विवस्त्रा
संपूर्ण अनावृत्त असलेल्या त्या स्त्रीच्या ओटीपोटाखालचे केस नीट कापून व मेणाचा वापर करून आकार दिल्याने तो भाग अस्ताला चाललेल्या सूर्यासारखा दिसत होता. ती स्त्री सौंदर्य प्रसाधने आणि मलमांचे नमुने, त्यांचे फायदे दिसावेत अशा रीतीने मांडत असताना, कपडे परिधान केलेल्या स्त्रिया तिच्याकडे तुच्छतेने पाहात होत्या. "त्वचा कशी मृदू व मुलायम होते, हे तुम्ही प्रत्यक्ष पाहात आहातच", ती स्त्री डोळे मिचकावत म्हणाली खरी, पण स्वत:च्या नग्नतेवर विनोद करण्याचा तिचा प्रयत्न सपशेल फसला होता. एजेमने पेटीतून बाहेर काढलेल्या सर्व वस्तू न्याहाळून पाहात मान हलविणारी चिडिमा तिला प्रोत्साहित करण्यासाठी चेहर्यावर हास्य टिकवून होती. एजेमला तिच्या सौंदर्य प्रसाधान विक्रीचे प्रदर्शन मांडण्याची संधी तिनेच दिल्यामुळे, जरी तिथल्या पाहुण्यांपैकी कुणीही एकही प्रसाधन विकत घेतलं नसतं, तरी तिला एक तरी महागडं उत्पादन फुकट मिळणारच होतं.
स्त्रीची अंगकांती तिच्या स्त्रीत्वाचं महत्त्वाचं अंग असून तिला एखाद्या खजिन्यासारखी उपयुक्त पण शोभेची बाब म्हणून तिची किती काळजी घ्यावी लागते, याकडे एजेमने विक्रेती म्हणूनच्या तिच्या आवाहनाच्या अखेरीस लक्ष वेधलं. कपडे परिधान केलेल्या स्त्रियांनी आकर्षक डिझाइन असलेल्या आपल्या 'पत्नी पेहरावां'वर नाजूकपणे हात फिरवत केविलवाणं हास्य केलं. अत्यंत सहजपणे चढवलेले आणि अंगावरून हलकेच ओघळणारे ते सुंदर पेहराव कापडाच्या गुणवत्तेमुळे नजरेत भरत होते. डोळ्यांतून सुखावणारी दया व्यक्त करीत एजेमच्या नग्नतेकडे पाहात त्यांच्यातील एक दोघी म्हणाल्या, ‘‘तुझ्या वयाची होईपर्यंत मी कपड्यांविना राहूच शकले नसते. तसं राहणं हे तरूण मुलींसाठी असतं, असं नाही तुला वाटत?’’
‘‘माझा एक मित्र पत्नीच्या शोधात आहे; कदाचित मी तुझी त्याच्याशी ओळख करून देऊ शकेन. निवडीबाबत तो फारसा चोखंदळ नाहीये.’’
एजेमने आपली नजर दुसरीकडे वळवली. रागाऐवजी तिच्या डोळ्यांतील अश्रू तिला लपवायचे होते. प्रत्येक वेळी हे असंच घडत राहणार होतं का? तिने चिडिमाकडे मदतीसाठी याचना करीत पाहिलं. ‘‘हे बघ, मी इथे मलमांसाठी आले आहे; कपडे घातलेल्या विरुद्ध कपडे न घातलेल्या स्त्रियांबद्दल मला चर्चा करायची नाहीये. मला हे मलम आवडेल.’’ चिडिमा तिच्या हातातील सर्वांत महागडे मलम दाखवीत म्हणाली.
