सूर्यफुलासारखं पालकत्व: बदलाकडे पाहणारा दृष्टिकोन

रेणू दांडेकर या सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ज्ञ आपल्या लेखात डॉ. अदिती काळमेख यांच्या समृद्ध पालकत्व या पुस्तकाच्या आशयपूर्ण मांडणीवर प्रकाश टाकतात. त्या सांगतात की हे पुस्तक पालकत्वाकडे केवळ जबाबदारी म्हणून न पाहता, संवाद, समजूत आणि बदल स्वीकारण्याची एक समृद्ध प्रक्रिया म्हणून पाहण्यास शिकवते. हे पालकांसाठी मार्गदर्शन करणारे आणि भावनिक पोषणाची जाणीव करून देणारे मोलाचे पुस्तक आहे.
समृद्ध पालकत्व या डॉ. अदिती काळमेख यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सूर्यफुले दिसतात. सूर्यफुले ही नेहमी प्रकाशाकडे पाहतात.पालकत्व हे ज्यांचे स्वप्न आहे आणि ते ज्याच्यासाठी पाहिलेले आहे ते त्यांचे मूल हे आईबाबा दोघांनी मिळून हातात धरलेले आहे. आणि दोघांची तोंडे समोर नाहीयेत, ती एकमेकांकडे आहेत. हे खूप महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या मदतीने, सामंजस्याने, एकमताने ते पालकत्व निभावणार आहेत. सूर्यफूले जशी प्रकाशाकडे पाहतात, तसे हे पालकत्वसुद्धा प्रकाशाकडे पाहणारे आहे. त्यांच्या अवतीभवती प्रकाशाचा- ज्ञानाचा पिवळा रंग आहे. खरोखरच आपादमस्तक म्हणजे बालकांच्या बुद्धीपासून सर्वांगीण वाढीपर्यंत, आहारापासून मानसिक - भावनिक आरोग्यापर्यंत, स्क्रीनच्या व्यसनापासून छंदांपर्यंत सर्व आवश्यक विषयांबद्दल पालकांना मार्गदर्शन करणारे हे सर्वांगसुंदर पुस्तक आहे. मुलांना वाढवताना काय करावे, याबरोबर काय करू नये याचेही अचूक मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते.
मुले आपल्या पालकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीकडे नेहमी लक्ष ठेवून असतात. आज तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहेत. मुलांच्या हातामध्ये साधने असतात. त्यामुळे मुलांची तर्कशक्ती, विचार करण्याची पद्धत बदलत आहे. या स्थितीत मुलांना भावनिक आधाराची गरज असते,हे लक्षात घेऊन त्यांना नेमका काय पर्याय द्यायचा याचा विचार पालकांनी करायला हवा, याकडे हे पुस्तक लक्ष वेधते.

मी स्वतः कोणत्याच कुटुंब व्यवस्थेची पुरस्कर्ती नाही. याचे कारण जशी, जी परिस्थिती माझी, माझ्या कुटुंबाची असेल ती दुसऱ्या कोणाची नसेल, प्रत्येक व्यक्ती वेगळी, तसे त्यांचे कुटुंब,त्यांची मूल्यव्यवस्था वेगळी. आज आपली जी चिडचिड होते, वेगवेगळे प्रॉब्लेम्स चिंताक्रांत करतात, त्याचे एकच कारण आहे ते म्हणजे बदल आणि हा जो बदल आहे तो पालकांना झेपत नाहीये. पण ते अपरिहार्य आहे. पालकांनी मुलांच्या भूमिकेतून विचार केला पाहिजे, बदलाशी जुळवून घेतलेच पाहिजे. ज्या गोष्टी नको वाटतात, त्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. कारण ही जी जनरेशन आहे, ती तंत्रज्ञानातूनच वाढलेली आहे. मग जर एखाद्या अमूर्त गोष्टीकडे मला त्याला न्यायचे असेल, तर अमूर्तच हात मला त्यांना द्यायला हवा, माझा हात नाही चालणार त्यांना. कारण माझा हात त्याच विचारांचा आहे, जे डोक्यातून माझ्या येतात. मुलांची विचारधारा बदलता येईल, यासाठी त्यांच्यासमोरची पुस्तके बदलली पाहिजेत. त्यांची भावनिक भरणपोषणाची गरज आपण भागवली पाहिजे. आपल्यापेक्षा तंत्रज्ञानाने ते खूप पुढे गेलेले आहेत. शिक्षक, पालक, समाज जुन्याच पद्धतीने त्यांना शिकवू पाहतो. त्यांना आम्ही अनुभवांना सामोरे जायला लावत नाही. मुले वास्तववादी झाली आहेत. अशा परिस्थितीत पासवर्ड ऑफ हॅप्पीनेस कसा शोधायचा, मुलांना समजून कसे घ्यायचे, त्याच्यातील क्षमता कशा ओळखायच्या, मुलांच्या दृष्टिकोनातून विचार कसा करायचा, त्यांना संधी कशी द्यायची आणि मुलांशी संवादाचे नाते कसे जपायचे, त्यांना घडवताना आपण समृद्ध कसे व्हायचे, याचे अचूक मार्गदर्शन डॉ. अदिती यांनी आपल्या पुस्तकातून केले आहे.
त्या गेली २३ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. गेली १२ वर्षे पालकत्व या विषयावर काम करत आहेत. त्या अनुभवातून शिवाय समुपदेशनासाठी त्यांच्याकडे आलेल्या केसेसची उदाहरणे देऊन त्यांनी मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. भाषा अत्यंत साधी सोपी आहे, जी पुस्तक वाचायला सुरुवात केल्याक्षणी वाचकाला आपलीशी करते.
आजच्या मुलांमध्ये प्रचंड कपॅसिटी असते, प्रचंड ताकद असते आणि ती ताकद आपण आपले हट्ट, आपला आग्रह, आपला दुराग्रह यांत घालवून टाकतो. मग मी आईबाबा असेन, आजी-आजोबा असेन, आजूबाजूचे असेन किंवा कुणीही असेल. मुलांना आपलंसं करुन, त्यांचे विचार - कल्पना - मते जाणून घेऊन त्यांच्यात बदल घडवले पाहिजेत. समाजातील हा प्रॉब्लेम नेमका समजून अगदी गप्पांच्या स्वरूपात या पुस्तकातून सुंदर मार्गदर्शन केले आहे. सहा महिन्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आलेली आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पालकांना पुस्तक उपयुक्त ठरते आहे, याचीच ही पावती आहे. डॉ. अदिती यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!
-रेणू दांडेकर
(सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक)