सोलापुरी खाद्य भ्रमंती, शालामित्रा संगे!
या शनिवारी, २६ ऑगस्ट २०२३ला, सकाळीच सांगलीहून सोलापूरला येण्यास बसलो. अर्थात बस पंढरपूर मार्गे घेतल्यामुळे ती प्रथम रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आणि सांगोल्यावरून मोहोळ मार्गे साधारण दुपारी एक वाजता सोलापूरच्या स्टॅन्ड वर आली. मित्र घ्यायला आला होताच! हा मित्रही खवय्या! गेल्या काही वर्षाच्या वास्तव्यामध्ये त्याने भरपूर छान छान authentic आणि हटके अशी खाद्य भ्रमंती केली होती, त्यामुळे त्याचा प्रत्येक choice हा उत्तमच असणार, याची खात्री होतीच. त्याच्या गाडीवरून मध्यवस्तीत असलेल्या भागवत टॉकीज समोरच्या मेकॅनिक चौकातल्या चाळवजा अपार्टमेंटमध्ये आलो. फ्रेश झालो आणि त्याने ठरवल्यानुसार त्याच्या दक्षिण सोलापूर भागातील पान मंगरूळ या खायच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या छोटेखानी गावात जाण्यास निघालो. गाव साधारण एक तास अंतरावर. सोबतीला त्याची छान गाडी होतीच. सोलापूर सोडण्याच्या आधीच आम्ही थोडी पोटपूजा करावी म्हणून सात रस्ता भागात संगमेश्वर कॉलेजच्या पाठीमागच्या सोलापूर वडापाव या नव्या फूड जॉईंटमध्ये गेलो. तशी सोलापुरात एक्सपिरीयन्स ओरिएंटेड खाद्य संस्कृती हळूहळू रुजायला लागलेली. त्याचाच परिपाक म्हणून हा सोलापूर वडापाव. तरुणाईसाठी अगदी योग्य ठिकाण. वडापाव, सँडविच असा छान नाष्टा केला. तिथे अजून बरेच प्रकार मिळतात, शेजारीच दोन दुकाने सोडून एक रसगृह होते, तिथे ज्यूसचे अनेक प्रकार. मोमेडियन लोकांनी चांगल्या प्रकारे चालवलेले ते दुकान होते. तिथे मी मुद्दामून नेहमीच पायनापल ऑरेंजला फाटा देत कीवी या फळाचा ज्यूस घेतला आणि तोही अगदी अप्रतिम होता. पुढे आम्ही जुन्या बॉम्बे बेकरीतून काही खारी आणि इतर बेकरी पदार्थ त्याच्या घरी नेण्यासाठी घेतले आणि निघालो. पुढे जाताना होटगी रोडवर डाव्या बाजूला भले मोठे विस्तीर्ण असे होटगीचे तळे लागले. थोड्यावेळ गाडी थांबून मस्त तळ्याकडे न्याहाळत राहिलो. पाणी इतके छान नितळ होते की, शेजारी डुंबणाऱ्या म्हशीसारखे आपणही डुंबावे, असा मोह झाला पण कपडे आणले नसल्याने आणि लवकर घरी जायचे असल्याने निघालो. अगदी कच्चा पक्का रस्ता होता. एका उजवीकडे वळणावर रेल्वे क्रॉसिंग पार करत आम्ही एनटीपीसी या थर्मल पॉवर स्टेशनच्या शेजारून प्रवास चालू केला. या थर्मल स्टेशनने भरपूर पाणी साठवणुकीसाठी पंधरा पंधरा हजार लिटरची तळी खोदली होती त्यामुळे आजूबाजूची भाग शेती जिरायती पासून बागायतीमध्ये बदलली होती, असे मित्राने सांगितले. त्याचा मित्रही जवळच शेती करत होता आणि त्याचीही केळी, ऊस त्याने दाखवले. बंकलगी, बाके अशा कन्नड तोंडावळा असणाऱ्या गावांमधून टू व्हीलर जात राहिली. रेल्वे रूट साथ देत होताच. एका टर्नला सुलेर जवळगे या महाराष्ट्रातील शेवटून दुसऱ्या रेल्वे स्टेशनच्या शेजारून आमची गाडी गेली आणि पुढे काही वेळातच त्याचे गाव आले. गावाला जाण्याआधी प्रचंड घेरदार अशी वडाची झाडे आणि चिंचेचे झाडे लक्ष वेधून घेत होतीच. अशा ओपन टू व्हीलरच्या वाऱ्यामध्ये