एजेमनं तिला पाठिंबा दिल्याचं नाटक केलं, त्यामुळे खजील झालेल्या इतर स्त्रियांनी आपापली खरेदी उरकून घेतली. त्यांनी एजेमशी सरळ बोलणं थांबवलं आणि ती जणू ओसू जातीतील आहे, असं तिला वागवण्यास सुरुवात केली. त्यांनी वस्तूंबद्दलचे प्रश्न हवेत उच्चारले किंवा चिडिमाला विचारले. त्यांनी तिचं ऐकलं परंतु एजेमने उत्तरं दिली तेव्हा तिला प्रतिसाद दिला नाही. त्याबाबत एजेम आणि चिडिमा यांनी निषेधही व्यक्त केला असता, परंतु त्यांना ती विक्री चिडिमाचा पती परतण्याआधी संपविणे गरजेचं होतं. एजेमच्या विक्रीसाठी यजमानपद स्वीकारताना तिने ही एकमेव अट घातली होती. खरं तर, त्यांच्या मैत्रीसाठीही तिची ती एकच अट होती : स्त्री म्हणून तुझ्या उपलब्धतेची जाहिरात माझ्या नवर्यापर्यंत जाऊ देऊ नकोस. एजेमचे कौतुक करताना चिडिमा नेहमीच विनोदाने म्हणायची, ‘‘तुला मुलं झाली नसल्यामुळे तुझं शरीर अजूनही इतकं आकर्षक राहिलं आहे.’’ परंतु त्यात नेहमी एक प्रकारचा ताण जाणवायचा; एजेमवर कुणीही 'हक्क' न सांगितल्याने कालांतराने तो ताण वाढलाच होता.
ज्या स्त्रीने एजेमऐवजी प्रथम चिडिमाला विचारलं होतं (एजेमला ती महिलांची गटप्रमुख वाटली होती) तिला त्या दोघींचं घड्याळाकडे पाहणं लक्षात आलं. छद्मी हास्य करत तिने मागणी केली की, प्रत्येक वस्तूची तिला नीट माहिती दिली जावी. एजेमने ते सर्व कमीत कमी वेळात करण्याचा प्रयत्न केला. परंतु घड्याळ वेगाने पुढे जात राहिल्याने चिडिमाने तिला मदत करण्याचे थांबवलं. पुढे येणार्या पेचप्रसंगामुळे तिची पंचाईत झाली होती. थोड्याच वेळात चिडिमाचा नवरा चान्स कामावरून परतला.
चान्स हा इतर नवर्यांसारखाच व्यवस्थित माणूस होता. एका प्रसिद्ध बँकेच्या काही शाखांची व्यवस्था पाहात असल्याने त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांच्या मोठ्या घरात घरकाम करणारी ओसू जमातीची स्त्री मदतनीस असल्याने चिडिमाला रोजच्या कामाचा फारसा ताण पडत नसे. तिच्या नवर्याला एका अर्थाने काहीसा पुरोगामीही म्हणता आले असते; त्याने आपल्या बायकोला विवस्त्र फिरणार्या तिच्या मैत्रिणीचा सहवास चालू ठेवण्यास परवानगी दिली होती, आणि शिवाय त्याच्या नोकरीतल्या ओसू स्त्रीला त्रास देणार्यातलाही तो माणूस नव्हता. चिडिमाने त्याचे स्वागत करावे अशी त्याची अपेक्षा होती हे मात्र खरं. चिडिमाने झुकून त्याचं स्वागत केलं. पाय उंचावून त्याला चुंबन दिलं; त्याने प्रतिसाद देताना तिच्या 'पत्नी-पेहरावा'स पाठीवर घट्ट पकडून तिला जवळ ओढलं होतं.
परंतु तरीही तो एक पुरूष होता. तो जेव्हा इतर स्त्रियांना अभिवादन करण्यासाठी वळला, तेव्हा त्याने एजेमकडे बघितलं आणि त्याचे डोळे तिथेच थांबले. तिच्या स्तनाग्राभोवतालची तपकिरी वर्तुळं, तिच्या पायांमधील कापलेल्या केसांची नक्षी, बसलेल्या स्थितीत असल्यामुळे तिच्या शरीराचे जे भाग अनावृत्त राहिले होते ते भाग - हे सगळं त्याने पाहिलं. कुणी काहीही बोललं नाही, कारण कुणीही 'निवड' न केलेल्या स्त्रीने एका विवाहित पुरूषाच्या घरी असण्याचा असभ्यपणा म्हणजे इतरांनी व्यत्यय आणू नये असा एक चविष्ट सामाजिक प्रमाद होता. चिडिमा त्यामुळे हादरून गेली असताना गटप्रमुख महिलेने सगळ्यांना बाहेर पडण्यास सांगताच सर्वजणी निघण्याच्या तयारीने उठल्या. त्यांनी चान्सला झुकून अभिवादन केलं आणि चिडिमाचे हात हातात धरून तिला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट नक्कीच सर्वत्र पसरणार होती (त्याने तिच्याकडे कसं निरखून पाहिलं!) आणि त्या प्रकारातून चिडिमाची निदान काही काळ तरी सुटका होणार नव्हती. सर्व स्त्रिया एजेमच्या जवळून एकही शब्द न बोलता बाहेर पडल्या. संदेश अगदी स्पष्ट होता. एजेम त्यांच्यापेक्षा खालच्या दर्जाची स्त्री होती.
