फाळणीचे धागे : १९४७ ते १९८४ ते २००२
उर्वशी बुटालिया ‘द अदर साइड ऑफ सायलेंस’ (१९९८) या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकात दिल्लीतील १९८४ च्या शीखविरोधी हत्याकांडानंतर त्यांच्यासाठी फाळणी कशी जिवंत झाली याची आठवण करून देतात. शीख हत्याकांडानंतर त्या निर्वासित शिबिरांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत असताना अनेकदा ‘हे पुन्हा फाळणीसारखेच आहे' असे वृद्ध लोकांना बोलताना त्यांनी ऐकले. त्या लिहितात, "आपल्या आयुष्यात फाळणी सतत कशी जिवंत होती हे मला १९८४ च्या हत्याकांडानंतर समजलं, इतिहासाच्या पुस्तकात सहजपणे टाकण्यासारखी ही घटना नाही हे लक्षात आलं. हा एका वेगळ्या काळातील दुसऱ्या कोणाचा इतिहास आहे असं स्वतःला भासवणं मला अशक्य झालं." बुटालिया यांचे काम प्रकाशित झाल्यापासून सुमारे दोन दशकांपासून फाळणीतील मानवी दुःखाचे मोठ्या प्रमाणावर दस्तावेजीकरण केले गेले आहे. फाळणीच्या घटनेचा संपूर्ण अर्थ लावण्यासाठी फाळणीतील क्रूर हिंसा, हानी आणि विस्थापन या मानवी अनुभवांचा शोध घेण्यासाठी तरुण अभ्यासकांची एक संपूर्ण पिढी प्रेरित झाली होती. फाळणी ही केवळ नेहरू, जिना आणि माउंटबॅटन या उच्चभ्रू नेत्यांमधील राजकीय निर्णयांचा आणि संभ्रमांचा घटनाक्रम नाही ही बाब मौखिक इतिहास आणि ज्यांचे जीवन उच्चस्तरीय राजकारणामुळे हिंसकपणे विस्कळीत झाले होते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना यांच्याद्वारे अधोरेखित झालेली आहे. वैयक्तिक पातळीवर झालेले आघात फाळणीच्या इतिहासाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न आता अकादमिक क्षेत्रात आणि सार्वजनिक क्षेत्रात एक अफाट लोकप्रिय प्रकल्प बनला आहे. कॅलिफोर्निया मधील '१९४७ फाळणीचे संग्रहीकरण' आणि अमृतसरमधील 'फाळणी संग्रहालय' ही फाळणीच्या आठवणी आणि वस्तू यांचे एकत्रीकरण आणि प्रदर्शनाद्वारे फाळणीचे स्मरण करणाऱ्या प्रकल्पांची उदाहरणे आहेत. हे स्मरण प्रकल्प स्तुत्य आहेत. हे प्रकल्प अपक्षपाती आहेत हे अधोरेखित करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रकल्पांना 'बिगर राजकीय' म्हणून ‘फाळणीची मानवी बाजू’ ह्या लोकप्रिय नामाभिधानाखाली प्रसिद्ध केले जाते.
परंतु असे असले तरीही अशा प्रकारच्या स्मरण प्रकल्पातील मानवी दु:खाच्या वाढत्या बिगर-राजकीय धारणेत काहीतरी खोलवर अस्वस्थ करणारे आहे. आणि जेव्हा स्मरण करीत असलेला भूतकाळ हा वर्तमानापासून अलिप्त असतो तेव्हा ही अस्वस्थता प्रकर्षाने जाणवते. फाळणीला आठवण्याची आणि स्मृतीत जतन करण्याची इच्छा/आपल्याला अपरिहार्यपणे अमेरिका, जपान आणि इस्त्रायलमधील स्मरण प्रकल्पांची आठवण करून देते. न्यूयॉर्कमधील ९/११ स्मारक, हिरोशिमा शांती स्मारक आणि जेरुसलेममधील याद वाशेम ही सामूहिक हिंसाचाराने घडवलेल्या मानवी शोकांतिकांची सार्वजनिक स्मरणातील काही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. या स्मरण प्रकल्पांमागील कल्पना केवळ मृतांचा सन्मान करणे, जुन्या जखमा भरणे आणि दबलेल्यांना आवाज देणे ही नाही, तर भविष्यातील पिढ्यांना धोक्याचा इशारा देणे आणि मानव किती मोठा विनाश घडवू शकतो याची आठवण करून देणे हीदेखील आहे. थोडक्यात, एखाद्या गोष्टीचे स्मरण ठेवणे किंवा विसरणे, त्याविषयी सार्वजनिकपणे बोलणे किंवा गप्प राहणे ह्या नेहमीच गंभीर राजकीय कृती असतात.
