न बोललेल्या भावनांचं स्टिअरिंग
नवरा–बायको संसाराची दोन चाकं असतात, चार भिंतींच्या खोलीला घरपण एका बाईमुळेच येतं, एक बाई शिकली तर तिचं संपूर्ण कुटुंब शिकतं—अशा म्हणी पूर्वापार चालत आल्या आहेत. तरीही, संसाराचं, घराचं, कुटुंबाचं स्टिअरिंग मात्र त्या बाईच्या हातात क्वचितच असतं, हे आजच्या सुशिक्षित समाजाचं कटू सत्य आहे. हेच सत्य हिनाकौसर खान या माझ्या मैत्रिणीने तिच्या ‘स्टिअरिंग’ या नव्या कथासंग्रहातून अत्यंत प्रभावीपणे उलगडलं आहे.
या कथासंग्रहातील नायिका वेगवेगळ्या समाजकठोर पार्श्वभूमीचे प्रतिनिधित्व करत असल्या, तरी त्या सर्व कुठेतरी आपलीच छबी घेऊन उभ्या राहतात. कथा वाचताना “अरे, हे तर अगदी माझ्याच मनातलं!”, “असं माझ्यासोबतही झालंय…” असा फील वाचकाच्या मनात सहज निर्माण होतो; आणि हीच हिनाच्या लेखनाची खरी जमेची बाजू आहे.
घराची आर्थिक व कौटुंबिक जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या फुफ्फुची, तिच्या कामचुकार नवऱ्याच्या हट्टी इच्छा पेलताना होणारी भावनिक घुसमट… आणि तिच्या स्वतःच्या टर्म्सवर आयुष्य जगण्याची हिम्मत दाखवणारी भाची अमीना—यांच्यातला नाजूक संवाद मनाला चटका लावतो. अमीनाचे फुफ्फुकरिता केलेले प्रयत्न आणि त्यामागची तिची निरागसता, तर दुसरीकडे त्या वागण्यामुळे दुखावलेली फुफ्फु—या भावनिक टकरावामुळे कथेचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा ठरतो. ‘फुफ्फु’ ही कथा त्यामुळे अत्यंत जवळची, गहिरी वाटते. विशेष म्हणजे, या कथेतील हिनाची लेखनशैली साधी, प्रवाही आणि थेट हृदयाला भिडणारी भाषा वाचकांवर प्रभाव टाकणारी आहे. वास्तववादी संवाद, कोमल पण प्रभावी शब्दयोजना आणि प्रत्येक प्रसंगात जाणवणारी लेखिकेची संवेदनशीलता ही विशेष उठून दिसणारी वैशिष्ट्ये.
"सकाळचा सहाचा अलार्म होऊन अर्धा तास झाला होता. आता उठण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांच्या घोरण्याचा आवाज इरिटेट करत होता. त्यांनी मला मागून हलकेच जवळ घेतलं. मिटलेल्या डोळ्यांनीच माझ्या ओठांवर ओठ टेकवले. मला जरा कसनुसं झालं आणि मी बाजूला झाले. हात धरत ते म्हणाले, ‘आय ऍम सोरी डिअर… काल रात्री जरा जास्तच त्रास दिला ना! आय नेव्हर वाँट टू हर्ट यू सिरिअसली… बट आय रिअली लव्ह यू. अँड यू?’ आजतागायत त्यांच्या प्रेमाची जातकुळी न समजलेल्या अडाण्यासारखी मी कामाला लागले."
‘कालची रात्र’ या कथेतील हा परिच्छेद सुशिक्षित कुटुंबातील एका पत्नीची उद्विग्नता आणि अंतर्मनातील कोंडलेपण अचूकपणे उलगडून दाखवतो. आणि मग ‘फुलफिलमेंट’ या कथेतील सुशिक्षित, कमावत्या स्त्रीची स्वतःच्या आयुष्यातील मौलिक क्षणांवर स्वतःचा हक्क प्रस्थापित करण्याची जाणीव… तिचं स्वतःशी केलेला प्रामाणिक संवाद…
तर ‘फुलफिलमेंट’ मध्ये एक आधुनिक, कमावती स्त्री स्वतःच्या आयुष्याचं स्टिअरिंग काही काळासाठी का असेना स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेते. तिच्या भावनांवर तिनेच हक्क सांगणारा हा परिच्छेद स्त्री-मनाच्या प्रामाणिकतेचा खुला, धाडसी आवाज बनतो.
"तो मोहाचा चुकारक्षण होता किंवा पाय घसरला अशी लेबलं मी खपवून घेणार नाही. माझी शुद्ध जागी होती आणि मी सगळं काही मला हवं म्हणून केलं. माझ्या आयुष्यात जी गंमत मिसिंग होती ती मला एकदा मिळवायची होती. एकेकाळी माझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असणाऱ्या व्यक्तीकडूनच मला ती मिळू शकली, याहून सुख काय असणार? शरीराची गरज मिटतच होती, पण मला सुख हवं होतं… तो प्रवास रोमांचकारी, अविस्मरणीय हवा होता. मी स्वतःला खुश ठेवणं हे माझंच काम आहे."
हा परिच्छेद स्त्रीच्या आत्मजागृतीचा नितांत प्रामाणिक स्वर मांडतो. या संग्रहातील प्रत्येक कथा सांगते की स्त्रीच्या आयुष्याचं स्टिअरिंग निसटणं ही कथा फक्त पुस्तकातली नाही आपल्यातील अनेकांच्या जगण्यातली लपलेली, न बोललेली सत्यकथा आहे.
- दीपा पिल्ले पुष्पकांथन, बँगलोर (९८५०७९६४३१, pillaydeepa2581@gmail.com)