चिडिमाने आपल्या नवर्याला त्याचा दिवस कसा गेला हे विचारून त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. चान्स उत्तरे देतानाही एजेमकडे टक लावून पाहात होता. एजेमला जमेल तितक्या वेगाने तिथून लवकर बाहेर पडायचं होतं, परंतु त्यामुळे तिची हलणारी वक्षःस्थळं, तिच्या मांड्यांची होणारी हालचाल याची तिला सतत जाणीव होत होती. ती बाहेर पडत असतानाच फक्त चान्स निरोपादाखल तिच्याशी काही तरी बोलला, तेव्हा गुडघे किंचित वाकवून प्रणाम करत तिने त्याचा निरोप घेतला. चिडिमा तिला सोडण्यासाठी दरवाजापर्यंत आली. ‘‘एजेम, आता खरं तर आपण आपली मैत्री थांबवली पाहिजे, असं मला वाटतं.’’ दुःखी सुरात ती अखेरचं वाटावं असं बोलली. तिच्या बोलण्यावरून त्यांची मैत्री तात्पुरती तुटणार नव्हती, हे स्पष्ट कळत होतं.
‘‘का?’’ ‘‘तुला ठाऊक आहे, का ते.’’
‘‘तू ते स्पष्टपणे सांगितलं पाहिजेस, चिडिमा.’’
‘‘ठीक आहे. आपलं हे नातं, ही मैत्री छान होती, जेव्हा आपण दोघीही मुली विवस्त्र स्थितीत फिरत होतो. परंतु कपडे परिधान करणार्या स्त्रीला विवस्त्र मैत्रिणी असू शकत नाहीत. आधी मला हे मूर्खपणाचं वाटत होतं. पण ते सत्य आहे, मला क्षमा कर.’’
‘‘तू कपडे घालायला लागून 13 वर्षे झाली आहेत, इतक्या वर्षांत तुला हा प्रश्न कधीही पडला नव्हता?’’ ‘‘आतापर्यंत मला वाटलं होतं, तुला पत्नीचे कपडे मिळून तूही विवस्त्र राहणार नाहीस. तो माणूस जवळजवळ तयार झाला होता. त्यामुळे सारं जुळून आलं असतं. परंतु त्यासाठी तू खरं तर कधी प्रयत्नच केला नव्हतास. हे अगदी चुकीचं आहे.’’
‘‘तुझ्या नवर्याला तू माझ्याबद्दल स्पष्ट सांगितल्यानंतर त्यानं मला फक्त एकदाच पाहिलं आहे.’’ ‘‘तेवढं पुरेसं आहे. तू कपडे मिळव. कुणी तरी तुला निवडून तुझ्यावर हक्क सांगेल असं पाहा. स्वत:ला लग्नाच्या बाजारातून बाहेर काढ. तोपर्यंत मला माफ कर. परंतु मैत्री नको.’’
एजेम यावर काही म्हणण्याच्या आतच चिडिमा घरात परत गेली होती. आणि नाही तरी त्यावर ती काय म्हणू शकणार होती? 'मला कुणीतरी कधी निवडावं याविषयी मला स्वत:लाच खात्री वाटत नव्हती' हे? चिडिमाने ते ऐकून तिला नक्कीच वेडी ठरवलं असतं.
