द लेसबियन - स्वातंत्र्याची बंडखोर कलाकृती

२१ जुलै २०२५

‘द लेसबियन – स्वातंत्र्याची बंडखोर कलाकृती’ या समीक्षात्मक लेखात साहित्य, संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सामाजिक भान असणारी साऱ्याजणीची मैत्रीण आणि संवेदनशील लेखिका शुभांगी दळवी यांच्या कादंबरीचे वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मर्म तपशीलवार उलगडले आहे. मानसी आणि कल्याणी यांच्या समलैंगिक नात्याच्या माध्यमातून कादंबरी लैंगिकतेच्या नैसर्गिकतेचा, स्त्री स्वातंत्र्याचा आणि रूढ सामाजिक चौकटींच्या बंडखोरीचा धीट आवाज बनते. भारतीय समाजात समलिंगी संबंधांविषयी असलेल्या पूर्वग्रह, अपमान आणि अस्वीकार यांना लेखकाने अत्यंत प्रगल्भ आणि मानवी दृष्टीकोनातून उधळून लावले आहे. समलिंगी नात्यांना केवळ कायदेशीरच नव्हे तर सामाजिक आणि नैतिक स्वीकार मिळावा, यासाठी ही कादंबरी एक प्रकारचा वैचारिक हस्तक्षेप ठरते. स्त्रीच्या लैंगिक, भावनिक आणि सामाजिक अस्तित्वाचा सन्मान करणाऱ्या या कलाकृतीतून मानवी स्वातंत्र्याचा आणि समतेचा व्यापक विचार मांडला आहे. ही केवळ एक कादंबरी नाही, तर सुसंस्कृत समाजाच्या दिशेने टाकलेले निर्भीड पाऊल कसे आहे हे उलगडून दाखवणारा हा लेख वाचायला हवा.

मराठी कादंबरी नव्या अनुभूती व नव्या जाणिवेने समृद्ध करण्यासाठी अनेक लेखकांची धडपड चालू आहे, नवे प्रयोगही सिद्ध केले जात आहेत. त्यातील द लेसबियन कादंबरी हा सर्वार्थाने नवा, यशस्वी झालेला कलात्मक प्रयोग आहे. शुभांगी दळवी यांच्या लेखणीतून ही कलात्मक साहित्यकृती जन्माला आली आहे. लैंगिक साक्षरतेला परंपरागत विरोध करून विकृती, अज्ञान व समज गैरसमज जपणाऱ्या भारतीय समाजात नैसर्गिक आनंदाला पारखे राहण्याची वृत्ती कायम आहे. संस्कृतीचा ध्येयवाद सर्वांच्या सर्व सुखाचा असला तरी संस्कृतीच्याच कैवार्यांचा मुळात त्यास आजही कट्टर विरोध आहे; असे काहीसे संघर्षात्मक चित्र आणि चरित्र आपल्या वाट्याला आले आहे. प्राचीन काळापासून कामशास्त्राचा अभ्यास वात्स्यायनाच्या वास्तववादी ज्ञानदृष्टीने समाजाला पुरवला आहे. स्त्री-पुरुष संभोगाची व समलिंगी संबंधांची साक्ष पौराणिक काळातही कायम आहे. 

