स्त्रीवादी पुरुष म्हणजे कोण?
मला विद्या बाळांनी सांगितलेला एक किस्सा आठवतोय. एका खेड्यामध्ये स्त्रियांचे स्वयंसाहाय्यता गट बांधण्याचे, तसेच संडास बांधण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याचे काम चालू होते. त्यातच आठ मार्चला स्त्रीमुक्ती दिन साजरा करायचे ठरले. कार्यक्रम काय करायचा यावर खूप चर्चा झाली. त्यासाठी एका बाईने एक सूचना दिली. सर्व बायांनी मिळून गावातील सर्वात चांगला नवरा कोण आहे हे ठरवावे. म्हणजे त्याचे गुण सर्वांनी जपावे, असे आवाहन करता येईल. चार-पाच नावे पुढे आली आणि मग त्यांच्या नावे चिठ्ठ्या तयार झाल्या. त्या वेगवेगळ्या छोट्या टोपल्यात ठेवल्या गेल्या. आणि मग स्त्रियांना आवाहन करण्यात आले की, तुम्हाला जो सर्वात योग्य वाटेल त्या माणसाची चिठ्ठी तुम्ही उचलायची. आणि एका मोठ्या टोपलीमध्ये आणून ठेवायची. सर्व स्त्रियांनी आपापली निवड केली की चिठ्ठ्या उलगडायच्या. ज्या माणसाला, म्हणजेच पुरुषाला जास्त मते मिळतील तो जिंकला. या स्पर्धेमध्ये एका वयस्कर पुरुषाचा विजय झाला. तो गावातील आदर्श नवरा ठरला. त्याला बक्षिस देण्यात आले. बायांनी त्यासाठी काय काय निकष लावले ते समजून घेतले तर मजा येते. बायकोला न मारणारा, दारू न पिणारा, शेतीच्या बाबतीत किंवा एकूणच आर्थिक प्रश्नाबाबतीत बायकोशी सल्लामसलत करणारा, बायकोने शेळ्या सांभाळल्या आणि त्यांची खरेदी विक्री केली तर ते तिचे पैसे आहेत असे समजून तिला ते स्वत:साठी वापरायला, किंवा माहेरच्या माणसांना भेटी देण्यासाठी वापरायला संपूर्ण मुभा देणारा असा हा आदर्श नवरा त्यांनी निवडला होता.
मला आठवतंय की, मुंबईला मैत्रिणी गटातर्फे आम्हीही आदर्श जोडप्यासाठी अशीच स्पर्धा घेतली होती (१९८२). अनेक निकषांपैंकी साधारण आर्थिक बाबतीतील निकष व सांस्कृतिक बाबतील निकष असे दोन भाग केले होते. आर्थिक बाबतीत तर नवर्याचा वरचष्मा दिसून आला. उदा. सगळ्यांचे जॉइंट बँक अकाउंट नव्हते. घर बहुधा पुरुषाच्या नावेच होते. शिल्लक कुठे गुंतवायची याबाबतीत नवराच निर्णय घेत असे. अगदी स्वत: कमावणार्या स्त्रियाही त्याबाबतीत फार आग‘ही नव्हत्या, असे लक्षात आले. पण सांस्कृतिक बाबतीतही बर्याच स्त्रिया पतिपरायण असलेल्या आढळल्या. कारण काय तर नवर्याची भीती. त्याच्या आवडीनिवडीचा सतत विचार. विवाहानंतर नाव सर्वांनीच बदलले होते. पुरुष मित्र असलेल्या फारच थोड्या. नवर्याला वाटणारी असूया, संशयी स्वभाव. मुलांच्या बाबतीतही नवर्याला वाटणारे स्वामित्व आणि बायकोशी सल्लामसलत न करण्याची प्रवृत्ती अशा अनेक गोष्टी गृहीत धरून आम्ही प्रश्न काढले होते. पुरुषांनीही बर्याच मोकळेपणी उत्तरे दिली होती. त्यातूनच लक्षात येत गेले की, स्त्रीस्वातंत्र्याची वाटचाल खूप लांबलचक आहे. स्त्रियांच्या अपेक्षाही अजून मर्यादित आहेत. जोपर्यंत स्त्रीभानही जागृत होत नाही, तोपर्यंत पुरुषभानालाही आव्हान मिळणार नाही असे आम्ही ४० वर्षांपूर्वी म्हणत होतो. आज मात्र शिकलेल्या, शहरात नोकरी करून स्वतंत्रपणे जगणार्या तरुण मुलामुलींचे निकष कितीतरी निराळे आहेतच आणि म्हणूनच आजचा स्त्रीवादी पुरुष - फेमिनिस्ट मॅन कसा असेल, त्याची व्याख्या काय करायची यावर पुरुषांनीच उत्तरे शोधण्याची गरज आहे.