एजेमने हातातली पेटी छातीजवळ आपले उरोज जास्तीत जास्त झाकले जातील अशा बेताने धरली आणि ती बसस्टॉपकडे चालू लागली. एजेमला सार्वजनिक वाहनाने प्रवास करणं किती तिरस्करणीय वाटे हे चिडिमाला ठाऊक होतं. तरीही तिने तिच्यासाठी खासगी वाहनाची व्यवस्था केली नव्हती. बसमधील सीटवर ओलेपणा शोषून घेणारा छोटा चौकोनी टॉवेल टाकीत असताना तिला पाहणार्या लोकांच्या नजरा, दर दुसऱ्या सेकंदाला 'पाळी अचानक सुरू झाली तर आपण काय करणार' या नुसत्या कल्पनेमुळे मनात निर्माण होणारी प्रचंड भीती - यामुळे तिचं मन सतत धास्तावलेलं असायचं. स्टॉपवर तरुणांचा एक घोळका बसची वाट पाहत उभा होता. एजेमला पाहताच त्यांनी आपलं बोलणं थांबवलं. नंतर ते पुन्हा बोलू लागले. या वेळी त्यांचं बोलणं तिच्यावर केंद्रित झालं होतं. ‘‘तुला काय वाटतं, किती असेल तिचं वय?’’
‘‘मित्रा, वय जास्तच असेल.’’
‘‘मला ठाऊक नाही रे. तिची छाती नीट बघूयात. तिने ती पेटी खाली ठेवायला हवी.’’
ते वाट पाहात असताना एजेमने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तिने आपल्या हातातील पेटीचा आणि सौंदर्यप्रसाधन कंपनीने दिलेल्या पिशवीचा ढालीसारखा उपयोग करीत स्वत:ला झाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला.
‘‘बघ तिचा आगाऊपणा! म्हणूनच तिच्यावर आजपर्यंत कुणी हक्क सांगितलेला नाही. अशा बाईला कोण निवडेल?’’
बस येईपर्यंत त्यांचं बोलणं तसंच चालू होतं. जरी पुरुषांनी बसमध्ये आधी चढणं अपेक्षित होतं तरी त्यांनी स्त्रीदाक्षिण्य दाखवण्याचा बहाणा करीत तिला खुणेनं पुढे व्हायला सांगितलं; ज्यामुळे तिला नीट पाहण्याची त्यांची लालसा झाकली जावी. आपल्यासारख्या स्त्रियांचा पाठिंबा मिळेल म्हणून बसमधील प्रवाशांमध्ये कोणी विवस्त्र स्त्रिया आहेत काय, याचा तिने शोध घेतला. तशी एक स्त्री दिसताच तिला हायसं वाटलं. पण ती भावना लगेचच हवेत विरून गेली. ती स्त्री सुंदर होती. ही बाब तिला बोचणारीच होती. परंतु ती अंगाने भरलेली आणि मुलायम अंगकांती असलेली मुलगी अगदी तरुणसुद्धा होती. त्यामुळे त्या तरूणांच्या घोळक्यासाठी एजेमचं अस्तित्वच संपलं. त्यांनी मोठ्याने तिची नाजूक कंबर आणि हाताची गोलाई यावर उघड शेरेबाजी केली. त्या तरुण स्त्रीने हे नेहमीचंच समजून त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हातातल्या पुस्तकाच्या पानांवरून बोट सरकवीत ती वाचत राहिली.
एजेमला एकाच वेळी उपकृत आणि तिरस्कृत झाल्यासारखं वाटलं. तिची कंबर जाडसर होऊन तिचे नितंब खाली ओघळण्याआधीच्या तिच्या तारूण्याची तिला आठवण झाली. जरी स्वत:ची नग्नता धाडसानं मिरवणार्या मुलींपैकी ती कधीच नव्हती, तरी ती निदान दिसायला छान व प्रसन्न होती, हे तिला नक्कीच ठाऊक होतं.
