उपेक्षितांची अन्नपूर्णा : उज्ज्वला बागवाडे

सध्या टीव्हीवर ’आई कुठे काय करते’ ही मालिका चालू आहे त्यात आपल्या मुलाबाळांमध्ये, सासू-सासरा, नवरा, संसार यात रमलेल्या स्त्रीची वयाच्या पन्नासाव्या वर्षी स्वत:चे अस्तित्व शोधण्यासाठीची धडपड दाखवलेली आहे. मालिकेतील अशी लग्न झाल्यापासून आपली मुलं, परिवार, नातेसंबंध, नवरा यांच्यात गुंतून पडलेली आई, या ना त्या फरकाने आपण प्रत्येकाने आपल्या घरात पाहिली आहे. आपल्या आईने तिच्या आधी आपली काळजी करावी, आपल्यासाठी तिने सदोदिीत हजर राहावं अशी अपेक्ा देखील आपल्या शालेय वयात आपण मनात बाळगल्या आहेत. समाजातल्या अनेक घरांमधील बायका, आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा शोध घेणं थांबवून कुटुंबामध्ये रममाण होतात. पण, काही जणी मात्र घरातली सर्व जबाबदारी सांभाळून, आपल्यातील कार्यक्षमतेला न्याय देण्यासाठी बाहेर पडतात आणि असे काहीतरी दिव्य घडवून आणतात ज्याने केवळ आपल्याच नाही, तर समाजातल्या इतर अनेकांसाठी त्या आदर्श ठरतात.

या अशाच धाडसी आणि महत्त्वाकांक्षी महिलांपैकी एक म्हणजे ठाण्याच्या उज्ज्वला बागवाडे. उज्ज्वलाताईंचे बालपण गिरगावच्या चाळीत गेलं. चाळ म्हणलं की, तिथे शेजारधर्म अगदी सढळ हाताने निभावला जायचा. अडीअडचणीला मोकळेपणाने एकमेकांना मदत करणे, घरात बनवलेला एखादा खास पदार्थ अगदी सहजपणे चाळीतल्या प्रत्येक घरात पोहचता होणं, दार बंद करून राहण्याची सवयच नसल्यामुळे घर हे केवळ घरात राहणाऱ्या तीन-चार माणसांनी बनत नाही तर चाळीत ३०- ४० बिऱ्हाडं म्हणजे एक घर असतं अशा शिकवणीतून त्या मोठ्या झाल्या. समाजकार्याची, लोकांना मदत करण्याची सवय त्यांना पहिल्यापासूनच होती.

लग्न झाल्यानंतर संसाराच्या जबाबदाऱ्या निगुतीनं सांभाळत असताना, केवळ संसारामध्येच अडकून पडणे त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे, घरातील जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून त्या विविध सामाजिक संस्थांना भेटी देत, त्यांच्या लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये यथाशक्ती सामील होतं. एक दिवशी सकाळी फेरफटका मारत असताना ठाणे परिसरात त्यांना एक मुलगी रस्त्यावर उभी असलेली दिसली, कपड्यांवरून ती चांगल्या घरची असावी असं वाटतं होतं. त्यांनी तिच्याशी बोलण्याच्या प्रयत्न केला आणि मिळालेल्या उत्तरांमधून तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगाबद्दल त्यांना समजलं. या अशा तरुण मुलीला रस्त्यात एकटीला टाकून जाणं शक्यच नव्हतं. त्यांनी तिला खाण्यासाठी दोन बिस्किटचे पुडे दिले, आणि रात्रभर उपाशी असणाऱ्या त्या मुलीने एक पुडा स्वत:कडे ठेवून दुसरा त्या भागातील इतर रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना द्यायला सांगितला. तिच्या ज्या सहजपणे दुसऱ्या मुलांना घासातला घास काढून दिला त्याने उज्ज्वलाताई हरखून गेल्या. आणि तेव्हा त्यांनी एक गोष्ट मनाशी बांधली ती म्हणजे, ‘समाजकार्य करण्यासाठी, दुसऱ्याला मदत करण्यासाठी प्रत्येक वेळेस काहीतरी, मोठं अचाट, आपल्या संसारावर पाणी सोडून काही करण्याची गरज नसते. अगदी छोट्या मदतीने देखील एखाद्याचे आयुष्य उभं राहू शकतं, त्याचं पोट भरू शकतं’.

त्यांनी डॉ. भरत वाटवानी यांच्या श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर या रस्त्यावरती भटकणाऱ्या मनोरुग्णांचे पुर्नवसन करणाऱ्या संस्थेमध्ये फोन केला. आणि त्या मुलीला त्यांनी सुरक्षित जागी पोचवले. काही महिन्यांनी ती मुलगी बरी होऊन जेव्हा तिच्या गावी परत गेली तेव्हा संपूर्ण गाव तिला भेटण्यासाठी आणि ताईंचे धन्यवाद करण्यासाठी वेशीवर उभे होते!

