सामाजिक सामंजस्य आणि शिक्षणाची भूमिका
अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या दुर्दैवी मृत्यूने जगभरात विविध प्रकारे हळहळ आणि संताप व्यक्त करण्यात आला आहे. कृष्णवर्णीय आणि सवर्ण यांच्यातील वर्षानुवर्षे चालत असलेला संघर्ष या घटनेमुळे अतिशय ठळकपणे पुढे आला. जगभरात ‘सामाजिक सामंजस्य’ या विषयाला पुन्हा एकदा केंद्रस्थानी ठेऊन त्यावर काम करण्याची कशी गरज आहे यावर चर्चा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर बहाई अकादमी या पाचगणी स्थित शैक्षणिक संस्थेच्या
पुढाकाराने ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन एज्युकेशन फॉर सोशल कोहेजन’ ही ऑनलाईन परिषद ११ आणि १२ जुलै रोजी पार पडली. बहाई अकादमीबरोबरच इतर तीन राष्ट्रीय आणि चार आंतरराष्ट्रीय सहयोगी संस्थांचा या परिषदेत सहभाग होता. या परिषदेत मांडले गेलेले मुद्दे विविध पातळ्यांवर विचार करण्यास भाग पाडतात. सर्वात महत्त्वाची सुरुवात सामाजिक सामंजस्य म्हणजे काय या मूलभूत प्रश्नाने होते. साधारणपणे आपण एक सामान्य व्यक्ती आहोत आणि या प्रश्नावर कशी चर्चा करायची हा विचार प्रत्येकाच्या मनात येतो. पण या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन जर थोडासा बदलला तर सर्वसामान्य व्यक्तीच या सामाजिक सामंजस्याचा पाया आहेत हे समजण्यास कठीण जात नाही. शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे वैयक्तिक विकास घडवणे आणि सामाजिक प्रगतीस हातभार लावणे. पण शिक्षणाकडे या दृष्टीने बघितले जात नाही, त्यामुळे सामाजिक सामंजस्य म्हणजे काय? यावर उघडपणे शाळा किंवा महाविद्यालयीन स्तरावर कमी प्रमाणात चर्चा केली जाते. या परिषदेच्या निमित्ताने शिक्षणाद्वारे सामाजिक सामंजस्य कसे टिकवता येईल आणि वृद्धिंगत करता येईल या विषयावर काही मुद्दे मांडले गेले.
पुढे जाण्याआधी सामाजिक सामंजस्य म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया. गुस्ताव ल बॉन हे एक नावाजलेले फ्रेंच विद्वान होते. त्यांचे आवडीचे विषय म्हणजे मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, संशोधन आणि भौतिकशास्त्र. ‘द क्राउड : अ स्टडी ऑफ द पॉप्युलर माइंड’ हे त्यांचे नावाजलेले काम. जमावाचे मानसशास्त्र जाणून घेण्यासाठी त्यांचे हे काम अत्यंत परिणामकारक समजले जाते. त्यांनी १८९७ साली सामाजिक सामंजस्याबाबत पहिल्यांदा त्यांच्या ‘सामूहिक वर्तन आणि संसर्ग सिद्धांत’ या संशोधनात विचार केला. त्यानंतर या विषयावर वेगवेगळ्या व्याख्या तयार झाल्या आणि सर्वांपुढे प्रस्तुत केल्या गेल्या. त्यामध्ये समाजातील विविध स्तर, विविध असमानता आणि सामाजिक तडे यांचा समावेश केला गेला. ‘द काऊन्सिल ऑफ युरोप’ द्वारा सामाजिक सामंजस्याची पुढीलप्रमाणे व्याख्या देण्यात आली, जी माझ्या मते समजण्यास सोपी जाते – सामाजिक सामंजस्य म्हणजे ‘आपल्या सर्व सदस्यांचे कल्याण करण्यासाठी, असमानता कमी करण्यासाठी व उपेक्षित गटांची निर्मीती टाळण्यासाठी असलेली सामाजिक क्षमता’. यामध्ये पुढील वैशिष्ट्यांचा समावेश केला जातो – (१) परस्पर निष्ठा आणि एकता (२) सामाजिक संबंधांची आणि सामायिक मूल्यांची मजबुती, (३) आपुलकीची भावना, (४) समाजातील व्यक्तींमध्ये (समुदाय) विश्वास, आणि (५) असमानता कमी करणे व उपेक्षित गटांची निर्मिती टाळणे. सर्वसामान्य भाषेत समाजातील व्यक्तींमध्ये एकतेची भावना निर्माण होणे, एकमेकांवर असलेली विश्वासाची पातळी अधिक उंचावणे, स्त्री-पुरुष समानता लागू होणे, लिंगभेद दूर होणे, समाजातील विविधतेला स्वीकारून एक प्रकारची सामाजिक सुसंगती व शांतता निर्माण होणे, व्यक्तींमधील आर्थिक व जातीयवादी असमानता दूर होणे, समाजाची एकत्रित प्रगती होणे, सर्व व्यक्तींच्या मूलभूत मानवी हक्कांचा सन्मान केला जाणे म्हणजेच सामाजिक सामंजस्य तयार होणे.
आपल्या आजूबाजूला किंवा सोशल मीडियावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असे दिसून येते की एकंदरच समाजातील सहनशीलता कमी होत चालली आहे. व्यक्तीस्वातंत्र्य वेगळ्याच पद्धतीने वापरले जात आहे. एखाद्या व्यक्तीचा विचार, कला, साहित्य यावर टीका करणारे आणि त्यामध्ये कमतरता शोधणारे लोक वाढत चालले आहेत. एकविसाव्या शतकात अनेक नवीन प्रकारची साधने आपल्यासमोर उभी ठाकली आहेत, पण त्यांचा स्तुत्य वापर कसा करावा याबाबतचे अज्ञान सुद्धा वाढीस लागले आहे. एकीकडे समाज बांधणीसाठी अनेक लोक, संस्था झटत आहेत पण त्यांचे प्रमाण अजूनही अल्प आहे. एका वर्कशॉप मधील वैयक्तिक अनुभव इथे मांडावासा वाटतो. एका कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रविष्ट झाल्यावर ‘इंडक्शन प्रोग्रॅम’ घेतला गेला आणि त्यात मूल्य शिक्षणावर बोलण्याची संधी मला मिळाली होती. जवळजवळ ३५० मुलांमध्ये १०० मुली उपस्थित होत्या. जेव्हा ‘स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर चर्चा सुरु झाली तेव्हा मुलींचा पुढाकार होता. पण ८०% मुलांनी मात्र “चला झालं सुरु, आता तेच रडगाणं”, “हो करतो करतो ताई, तुमचंच ऐकतो”, “देतो देतो, आईला जेवायला देतो आणि मी बसतो भांडी घासत” (त्यावर हशा) वगैरे बोलायला सुरुवात केली. शेवटी कॉलेजचे प्राध्यापक उठले आणि म्हणाले, “गप्प बसा. नाहीतर हजेरी लावणार नाही”. मग मात्र सगळे चिडीचूप बसले. वाईट या गोष्टीचे वाटले की, या मुलांना समाजात विषमता तयार करण्यास कारणीभूत असलेल्या विषयाचे महत्त्वच वाटत नाही आणि हा विषय काही स्त्रियांनी एकत्र येऊन भाषण देण्यास तयार केला आहे असे विदारक विचार त्यांच्या मनात पक्के बसले आहेत. दुसरा मुद्दा शिक्षकांचा. विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात पुढाकार न घेता सोयीस्करपणे हजेरीचे कारण पुढे करून शिक्षकांनी सोपा मार्ग शोधला. हे तरुण देशाचे भविष्य म्हणायचे, मग जर भविष्याचे विचारच इतके दारुण असतील तर त्यांच्याकडून समाज बदलाची अपेक्षाच आपण कशी करू शकू?
इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन एज्युकेशन फॉर सोशल कोहेजनमध्ये सर्वप्रथम सामाजिक सामंजस्य तयार करण्यासाठी एका शिक्षकाची भूमिका काय असू शकते यावर मुद्दे मांडले गेले. एखादा शिक्षक विद्यार्थी घडवतो असे म्हणणे चुकीचे नाही. शिक्षक आपल्या विद्यार्थांना विविध भूमिका पार पाडून कळत-नकळत प्रभावित करत असतात. जन्म झाल्यावर व्यक्तीच्या आयुष्यात सर्वप्रथम कुटुंबियांचा प्रभाव असतो. मग तो कधी सकारात्मक तर कधी दुर्दैवाने नकारात्मकही असू शकतो. कुटुंबानंतर सामाजिक शिक्षण हे शाळेत पहिले पाउल टाकताच सुरु होते. मग अश्या वेळी विद्यार्थी सर्वप्रथम शिक्षकाकडे आदर्श म्हणून बघतात. कित्येक वेळा शाळेत गेल्यावर मुलं फक्त शिक्षकाचे म्हणणे ऐकून घेतात. घरी आल्यावर शिक्षकांनी सांगितले आहे म्हणून करतो असे सुद्धा ठामपणे सांगतात. मुलांच्या वैचारिक प्रगतीसाठी शिक्षकांचे योगदान किती मोलाचे आणि मूलभूत ठरू शकते याचे हे छोटेसे उदाहरण म्हणता येईल. जर एखाद्या शिक्षकाचे व्यक्तिमत्व नि:पक्षपाती असेल, त्याने सर्वधर्मसमभाव जोपासला असेल, त्याला समाज बांधणी करण्यासाठी आवश्यक घटकांची जाणीव असेल, त्याची वर्तणूक एकता उभारणी करण्यासाठी पोषक असेल तर याचा विद्यार्थांवर उघड परिणाम होईल आणि त्यांची वैचारिक क्षमता विस्तृत होईल, त्यांच्यामध्ये मानवी मूल्ये रुजण्यास मदत होईल. भारतीय शिक्षणपद्धतीनुसार विद्यार्थी दशा कमीतकमी वयाच्या २० वर्षांपर्यंत चालू असते. या संपूर्ण काळात शिक्षक विद्यार्थ्यांसोबत बरोबरीने सहभागी असतात. अश्या वेळी शिक्षकाची सामाजिक बांधिलकी महत्त्वाची ठरते. शिक्षकाची संवेदनशीलता, सहनशीलता, विविधतेकडे बघण्याचा दृष्टीकोन, पूर्वग्रह विरहीत वागणूक या सर्वांचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत असतो. म्हणूनच एखादा शिक्षक सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक असणे, त्याने वारंवार विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर चर्चा करणे, सामाजिक ऐक्याबाबत नवीन विचार मांडणे व दूषित विचारांचे समर्थन न करणे असे केल्यानेच विद्यार्थ्यांची मूल्यप्रणाली तयार होण्यास हातभार लागतो. इथे एक मुद्दा समजून घेणे महत्वाचे आहे, तो म्हणजे या एकविसाव्या शतकातील माहिती युगात शिक्षकांची भूमिका एखादा विषय शिकवणे एवढीच मर्यादित नसून, शिक्षक आता विद्यार्थ्याच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासातील एक सुलभकर्ता मानला जातो. मग एक माणूस म्हणून विद्यार्थाची जडणघडण करणे ही जबाबदारीसुद्धा त्याला पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकाने विद्यार्थी-पालक, आजूबाजूचा समुदाय, त्यामध्ये कार्यरत सामाजिक संस्था यांच्याशी संलग्नता निर्माण करणे महत्त्वपूर्ण ठरेल. यासाठी बीएड किंवा एमएड अभ्यासक्रमात काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहेत. जसे की, इतर विषयांसोबतच एका शिक्षकाची नैतिक सक्षमता कशी वृद्धिंगत करता येईल त्याबाबत मूल्य शिक्षणाचा समावेश करणे. विद्यार्थी-पालक-सुमदाय यांच्यामध्ये भागीदारी कशी प्रस्थापित होऊ शकते याबाबत प्रशिक्षण घेणे.