बसमध्ये लवकरच जास्त प्रवासी चढले आणि तीन-चतुर्थांश बस भरून गेली. त्या वेळी एक ओसू जमातीची नग्न स्त्री बसमध्ये चढली. तिच्यावरून आपली नजर दुसरीकडे वळवताना एजेमच्या मनात दोन विचार येऊन गेले : तिचं आत येणं बेकायदेशीर नव्हतं, फक्त तसं फारसं घडत नसे, कारण ओसू स्त्रियांच्या प्रवासाची वेगळी व्यवस्था होती. इतर प्रवाशांची पंचाईत झाल्यामुळे आणि त्यांना चीड आल्यामुळे त्यांनीही आपल्या नजरा दुसरीकडे वळवल्या. ती स्त्री तिकिटाचे पैसे मोजत असताना, बसच्या चालकानेदेखील आपली नजर सरळ समोर ठेवली. अखेर जेव्हा ती स्त्री बसमधील चालण्याच्या जागेत मध्यभागी पोचली, तेव्हा शेजारची जागा देण्यासाठी मूकपणे केली जाणारी सभ्यतादर्शक हालचालही कोणी केली नाही. त्यामुळे बरीच आसनं रिकामी असतानाही ती ओसू स्त्री तशीच उभी राहिली. आसनावर बसण्यासाठी स्वत:चे विवस्त्र शरीर कोणाच्या तरी जवळून पलीकडे नेण्यापेक्षा ते जास्त बरं होतं. एजेमला वाटलं, तिचं वागणं हे समाजात लोकांनी भविष्यात स्वत:ला कसं सुधारावं हे सूचित करण्यासाठी केलेली एक साधी सूक्ष्म कृती होती.
परंतु प्रवास जसजसा पुढे सुरू राहिला, तसतसं त्या ओसू स्त्रीला तिच्याकडे मुळीच लक्ष न देणार्या लोकांना पुढे जाता यावं म्हणून स्वत:चं शरीर आणखीनच आवळून धरत कोपर्यात सरकावं लागलं. त्यामुळे शांत झालेली एजेम जणू स्वत:च अदृश्य स्त्री होण्याच्या स्थितीला पोचली होती. आयुष्याने वार्यावर सोडून दिल्यामुळे तिला ओळखणार्या लोकांच्या नजरेसमोरूनही ती अदृश्य झाली होती. ती ओसू जातीत जन्मली नव्हती ही जणू देवाचीच कृपा होती. जेव्हा तिच्या आईची अखेरची भेट झाली होती, तेव्हा ती तिला या संदर्भात म्हणाली होती, ‘‘निदान तुला निवडायची संधी आहे, एजेम. म्हणून शहाणपणाने तुझी निवड कर.’’ तिने तसं केलं नव्हतं. तो माणूस, त्याची लग्नाची मागणी आणि त्याने देऊ केलेलं संरक्षण यापासून ती दूर झाली होती. नंतर तिच्या आई-वडिलांनी तिच्याशी संबंध तोडले होते. परंपरा मोडून टाकल्यामुळे त्यांनी तिच्यावर राग धरून तिचा तिरस्कार केला होता. तिने स्वीकारावं म्हणून त्याने देऊ केलेला पत्नीचा पेहराव पुढे जड होऊन तिचा जीव गुदमरून टाकेल असं तिला का वाटलं होतं, याविषयी ती स्वत:लादेखील काही स्पष्टीकरण देऊ शकली नव्हती.
तिचा बसस्टॉप येताच आपली पेटी छातीशी कवटाळून धरतच ती खाली उतरली. काही लोकांनी तिच्याकडे सहज टाकलेले कटाक्ष वगळता कोणीही तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. या एका कारणासाठी हे शहर तिला आवडलं होतं. इथल्या प्रत्येकाला फक्त आपल्या स्वत:च्या कामाकडेच लक्ष देण्याची सवय होती. तिची सदनिका लाल आच्छादन असलेल्या ज्या इमारतीत होती, ती दिसताच तिने आपली गती वाढवली. लिफ्टमध्ये तिथल्या एका वयस्कर भाडेकरूने डोळ्यांच्या कोपर्यातून तिला नीट पाहून घेतलं. एजेम जास्तच मागे सरकली, ज्यामुळे तिला पाहण्यासाठी त्याला वळून बघावं लागलं असतं. एखादा पुरुष एकटा आहे, की एखाद्या स्त्रीबरोबर राहतो, हे सांगणं कठीण असतं आणि ज्यांनी स्वत:साठी हक्काची पत्नी मिळवली होती, अशा पुरुषांनी आपल्याकडे पाहावं याचा तिला भयंकर तिरस्कार वाटे.
आपल्या सदनिकेत आल्यावर तिने एक दीर्घ नि खोल श्वास घेतला. असं ती सार्वजनिक ठिकाणी करण्याचं धाडस कधी करू शकत नसे कारण तसं केल्यास नको त्या लोकांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेतलं जाई. शांत झाल्यावरच तिनं चिडिमाची मैत्री गमावल्याबद्दल विचार करायला सुरुवात केली आणि तिला रडू कोसळलं.