आपण केलेल्या एका छोट्या मदतीने एका मुलीचे आयुष्य पुन्हा रूळावर आले या विचाराने ताईंना आणखी हुरूप आला आणि मग काहीतरी स्थिरस्थायी स्वरूपाची मदत आपल्याला समाजाला करायची आहे, या विचाराने त्या झपाटून गेल्या.

त्यानंतर काही महिन्यांनी एका मासिकात त्यांनी बीडमध्ये उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि निवासाठी काम करणाऱ्या शांतिवन या संस्थेविषयी वाचलं. आपण या संस्थेला भेट द्यायला हवी या विचाराने आजवर कधीही मुंबई बाहेर न पडलेल्या उज्ज्वला ताई बीडला एकट्या जाऊन पोहचल्या, तिथलं काम, मुलांवर होणारे संस्कार, त्यांना शिक्षण मिळावं म्हणून धडपडणारी मंडळी त्यांनी बघितली आणि तिथून परत आल्या ते ‘धान्य बॅंक’ उघडण्याचे स्वप्न उराशी बाळगूनच.

२०१५ साली उज्ज्वल ताईंनी आपल्या काही खास मैत्रिणींना घरी बोलावलं. आपल्या समाजामध्ये अनेक अशा सामाजिक संस्था आहेत ज्या पोटतिडिकीने समाजासाठी काम करत आहेत. अशा संस्थांना जिथे निवासी विद्यार्थी, महीला आहेत त्यांना आपण धान्य पुरवूया म्हणजे दररोजच्या जेवणाची सोय कशी करायची या प्रश्नांतून ते मुक्त होतील आणि त्यांच्या मूळ कामावर त्यांना अधिक लक्ष देता येईल.

मैत्रिणींना अर्थातच संकल्पना आवडली, आपली घरची जबबादारी, संसार सांभाळून हे काम करता येणार होतं त्यामुळे मैत्रिणी तयार झाल्या आणि ’वी टूगेदर’ या नावाने संस्थेची स्थापना करण्यात आली. आलेल्या बारा जणींनी किमान दहा धान्यदाते शोधायचे असं ठरलं. सुरुवातीच्या काळात धान्यदाते त्यांच्या कुवतीनुसार धान्य द्यायचे, ज्यावेळेस त्यांनी संस्थेचे काम पाहिलं, त्यातील पारदर्शिपणा त्यांना भावला तेव्हा त्यांनी पैसे देण्यास सुरुवात केली. कामातील सच्चेपणा आणि स्वयंसेविकांच्या झोकून देऊन काम करण्याच्या स्वभावामुळे तीन वर्षामध्येच संस्था नावारूपाला आली आणि लोक सढळ हाताने मदत करू लागले. २०१८ साली कागदोपत्री उज्ज्वला ताईंनी ’वी टूगेटर’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. आतापर्यंत या संस्थेने महाराष्ट्रातल्या नऊ संस्थांना दत्तक घेतलं आहे.

दत्तक घेतलं आहे म्हणजे नेमकं काय केलं आहे?

वी टूगेटर ही संस्था या नऊ संस्थांना सहा महिन्याचे किराणा सामान भरून देते. पारदर्शी काम करण्याचा मानस असल्यामुले किराणा सामान भरून देताना कुठेही प्रत्यक्ष पैशाचा व्यवहार केला जात नाही. संस्था ज्या दुकानदाराकडून किराणा सामान भरणार असतील त्या दुकानदाराच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात आणि संस्था तेवढ्या पैशाचा किराणा भरून घेऊन जाते.

धान्यदाते कशाप्रकारे मदत करू शकतात?

संस्थकडे जवळपास २५०० हून अधिक धान्य दाते आहेत. समाजातील कोणीही दरवर्षी १२०० किंवा ७०० रुपये देऊन संस्थेला मदत करू शकतो. हे पैसे देखील कोठेही रोख स्वरूपात घेतले जात नाहीत. धान्यदाता संस्थेच्या बॅंके खात्यात चेकने किंवा ऑनलाईन पैसे भरतो. दरमहा शंभर रुपये देऊन आपल्याला संस्थेच्या अमूल्य कामात मदत करता येते. दहा किलोच्या वर धान्य दाता देण्यास तयार असेल, तर संस्था धान्य देखील स्वीकारते आणि ज्या दत्तक संस्थेपैकी जिकडे गरज आहे तिकडे पोचवते. ’वी टूगेदर’ने काही स्थानिक संस्थादेखील दत्तक घेतल्या आहेत. ज्यांना त्यांच्या गरजेनुसार धान्य बॅंक मदत करते.