द लेसबियन कादंबरीत मानसी व कल्याणी दोन्ही स्त्रिया आहेत, म्हणून त्या नायिका. मग नायक कोण? त्यांच्यापैकीच एक नायक मानता येईल का? खलनायक मात्र शशांक आणि अमनला मानता येईल, कारण अमनकडून कल्याणीला धोका मिळालाय आणि लग्नानंतर कल्याणीवर अन्याय केलाय त्यामुळे नवरा म्हणून शशांक सर्वार्थाने कुचकामी असूनही तो पुरुषी अहंकारात बुडालेला आहे. स्त्री वेदना व त्यातून मुक्ती तसेच मानवी रूपात असणाऱ्या स्त्रीचे लैंगिक आनंदही नैसर्गिक असतील तर ते अधिकार सुरक्षित रहावेत हा मुळ हेतू शुभांगी दळवी यांचा आहे. स्त्रीची अनेक रूपे व तिच्या अनेक समस्यांना या कादंबरीत लेखिकेने बोलके केले आहे. स्त्री अत्याचाराच्या अनेक कथांना इथे शब्द रूप मिळाले आहे. खरे तर मानसीची सासू परंपरावादी न दाखवता ती उदारमतवादी असल्याचे शुभांगी दळवी दाखवतात. स्त्रीचे पुरोगामी व्यक्तीमत्व वाचकांनाही भावते. सासूच विधवा सुनेचे पुन्हा लग्न लावण्याचा प्रयत्न करते, पण मानसी तयार नसते. यामध्ये समंजस आणि मित्रत्वाच्या नात्याला समर्थपणे न्याय देऊ पाहत असणारे चिन्मय आणि केतकी हे जोडपेही आले आहे. तसेच दुष्ट प्रवृत्तीचे लोकही समाजात असतात परंतू लेखिकेची दृष्टी सम्यक आहे. दोन्ही प्रवृत्तीच्या स्त्री-पुरुष व्यक्तिरेखा त्यांनी कादंबरीत शब्दबद्ध केल्या आहेत. विशेषता वाईट प्रवृत्तीच्या बायकांचे बोलके चित्र कादंबरीच्या कथानकात आले आहे. पण प्रत्यक्षात अशी विकृत स्त्री व्यक्तिरेखा दाखवलेली नाही. शशांक आणि अमनच्या रूपाने वाईट पुरुषांचे प्रतिनिधित्व कथानकाच्या गाभ्यात आहे. अशी विकृत वाईट स्त्री कादंबरीत का नसावी? समाजात अशा स्त्रिया जरूर आहेत पण कादंबरीत स्त्री अत्याचार व स्त्री वेदना या संबंधानेच आलेली असल्यामुळे शुभांगी दळवी यांना नव्या प्रश्नाच्या संबंधाने मंथन जरुरी वाटल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांनी अशा व्यक्तिरेखांची निवड केलेली आढळते. 

सत्प्रवृत्त पण वेदना भोगणारी गोल्डन ऑंटी जशी त्यांनी उभी केली तशीच सत्प्रवृत्त विधवा मानसीच्या आयुष्यातील पेच कादंबरीत मांडला आहे. स्वतःच्या नैसर्गिक उर्मीचा सन्मान करणारी बिनधास्त कल्याणी श्रीयंत रूपात उभी केली आहे. मानसीच्या मनात समलिंगी संबंधांबद्दल द्वंद्व आहे. तिच्या अंतर्मनातल्या विविध भावना व संकल्पनांच्या संघर्षाचे वर्णन लेखिकेने केले आहे. त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा, वाचक मनावर प्रभावीरित्या उमटणारा आहे. मानसिक संघर्ष हा अंतरंगी वास्तवाचा शोध असतो त्यामुळे ती व्यक्तिरेखा संवादातून जशी उलगडते तशीच ती मानस पातळीवरील चिंतनातून सुद्धा अधिक प्रभावीरीत्या उलगडते. मानसी काही प्रमाणात सुधारणावादी आणि पुरोगामी आहे. तिचे स्वतःचे अस्तित्व अर्थपूर्ण करण्याच्या संदर्भात ती जागरूक आहे. सामाजिक समाजातील बायकांनी तिला व कल्याणीला ताळतंत्र सुटलेल्या व बिघडलेल्या बायका ठरवले असले तरी त्या परंपरावादी जोखडातून मुक्त आहेत. पण तरीही काही संदर्भ तिच्या भूमिकेला परंपरावादी वर्तुळातच अनुभवण्यासाठी कारण ठरतात. दुसऱ्या लग्नाचा विचार करताना तिला अनुराग म्हणजे तिच्या मुलाच्या अस्तित्वाचे भान आहे. हा काही तिचा परंपरा वाद नव्हे, पण कल्याणीच्या संदर्भात लेसबियन म्हणून जगताना तिला लोक काय म्हणतील हा विचार येतो. शिवाय अनुरागला काय वाटेल हा विचार सुद्धा तिला मुक्तपणे जगू देत नाही. हा तिच्या मनातील पेच अत्यंत महत्त्वाचा आहे. तो व्यक्त न करता समलिंगी संबंधांचे चित्रण लेखिकेने केले असते तर ती वरवरची कलाकृती ठरली असती. 

