनजीओ आहे. "माझे आजोबा इथे आले तेव्हा ते उघड्यावर झोपायचे. लग्नाआधी त्यांना घरच नव्हतं. नंतर आजी आणि बाबा यांनी मिळून धारावीत घर घेतलं. त्यांचे भाऊ-बहीण सर्व इथे वाढले. त्या परिस्थितीतून ते बाहेर आले. माझे वडील सर्वात लहान, त्यामुळे ते शिकले. शिक्षणामुळे त्यांचं आयुष्य अमुलाग्र बदललं. ते शिक्षण आणि तो माईंडसेट त्यांना वेगळ्या जगात घेऊन जाऊ शकले. हा त्यांच्या आयुष्यात झालेला बदल होता. त्यामुळे २०१० मध्ये त्यांनी ही संस्था सुरू केली."
"इथल्या लोकांना अनेक गोष्टींसाठी ॲक्सेस नाही. शिक्षण परवडण्याजोग झालं पाहिजे ही मागणी करणं हे एक काम आहे. पण लोकांना त्या प्रवाहात आणण्यासाठी जी मदत करता येईल, ती करणं हे दुसरं काम आहे. मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवून देणं, महिलांसाठी कौशल्य विकासाचे क्लासेस चालवणं, की जे त्यांना रोजचं उत्पन्न देऊ शकेल. या स्वरूपाचं काम त्यांनी वैयक्तिक पातळीवर अनेक वर्ष केलेलं आहे. शहरी गरीबीचे प्रश्न आणि निवाऱ्याचा हक्क यावर इथून पुढे आमचा अधिक फोकस असायला हवा असं मला वाटतं."
पंचविशीची साम्या चिल आउट होण्यासाठी काय करते?
कॉलेजच्या वयात तिचं सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं नव्हतं. तिचं सोशल मीडिया अकाउंट कार्यकर्ती म्हणूनच होतं. उशिरा, म्हणजे ग्रॅज्युएशननंतर तिने एक वेगळं अकाउंट ठेवलं. ते फक्त मित्र-मैत्रिणींसाठीच आहे. ती म्हणाली, त्यात कोणी तुम्हाला जज करत नाही. एरवी चिल आउट करायला मुंबईला मस्त समुद्रकिनारा आहे. आणि कधीतरी एखादा दिवसभर घरी थांबलं, तरी त्यामुळे थोडं शांत वाटतं.
मुलाखत आणि शब्दांकन: शिल्पा शिवलकर, मुंबई shilpa.journalist@gmail.com