उसात गोडवा भरणाऱ्या शास्त्रज्ञ - डॉ. जानकी अम्मल
समाजातील सर्वच स्तरांवर महिलांच्या कामाची विशेष दखल घेतली जात नाही. बऱ्याचदा त्याची नोंदही केली जात नाही. शिक्षण - संशोधन क्षेत्रही त्याला अपवाद नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जानकी अम्मल एडावलाथ कक्कट! खरं तर शिक्षण - संशोधन क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांवर सुवर्णाक्षरांनी हे नाव कोरायला हवं. पण आपण इतके करंटे की, संशोधनाच्या इतिहासातील मोजकीच पाने त्यांच्यासाठी खर्ची घातली. वनस्पतीशास्त्र - विशेषत: पेशीजननशास्त्र - या विषयातील संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे नाव अग्रगण्य मानले जाते. ज्या काळात मुलींना शालेय शिक्षण नाकारले जात होते, त्या काळी जानकी केवळ उच्च शिक्षण घेऊन थांबल्या नाहीत, तर परदेशी विद्यापीठात डॉक्टरेट संपादन करून अध्यापन व संशोधन क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून त्या नावारूपास आल्या. या पार्श्वभूमीवर त्यांचे कार्य विशेष कौतुकास्पद आहे. भारतातील जैवविविधतेचा त्यांनी इतका सखोल अभ्यास केला आहे की, प्रत्येक भारतीयाच्या ओठी हे नाव असले पाहिजे. पण दुर्दैवाने केवळ मूठभर लोकांनाच त्यांचा परिचय आहे. जानकी यांचा संघर्ष केवळ स्त्री म्हणून नव्हता तर, भारतीय परंपरेत खोलवर रुजलेल्या वर्णव्यवस्थेचाही त्यांना त्रास झाला. या विदुषीचा जीवनसंघर्ष आणि संशोधनकार्य समजून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न!
जानकी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९७ रोजी केरळमधील तेलीचेरी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील दिवाणबहादुर एडावलाथ कक्कट कृष्णन हे मद्रास विभागाचे दिवाणी न्यायाधीश तर आई कुरुवायी गृहिणी. पुरोगामी विचारांच्या या परिवाराने जानकींना प्रोत्साहन दिले. वडिलांना झाडे, पशु - पक्षी आणि एकूणच निसर्गाविषयी प्रेम होते. त्यांच्या वडिलांनी 'बर्ड्स ऑफ मलबार' आणि 'बर्ड्स ऑफ थॅलसेरी' लिहिले तर, त्यांचे काका फ्रॅंक यांनी फुलपाखरांवर संशोधन केले. त्यांचा शोधनिबंध 'जर्नल ऑफ बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी' मध्ये प्रकाशित झाला होता. वनस्पती आणि एकूणच जैवविविधतेविषयी जानकी यांचे प्रेम म्हणजे त्यांना वडील व काकांकडून मिळालेला वारसा होय!
१९ व्या शतकातील भारतीय, विशेषत: केरळमधील शिक्षण व्यवस्था अतिशय बिकट होती. मद्रास प्रांताचे त्यावेळचे गव्हर्नर सर थॉमस मुन्रो यांनी भारतीयांच्या दारिद्रयासाठी इथली शिक्षण व्यवस्था आणि ब्रिटिश वसाहतींचे धोरण कारणीभूत असल्याचे ओळखले. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार बहुतांशी शिक्षण संस्था या वैदिक पाठशाळा होत्या. विज्ञान - तंत्रज्ञान, कौशल्य विकास यांचा संपूर्ण अभाव होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी शैक्षणिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला. यासाठी १८२६ मध्ये त्यांनी एक समिती स्थापन केली. पण दुर्दैवाने १८२७ मध्येच त्यांचे निधन झाले. या समितीच्या प्रयत्नातून १८४० मध्ये प्रथम मद्रास हायस्कूल आणि पुढे प्रेसिडेन्सी कॉलेजची स्थापना झाली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मुलींसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले झाले.