फेमिनिस्टांच्या बाजूने लढणार्या अनेक पुरुष संघटना आज जगातील अनेक देशांमध्ये आहेत. अमेरिकेतील नॅशनल ऑर्ग़नायझेशन ऑफ मेन अगेन्स्ट सेक़्सीझम, युरोपमधील प्रो़-फेमिनिस्ट मेन्स नेटवर्क, कॅनडातील व्हाईट रिबन मूव्हमेंट ही काही महत्त्वाची नावे. भारतातही पुरुष उवाच, मेन अगेन्स्ट व्हायोलंस अँड अब्यूज (मावा), मेन एंगेज मेन अशा अनेक संघटना आज काम करत आहेत. एवढेच नव्हे तर 'समजदार जोडीदार' या संघटनेने ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी पद्धतशीर प्रकल्प आखून, ग्रामीण तरुणांनाच तयार केले आहे. वेगवेगळी पोस्टर्स तयार करून, घोषणाही त्यांनीच तयार केल्या आहेत आणि वेगवेगळ्या वयोगटाच्या पुरुषांशी बोलून पुरुषांच्या मर्दानगीच्या कल्पना बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. रवींद्र आर.पी. लिहितात की, ‘अनेक विचारवंत ह्या विचारव्यूहाची मांडणी करण्यात गुंतले आहेत.’ बॉब पीज यांनी ‘अनडूईंग प्रिविलेजेस’ नावाचा ग्रंथ लिहून विशेषाधिकारप्राप्त व्यक्ती आपल्या विशेष अधिकारांचा त्याग करून सामाजिक लढा अधिक तीव्र कसा करू शकतील, ह्याची व्यापक मांडणी केली आहे. रविंद्र आर.पी. पुढे म्हणतात की, भारतात हा विचार गांधीजींनी मांडला. शोषणावर आधारित प्रत्येक व्यवस्था हिंसक असते आणि अशी व्यवस्था शोषकाचे माणूसपणदेखील हिरावून घेते. म्हणून अशी व्यवस्था नष्ट करण्यात सर्वांचेच भले आहे. हा विचार फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात तर संत कवींपासून हा वारसा चालू आहे. त्यानंतर वासाहतिक काळामध्ये महाराष्ट्रात मोठीच प्रबोधन परंपरा सुरू होती. महात्मा फुले, आगरकर हे त्याचे महत्त्वाचे नेते होते. रविंद्र आर.पी. यांच्या मते पुरोगामी चळवळींच्या सर्व प्रवाहांनी, मार्क्सवादी, फुले आंबेडकरवादी, गांधीवादी आणि आता स्त्रीवादी यांनी ह्या नव्या पुरुषाचे स्वप्न रंगवले आहे आणि त्याची आस धरली आहे.
अनेक फेमिनिस्ट पुरुषांच्या संघटना मुख्यतः स्त्रियांविरुद्ध केल्या जाणार्या हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवणे आणि पुरुषांना त्याबाबत जागरूक करणे असे मर्यादित ध्येय घेऊन काम करत असतात. पुरुषांमधील हिंसक प्रवृत्तीला, आक्रमक मनोवृत्तीला, मर्दानगीबाबत असलेल्या चुकीच्या समजुतींना छेद देणे हे त्या संघटना आपले प्रमुख कार्य मानतात. आणि मुख्य म्हणजे ह्या संघटना असे मानतात की, त्यासाठी त्यांना फेमिनिस्ट स्त्रियांसोबत, त्यांच्या संघटनांसोबत काम करण्याची गरज आहे. स्त्रीवादी सिद्धांतन समजून घेण्याची गरज आहे. आणि हे सिद्धांतन केवळ एकच एक नाही, तिथे अनेक पदर आहेत किंवा अनेक पंथ आहेत. तेव्हा त्यांना स्वत:ला जो पंथ योग्य वाटेल त्याच्याबरोबर ते जातील. कारण शेवटी काम करताना, पुरुषांशी वैचारिक देवाणघेवाण करताना, प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुरुषांना संवेदनशील करताना त्या सिद्धांतनाशी असलेले उत्तरदायित्व ते लक्षात ठेवू इच्छितात. स्त्रीवादी संघटनेबरोबर कार्य करतांनाही हे उत्तरदायित्व ते मानतातच, पण ते केवळ स्वत:कडे दुय्यम भूमिका घेऊन नव्हे तर सिद्धांतनाच्या मांडणीशी जोडले जाऊन, वेळ पडल्यास एखाद्या प्रश्नावर त्या सिद्धांतनाच्या