व्यक्तीचित्रणात जिवंतपणा येण्यासाठी आंतर्बाह्य चित्रणाची गरज असते. मानसीच्या मनातील स्त्रीत्वाचा गुंता तिच्या अंतर्मनातील संघर्ष चित्रणातूनच अस्सल चित्र निर्माण करते. तिच्या जीवनाची स्वाभाविकता त्या सचित्रणातून श्रीयंतपणाला जन्म देणारा ठरते. मानसीच्या जीवन प्रवासात शेवटचा बिंदू कल्याणी आहे. पुरुषाशिवाय स्त्रीजीवन अपूर्ण असल्याचा सामाजिक समज या कादंबरीने चूक ठरवलाय कारण त्या समाजाला अन्य पर्याय कादंबरी देते. तो पर्याय समाजाला रुचणारा नाही, पचणारा नाही. पण समलिंगी संबंधाच्या मुद्द्यावर लेखिकेच्या बुद्धीवादाला तोच पर्याय योग्य वाटतो. मानसीच्या जीवनात आनंदाचा पर्याय दिवाकर नसून कल्याणीच असल्याचा निर्वाळा ही कादंबरी देते. 

स्त्रीला विधायक पर्याय स्त्री कशी असू शकेल? पुरातन काळापासून समाजमनात ठराविक संस्कार रुजले आहेत. पुरुषच तिचा खरा जोडीदार आणि समर्थ पर्याय असून स्त्री-पुरुष संबंधच नैसर्गिक सुखाचे, आनंदाचे आणि एकमेव मार्ग म्हणून त्याच संबंधांचा गौरव सर्व समाज माध्यमातून आजपर्यंत केला गेला आहे. कायदा, कला, तत्त्वज्ञान, धर्म या संस्कृतींच्या सर्व घटकातून स्त्री पुरुष संबंधच गौरवले गेले आहेत. त्यातही प्रौढ विवाहित स्त्रीला संपूर्ण संबंधांनाच समाज मान्यता मिळते. अविवाहितांना संभोग प्रक्रियेची मान्यता नाही. तृतीयपंथी स्त्री-पुरुष, स्त्री-स्त्री व पुरुष-पुरुष, किंवा स्त्री पुरुष व प्राणी यांच्या लैंगिक संबंधांना अनैसर्गिक ठरवून, त्यांना समाजाने मान्यता नाकारली. सबब नाकारलेल्या लैंगिक संबंधांना सुखाचा व आनंदाचा विचार निषेधार्थ ठरला आहे. 

पण जे निसर्गाला मान्य आहे ते संस्कृतीला मान्य का नसावे? प्रत्येक जीवाची प्रकृती व प्रवृत्ती निसर्गाचीच निर्मिती असते तर सहज स्वाभाविक भावना लैंगिक उर्मिंना जन्म देणारच आणि आपसातील संबंधांचे स्वातंत्र्य नैसर्गिकरित्या भोगून, त्यात आनंद मिळवण्याचा प्रत्येकालाच अधिकार असणार. पण नैसर्गिक अधिकारांचा लाभ फक्त मर्यादित लोकांपुरता राखून ठेवण्याचा स्वार्थ संस्कृतीच्या ठेकेदारांनी जपला आहे. त्याचे नियम बनवले, कायदे बनवले, धर्म आणि संस्कृती त्या कायद्यावरच उभी करून संरक्षित केली. त्यामुळे तृतीयपंथीयांवर, लेसबियन किंवा गे संबंधांवर बंधने घालून अन्याय केला गेल्याचे दिसते. संस्कृतीच्या पावित्र्याचे निमित्त करून अशा लैंगिक संबंधांना बाद ठरवून, गुन्हा ठरवून ते लोक गुन्हेगार ठरवले गेले. त्यामुळे बहुतांशी लोकमत याच जाणीवने प्रभावित होऊन संस्कारीत झाले. 

