सीतेचे वाण
‘सीताबाई’च्या मंदिरात मी हात जोडून उभा होतो खरा; पण मस्तकात मात्र उठलेल्या प्रश्नांच्या मोहोळातील मधमाशा डंख मारत घोंघावत होत्या. प्रश्नांचे मोहोळ उठले होते; पण उत्तरे मात्र मिळत नव्हती. ती आजही मिळालेली नाहीत. सैरभैर झालेलं चित्त स्थिरावण्यासाठी माणसं मंदिरात जातात. माझं मात्र उलट झालं होतं.
खरं तर मी फक्त माझ्या डोंगर भटकंतीच्या छंदातून सीताबाईच्या डोंगरावर आज आलो होतो. तसा माझ्या गावच्याच उशाशी हा डोंगर असल्याने (फलटण तालुक्यातील ‘वाठार निंबाळकर’ हे माझे गाव) लहानपणीही अनेक वेळा या सीताबाईच्या डोंगरावर सहलीला आलेलो आहे. रायरेश्वरपासून सुरू होणार्या शंभू महादेव डोंगररांगेत, फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवर (जिल्हा सातारा) एका लहानशा डोंगरावर वसलेले हे स्थानिकांचे, लगतच्या परिसरातील नागरिकांचे, विशेषतः स्त्री वर्गासाठी आपुलकीचे श्रद्धास्थान, धार्मिक स्थळ.
हा डोंगर ‘सीताबाईचा डोंगर’ म्हणूनच ओळखला जातो. या मागील आख्यायिका अशी आहे की, प्रभू रामचंद्र वनवास संपवून आल्यानंतर ते परत राजा म्हणून कारभार पाहू लागले; पण वनवास काळात सीतेच्या झालेल्या अपहरणातून तिच्या चारित्र्याविषयी कुठेतरी कुजबूज कानी आली आणि एकपत्नीव्रती, सत्यवचनी, प्रजाहितवादी, कोणावरही अन्याय होणार नाही असेच वर्तन असणार्या प्रभू रामचद्रांनी न्यायनिष्ठुर राजाच्या प्रतिमेला जपण्यासाठी सीतेचा त्याग केला. असे करत असताना सीतेच्या तात्कालिक शारीरिक, मानसिक स्थितीचा त्यांनी कसा काय विचार केला नसेल? किंवा मग केलाही असेल तर मग ते सीतेच्या तशाही अवस्थेत इतके कसे कठोर झाले असतील? या प्रश्नाचा पहिला दगड मोहोळावर पडताच ‘प्रश्नरामायण’ उठले.
राज्यकर्त्या बंधूच्या आज्ञेचे पालन करत लक्ष्मणाने सीतामाईला, वाल्मिकी ऋषींचा आश्रम असलेल्या परिसरात, म्हणजे या दंडअरण्यात आणून सोडले. (आता येथे मंदिरावर ‘दंडक अरण्य’ असा उल्लेख आहे, तो कशामुळे असावा? चारित्र्याविषयी संशय असणार्या स्त्रियांना अरण्यात नेऊन सोडण्याचा दंडक होता की काय?) आज जरी मंदिरापर्यंत गाडीरस्ता असल्याने गाड्या येत असल्या तरी, रामायण काळात येथे निश्चितच निबिड अरण्य असावे. त्या निबिड अरण्यात सीतामाईला सोडून जाताना, त्यांच्या विनंतीनुसार लक्ष्मणाने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली. लक्ष्मणाने भूगर्भात खोलवर दोन बाण मारून झरे भूपृष्ठावर आणून वाहते केले. सीतामाईच्या आजच्या मंदिराशेजारीच या झर्यांचे उगमस्थान आहे. भूगर्भातील पाणी भूपृष्ठावर आले ते बाणांच्या आघातामुळे– बाणांमुळे. या वाहत्या झर्यांच्या पुढे नद्या झाल्या. त्यापैकी एक ‘बाणगंगा’ नदी. फलटण तालुक्यातील ह्या एकमेव नदीची कुळकथा ही अशी आहे. दुसरी झाली- ‘माणगंगा’. ती माण तालुक्यातील नदी. नद्यांच्या उगमाविषयी असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी ही सर्वपरिचित आख्यायिका.