मांडणीच्या आधारे मतभेद व्यक्त करण्याची जबाबदारी, विमर्श करण्याची जबाबदारी घेऊन. या संघटनांचे असे अनुभव समजून घेणे महत्त्वाचे आहे. मला आठवतंय की, ‘बेटी बचाओ’ या उद्देशाने काम करणार्या एका संस्थेने स्त्रीगर्भ हत्येसबंधात काही पोस्टर्स बनवली होती. पण त्या पोस्टर्समधील स्लोगन्स अशा तर्हेचा भाव देत होत्या की, ‘भ्रूणहत्या’ हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. हा संदेश चुकीचा होता. आपल्याकडे गर्भपाताचा कायदा झालेला आहे. पूर्वी चार महिन्यांच्या गर्भाच्या गर्भपाताला परवानगी होती आता ती विशिष्ट परस्थितीत सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ‘बेटी बचाओ’ या मोहिमेचा उद्देश ‘स्त्री गर्भाची हत्या’ थांबवावी हा होता. कारण मुलगा पाहिजे या उद्देशाने मुलाचा गर्भ राहितोवर मुलींचे गर्भ मारले जातात, अशी पुरुष वर्चस्वाची सामाजिक भूमिका आहे. तिला छेद देण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. या प्रकारामुळे लोकसंख्येमधील स्त्री-पुरुषांच्या प्रमाणातील समतोल नाहीसा झालेला आहे. आणि स्त्रीच्या दुय्यमत्वाची भुमिका अधिकाधिक ठळक होताना दिसते. थोडक्यात, सिद्धांतन समजून न घेता पुरुष संघटनांनी केवळ दयाबुद्धीने काम करणे चुकीचे ठरते.
पुरुषांचा एक गट असा आहे की, जो शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाशी निगडित आहे. ते असे मानतात की प्रत्येक व्यक्तीने, स्त्री वा पुरुष, त्यांच्या प्रत्येक संशोधन प्रकल्पामध्ये स्त्रीवादी नजरेचा वापर केला पाहिजे, मग तो सामाजिक विज्ञानाच्या परिघाच्या आतील विषय असो की हार्डकोअर विज्ञानाशी संबधित असो. मग प्रश्न निर्माण होतो की, पुरुष संशोधकाला स्त्रीवादी होणे, त्या नजरेतून संशोधित व्यक्ती, समाज आणि त्याच्याभोवतीचे वातावरण याचा वेध घेता येणे शक्य आहे का? स्त्रीवादी पुरुष अशाप्रकारे तटस्थपणे संशोधन करू शकतील का? लिंगभावा पलीकडे गेलेली संवेदना त्यांना आत्मसात करणे शक्य होईल का? आज अस्तित्वात असलेली ‘मर्दानगी’ ची सत्ताप्रधान कल्पना (जिचा पुरुषाला निश्चित फायदा घेता येतो) लयास जाण्यासाठी पुरुष स्त्रियांबरोबर संवाद साधू शकतील का? ‘लिंग व लिंगभाव’ अशी जी व्यवस्था आज तयार झाली आहे त्यामध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत. पहिला लैंगिकता. या घटकामुळे एकमेकांशी संवाद, शारीरिक जवळीक अपरिहार्य आहे. ती किती समानतेच्या पायावर आधारित आहे, किंवा येऊ शकते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण या कारणाने हिंसा घडू शकते, लैंगिक हिंसा एक हत्यार म्हणून वापरले जाऊ शकते. याची जाणीव सतत असणे आवश्यक. दुसरा घटक आहे तो लिंगभावावर आधारित समाजातील आजपर्यंतचे सर्व व्यवहार. हे व्यवहार केवळ गुणवत्तेवर आधारित आहेत, काही विशिष्ट उपजत कौशल्यावर आधारित आहेत हा आजपर्यंतचा समज. हे दोन घटक खोलवर पडताळून पाहून, त्यांना स्वत:च्या व्यक्तिमत्त्वामध्ये कोठेही जागा नाही ना, याबद्दल सतत जागरूक असणे शक्य आहे का? यावर आधारित पुढचा प्रश्न उभा राहतो की, केवळ सिद्धांतन नाही; पण स्त्री म्हणून येणारा ‘अस्सल’ अनुभव एखादा पुरुष घेऊ शकतो का? आणि संशोधन करतांना अशी ‘स्त्री ओळख’ उपयोगी पडू शकते का?
