द कॉल ऑफ लाइफ
कोपनहेगनच्या बंदराच्या आतील बाजूस असलेल्या मैदानाजवळ व्हेस्टरव्होल्ड नावाचा तुलनेने नवा असलेला रस्ता होता. मात्र तो तसा एकाकी होता. त्या रस्त्यावर थोडीच घरे होती व थोडेच गॅसचे दिवे होते. रस्त्यावर कोणीच माणसे सहसा दिसत नसत. सध्या अगदी उन्हाळ्यातही त्या रस्त्यावर रहदारी तुरळकच होती.
काल संध्याकाळी एक आश्चर्यकारक गोष्ट त्या रस्त्यावर घडली.
मी रस्त्याच्या बाजूने इकडे तिकडे फेऱ्या मारीत असताना विरूद्ध दिशेने माझ्येकडे एक स्त्री आली. रस्त्यावर अन्य कोणीही दृष्टीपथात नव्हते. गॅसचे दिवे लागलेले असूनही रस्त्यावर अंधारच होता. त्या अंधारात त्या स्त्रीचा चेहरा स्पष्ट दिसू शकत नव्हता. रात्रीच्या वेळी नेहमीच रस्त्यावर हिंडणाऱ्यांपैकी ती असावी असा विचार करून मी तिच्या बाजूने पुढे निघून गेलो.
रस्त्याच्या शेवटापर्यंत येऊन मी मागे फिरून चालू लागलो. वाटेत ती परत मला भेटली. ती कोणासाठी तरी थांबली होती असे मला वाटले. ती कोणासाठी थांबली आहे याची मला उत्सुकता लागून राहिली होती. मी पुन्हा एकदा चालताना तिच्या समोरून गेलो. जेव्हा तिसऱ्यांदा ती मला दिसली तेव्हा मी हॅट जराशी काढून तिच्याशी बोललो.
"आपण कोणाची वाट पाहत आहात का?"
ती एकदम दचकली. ती कोणाची तरी वाट पाहत होती. ती ज्याची वाट पाहत होती ती व्यक्ती येईपर्यंत मी तिला सोबत केली तर तिला चालेल का असे विचारावे असा माझ्या मनात विचार आला.
त्याप्रमाणे विचारल्यावर तिने माझे आभार मानले. ती कोणाची तरी वाट पाहत असल्याचे तिने स्पष्ट केले. ती केवळ मोकळ्या हवेत आली होती. रस्त्यावर अगदी सामसूम होती. आम्ही एकमेकांच्या साथीने भटकलो. फारशा महत्त्वाच्या नसलेल्या विषयांवर आम्ही बोलत होतो. बोलता बोलता मी तिचा हात हातात घेण्याची इच्छा व्यक्त केली.
तिने त्याला हरकत घेतली नाही. "धन्यवाद" असे म्हणून तिने मान हलवली. अशा तऱ्हेने चालण्यात काही गंमत नव्हती. मी त्या अंधारात तिला पाहूही शकत नव्हतो. किती वाजले ते पाहण्यासाठी मी काडी शिलगावली. ती पेटती काडी जरा वर धरली आणि तिचा मुखडाही पाहून घेतला.
"साडेनऊ" मी म्हणालो.
थंडीने कुडकुडल्याप्रमाणे ती शहारली. मी ती संधी साधली.
"थंडी वाजतेय का? आपण एखाद्या ठिकाणी जाऊन काही पेय घेऊ या का? ट्रिवोलीत? किंवा नॅशनलमध्ये?" मी विचारले.
"तुम्हांला दिसत नाही का? अशा पेहरावात मी कुठेही जाऊ शकत नाही." ती उत्तरली.
तेव्हा माझ्या प्रथम लक्षात आले की तिने अंगावर फक्त बुरखा चढवला आहे. मी तिची क्षमा मागितली आणि अंधाराला माझ्या चुकीबद्दल दोष दिला. ज्या प्रकारे तिने माझ्या दिलगिरीचा स्वीकार केला त्यावरून नेहमीच्या रात्री फिरणाऱ्या स्त्रियांपैकी ती नव्हती अशी माझी खात्री पटली.