संध्याकाळी जाताना फार मस्त वाटत होते. प्रसन्न हवा, ऑगस्ट असला तरी पावसाचा माग नसल्याने उकडत जास्त नव्हते. ‘मध्ये मध्ये मोर दिसतात इथे’, असे त्याने सांगितले. गावात पोहोचलो. त्याच्या आईचा हातचा सुशीला हा कन्नड पदार्थ खाल्ला आणि थोडी विश्रांती घेऊन बोलून त्याचे घर बघायला बाहेर पडलो. १०० वर्ष जुने असलेले वाडावजा त्याचे घर. सदराचे बांधकाम चालू आहे. आजूबाजूला गावातून फिरत असताना प्रत्येक ठिकाणी दणकट जुने वाडे, त्यांच्या लाकडी जुन्या प्रकारच्या कडी असलेला दरवाजा न वास्तू पाहताना मन बरेच भूतकाळात गेले. सोलापूर भागातील विशिष्ट प्रकारची रचना असलेल्या गल्ल्या आणि चांगले बारा फूट उंच दगडी मनोरे गल्लीच्या दोन्ही बाजूला पहात आम्ही तिथल्या दर्ग्यामध्ये गेलो. दर्ग्यासमोर एक मोठी विहीर, नेहमीसारखी सोलापूर मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या रहाट आणि विशिष्ट रचना असलेल्या पायऱ्या आलेली, मात्र पूर्ण वापरात नसल्याने आणि घरोघरी नळ आले असल्याने दुर्लक्षित अशी. त्या समोर दर्गा. दर्ग्यामध्ये आत शिरताच डाव्या बाजूला अगदी हिंदू वाटावा अशा प्रकारचा कमानीच्या आकार दिसला. उजव्या बाजूच्या ओवऱ्याही बऱ्याच प्रमाणात मूळच्या हिंदू धर्माच्या मंदिरासारख्या वाटत होत्या. आत मध्ये जाऊन दर्ग्याच दर्शन घेतले. थोडावेळ बसलो. या दर्ग्याच्या एका कमानीमध्येच एका बाजूला हरीण व दुसऱ्या बाजूला वाघाचे चित्र होते. याचा काही खुलासा झाला नाही, मात्र अफजलखान विजापूरहून निघाल्यानंतर तो या भागातूनच गेला आणि मधल्या काळात त्याने हिंदू धर्मांच्या मंदिरांचा ऱ्हास केला त्याच कचाट्यात ह्या गावाचे मंदिर सापडले असावे, असा कयास मी लावला. तसा हा भाग मोगलाई मधीलच. बऱ्याच वर्षापासून इथे दोन्ही संस्कृती नांदत असलेल्या. हिंदू धर्म, लिंगायत (धर्म?) आणि मुस्लिम धर्माची प्रचंड छाप इथल्या गावांमध्ये दिसून येते प्रत्येक गावामध्ये दर्गा,मस्जिद हटकून असतेच, मात्र हिंदू मुस्लिमांच्या मनामध्ये, अनेक पिढ्यान पिढ्या राहत असल्यामुळे, तेवढी तेढ दिसून येत नाही. पुढे गावातून फेरफटका मारत त्याच्या ओळखीच्या लोकांशी बोलत आम्ही परत घरी आलो आणि तिथून पुन्हा निघालो. जाता जाता संध्याकाळी एका सुंदरशा वडाच्या झाडासमोर थांबलो. वडाच्या पारंब्या पूर्ण लोंबत असलेल्या. त्याच्यावर सोनेरी छटा आलेली. शेजारी सूर्य मावळत असलेला आणि एक जुने असे विशिष्ट सोलापूर भागात बांधले जाणारे हिंदू मंदिर. त्याच्यासमोर एक दीपमाळ. मात्र ती दगडी नसून मिलच्या चिमणी सारखी. खालचा रुंद भाग वर अरुंद होत गेलेला आणि त्यामध्येच केलेल्या खोबण्या पणत्या ठेवण्यासाठी. वेशींवर आणि गावांमध्ये मला अशा प्रकारच्या बऱ्याच दीपमाळा दिसल्या. पुढे येताना गावामध्येच आम्ही थोडीशी भूक असल्यामुळे ओम आंध्रा भजी सेंटर येथे गेलो. आंध्रा भागातली विशिष्ट बोंडा नावाची भजी आणि त्याचबरोबर मिरची भजी खाल्ल्या. सोबतची चटणी अप्रतिम होती आणि अतिशय चविष्ट अशी भजी होती, जी अतिशय जास्त तळलेली नव्हती आणि त्यामध्ये एक घरगुती गोडवा होता.