मी माझ्या लहानपणी पाहिलेल्या एका घुमटीवजा सीताबाईच्या मंदिराचे; आता एक धार्मिक पर्यटनस्थळ झाले आहे. परिसर तसा आडबाजूला असला, तरी निर्जन मात्र कधीच नसतो. संक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत स्त्रियांची भरपूर गर्दी असते. संक्रांती दिवशी तर पूर्ण डोंगर परिसर स्त्रियांनी फुलून गेलेला असतो. ओवसा घेण्यासाठी (वसा घेणे मूळ शब्द असावा) सीताबाईपुढे नतमस्तक होत, वाणाची देवाणघेवाण करण्यासाठी ही गर्दी होत असते. पूर्ण डोंगर परिसर हळद-कुंकवाने माखला जातो. या वर्षी संक्रांतीच्या आधीच्या एका रविवारच्या भेटीत हे स्थानमाहात्म्य मी मंदिरात पूजाअर्चा करणार्या मावशीकडून ऐकत होतो आणि प्रश्नांचे मोहोळ जागे होत होते.
सीतेचा वसा घेणे, चालवणे, इतके सोपे आहे का? मुळात तो वसा घेण्याइतपत कसले आकर्षण आहे त्यात? पूर्ण आयुष्यात काही मोजके क्षण, दिवस सुखासमाधानाचे असतील, अभिमानाने पत्नीपद मिरवण्याचे असतील, पण ते वजा करता जादातर आयुष्यकाल हे तर एक धगधगते अग्निकुंडच की. वनवास, अपहरण, पुन्हा राज्ञीपदाच्या सुखाचा प्याला ओठी येतो न येतो तोच, केवळ लोकापवाद टाळण्यासाठी, यत्किंचितही कल्पना न देता नवर्याने केलेला त्याग. निबिड अरण्यातील कष्टप्रद आयुष्य, अवघडलेल्या शारीरिक, मानसिक अवस्थेतील ते ललाटीचे भोग सहन करतानाही काय आंदोलने चालली असतील त्या माऊलीच्या मनात? दोन अपत्यांचे त्यांच्या पित्याशिवाय, आप्तेष्टांशिवाय संगोपन कसे केले असेल? आणि अशा कष्टमय जीवनाचा वसा आजही का बरं घ्यावा असे वाटत असेल? कशाचे आकर्षण असेल त्यात?
येथे परित्यक्ता भगिनीही या दिवशी सीताबाईच्या पायावर डोके टेकवून तो वसा घेत असतात. काही अंशी त्यांचे आयुष्य म्हणजे ही एकप्रकारचा वनवासच असतो. तो वनवास सहन करण्याची शक्ती त्या सीतेकडे मागत असाव्यात का? की या कर्मकांडात, रीतीरिवाजात समस्त स्त्री जमातीला अडकवून ठेवले की, त्यांना कुठलेच प्रश्न पडत नाहीत आणि मग पुरुषांच्या वर्तनाला कुठलीच वेसण राहू नये, यासाठी पुरुष वर्गानेच रचलेला हा डाव आहे.