तथापि, आतापर्यंत नोंदल्या झालेल्या शेकडो व्यक्तिगत स्वरूपाच्या शोकांतिकांकडे आपण पाहिले तर असे लक्षात येते की मानवी दुःखाच्या या तीव्र, परिणामकारक पण काहीशा सुलभ कथनामुळे फाळणीच्या राजकारणामधील गुंतागुंत दबली गेली आहे. ह्या प्रकल्पातील 'व्यक्ती' स्वतंत्र असून ती राजकीय क्षेत्रापासून तुटलेली आहे. ‘राजकारण’ हा शब्द सामान्यपणे नापसंतीने वापरला जातो आणि राजकारणाचे आकलन राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या नेत्यांद्वारे केल्या जाणाऱ्या वाटाघाटीपर्यंतच मर्यादित असते. वैयक्तिक आणि सामूहिक वाटाघाटी, मर्यादांचे उल्लंघन आणि गुंतागुंतीच्या सामाजिक संबंधात रुतलेल्या दैनंदिन आयुष्यातील तडजोडी हेदेखील राजकारणच आहे हे लक्षात घेतले जात नाही. म्हणूनच अधिकाधिक स्मारकांमध्ये आपल्याला भेटणाऱ्या व्यक्ती ह्या परिस्थितीच्या निष्क्रिय (passive) बळी ठरलेल्या असतात. घडलेल्या घटनांमध्ये त्या स्वेच्छेने सहभागी झालेल्या नसतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा स्मरणाचा प्रकल्प चिकित्सक इतिहासाच्या प्रकल्पापेक्षा वरचढ ठरतो तेव्हा गुंतागुंत आणि विरोधाभास यांचा अवकाश हळूहळू पुसून टाकला जातो.
एखाद्या सार्वजनिक स्मरणाच्या कामातून विशिष्ट इतिहासाचे पुनरुत्थान कशा प्रकारे केले जाते या प्रश्नात मला रस आहे. मानवी दुःखाच्या स्मरणाचे (जे स्मरण बिगर राजकीय अवकाशात आकारास आलेले आहे) दैनंदिन जीवनातील गुंतागुंतीपासून कसे अलगीकरण होते हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे. यात कुणी असा युक्तिवाद करू शकतो की स्मरणाचा उद्देशच दु:खाला एक मूल्य म्हणून मान्यता देणे, बळी गेलेल्या लोकांच्या जखमांची आठवण ठेवणे हा आहे आणि त्यामुळे स्मरण ठेवणे हा मुद्दा वादातीत आहे. फाळणीच्या इतिहासाच्या संदर्भात एक लक्षणीय बाब अशी आहे की अद्याप आपण या निर्णायक क्षणाचा संपूर्ण अन्वयार्थ उलगडू शकलेलो नाही. मात्र फाळणीच्या जखमा आणि दुःख हे केवळ सार्वजनिकरीत्या मान्य केले जात नाही तर त्याचे स्मरणही केले जाते. यात काही मुख्य ट्रेंड्स दिसतात.
एक म्हणजे, फाळणीच्या स्मरणामुळे फाळणी ही गोष्ट एकमेव, अनन्य अशी होते. इतर सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांपेक्षा ती वेगळी मानली जाते. फाळणीमधील हिंसाचाराचे प्रमाण आणि भारत-पाकिस्तानला ब्रिटिश वसाहतीच्या राजवटीपासून मिळालेल्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी यामुळे फाळणीला वेगळे महत्व नक्कीच आहे. तरीही त्यातील संघटित सामूहिक हत्या, लैंगिक हिंसा आणि मालमत्तेच्या नुकसानीच्या कथा ओळखीच्या वाटतात. फाळणीला एक असामान्य घटना म्हणून अधोरेखित करण्याचा हा ध्यास होलोकॉस्टला जगातील इतर मानवी हिंसाचाराच्या घटनांपासून वेगळे ठरवण्याच्या चर्चांची आठवण करून देतो. प्रत्येक ऐतिहासिक घटनेला एक विशिष्ट संदर्भ असतो आणि त्याप्रकारे ती निश्चितच वेगळी असते. परंतु, सामूहिक अस्मितांच्या एकत्रीकरणासाठी ह्या घटनांच्या विशिष्टतेचे दावे आवश्यक असतात.