तिथूनच येताना आम्ही थोडसं काहीतरी पेय प्यावं म्हणून वसंत पैलवान या १९५२ मध्ये स्थापन झालेल्या आणि लाकडी घाण्यापासून आतापर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक घाण्यापर्यंत प्रगती केलेल्या अशा जुन्या रसवंतीगृहात गेलो. हे रसवंतीगृह किल्ला भागाच्या जवळ असे. तिथला रस अप्रतिम होता कारण त्या रसामध्ये सुंठ आणि इतर अशा अनेक औषधी यांची पावडर घातलेली, त्यामुळे त्याला एक वेगळाच स्वाद आला होता. येताना नसले चटणीच्या ऐवजी एका नव्या आणि छान दुकानामध्ये जाऊन त्याने मला सोलापूरची स्पेशल शेंगा चटणी खरेदी करून दिली. तिथे त्याच बरोबर काळे तिखट, कोरड्या, वेगवेगळ्या धान्याच्या भाकऱ्या पॅक करून ठेवलेल्या. सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये आणि एकंदर ग्रामीण भागामध्ये शेंगाची चटणी, त्यामध्ये दही घालून कोरड्या भाकऱ्यांबरोबर खाण्याचे व आंबट भात नावाचा एक प्रकार आढळून येतो. इकडच्या कोरड्या कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशामुळे अशा प्रकारच्या विशिष्ट खाद्य संस्कृतीची जाणीवपूर्वक वाढ इथल्या ग्रामीण व शहरी भागात झाली. त्यामुळे कोरडी भाकरी खाणे असो किंवा कोरड्या शेंगदाण्याची चटणी, तिखट गोष्टींचा सढळ वापर हा इथल्या पारंपारिक पदार्थांमध्ये जाणवतो.दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार होता. मित्राने त्याचे काम मोठे शिताफीने सोमवारवर ढकलले आणि माझ्यासाठी तो दिवस मोकळा केला. सकाळीच आवरून आम्ही सोलापूर पासून विजापूरकडे जाणारा नॅशनल हायवेच्या अलीकडे असणारा शगुफ्ता सोलापुरी दालचा राईस या अतिशय जुन्या आणि टेस्टी राईसच्या नाष्टा सेंटरकडे मोर्चा वळवला. अपेक्षेप्रमाणे रविवार असल्याने आणि खूपच जुने आणि फेमस ठिकाण असल्याने गर्दी होतीच. साधाच असलेला रंगीत भात आणि त्याच्यावर विशिष्ट प्रकारची घट्ट अशी करी आणि सोबत छोट्या छोट्या आकाराच्या मऊशार अशा भज्या असा सगळा बेत होता. शेजारी कोल्ड्रिंक चहा कॉफीचे दुकानही होते. मी हा दालचा राईस भजीचा आस्वाद मस्तपैकी घेतला. अतिशय चविष्ट होत्या भजी आणि राईस! त्याचबरोबर एक समोसही घेतला ज्यामध्ये हलका पुदिना टाकल्याने चटणी आणि समोस्यांचा स्वाद दिगुणीत होत होता. असा पोटभर नाश्ता करून आम्ही हत्तर कुडल या गावाकडे निघालो. साधारण एक तास अंतरावर असलेले गाव. विजापूरकडे जाणाऱ्या नॅशनल हायवेवर एका ठिकाणी डावीकडे दहा किलोमीटरचा एक फाटा हा थेट हत्तर कुडल संगम या गावाला घेऊन जातो. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले सीना आणि भीमा नदीचा संगम आणि लगतच महाराष्ट्र कर्नाटकची असलेली सीमा हद्द.