मानववंशशास्त्राच्या आधारे आदिम समाजाचे किंवा आदिवासी समाजांचे संशोधन करतांना लिंगभावावर आधारित शासनव्यवस्था सहज नजरेस पडते. लिंगभावावर आधारित श्रमविभागणी सहज दिसून येते. मानववंशशास्त्र मुख्यतः समाजजीवनाबद्दलची निरीक्षणे नोंदवते. हे करताना लिंगभावाचा आधार घ्यावाच लागतो. ‘स्त्रियांचे विश्व’ असा शब्दप्रयोग नेहमी वापरला जातो आणि त्यामध्ये शिरण्यासाठी आजपर्यंत संशोधक स्वत: स्त्री असणे महत्त्वाचे मानले जात होते. स्वत: स्त्री असल्यामुळे त्या अस्सल अनुभवाच्या जोरावर ज्यांचा अभ्यास करायचा तेथील ‘स्त्री विश्व’ त्यांनाच अनुभवता येईल आणि जितक्या सच्चेपणे त्याबद्दलची निरीक्षणे मांडता येतील तेवढी पुरुष संशोधकाला मांडता येणार नाहीत. या पारंपरिक कल्पनेला पुरुष संशोधक आव्हान देऊ लागले आहेत. त्यांच्या मते असे अनेक मार्ग आहेत की, संशोधकाचे लैंगिक वास्तव पुरुष असूनही एखाद्या समाजाच्या लिंगभावावर आधारित व्यवहार समजून घेतांना स्त्रियांशी मैत्री करत त्यांची मानसिकता समजून घेता येणे शक्य आहे. तो स्त्रीवादी पुरुष बनू शकतो.
नांदेड येथील प्राध्यापक पुष्पेशकुमार स्वत:चा अनुभव सांगतात. त्यांच्या मते ज्या प्रकल्पामध्ये स्त्री विश्वाबद्दलच्या संशोधनाला प्राधान्य असेल अशा ठिकाणी एक तर स्त्री व पुरुष मानवशास्त्रज्ञ एकमेकांबरोबर काम करून हा प्रश्न सोडवू शकतील. तसेच पुरुष शास्त्रज्ञसुद्धा सतत लिंगभावाचा विचार करीतच जाणीवपूर्वक त्या समाजाच्या सामाजिक परिमाणांचा वेध घेऊ शकतो. कोलाम आदिवासींच्या सामाजिक जीवनाचा त्यांनी अभ्यास केला. नेहमीप्रमाणे त्यामध्ये अडचणी होत्याच. तो तेथे राहिला गेल्यावर त्याला एक त्याच समाजातील विधवा बाईची खूप मदत झाली. तो तेथे राहिला होता आणि त्याच्यासाठी जेवणखाण करायला, कपडे धुवायला ही चाळिशीच्या आसपास असणारी बाई तयार झाली होती. लेखक म्हणतो की, माझे तिच्याशी आई व मुलगा असे नाते तयार झाले होते. इतर जातीतील स्त्रीपुरुष व्यवहारांपेक्षा कोलाम या आदिवासी जमातीमध्ये स्त्रीपुरुष बर्याच मोकळेपणे एकमेकांशी बोलतांना, एकत्रितपणे तंबाखू आणि थोडीशी दारू पिताना आढळतात. त्यांचे नृत्यही एकत्रितपणे होते. आणि तरीही काही असे प्रसंग असतात, किंवा जागा असतात की जेथे पुरुषांना मज्जाव असतो. उदा. स्त्रिया एकत्रित गाणी म्हणायला बसतात. जंगलातील कामालाही त्या एकत्रित जातात. यासाठी लेखकाला विधवा बाईची - सन्माची- खूप मदत झाली. तिच्यामुळे तिच्या बहिणींमध्ये त्याला प्रवेश मिळाला. सन्मा ही एकटी राहात असल्यामुळे तिच्याकडे पुष्कळदा गाणे म्हणायला स्त्रिया एकत्र येत असत. तसेच विनोद आणि गप्पाटप्पा किंवा कुचाळक्या करायला जमत असत. या भेटीतूनच लेखकाला त्यांच्या समाजाच्या चालीरीतींसंबंधी बरीच माहिती मिळत गेली जी त्याच्या अभ्यासाचा भाग होती. जमातीमध्येच विवाहाची गरज, घटस्फोट झाला तर मुलाची कस्टडी कोणाकडे, नवर्याशी न पटण्याची कारणे, एकटे राहतांना पैसे जमा करण्याचे कष्ट, त्यातून काही वेळा चांगले यश मिळाल्याच्या कथा अशा बर्याच गोष्टी त्याला कळत गेल्या. सन्मा आजारी