द लेस्बिअन या कादंबरीच्या नायिका, मानसी व कल्याणी अशाच परंपरागत संस्कारात वाढल्या आहेत. मग मानसीच्या तुलनेत कल्याणीच कशी बंडखोर? तिच्या आयुष्यात शशांक हा नपुसंक पुरुष नवरा म्हणून आल्याने, त्याचा लैंगिक अनुभव सुखाचा ठरण्याची शक्यताच मावळली आणि लग्नापूर्वीच अमन या मित्राने विश्वासघाताने संभोग केल्याने त्या संबंधांची तृप्ती व आनंद कल्याणी घेऊ शकले नाही. म्हणूनच स्नेहबंधातून कल्याणी मानसीकडे आकर्षित झाल्याचे दिसते. परंतु पुरुष संबंध संभोगातून जी तृप्ती व समाधान स्त्रीला मिळते ते एका स्त्रीच्या सहवासातून मिळेल का? मानसीच्या संबंधात कल्याणी सुखी आहे परंतु दोन्ही प्रकारच्या शरीर संबंधातून आनंद आणि समाधान मिळणे नैसर्गिक असल्याचे सत्य या कादंबरीतून प्रतित होते. म्हणूनच मानसी प्रारंभी कल्याणीचा चुंबनामुळे तिचा तिरस्कार करत असली तरी तिच्या सहवासाची गोडी तिला अधिक आहे. त्यामुळे निसर्ग प्रेरणा आणि भावनेपुढे मानसी सुद्धा जाऊ शकत नाही. वास्तविक पतीच्या सहवासाचा सुखद अनुभव मानसिक मानसीच्या गाठी आहे. त्यातूनच अनुरागचा जन्मही झाला आहे. अशा प्रसंगी कल्याणीच्या सहवासाची ओढ तिला वाटणे हे समलिंगी लैंगिक संबंध निर्माण होण्याचे घटक सूत्र इथे दिसते. समलिंगी महिलांचे लैंगिक संबंध वंशवृद्धीसाठी वांझ ठरतात. हे माननीय असूनही कल्याणीशी ती संबंध स्वीकारते आणि दिवाकरचे आलेले लग्नासाठीचे प्रपोजल ती नाकारते हा कुठेतरी पुरुष प्रेमाचा अपमान आहे का? कादंबरीतील मानसी आणि कल्याणी यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या अनुभवातून एकमेकींच्या सहवासातून निर्माण झालेले हे समलिंगी प्रेम हे निसर्गतः जन्माला आले आहे. 

म्हणूनच निसर्ग किमया समजून घेऊन विधायकतेनेच मानवी समाजाने त्यांची लैंगिक, आर्थिक, सामाजिक सोय लावली पाहिजे यालाच सुसंस्कृत समाज म्हणता येईल. लैंगिक भावनांची सोय न लावणाऱ्या समाजात मग अनेक स्फोट होत राहतात. कुमारी मातेचे व विधवा मातेचे मातृत्व आणि आता यापुढे समलिंगी संबंधातील कायदेशीर पद्धतीने स्वीकारले जाणारे मातृत्व वंदनीय मानणारा प्रगत समाज जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत स्त्रियांना अन्याय अत्याचाराला सामोरे जावेच लागेल. समाजाच्या सामूहिक शहाणपणातून कायदा निर्मिती होत राहील. आजही समलिंगी संबंध कायद्याने मान्य पण समाज नीतीला अमान्य आहेत. नीती आणि कायद्यामधील असे संघर्ष, स्वीकार, संस्कृती दुटप्पीपणाने मिळवत राहते. त्यामुळे अनेक समाज घटकांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी लैंगिक स्वातंत्र्यासाठी समाजाच्या प्रभल्भतेची प्रतीक्षा करावी लागते ही शोकांतिका आहे. साधारणपणे आपल्या समाजात स्त्री-पुरुषांप्रमाणेच समलिंगी पुरुषांप्रमाणेच तृतीयपंथी ही निसर्गाची निर्मिती असूनही त्यांच्यावर सर्वात जास्त उपेक्षा, अन्याय सुसंस्कृत समाजाने केलेला दिसतो. जनावरांइतकेच वाईट जीवन त्यांना जगावे लागते. अशा निसर्ग निर्मितीला "अबनॉर्मल" समजून तिरस्काराची परंपरा समाज जोपासत असतो. 