"माझा हात हातात धरला तर तुम्हाला उबदार वाटेल." मी सुचवले.
तिने माझा हात हातात घेतला. आम्ही आणखी काही फेऱ्या मारल्या. थोड्या वेळाने तिने मला परत घड्याळात किती वाजले ते पाहण्यास सांगितले.
"आता दहा वाजले आहेत. तुम्ही कुठे राहता?"
"गॅमल कोंगेवी"
मी तिला थांबवले आणि विचारले, "तुमच्या दारापर्यंत तुम्हांला सोडायला आलो तर चालेल का?"
"नाही...मी तुम्हांला तसं करू देऊ शकत नाही...तुम्ही ब्रेडगेडवर राहता ना?""तुम्हांला कसं माहीत?" मी आश्चर्याने विचारले.
"तुम्ही कोण आहात मला माहीत आहे." ती म्हणाली.
काही क्षण शांततेत गेले. आम्ही परत हातात हात घालून प्रकाशाने उजळलेल्या रस्त्यावरून चालू लागलो. ती भरभर चालत होती. "आपल्याला लवकर गेलं पाहिजे." ती म्हणाली.
गॅमले कोंगेवीवरच्या तिच्या घराच्या दाराशी पोचल्यावर मी तिला सोबत केल्याबद्दल माझे आभार मानण्यासाठी जणू ती मागे वळली असे मला वाटले. मी तिच्यासाठी दरवाजा उघडला. ती हळूच आत शिरली. मी माझा खांदा हळूच त्या दारावर टेकवून तिच्या पाठोपाठ आत शिरलो. आत प्रवेश केल्यावर तिने माझा हात घट्ट धरून ठेवला. आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही.
आम्ही दोन जिने चढून गेलो आणि तिसऱ्या मजल्यावर थांबलो. तिने आपल्या अपार्टमेंटची चावी काढून स्वतःच दार उघडले. नंतर दुसरा दरवाजा उघडून ती मला आत घेऊन गेली. मी बहुधा दिवाणखान्यात होतो. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक मला ऐकू येत होती. एकदा दारातून आत शिरल्यावर क्षणभर थांबून तिने अचानक मला मिठी मारून थरथरत आवेगाने माझ्या मुखाचे चुंबन घेतले.
"तुम्ही बसाल का ?" तिने सुचवले. "इथे सोफा आहे. मी तेवढ्यात दिवे लावून येते."
तिने दिवा लावला. मी माझ्याकडेच आश्चर्यचकित होऊन तरीही कुतूहलाने पाहत होतो. मी बसलो होतो तो दिवाणखाना प्रशस्त आणि फर्निचरने सुसज्ज होता. दुसऱ्या अर्धवट उघडलेल्या दरवाजातून इतर खोल्यांमध्ये उघडणारे अनेक दरवाजे दिसत होते. कोणत्या प्रकारच्या व्यक्तीबरोबर मी इथे येऊन पोचलो आहे ते माझे मलाच कळेना.
"किती सुंदर खोली आहे. तुम्ही इथे राहता का?" मी विचारले.
"होय. हे माझं घर आहे." तिने उत्तर दिले.
"हे खरोखरच तुमचं घर आहे? तुम्ही तुमच्या पालकांबरोबर इथे राहता का?"
"नाही." असे म्हणून ती हसून म्हणाली, "मी वृद्ध स्त्री आहे. तुम्हांला आता कळेलच!" असे म्हणून तिने आपला बुरखा आणि त्यावरील आच्छादन दूर केले. पहा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं!" असे म्हणून तिने आपले बाहुपाश अधाशासारखे माझ्या गळ्यात टाकले.