असतांना त्याने तिची चांगली मदत/सेवा केली त्यातून ती अगदी त्याच्याशी जिव्हाळ्याने व मनातले बोलायला लागली. नवरा कसा आक्रमक व हिंस्रपणे वागायचा याच्याही कहाण्या तिने सांगितल्या. तिच्या पाळीच्या वेळी कसा त्रास होत असे याचेही वर्णन तिने न लाजता केले. लेखक जवळजवळ सर्व रोजच्या व्यवहारात तिच्या बरोबर असे. जंगलामधून काटक्या गोळा करून दूरवरच्या बाजारात विकायला जाईपर्यंत त्याची पोच होती. थोडक्यात, लेखकाच्या मते ‘स्त्रीविश्व’ असे काहीतरी गूढ आहे आणि पुरुषाला त्याच्या आत प्रवेश नाही, असे समजता कामा नये. तो स्त्रीवादी पुरुष म्हणून जगू शकतो, दृष्टिकोन स्वीकारू शकतो.
काही पुरुष संशोधक यासाठी ‘अदरींग द सेल्फ’ ही संकल्पना वापरू पहातात. स्वत:ची ओळख पुरुष असताना आपण स्वत:ला दुसरीच व्यक्ती मानायचं. पुरुष म्हणून व्यक्त व्हायचं नाही. म्हणूनच आधी ‘पुरुषी व्यक्तिमत्त्वाचा’ किंवा मर्दानगीचा अभ्यास करायचा. पुरुषाला आपण स्त्रियांपेक्षा वेगळे आहोत हे कशामुळे ओळखू येते? केवळ लैंगिक वेगळेपणामुळे नक्कीच नाही. तर काही एका प्रकारची मानसिकता आणि सामाजिक भांडवल ज्यामध्ये आपण उतरंडीच्या वरच्या थरावर आहोत, किंवा आपण कोणी विशेष आहोत, अनन्य आहोत असा भाव निर्माण झालेला असतो. त्याला आपल्यासारखे अनेक आजूबाजूला दिसतात. आणि मग तो स्वत: 'स्त्री' या लिंगभावाच्या बरोबर दुसर्या बाजूला आहोत. किंबहुना पुरुषांच्या विरोधात आहोत अशी स्वत:ची ओळख कडवेपणाने त्याच्या मनात कोरली जाते. रोजच्या कौटुंबिक जगण्यातूनच ही ‘अनन्यपणाची’ भावना पुरुषाच्या मनात जोपासली जाते. त्यातूनच ‘सन्मानाची’ भावना आणि ती भावना दुखावली गेली की त्याच्या विरुद्ध ‘लज्जेची’ भावना किंवा ‘अपमानाची’ भावना या जाणिवांवर आधारित त्याचे व्यवहार होत राहतात. हिंसेचे समर्थन याच जाणीवेतून होत राहते. स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण हा महत्त्वाचा मुद्दा दक्षिण आशियातील समाजांमध्ये आढळून येतो. किंबहुना समाजाची ओळख ही स्त्रियांच्या इज्जतीवर अवलंबून असते. आणि ही इज्जत म्हणजे काय याची व्याख्या दक्षिण आशियातील सर्व धर्मांमध्ये पुरुषांनी ठरविलेली असते. उदा. विवाहित स्त्रीने कपाळावर कुंकू लावणे हे हिंदूचे इज्जतीचे एक चिन्ह. तर काळा बुरखा घेणे हे इस्लामी धर्माचे इज्जतीचे एक चिन्ह. दोन्ही धर्म पुरुषप्रधान आणि स्त्रिया पुरुषसत्तेच्या वाहक. दोन समाजांच्या एकमेकांबाबतच्या दुष्मनीमध्ये आपापल्या स्त्रियांचे संरक्षण करणे आणि दुसर्या समाजाच्या महिलांवर आक्रमण करून त्यांची इज्जत घालवणे अशा प्रकारच्या ‘मर्दानगी’च्या संकल्पनेवर मात करणे हे विश्लेषणाअंती शक्य असते असे काही संशोधकांना वाटते. त्यातूनच आपण ते पुरुष नाहीच आहोत, आपली ती ओळखच नाही असे मानणे हे शक्य होत असले पाहिजे. किंवा आपण संशोधक म्हणून, किंवा चौकशी करणारी व्यक्ती म्हणून त्याच समाजाचा, सत्ताधारी चौकटीचा भाग आहोत याबद्दल सतत सतर्क राहूनच निरीक्षणे नोंदवितांना काळजी घेत, ती दहा वेळा तपासून घेणे म्हणजेच ‘अदरींग द सेल्फ’ ही पद्धत वापरणे असे असेल.