कदाचित, आपले भोग निमूटपणे सहन व्हावेत म्हणून स्त्रियांनीच ही कर्मकांडरूपी अफूची गोळी आपल्या आयुष्यात स्वीकारली असेल. काही वर्षांपूर्वी फलटण येथील राममंदिरात घडलेली एक घटना या निमित्ताने आठवली. संक्राती दिवशी मंदिरात ओवसा घेण्यासाठी स्त्रियांची प्रचंड गर्दी होत असते. त्या वर्षीच्या संक्रातीला इतकी प्रचंड गर्दी झाली की, चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा, पोटात ताट घुसल्याने मृत्यू झाला होता. इतक्या कमालीची श्रद्धा ठेऊन कुठलं सुख वाट्याला येत असेल, काय माहिती? वटसावित्रीच्या व्रताबाबातही मला हाच प्रश्न पडतो. सत्यवानाचे प्राण परत आणले ते सावित्रीने. ते दोघंही त्या कसाचे होते म्हणून हा चमत्कार घडला असेल. पण मग अशा वेळी सत्यवानाने सावित्रीसाठी उपास-तापास, व्रत करायला पाहिजे; पण घडते उलटेच.
तसेच सीताबाईचा वसा घ्यायला येणार्या माऊलींचे राम आणखी दुसरीकडेच कुठेतरी रममाण झाले असले तरी या माऊली काय म्हणून हा वसा घेत असतील? सत्यवानाने, रामाने कृतज्ञ असायला पाहिजे त्यांच्या-त्यांच्या अर्धागिनींसाठी.
येथे वसा घ्यायला येणार्या भगिनींनी एकदा तरी स्वतःला प्रश्न विचारावा, खरंच आपला राम आपल्यासाठी कोणता वसा घेतो? कोणती व्रतवैकल्ये करतो? वैवाहिक आयुष्याचे साफल्य तर दोघांनाही हवे असते. मग एकट्याच्या प्रयत्नातून ते कसे साध्य व्हावे?
प्रश्न, प्रश्न अन् प्रश्न... डोंगर उतरून येईतो, प्रत्येक पावलाला नवा प्रश्न उगवत होता. मुळात ही सारी व्रतवैकल्ये, उपास-तापास, एकूण एक धार्मिक कर्मकांडे स्त्रियांना सक्तीची अन पुरुषांना ऐच्छिक, ही रचना कोणी अन् कधीपासून केली असेल? फक्त निसर्गतः स्त्रियांपेक्षा थोडेसे जादा शारीरिक बळ लाभलेल्या (मिळवलेल्या नाही म्हणत मी) पुरुषांनीच तर या लाभाचा फायदा घेत ही कर्मकांडे स्त्रियांच्या माथी मारली असतील का? मग न दिसणार्या मानसिक बळाचे काय? ते तर कधीही स्त्रियांकडेच अधिक असते. माणसाच्या आजवरच्या इतिहासात याचे अगणित दाखले मिळतील. वर्तमानातही आहेत.
‘विचार करू शकणारा प्राणी म्हणजे माणूस’ अशी माणसाची व्याख्या असताना, धर्म-जाती-पंथ इत्यादींनी विखुरलेल्या संपूर्ण जगात एका बाबतीत मात्र एकवाक्यता आढळते, ते म्हणजे स्त्रीचे दुय्यमत्व. धर्म, राष्ट्रं यानुसार यात कमी-जास्त होत असेल, उन्नीस-बीस होत असेल. पण मूळ धारणा तीच.
आजपर्यंत मानवाच्या इतिहासातल्या या दुय्यम बाजूचा विचार, कृती अपवादानेच झाल्याची उदाहरणे आढळतात. स्त्रियांचेही जगणे, त्यांच्या शिक्षणाच्या, प्रगतीच्या वाटा सुलभ व सुसह्य करण्यासाठी समाजाचा रोष पत्करूनही काम करणार्या महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे यांसारख्या व्यक्तींची मांदियाळी झाली असती, तर माणसाचा इतिहास कितीतरी वेगळा, चमकदार झाला असता हे नक्की. या दृष्टीने पाहता आजही मला माणसाचा प्रगत होण्याचा प्रवास कूर्मगतीचा वाटतो. तुम्हाला काय वाटते?
दिलीप नाईक निंबाळकर
dilipnaiknimbalkar@gmail.com