जानकी यांनी ‘सेक्रेड हार्ट गर्ल्स स्कूल’ मधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पदवीपूर्व शिक्षणासाठी ‘क्वीन मेरीज कॉलेज’ मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १९२१ मध्ये बी. ए.(ऑनर्स) ही पदवी घेतली. या महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांना ‘पेशीजननशास्त्रा’चा अभ्यास करण्यासाठी उत्तेजन दिले. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी ‘विमेन्स ख्रिस्तियन कॉलेज’ मध्ये अध्यापन सुरू केले. तिथे त्यांनी वनस्पतीशास्त्र विभागात प्रयोग निर्देशक म्हणून दोन वर्षे काम केले. त्याच वेळी त्यांना अतिशय मानाची ‘बार्बर शिष्यवृत्ती’ मिळाली. आशियातील कर्तृत्ववान महिलांना मिशिगन विद्यापीठात उच्च शिक्षण घेता यावे म्हणून १९१७ मध्ये ही शिष्यवृत्ती लेव्ही लुईस बार्बर यांनी सुरु केली होती. १९२४ मध्ये जानकी ‘मिशिगन विद्यापीठात’ दाखल झाल्या आणि १९२६ मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर त्या भारतात परतल्या आणि पुन्हा ‘विमेन्स ख्रिस्तियन कॉलेज’ मध्ये रुजू झाल्या. पण लवकरच त्या पुढील संशोधनासाठी पुन्हा अमेरिकेला रवाना झाल्या. त्यांनी प्रामुख्याने वनस्पतींमधील गुणसूत्रांचा अभ्यास केला. १९३१ मध्ये मिशिगन विद्यापीठाने ‘रानपोपटी (Apple of Peru)’ तील गुणसूत्रांच्या अभ्यासासाठी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी त्यांना प्रदान केली. परदेशी विद्यापीठातून डॉक्टरेट संपादन करणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला! मिशिगन विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागात प्रा. हार्ले हॅरीस बार्टलेट यांच्याबरोबर त्यांनी काम केले. त्यांनी वांग्याची नवीन जात शोधली त्यास ‘जानकी ब्रिंजल’ असे संबोधण्यात आले. यामध्ये गुणसूत्रांचे तीन संच असतात.
सन १९३२ मध्ये त्या मायदेशी परतल्या आणि 'हिज हायनेस महाराजा कॉलेज ऑफ सायन्स', त्रिवेंद्रम येथे वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापकपदी त्यांची नियुक्ती झाली. भारतीय शिक्षणसंस्थांमध्ये संशोधनासाठी पूरक वातावरण व सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. इथल्या महाविद्यालयांचा मुख्य भर अध्यापनावर होता तर पाश्चिमात्य देशांतील विद्यापीठांत प्रामुख्याने संशोधनाकडे लक्ष दिले जाई. १९४३ ते १९३९ या काळात त्यांनी कोईमतूर येथील 'शुगरकेन ब्रीडींग इन्स्टिट्यूट (एसबीआय)’ येथे अनुवंशशास्त्रज्ञ म्हणून काम केले. याच काळात त्यांनी गोड ऊसाचे देशी वाण विकसित केले, ज्याचे आज प्रामुख्याने उत्पन्न घेतले जाते. त्यापूर्वी भारतात उसाचे मुबलक उत्पादन होत असले तरी, त्यास गोडवा नसल्याने तो प्रामुख्याने निर्यात केला जात असे. म्हणूनच त्यांची 'उसात गोडवा भरणाऱ्या शास्त्रज्ञ' अशी ओळख निर्माण झाली. याच काळात त्यांनी 'कासे गवत' या वनस्पतीतील जनुकांचा साद्यन्त अभ्यास केला. निरनिराळ्या प्रकारचे गवत व तृणधान्यांचा संकर घडवून (जसे ऊस X मका, ऊस X ज्वारी) नवीन प्रजाती विकसित केल्या. अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने त्यांचे संशोधन महत्वाचे मानले जाते. कुपोषण टाळण्याच्या दृष्टिकोनातून भरघोस उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ऊस आणि बांबू यांच्या संकरातून निर्माण झालेल्या प्रजातीमधील गुणसूत्रांच्या संख्येविषयीचे संशोधन ‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. या संशोधनाने जनुकशास्त्रात क्रांती घडवून आणली. यामुळे ऊस आणि इतर गवती वनस्पती यांच्यातील अनुवंशिक संबंध समजण्यास मदत झाली. एसबीआय मध्ये असताना त्यांनी ‘नेचर’, ‘करंट सायन्स’ आणि ‘सायटोलॉगिया’ या जर्नल्समधून चार शोधनिबंध प्रकाशित केले. कोईमतूर येथे असताना लोक त्यांना आदराने 'अम्मल' (तमिळमध्ये 'आई') असे संबोधत आणि पुढे त्यांचे 'जानकी अम्मल' असे नाव रूढ झाले.
ऑगस्ट १९३९ मध्ये एडिंबरा येथे सातवी अनुवंशशास्त्राची परिषद आयोजित केली होती. या परिषदेला जानकी हजर होत्या. सप्टेंबरमध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि त्यांना भारतात परतणे अशक्य झाले. त्यांनी त्या काळात (१९४० ते १९४४) लंडन येथील ‘जॉन इनिस हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूशन’ येथे सहाय्यक पेशीशास्त्रज्ञ म्हणून काम केले. प्रसिद्ध जनुकीय तज्ञ डॉ. सी. डी. डार्लिंग्टन संस्थेचे संचालक होते. जानकींनी अनेक वनस्पतींच्या प्रजातीमधील गुणसूत्रांची संख्या शोधली आणि त्यातून त्या प्रजातीच्या उत्क्रांतीचा वेध घेतला. जानकी अम्मल आणि डॉ. सी. डी. डार्लिंग्टन यांनी एकत्रितपणे ‘क्रोमोझोम अॅटलास ऑफ कल्टीवेटेड प्लॅन्ट्स’ हे पुस्तक १९४५ मध्ये प्रकाशित केले. डार्लिंग्टन यांच्या क्रांतिकारी संकल्पना आणि जानकी यांचे मूलगामी संशोधन यांच्या संयोगातून अनेक औषधी, शोभेच्या वनस्पती आणि त्यांनी लागवड केलेल्या दहा हजार प्रजातींच्या गुणसूत्रांचे संपूर्ण चित्रण या पुस्तकात त्यांनी केले आहे. १९४६ ते १९५१ या काळात त्यांनी विस्ले येथील ‘रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटी’ या संस्थेत काम केले. या संस्थेत प्रामुख्याने फळे व भाजीपाला यांच्यावर संशोधन केले जात होते. जानकींनी आपले गुणसुत्रांविषयीचे संशोधन येथेही पुढे चालू ठेवले. काळी तुती, नरसीशी (पिवळी, नारिंगी किंवा पांढरी फुले असणारे झाड) अशा अनेक फळे, फुलझाडांच्या गुणसूत्रांचा अभ्यास केला. त्यांनी मॅग्नोलियाचा विशेष अभ्यास केला. त्यामधील एका प्रजातीला ‘मॅग्नोलिया कॉबस जानकी अम्मल’ असे नाव दिले आहे. आजही विस्ले येथील बागेला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी जानकी यांनी लावलेले मॅग्नोलिया आकर्षण बिंदू ठरतात. पुढे भारतात परतल्यावरही जानकी आणि डार्लिंग्टन यांच्यामध्ये पत्रव्यवहार होता. आपल्या प्रयोगातील माहितीची देवाण घेवाण होत असे.
त्याच काळात भारतीय स्वातंत्र्य चळवळ अगदी जोमात होती. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि एक नवीन राष्ट्र उदयास आले. पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार समजले जाते. त्यांनी विज्ञान - संशोधनाला चालना देण्यासाठी अनेक संस्थांची स्थापना केली. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ संशोधक म्हणून जानकी अम्मल नावारूपास आल्या होत्या. नेहरूंनी त्यांना निमंत्रित केले. त्या मायदेशी आल्या आणि ‘बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (बी.एस.आय.)’ या संस्थेची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. या संस्थेची स्थापना १८९० मध्ये झाली होती. भारतात आढळणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती ओळखून त्यांचे दस्तावेजीकरण करण्याचे उत्कृष्ट काम या संस्थेने केले होते. पण या संस्थेचे उपक्रम काहीसे थंडावले होते आणि संस्थेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याची जबाबदारी जानकी यांच्यावर आली. यासाठी त्यांनी एक योजना आखली आणि १९५४ मध्ये सरकारकडून त्याला मंजुरी मिळाली.
भारत जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून समृद्ध आहे. त्याचा विचार करून व्यवस्थापनाच्या दृष्टीने बी.एस.आय.चे चार विभाग उभारण्यात आले. -
१) कोईमतूर येथे दक्षिण विभाग
२) शिलॉंग येथे पूर्व विभाग
३) पुणे येथे पश्चिम विभाग
४) डेहराडून येथे उत्तर विभाग
राष्ट्र उभारणीत सामाजिक,आर्थिक आणि औद्योगिक विकास आवश्यक मानला जातो. यामध्ये आदिवासी लोकांकडे असलेले वनस्पतींविषयीचे परंपरागत ज्ञान आणि त्याचे संवर्धन याकडे दुर्लक्ष झाले. तसेच विकासाच्या काही योजनांमुळे काही ठिकाणचे वनक्षेत्र धोक्यात आले. सहाजिकच जानकीबाईंनी सरकारी धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केली. पर्यावरण आणि परिसंस्थेचा असलेला धोका ओळखून केरळमधील जलविद्युत प्रकल्पाविरुद्ध आवाज उठवला. मग १९५५ मध्ये त्यांना डावलून रेव्ह. हर्मेनेगिल्ड सॅन्टापॉ यांची बी.एस.आय. च्या संचालकपदी नियुक्ती झाली. संशोधन क्षेत्रातील पुरुषी वर्चस्वही याला कारणीभूत ठरले.
अलाहाबाद येथील ‘सेंट्रल बोटॅनिकल लॅबोरेटरी’ च्या पहिल्या संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तसेच जम्मू येथील ‘रीजनल रीसर्च लॅबोरेटरी’ येथे विशेष अधिकारी आणि ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ येथेही त्यांनी काही वर्षे काम केले. विद्यापीठातील संशोधनाविषयी त्यात समाधानी नव्हत्या. नोव्हेंबर १९७० मध्ये त्या परत मद्रासला आल्या आणि मद्रास विद्यापीठातील ‘सेंटर फॉर अॅडव्हान्सड स्टडीज इन बॉटनी’ येथे 'एमेरेटस सायंटिस्ट' म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. ‘औषधी वनस्पती आणि पारंपरिक ज्ञान’ या विषयावर त्यांचे शेवटपर्यंत संशोधन चालू होते आणि त्यांनी अनेक शोधनिबंधही प्रकाशित केले.
जानकी अम्मलना अनेक मानसन्मान मिळाले. १९३५ मध्ये नोबेल विजेते डॉ. सी. व्ही. रामन यांनी स्थापन केलेल्या ‘इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्स’ च्या संस्थापक सदस्य म्हणून डॉ. रामन यांनी त्यांची नियुक्ती केली. १९५७ मध्ये ‘इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी’च्या सभासदपदी त्या निवडून आल्या. १९५६ मध्ये मिशिगन विद्यापीठाने त्यांना मानद एलएलडी पदवी प्रदान केली. भारत सरकारने त्यांचा १९७७ मध्ये ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. १९९९ मध्ये भारत सरकारने त्यांच्या नावे वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातील वर्गीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुरू केला. जानकी अम्मल यांच्या नावे ‘जॉन इनिस सेंटर’ विकसनशील देशातील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ करते. जम्मूतावी येथील २५००० वनस्पतींच्या प्रजाती जतन करणाऱ्या हार्बेरियमला जानकी अम्मल यांचे नाव दिले आहे. गांधी विचारांच्या प्रभावामुळे त्यांची जीवनशैली अतिशय साधी होती. ७ फेब्रुवारी १९८४ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना जेव्हा त्यांच्या जीवनाविषयी प्रश्न विचारला जाई तेव्हा, ‘माझं काम जिवंत राहील’, असं त्या म्हणत आणि खरंच त्याचा प्रत्यय आजही येतो.
तेजस्विनी देसाई
tejaswinidesai1970@gmail.com
(लेखिका के. आय. टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त), कोल्हापूर येथे पदार्थविज्ञान विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या महिला वैज्ञानिकांवर अभ्यास करत आहेत.)
संदर्भ :
- ‘Women Scientists in India – Lives, Struggles, Achievements’ by Anjana Chattopadhyay, National Book Trust, India.
- ‘Lilavati’s Daughters – The women Scientists in India’ Edited by Rohini Godbole, Ram Ramaswamy, The Indian Academy of Sciences, Bangalore, India.
- Nayar, M.P. (1985). "In Memoriam: Dr E.K. Janaki Ammal (1897-1984)". Bulletin of the Botanical Survey of India. 27 (1–4): 265–268.
- The Mother of Modern Botany in India, A Biographical Journey of Dr Edavalath Kakkat Janaki Ammal, Vidyarthi Vigyan Manthan(2019-20)
- Janaki Ammal, C. D. Darlington and J. B. S. Haldane: scientific encounters at the end of empire by Vinita Damodaran, Journal of Genetics, (Nov 2017)
- https://en.wikipedia.org/
- https://www.thebetterindia.com
- https://feminisminindia.com
- https://scientificwomen.net/
- https://www.nature.com/