संस्थेचा विस्तार आणि प्रचार

प्रत्येक शहरातच नव्हे, तर प्रत्येक गावात धान्य बॅंक असायला हवी, असा संस्थेचा आग्रह आहे. दरवर्षी महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यातून स्वयंसेवी दाते संस्थेला मदत पाठवत असतात. अमेरिका, स्कॉटलंडसारख्या देशात राहणाऱ्या भारतीयांकडून देखील संस्थेला मदत येत असते. या वर्षी चिपळूणला पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेने ब्रेकफास्ट आणि जेवणाचे किटस्‍ पाठवले होते तर सांगली आणि कोल्हापूर ला आलेल्या पुराच्या वेळेस तिथल्या लोकांसाठी अन्नछावणी उघडली होती.

कोविड काळातील संस्थेचे योगदान

कोविडच्या काळामध्ये देखील संस्थेने जवळजवळ १४,००० किलो धान्यदान केलं. खरंतर संस्था केवळ इतर सामाजिक संस्थांनाच धान्यासाठी मदत करत असते. पण कोविडसारख्या समस्येमध्ये संस्थेने हा निकष बाजूला ठेऊन सढळ हाताने गरजूंना मदत केली. या काळात कोणत्याही गृहिणींना बाहेर पडता येणे शक्य नव्हते, त्यामुळे लोकल दुकानदाराची मदत घेऊन त्यांनी अन्नधान्य किट्स बनवले. हे किट्स गरजूंपर्यंत पोहचवण्याचे काम मात्र ठाण्यातील समर्थ व्यासपीठ आणि एका संस्थेने केले. कोरोना काळात कसारा भागतील आदिवासी पाडे, घाटकोपर येथे देहविक्री करणाऱ्या महिला, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी जातीजमातींपर्यंत धान्याची सोय संस्थेने पोचती केली होती.

दत्तक घेण्यासाठी एखादी संस्था कशी निवडता या प्रश्नाचे उत्तर देताना ताई म्हणाल्या की, जशी संस्था जुनी होत जाते तशी तिची मदत करण्याची क्षमता वाढत जाणं महत्त्वाचं असतं. ती क्षमता ज्यांची वाढताना दिसते त्यांना आम्ही मदत करतो. शिवाय, अशा संस्थांची माहिती देणाऱ्या काही संस्था, त्यांच्या कागदपत्राची शहानिशा करून मगच संस्था मदतीसाठी निवडली जाते.

सध्या मुंबई व्यतिरिक्त चिपळूण आणि नाशिकमध्ये संस्थेच्या शाखा आहेत. महाराष्ट्रभरात प्रत्येक शहर आणि गावामध्ये एखादी तरी धान्य बॅंक असावी असा संस्थेचा मानस आहे. अन्न हे आपल्या मूलभूत गरजांपैकी एक असल्यामुळे, प्रत्येक व्यक्तीला सकस आणि पोटभरण्यापुरते अन्न मिळायला हवे आणि यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने काहीना काहीतरी मदत करायला हवी, असं ताईंना वाटते.

प्रत्येक घरात संसार चालवणाऱ्या बाईमध्ये खूप क्षमता असते आणि तीने स्वत: केवळ ती क्षमता घर कामात न वापरता, घरातील माणसांनी बनलेल्या छोट्याशा जगात न रमता बाहेर पडायला हवं आणि यथाशक्ती समाजासाठी काम करायला हवं. ’आई कुठे काय करते’ ही मालिका बघत स्त्रियांना सहानुभूती दाखवणाऱ्या समाजाला आणि इतरांसाठी करता करता आपल्यासाठी जगायचंच राहिलं या दु:खात जगणाऱ्या स्त्रियांना, एखाद्या आईने ठरवलं तर ती खूप काही करू शकते, हा विश्वास उज्ज्वला ताई आपल्या कार्यातून देतात. महिला एकत्र येऊन निव्वळ उसाभऱ्या करतात, अशी शेरेबाजी करणाऱ्या समाजकंटकांच्या बुरसटलेल्या डोळ्यात १२१ महिलांनी एकत्र येऊन चालवलेली ही संस्था चांगलंच अंजन घालते.

’देतो तो देव आणि राखतो तो राक्षस’, हा विनोबांचा शिकवलेला धडा उज्ज्वला ताईंनी अगदी मनापासून अंगिकारला. आपल्या घराची अन्नपूर्णा तर त्या होत्याच; पण आता हजारो गरजू विद्यार्थ्यांची अन्नपूर्णा म्हणून त्या सक्षमपणे उभ्या आहेत!

(उज्ज्वला बागवाडे, संपर्क : ९८२०७१३३०३)

शब्दांकन : मेघना अभ्यंकर
meghanaabhyankar2698@gmail.com