फाळणीच्या वेगळेपणाची ही संभाषिते कोणते कार्य करतात? प्रथमतः ती फाळणीला स्वातंत्र्योत्तर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामूहिक हिंसाचाराच्या इतर घटनांपासून सहजपणे वेगळे करतात. उदाहरणार्थ- दिल्ली १९८४, गुजरात २००२, मुझफ्फरनगर २०१३ मधील हिंसाचार. खरे तर १८८४ मधील हिंसाचाराने फाळणीतील हिंसाचाराकडे लक्ष वेधले या पार्श्वभूमीवर फाळणीतील हिंसाचाराला इतर सामूहिक हिंसाचाराच्या घटनांपासून वेगळे काढणे हा मोठा विरोधाभास आहे. तरी फाळणीच्या स्मरणाचा प्रकल्प त्याविषयी मौन असतो आणि तो १९४७ आणि २०१३ यांच्यामधले बिंदू जोडत नाही.
या मौनाची दोन संभाव्य कारणे असू शकतात. पहिले म्हणजे १९४७ च्या मानवी दुःखाचे धागे १९८४, २००२ आणि २०१३ च्या मानवी दुःखाशी जोडणे म्हणजे फाळणीच्या हिंसेचे मूळचे राजकीय आणि वादग्रस्त स्वरूप मान्य करणे होय. या स्वरूपात राजकीय संरक्षण, पोलिसांचा सहभाग, संघटितरित्या हिंसा घडवणारे गट, सभ्य म्हणून गणल्या गेलेल्या लोकांनी या क्रौर्याकडे केलेले दुर्लक्ष, न्याय मिळण्यात होणारा विलंब अशा अनेक गोष्टी येतात. त्यातून मानवी दुःखावरील ‘बिगर राजकीय’ आवरण देखील गळून पडेल. आणि अखेरीस हा फाळणीमधील हिंसाचार म्हणजे मानवी मूर्खपणा नसून राज्ययंत्रणेचे आपल्या प्रजेचे संरक्षण करण्यात आलेले अपयश आहे हे उघड होईल. फाळणीला इतिहासाच्या पुस्तकातून बाहेर आणण्यासाठी स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक ठरेल. कारण सर्व हिंसा परस्परोद्भवी किंवा समान वजनाची नसते.
दुसरे कारण म्हणजे, फाळणीचे स्मरण आपल्याला सामूहिक हिंसाचाराच्या सध्याच्या घटनांपासून आपला राग आणि निराशा यांना एकत्रितपणे विचलित करते. फाळणीच्या कथांमुळे १९८४ किंवा २००२ च्या हिंसाचाराला लक्षात न घेता आपण सामूहिक हिंसाचाराचा भयानकपणा सार्वजनिक चर्चाविश्वात मांडू शकतो. आज सुमारे सात दशकांनंतर, फाळणी हे एक सुरक्षित क्षेत्र बनले आहे. तिथे सामूहिक हत्या आणि बलात्कारांची दाहकता प्रतिरोधाशिवाय मोठ्याने व्यक्त केली जाऊ शकते. त्यामुळे कदाचित फाळणी इतर हिंसाचाराच्या घटनांपासून वेगळी ठरते.
बुटलिया यांनी सुरुवातीला सुचवल्याप्रमाणे, फाळणीच्या स्मरणाचा प्रकल्पाला फाळणीचे दस्तावेज, नोंदी आणि त्याविषयी बोलणे ह्याद्वारे पुढे नेले जाऊ शकते. एकदा का आपण फाळणीच्या स्मरण प्रकल्पांना त्यांच्या ऐतिहासिक विशिष्टतेपासून वेगळे केले की आपल्याकडे उरते ती फक्त आपल्या काळाविषयी बोलणारी क्रूर हिंसा आणि हानी!
रविंदर कौर
अनुवाद : मधुरा जोशी
(रविंदर कौर हे Since 1947 : Partition narratives among the Punjabi migrants of Delhi - Oxford University Press, 2007 या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रस्तुत लेख 'द वायर' या संकेतस्थळावर १५ ऑगस्ट २०१६ रोजी प्रकाशित झाला होता. १४ ऑगस्ट २०२१ रोजी तो याच संकेतस्थळावर पुनःप्रकाशित करण्यात आला.)