ती बावीस-तेवीसची असावी. तिच्या उजव्या हातात तिने अंगठी परिधान केली होती त्यावरून ती विवाहित असावी असे वाटत होते. ती सुंदर होती का? नाही. तिचा रंग पिंगटसर होता आणि तिला भुवया जवळजवळ नव्हत्याच. पण तिचे आयुष्य आनंदाने उतू जाणार होते असे मला वाटले. तिचा चेहरा कमालीचा सुंदर होता.
ती कोण आहे आणि असलाच तर तिचा नवरा कुठे आहे आणि मी बसलो होतो ते घर कोणाचे आहे हे मला तिला विचारायचे होते; पण प्रत्येक वेळी मी बोलण्यासाठी तोंड उघडले की ती माझ्या अंगावर येऊन मला बोलण्याची संधी देत नव्हती आणि मला चौकशी करण्यापासून परावृत्त करत होती.
"माझं नाव एलन" ती म्हणाली. तुम्हाला एखादं ड्रिंक आवडेल का? मी रिंग वाजवली तरी त्याचा कोणाला त्रास होत नाही. तोपर्यंत तुम्ही शयनगृहात जा.”
मी शयनगृहात गेलो. दिवाणखान्यातून येणाऱ्या प्रकाशामुळे तिथे अंधुकसा प्रकाश होता. मी तिथे दोन बेड पाहिले. एलनने घंटी वाजवली आणि वाइन आणण्यास सांगितले. नोकराणीच्या येण्याचा आणि परत जाण्याचा आवाज मी ऐकला. नंतर थोड्याच वेळात एलन बेडरूममध्ये आली. पण ती दारात किंचितशी थबकली. मी तिच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकलो. तोंडाने काहीतरी पुटपुटत ती माझ्याजवळ आली.
हे काल संध्याकाळी घडले. नंतर काय घडले? धीर धरा, पुष्कळ काही घडले.
मी जागा झालो तेव्हा स्वच्छ उजाडत होते. सूर्यप्रकाश पडद्यामधून हळूहळू खोलीत पसरत होता. एलनही जागी झाली आणि तिने माझ्याकडे पाहून स्मित केले. तिचे हात गौरवर्णी आणि मखमलीप्रमाणे मऊ होते. तिचे उरोज खूपच उन्नत होते. मी काहीतरी कुजबुजलो तेव्हा तिने हळूवारपणे चुंबन घेऊन माझे तोंड बंद केले. दिवसाचा प्रकाश हळूहळू वाढत होता.
दोन तासांनी मी उठून उभा राहिलो. एलनही उठली होती. ती आपले कपडे नीट करीत होती. तिने आपले बूट पायात चढवले होते. नंतर मी जे काही अनुभवले ते आजही मला एखाद्या भेसूर स्वप्नासारखेच वाटत आहे. मी तोंड धुण्यासाठी वॉश बेसिनजवळ उभा राहिलो. एलन लगतच्या खोलीत काहीतरी करीत होती. जेव्हा तिने दार उघडले तेव्हा गर्रकन वळून मी आत नजर टाकली. तेव्हा खोलीच्या खिडकीतून एक थंड वाऱ्याचा झोत माझ्या अंगावर आला. खोलीच्या मध्यभागी एका टेबलावर एक प्रेत ठेवलेले दिसले. शवपेटीतील ते प्रेत एका पुरुषाचे होते. प्रेताच्या अंगावर पांढरे कपडे होते. त्याची दाढी करड्या रंगाची होती. खालच्या कापडातून वेड्यासारख्या मुठी आवळल्यासारखे ते शव दिसत होते. त्याचा चेहरा फिक्का पिवळट आणि भयानक दिसत होता. स्वच्छ सूर्यप्रकाशात मला हे सर्व दिसत होते. मी तिथून वळलो आणि एक अक्षरही न बोलता निघालो.