या गावांमध्ये ही एक टी हाऊस प्रसिद्ध आहे असे मित्राने सांगितलेले. मी अगदीच उत्सुक होतो जाताना! हायवेवर सुंदर असा ढग, आकाश आणि हिरवाईचा कॉम्बो पाहता माझे मन हरवून गेले. बरेच फोटो बऱ्याच अँगलने, व्हिडिओ काढत सुंदर प्रवास झाला. पुढे फाट्यामधून आत वळल्यानंतर बऱ्याच उंच सखल भागातून प्रवास करताना लांब वर भीमा नदीचे सानिध्य असल्यामुळे बागायत झालेला उसाचा, केळीचा हिरवा पट्टा लक्ष वेधून घेत होता कुडल संगमची कमान लवकरच आली आणि त्या गावातून पुढे संगमाकडे आम्ही प्रवास करत राहिलो. संगम गावाच्या अगदी बाहेर. तिथे पोहोचताच आम्ही थोडावेळ एका घनदाट वडाच्या झाडाच्या कट्ट्यावर पाठ ठेवली. थोडीशी विश्रांती घेऊन, पाणी पिऊन आम्ही संगमाच्या मंदिराकडे निघालो. मंदिर अगदी जुने. दहाव्या शतकातील हेमाडपंथी आणि त्याच्यावर अगदी जुना मराठी असा लेख मिळालेला. तो मागे सापडलेल्या कर्नाटकातल्या मराठी शिलालेखापेक्षा जुना असावा का, असा संशोधनाचा विषय सध्या सोलापूर विद्यापीठात गाजतो आहे. त्यांना संदर्भातच एक मॅडम तिथे पाहण्यासाठी आल्या होत्या. संगमेश्वर म्हणजेच शिवाचे मंदिर आणि नागाचे ठायीठायी अस्तित्व अनार्यांची ओळख करून देत होते. मित्र म्हणाला त्यानुसार नुकतेच काही वर्षांपूर्वी इथे हरिहरेश्वर म्हणजे विष्णू आणि शिवाचे एकत्र असणारे मंदिर तिथे सापडले होते आणि त्याची डागडूजी करून पुरातत्व खात्याने त्याला मूळ रूप देण्याचा सुंदर प्रयत्न केलेला. अगदी बेसमेंट मध्ये खाली पाच दहा पायऱ्या उतरून जाऊन ते मंदिर आम्ही पाहिले. मंदिराची रचना अगदी हेमाडपंती आणि विशेष म्हणजे कृष्णाचा लिला दाखवणारे तीन अतिशय उच्च कोटीचे कलात्मक असलेले वास्तुशिल्प मंदिराच्या बाहेरच्या मंडपाच्या छतावर कोरलेले. ते पाहताना मन हरखले. पुढे आत गेल्यानंतर नेहमीसारख्या अंतराळ, गर्भगृह अशा रचना मला खिद्रापूरच्या(जि.कोल्हापूर) मंदिराची आठवण करून देत होत्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर समोरच उंचावरून एकावरून सीना नदी भीमेला मिळताना आणि भीमा नदी पुढे वाहताना दिसून येत होती. अगदी जीपीएस चौकसतेने पाहून मी माझे भूगोल प्रेमी मनाचे समाधान करून घेतले.
पुढे शेतातूनच जाणारी घाटावरची वाट आणि घाटावर मस्तपैकी नौकाविहार करत असणारे लोक पहात, फोटो काढत आम्ही बसलो. समोर सुंदर निळा पाण्याचा प्रवाह, हलके असलेले ऊन, शेजारी नारळीच्या बागा आणि वर निळ्या ढगाच्या कॅनवासवर चितारलेले पांढरे ढग यामुळे माझे मन तृप्त झाले, आनंदीत झाले. निसर्गाशी जवळीक साधणे किती महत्त्वाचे आहे हे समजले.
पुन्हा बाहेरच्या फेमस टी स्टॉलला जाऊन तिथला अप्रतिम चहा आणि कर्नाटकी भागात नेहमीच फेमस असणारा सुसला हा पदार्थ खाऊन आम्ही पुढे निघालो. माझा मित्र मूळचा बॉर्डरवरच्या गावचा असल्यामुळे कामचलाऊ कन्नड उत्तम बोलतो. त्याची कन्नड मराठीमध्ये नेहमी भेटणाऱ्या लोकांशी बातचीत चालू असायची, हे पाहून मजा येते आणि सांस्कृतिक एकात्मता आणि सर्व मिसळ कशी भाषा, प्रांत खाद्यसंस्कृतीचे भेद विसरते याचे उत्तम उदाहरण मला पदोपदी दिसत राहिले. पुन्हा हायवेवर येऊन आम्ही सोलापूर शहरात प्रवेश करताच पोटात असलेल्या थोड्याशा भुकेसाठी आम्ही कंबर तलावाच्या पुढच्याच बाजूला असणाऱ्या हाऊस ऑफ पराठा या ठिकाणी गेलो. तिथे चीली पनीर स्टफ पिझ्झा व एक आलू पालक पराठा मागवला. पराठा अप्रतिम होता. इतका छान, स्वादिष्ट पराठा मी आधी कधीच खाल्ला नाही. सोबत चटणी सॉस होताच, मात्र पराठ्यांनी मन जिंकले. त्याबरोबरच एक बुंदी रायता आणि एक साधा मठ्ठा घेऊन आम्ही खाद्ययात्रा तूर्तास स्थगित केली व घरी येऊन निवांत ताणून दिली. संध्याकाळी आम्ही जवळच्याच झुडीयो आणि वेस्ट साईड अशा दुकानात जाऊन मनसोक्त खरेदी केली. त्याआधी थोडासा सोडा आणि ट्राय केला. यामध्येही झोंगा नावाचा एक विशिष्ट पेयाचा मी आस्वाद घेतला आणि त्यानंतर हैद्राबादी सोडा. दोन्ही गोष्टी नव्या असल्यामुळे माझ्या जिभेसाठी अगदीच अनोळखी होत्या. मात्र, नव्या गोष्टीचा आनंद घेतला यातच मी समाधान मानले. त्यानंतर किल्ला भागात असणाऱ्या एका मस्त चौपाटीवर आम्ही दहीवडा खाल्ला आणि या प्रवासाची सांगता केली. दुसरा दिवस धावपळीचा होता. त्यामुळे सोमवार असल्याने मित्राचे ऑफिसही होते. त्यातही त्याने वेगात गाडी काढून एका जवळच्याच पोहे सेंटरवर नेले आणि तिथे अप्रतिम पोहे आणि त्यावर असलेली स्पेशल घट्ट अशी डाळ करी खायला घातली. चहाही सुंदर होता.
त्यानंतरच पुढे ऑफिसमध्ये जाण्याआधी त्याने पूनम इडली गृह येथे मला इडली वडा ट्राय करायला सांगितले तोही अप्रतिम होता. विशेष होते म्हणजे त्यातील चटणीचे गोडसरपण आणि त्याचबरोबर तिथे एक विशिष्ट मसालाही मागितल्यास मिळतो, हे मला नंतर मित्रानी सांगितल्यावर कळले. हा मसाला कोथिंबीर, मिरची, कडीपत्ता या सर्वाला तेलामध्ये हलके फ्राय करून सुकवून देण्यात येतो.याचा आस्वाद घेतल्यावर मी शांतपणे घरी निघालो. पुन्हा दुपारी जवळच्या टॉकीजमध्ये आवडता चित्रपट पाहून झाल्यावर माझे पाय मित्रानीच सजेस्ट केलेल्या अस्सल गुजराती थाळीच्या रसिक डायनिंग हॉलकडे वळले. टाकीजपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असणारे हे सुंदर, सुबक, कौलारू छपराचे घरगुती हॉटेल.या आधी हॉटेल पांचाळीत पहिल्यांदाच हॉटेल व गुजराती थाळी या बाहेरच्या जेवणाची ओळख झाली होती छोटा असताना! गड्ड्याला यायचो जानेवारीमध्ये. सिद्धरामेश्वरांची यात्रा म्हणून त्यावेळी या थाळीची आणि डायनिंगची झालेली ओळख. पुन्हा एकदा त्या आठवणींचा उजाळा सुंदर अशा पद्धतीने झाला. हलका गोडसर असा रंग येथील सर्व पदार्थांवर पसरलेला. घट्ट अशी डाळ, विशिष्ट गुजराती प्रकारची मोठ्या गवारीची मसाला भरून केलेली भाजी, बटाटा रस्सा, अजिबात तिखट न लागणारे मटारचे घट्ट ग्रेवी वाली रस्सा भाजी, विशिष्ट फोडणी घातलेली गोड सर आंबट अशी कढी, पापड, भरपूर सालाड पायनापल शिरा आणि सोबत थंडगार दह्यात बुडवलेला मेदुवडा. सोबत गरमागरम येणाऱ्या तळहाता एवढ्या आकाराच्या फुलक्या व शेवटी भात असा अप्रतिम बेत होता. मन न पोट तृप्त झालं. जेवण झाल्यानंतर मग माझी ब्रह्मानंद टाळी लागली. घरी येण्याआधी नुकताच पाऊस पडून गेल्याने सचींत झालेल्या सुंदर अशा जुन्या ब्रिटिशकालीन इमारतींचे चाळींचे फोटो काढत काढत मी घरी आलो. काही वेळानेच मित्र आ. त्याने मला स्टँडवर सोडले व सोलापूरच्या स्टँडवरून अक्कलकोट रत्नागिरी बसच्या संध्याकाळच्या प्रवासाने सांगता झाली.
सौरभ कुंभारे
saurabhkumbhare31@gmail.com