परिषदेत पुढचा मुद्दा ‘सेवा अध्ययन कृती’ (Service Learning Activities) यावर मांडला गेला. जान सईद या वेस्ट मिनिस्टर कॉलेज, यूटा, युएसए येथे ऑफिस ऑफ ग्लोबल पीस अँड स्पिरिच्युअॅलिटीच्या संचालिका आहेत. त्यांच्या विभागात अनेक वर्षं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सेवा अध्ययन कृतीचा अवलंब केला जात आहे. ‘मी जे ऐकतो ते मी विसरतो, मी जे बघतो ते मला आठवते, पण मी जे प्रत्यक्ष करतो त्यामधून मी नक्की शिकतो’ यावर आधारित सेवा अध्ययन कृती विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण प्रत्यक्ष समाजाच्या प्रगतीस हातभार लावण्यासाठी उपयोगात आणण्यास मदत करते. एखादा विद्यार्थी जर मूल्यशिक्षण घेत असेल तर प्रत्यक्ष समाजात काम केल्यावर, सामाजिक प्रश्नांवर चर्चा केल्यावर, त्यावर संबंधित भागधारकांशी चर्चा करून, वास्तविक उपाय शोधून, प्रत्यक्ष कृती हाती घेतल्यावरच खरे मूल्य शिक्षण होऊ शकते. कारण सेवा अध्ययन कृती करत असताना त्या विद्यार्थ्याची वर्तणूक अधिक विकसित होते, त्याचा आध्यात्मिक विकास होतो, सामाजिक प्रश्नांबाबतची समज अधिक विस्तृत होते, स्वत:ची क्षमता, कौशल्ये अधिक विकसित होऊन स्वत:चा विकास होतोच पण त्याचबरोबर इतरांची सेवा करण्याचा आनंद मिळतो. आपण स्वत: काही सकारात्मक करू शकतो याची प्रचीती येऊन विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थी इतर कोणत्याही क्षेत्राशी निगडीत असेल तरीही त्याच्या शिक्षणाचा उपयोग सेवा अध्ययन कृती नुसार प्रत्यक्ष समाज विकासासाठी करण्यात येतो. अश्या प्रकारे विद्यार्थी जेव्हा शिकतात तेव्हा ते वास्तविकतेच्या अधिक जवळ येतात, त्यांची तर्कबुद्धी तीक्ष्ण होण्यास अधिक मदत होते. समाज म्हणजे काय?, समाजाचे स्वरूप, सामाजिक जडणघडण याची त्यांना प्रचीती येते. आपणसुद्धा समुदायाचा एक महत्वपूर्ण घटक आहोत आणि आपल्या कृतीचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात याचा त्यांना आनंद मिळतो. या कोव्हिड – १९ च्या काळात अनेक प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर आले आहेत. विद्यार्थीजीवनसुद्धा विस्कळीत झाले आहे. तरीसुद्धा ऑनलाईन पद्धतीचा वापर करून अजूनही सेवा अध्ययन कृती हाती घेऊन विद्यार्थी आपले शिक्षण आणि समाजसेवा दोन्ही यशस्वीपणे पार पाडू शकतात. अश्या प्रकारे सेवा अध्ययन कृती जर शिक्षणाचा अविभाज्य घटक करण्यात आल्या तर नक्कीच विद्यार्थ्यांना सामाजिक सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी मोलाची भूमिका बजावण्याची संधी मिळू शकेल.