जेव्हा एलन आली तेव्हा मी कपडे करून जाण्यासाठी तयार झालो होतो. तिच्या मिठीला प्रतिसाद देणे मला फारच कठीण झाले होते. तिने अंगावर आणखी काही कपडे चढवले होते. मला दारापर्यंत पोचवायला येण्याची तिची इच्छा होती. मी तिला दारापर्यंत येऊ दिले. पण मी काही बोललो नाही. दरवाजापाशी आल्यावर मला दिसणार नाही अशा तऱ्हेने ती भिंतीला टेकून उभी राहिली.
"गुड बाय" ती पुटपुटली.
“उद्या भेटायचं का?” तिची जणू परीक्षा घेण्यासाठी मी विचारले.
"नाही. उद्या नको." ती म्हणाली.
"उद्या का नको?" मी.
“इतके प्रश्न विचारू नकोस. माझा एक नातेवाईक मरण पावला आहे. त्याच्या प्रेतयात्रेला मला जायचे आहे. आता तो इथेच आहे. तुला माहीत आहेच."
"परवा?"
"परवा चालेल. मी इथे या दरवाजापाशीच तुम्हांला भेटेन." ती.
मी तिथून निघालो.
ती कोण होती? भयानक चेहारा असलेले आणि हाताच्या मुठी आवळलेले ते प्रेत कोणाचे होते? परवाच्या दिवशी ती मला भेटणार होती. मी तिला पुन्हा भेटावे का असा मला प्रश्न पडला.
तिथून निघून मी सरळ बर्निना कॅफेमध्ये गेलो आणि तिथे टेलिफोनची डिरेक्टरी घेऊन गॅमल कोंगेवीचा नंबर शोधला. तिथे एक नाव होते. मी सकाळची वृत्तपत्रे येईपर्यत थांबलो. मृत्यूची बातमी देणाऱ्या रकान्यात पाहिले. तिने दिलेली ठळक अक्षरातील बातमी त्यात होती. "दीर्घ आजारानंतर माझा ५३ वर्षे वयाचा नवरा आज मरण पावला." त्या बातमीखाली दोन दिवसांपूर्वीची तारीख होती.
मी कितीतरी वेळ विचार करत तिथेच बसलो...
एक मनुष्य लग्न करतो. त्याची पत्नी त्याच्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असते. त्याला गंभीर स्वरूपाचा आजार होतो. एके दिवशी तो मरून जातो. आणि मग त्याच्या तरुण विधवा सुटकेचा निःश्वास टाकते!
मूळ लेखक : नट हॅमसन
अनुवाद : वासंती फडके
phadkevasanti4236@yahoo.co.in
नट हॅमसन यांचा जन्म नॉर्वेतील लॉम येथे १८५९ साली झाला. त्यांचे बालपण उत्तर नॉर्वेत गेले. तेथील कठोर वास्तववाची पार्श्वभूमी त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्यांना लाभली आहे. हॅमसनला १९२० मध्ये त्यांच्या 'द ग्रोथ ऑफ द सॉइल' या महाकाव्याबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले. औद्योगिक-लोकशाही समाजाबद्दलच्या त्यांच्या वाढत्या तिटकाऱ्यामुळे त्यांना देशावर आक्रमण करणाऱ्या नाझींच्या रांगेत बसवण्यात आले. देश स्वतंत्र झाल्यावर त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. वयाच्या कारणाने ते तुरुंगातून सुटले तरी त्यांची सर्व संपत्ती काढून घेण्यात आली आणि त्यांना जबरदस्तीने ओस्लोमधील सॅनटोरियममध्ये मानसरोग चिकित्सेला सामोरे जावे लागले. तिथून मुक्त झाल्यावर ते आपल्या ग्रिमस्टेड नजीकच्या इस्टेटीवर राहू लागले. १९५२ मध्ये तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
प्रस्तुत कथा 'ग्रेट स्टोरीज बाय नोबेल प्राइझ विनर्स' या संग्रहातून घेतली आहे. या संग्रहाचे संपादक : लिओ हॅमॅलिअन आणि एडमंड एल. वोल्प. प्रकाशक रुपा अँड कंपनी, १९९३.