आणखी एक प्रश्न विचारला जातो की, एखाद्या पुरुषाला स्त्रियांच्या बद्दल काळजी वाटत असेल, त्यांच्यासाठी काही ‘चांगले’ केले जावे असे वाटत असेल तर त्यांनी काय करावे? त्यांना इतर पुरुषांबरोबर संघर्ष करावा लागेल. ह्या पुरुषांना आणि कधीकधी स्त्रियांनासुद्धा पुरुषसत्तेचा माज चढला असेल. त्यांच्या इच्छा व आशा-आकांक्षा या पुरुषसत्तेला अनुकूल अशा असतील तर त्यांच्यापासून दूर राहूनच स्त्रीवादी चौकटीचा किंवा दृष्टिकोनाचा अभ्यास करावा लागेल आणि तरच स्त्रियांसाठी काहीतरी ‘चांगले’ किंवा उपयुक्त करता येईल. परंतु भारतीय उच्च शिक्षण शाखेमध्ये पुरुषांचा स्त्रीवादाला चांगलाच विरोध झालेला दिसतो. स्त्री-अभ्यास ही शाखा अनेक विद्यापीठांमध्ये सुरू झाल्यावर ह्या संस्थात्मक स्वरूपाला त्यांचा आक्षेप होता, असे दिसते. पुरुषांचा हा छुपा विरोध सतत उघडा पाडला पाहिजे, असे अनेक स्त्रीवाद्यांना वाटत आलेले आहे. स्त्रीवादामुळे अनेक विद्याशाखांना आलेली मरगळ जाऊन नव्या अंगाने त्या विद्याशाखांना झिलई आली, अभ्यासाला उत्साह आला हे मान्य करणे पुरुष अभ्यासकांना आवश्यक आहे. लिंगभावाधारित अभ्यास किंवा स्त्रियांचे अधिकार या बिरुदावलीखाली अनेक पुरुष आज काम करताना दिसतात. आणि त्याला पुरोगामीपणा म्हणण्यात येते. पण हे वरवरचे बदल आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. खरे बदल तेव्हाच होतील जेव्हा स्त्रीवाद आणि पुरुष हे एकमेकांना भिडतील आणि पुरुषसत्ता म्हणजे नेमके काय याचा शोध घेतील, तेव्हाच पुरुष संशोधकांना फेमिनिस्ट पुरुष म्हटले जाईल.
नायजेरीयातील चिमामान्द नागोझि अदिचि म्हणते की, ‘आपण सर्वच फेमिनिस्ट असले पाहिजे. फेमिनिस्ट किंवा स्त्रीवादी अशी वेगळी ओळख असण्याची गरज काय? सगळ्या स्त्रियांनी आणि सगळ्या पुरुषांनी स्त्रीवादी असले पाहिजे. तरच स्त्री पुरुषांमध्ये खर्या अर्थाने समता प्रस्थापित करणे शक्य होईल.’ आजकाल अनेक पुरुष स्वत:ला स्त्रीवादी पुरुष म्हणून घेतात तेव्हा त्यांना ओळखण्यासाठी एक प्रश्नांची यादी तयार करता येईल आणि त्यांच्या उत्तरांवरून किती प्रमाणात तो पुरुष स्त्रीवादी झाला आहे की नाही ते ठरवता येईल. याउलट रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ म्हणतात की, ‘आपण सगळेच मानुषवादी असले पाहिजे. म्हणजे स्त्रीवादी किंवा पुरुषवादी अशा लिंगभावाच्या पलीकडे गेले पाहिजे.’ माझा प्रश्न असा आहे की, मानुषवादाकडे जाणारा प्रवास स्त्रीवादाच्या रस्त्याने जाईल की नाही? म्हणजेच स्त्रीवादी सिद्धांतन समजून घेऊनच मानुषवादाकडे जाता येईल.
छाया दातार
chhaya.datar1944@gmail.com