परिषदेत पुढील सादरीकरण शामिल फाताकोव्ह यांनी केले. असोसिएशन फॉर क्रिएटिव्ह मॉरल एज्युकेशन, रशिया, या संस्थेचे ते संचालक आहेत व त्यांनी ‘हॅपी हिप्पो शो’ या परस्परसंवादी शोची निर्मिती केली आहे. ही एक प्रकारची कार्यपद्धती असून त्याद्वारे समुदायातील संबंधित भागधारकांसोबत मध्यस्थी करून दैनंदिन जीवनाशी निगडीत कठीण प्रश्नांवर मनमोकळी चर्चा करता येते. त्यामधून सकारात्मक उपाय शोधले जातात व लागू केले जातात. ‘हॅपी हिप्पो शो’मध्ये, टॉक-शो आणि नाटकातील काही घटक समाविष्ट केले गेले आहेत. या पद्धतीत विरोधाभास तसेच नैतिक विषयांवर मनोरंजक मार्गाने चर्चा केली जाते. नैतिकतेवर आधारित दृष्टीकोन संकलित करून प्रस्तुत केलेल्या ‘सामाजिक द्विधा’ मनःस्थितीवर प्रत्यक्षात अंमलबजावणी करता येईल असे उपाय शोधले जातात. ‘हॅपी हिप्पो शो’चा उपयोग करून विध्यार्थी सामाजिक प्रश्नांवर चर्चा करू शकतात. यामध्ये संपूर्ण महाविद्यालय, समुदायातील सदस्य, पालक या सर्वांचा समावेश होऊ शकतो. या शोमागील काही उद्देश पुढीलप्रमाणे आहेत: सल्लामसलत करून एखादा कठीण प्रश्न शांततापूर्ण वातावरणात, नैतिक मूल्यांचा आधार घेऊन सोडवणे, तरुणांसमोर नैतिक वर्तणूक सकारात्मक व प्रशंसनीय आहे हे मांडणे , समुदायातील प्रत्येक घटकाला चर्चेत सहभागी करून घेणे. ‘हॅपी हिप्पो शो’द्वारे विद्यार्थांना काय योग्य आणि काय चुकीचे आहे याबद्दलच्या वर्तमान अनुमानांचे विश्लेषण करण्याची क्षमता प्राप्त होते आणि त्याचबरोबर स्वतंत्रपणे विचार करण्याचे आणि कार्य करण्याचे धैर्य विकसित होते. आतापर्यंत जवळपास ६० देशांमध्ये हा शो अत्यंत परिणामकारक ठरला आहे. विद्यार्थ्यांशी आणि समाजाशी निगडीत अनेक विषयांवर तोडगे काढले गेले आहेत. सामाजिक सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जागरूकतेने सहभागी होणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. ‘हॅपी हिप्पो शो’ द्वारे विद्यार्थी आपल्या कलागुणांचा सर्जनशीलपणे वापर करून सामाजिक सामंजस्य प्रस्थापित करण्यास हातभार लावू शकतात.
‘प्रत्येक व्यक्ती जणू रत्नांची एक खाण आहे, पण या रत्नांना पैलू पाडून खरे व्यक्तिमत्व घडवण्याचे काम शिक्षणाद्वारे होत असते’ असा विचार मांडून शशी गायकवाड, सहायक संचालिका, मूल्यशिक्षण संशोधन, बहाई अकादमी यांनी सुरुवात केली. विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात प्रवेश घेतात तेव्हा त्यांचे शिक्षण आणि त्या शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग याबाबतचे व्यावहारिक ज्ञान तसेच आवश्यक कौशल्यांचा विकास आणि सराव यामध्ये तफावत दिसून येते. मूल्यशिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला गेला पाहिजे. मूल्यशिक्षण म्हणजे नुसतेच आदर्श व्यक्ती, विचार किंवा अध्यात्म वाचणे यावरच मर्यादित न ठेवता त्याद्वारे विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास कसा घडवता येईल यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. ‘वैश्विक मानवी मूल्यांचे शिक्षण’ या अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थी स्वत:च्या नैतिक क्षमता विकसित करू शकतात. याचे कारण सक्षमता उभारणीच्या पाच पैलूंवर – संकल्पना, कौशल्ये, अभिवृत्ती, आध्यात्मिक गुण आणि संबंधित आवश्यक माहिती – विद्यार्थी चर्चा करतात आणि त्यांची प्रत्यक्षात अनुभूती घेतात. या अभ्यासक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांनी स्वत:चा नैतिक व आध्यात्मिक विकास घडवणे व त्याचबरोबर त्यांचे विस्तारित कुटुंब, समुदाय आणि संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावणे असा आहे. त्यामुळे या पाच पैलूंवर सहकारात्मक चर्चेचा वापर करून सखोल चर्चा केली जाते व त्याचबरोबर विद्यार्थी प्रत्यक्ष जीवनात त्यांचा सराव करतात व त्यामधून शिकतात. उदा. स्त्री-पुरुष समानता या तत्त्वावर चर्चा केल्यानंतर विद्यार्थी स्वत:च्या विस्तारित कुटुंबात स्त्री-पुरुष समानता वृद्धिंगत करण्यासाठी काय करू शकतील यावर विचार करतात. त्या कृती प्रत्यक्षात हाती घेतात. त्यावरून काय शिकायला मिळाले याचा अहवाल तयार करतात. परिणाम सकारात्मक होता की नकारात्मक यावरून पुढील कृतीचा विचार करतात. यालाच अनुभवजन्य शिक्षण असे मानले जाते जी काळाची गरज आहे.