किन्नर योनी उपाहासाची मांडली जाते तरीसुद्धा रामायणाचा प्रारंभ हे तुलसीदासांनी किन्नर वंदना लिहून आशीर्वाद घेतल्याचे दिसते. महादेवाला अर्धनारी नटेश्वर मानले जाते. आज किन्नर समाजाची लक्ष्मी त्रिपाठी, गौरी सावंत, दिशापिंकी शेख आणि इतर अनेक जणी आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थपणे नेतृत्व करीत आहेत. निसर्गाच्या विचित्र निर्मितीला समजून घेण्यात कधीकधी मानवी शहाणपण कमी पडते. म्हणूनच महिलांच्या समलिंगी संबंधाला अनेक देशात मान्यता नाही. आपल्या देशातही कायद्याने मान्यता मिळाली पण अजूनही समाज तेवढ्या मोकळेपणाने हे संबंध स्वीकारत नाही. निसर्गाने दिलेले हक्क मानवी समाज का नाकारतो? संस्कृती शुद्धतेच्या नावाखाली माणूस पक्षपातीपणा का करतो? इतर सामान्य स्त्री पुरुषांना समाजात स्थान मिळते तर समलिंगी किंवा इतरत्र पणती व्यक्तींना ते स्थान का मिळू नये? या व्यक्तींनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही का? यांना यांचा स्वतःचा आनंद शोधण्याचा अधिकार नाही का? असे अनेक प्रश्न ही कादंबरी वाचकांसमोर उभे करते. 

या कादंबरीच्या निमित्ताने समलिंगी संबंध, लिव्हइन रिलेशनशिप, आधुनिक जगात होत असणारे वैवाहिक संबंधांमधले बदल अशा अनेक प्रश्नांवर प्रगल्भ चिंतन सुत्रांची लेखिकेने सहज केलेली पेरणी लक्ष वेधून घेणारी आहे. कादंबरीत गोवा आणि ख्रिश्चन संस्कृतीचे अर्थपूर्ण अस्तित्व हिंदूंच्या सहवासात दाखवून सांस्कृतिक संवाद व एकात्मतेचा उदात्त हेतू सिद्धीस गेलेला आहे. स्त्रीच स्त्रीच्या ऱ्हासाला कशी कारण ठरते हे सत्य हे लेखिका कादंबरीत मांडते. मानसीचा मुलगा अनुराग परदेशात शिक्षणासाठी गेल्यानंतर मार्टिना नावाच्या मैत्रिणीमुळे त्याच्या विचारात आणखी प्रगल्भता येते आणि माणसा-माणसातील प्रगल्भ नात्याची ही विण महत्त्वाची ठरते. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय व आंतरधर्मीय प्रेमाचे हे सूत्र या कादंबरीत कलात्मकतेची भर घालते. पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीचा मिलाफ आणि सौदार्य आदर्श समाजाचे दर्शन घडवते. संस्कृती आणि निसर्गाचा अंतरंगी गुंता सोडवणारी ही कादंबरी सर्वार्थाने शुद्ध प्रबोधन करणारी श्रेष्ठ कलाकृती आहे असे वाटते. या कलाकृतीने मराठी कादंबरीची कोंडी फोडून नव्या दिशा अधोरेखित केल्याचे दिसते. मानवता सर्व संदर्भानेच, सर्व पातळीवर सुखी व्हावी म्हणून हा नात्यांच्या कलात्मकतेचा सोहळा लेखिकेने सजविला आहे. यात लैंगिक संबंधांचा सोहळा निर्णायक असल्याचे सत्य विलोभनीय आहे. या निमित्ताने लेखिका शुभांगी दळवी यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.