नामवंत शिक्षणतज्ञ प्रा. राम ताकवले यांच्या विचारांनी या परिषदेचा समारोप झाला. सर्वप्रथम त्यांनी युनेस्कोने दिलेले चार स्तंभ शिक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे कशी आहेत याचा संदर्भ दिला. ही तत्त्वे म्हणजे लर्निंग टू नो – जाणून घेण्यासाठी शिक्षण, लर्निंग टू डू – कसे करावे यासाठी शिक्षण, लर्निग टू लिव्ह टुगेदर – एकत्र राहण्यासाठी शिक्षण आणि लर्निग टू बी – कसे असावे यासाठी शिक्षण. त्यांच्या मते या मार्गदर्शक तत्त्वांचे जर शिक्षणपद्धतीत पालन केले गेले तर सामाजिक ऐक्य साधले जाऊ शकते. आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सामाजिक समन्वयासाठी मानवाची भूमिका या दोन्ही गोष्टी समरस होणे आवश्यक आहे. आज विद्यार्थी जागतिक स्तरावर शिकत आहेत आणि शिकण्याच्या प्रक्रियेद्वारे त्यांनी स्थानिक पातळीवर विकासाशी जोडले जाणे मह्त्त्वाचे आहे. इथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे अध्ययन, विकास, निर्मिती आणि सुधारणा या जीवन मार्गासोबत शिक्षण जोडले गेले आहे. नवीन शिक्षणपद्धती सामाजिक पुनर्रचनेवर आधारित असली पाहिजे. प्रत्येक वर्तनाचा जागतिक आणि स्थानिक परिस्थितीवर प्रभाव पडत असतो म्हणूनच विद्यार्थांमध्ये सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी काही आवश्यक कृती करण्यास शिक्षणाने प्रवृत्त केले पाहिजे. विद्यार्थ्यांना आपण व्यवस्थेचा एक भाग आहोत याची जाणीव झाली पाहिजे.
या सर्व विचारांचा आढावा घेतल्यावर असे लक्षात येते की सामाजिक सामंजस्य प्रस्थापित करण्यात शिक्षणाचा नक्कीच मोलाचा हातभार आहे. विविध नावीन्यपूर्ण, सहकारात्मक, अनुभवजन्य, सहभागी, परस्परसंवादी शिक्षणपद्धतींचा अवलंब करून विद्यार्थी ‘व्यक्ती’ म्हणून अधिक सक्षम होतीलच, पण त्याचबरोबर समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून वैयक्तिक पातळीवर समाज विकासासाठी, सामंजस्य टिकवण्यासाठी आणि अधिक बळकट करण्यासाठी त्यांना तयार करता येऊ शकेल.
सायली दुबाश
sayalidubash@gmail.com
(सायली दुबाश गेली ९ वर्षे, बहाई अकादमी, पाचगणी या शैक्षणिक संस्थेच्या ‘मानवी वैश्विक मूल्यांचे शिक्षण’ या अभ्यासक्रमाच्या कार्यक्रम समन्वयक म्हणून काम करत आहेत. बहाई अकादमी उच्च शिक्षण संस्थासाठी १९८२ सालापासून मूल्यशिक्षण व संशोधनाचे काम करते. अकादमीतर्फे देण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचा हेतू तरुणांना त्यांच्या सुप्त शक्ती, क्षमता यांची जाणीव करून देणे व वैश्विक मानवी मूल्यांवर आधारित त्यांची नैतिक क्षमता विकसित करणे हा आहे, जेणेकरून ते सामाजिक प्रगतीमध्ये योगदान देऊ शकतीत.)