जेव्हा चिडिमा आणि ती दोघीही लहान मुली होत्या आणि वडिलांनी दिलेल्या कपड्यांत फिरत होत्या, तेव्हा त्या अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. त्या दोघीही शाळेत नवीन होत्या, आणि त्यांच्या कपड्यांवरील डिझाइन्स इतक्या सारख्या होत्या की, त्या एकमेकींचे कपडे सहजी घालत असत. एजेमला आपलं बालपण आठवून भरून आलं. वडिलांनी दिलेल्या कपड्यांतील अभयामुळे तिला पूर्णपणे संरक्षित असल्यासारखं वाटे. ती पंधरा वर्षांची असताना एक दिवस तिची आई तिच्या खोलीत आली, आणि तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली की, आता तिचे कपडे उतरवण्याची वेळ आली आहे. तेव्हा ती खूप रडली होती. जे लोक श्रीमंत होते तेच फक्त आपल्या मुलींचे कपडे जास्त काळ त्यांच्या अंगावर ठेवून त्यांना विवस्त्र होण्यापासून वाचवू शकत. मुलींना पत्नीचे कपडे मिळेपर्यंत ते पैशाच्या जोरावर तसं करू शकत. परंतु एजेमचे वडील एका खेड्यात, गरिबीत वाढले होते, जिथे मुलींचे कपडे जमेल तितके लवकर उतरवले जात. काहींना तर दहा वर्षांनंतर लगेच विवस्त्र व्हावं लागे. तिच्या बाबतीत तर आधीच खूप उशीर झाल्यामुळे त्यांना ते अजून टाळणं शक्यच नव्हतं. आपल्या सामाजिक स्तरापलीकडे जाऊन ज्या कुटुंबांनी मुलींना जास्त वेळ संरक्षण दिलं होतं, त्यांचं काय होत असे, हे तिच्या वडिलांना माहीत होतं. त्याला अपवाद फक्त शारीरिक व्यंग असणाऱ्या मुलींचा असे. त्यांना त्यांच्या समूहातर्फे ‘समूह वस्त्र’ दिलं जाई. हे वस्त्र लोकांनी दान केलेल्या कापडाच्या तुकड्यांपासून बनवलं जाई. परंतु एजेमसारखी मुलगी जर वडिलांनी वेळ आल्यानंतरही कपड्यात संरक्षित ठेवली, तर नगर परिषद त्यांच्यावर कर लादून मुलीचा बाप तो भरूच शकणार नाही इथवर पुन्हा पुन्हा दुप्पट करत असे. तसं झाल्यास त्याची मुलगी सर्व जनतेसमोर विवस्त्र करून कुटुंबाची नाचक्की केली जात असे. एजेमच्या वडिलांना हा अपमान सहनच झाला नसता. त्यामुळे सर्व गोष्टी त्यांच्या म्हणण्यानुसारच केल्या जात.
ज्या दिवशी एजेमचे कपडे उतरवले गेले, त्या दिवसापासून तिच्या वडिलांनी तिच्याशी संपर्क तोडला. एखाद्या पुरुष माणसाने तरुण विवस्त्र मुलीशी बोलण्यातली असभ्यता टाळणे हा त्यामागील उद्देश होता. त्या वेळी एजेमला जिथे लोक तिला पाहू शकतील अशा ठिकाणी - शाळेत किंवा बाजारात किंवा घराबाहेर कुठेही जाणं नकोसं वाटे. तेव्हा चिडिमा अजूनही वडिलांच्या वस्त्रांत संरक्षित होती. तिने एकदा आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या आपल्या आई-वडिलांनाही भयभीत करणारे मनातले विचार बोलून दाखवले : तीसुद्धा तिचे कपडे उतरवून ठेवायला तयार होती. त्यामुळे ती आणि एजेम एकत्रितपणे, दोन विवस्त्र बेवारस मुली असल्यासारख्या सार्या जगाला सामोर्या जाऊ शकल्या असत्या.
चिडिमाच्या आई-वडिलांनी तिच्या विचारावर पावित्र्याचा बुरखा पांघरायचा प्रयत्न केला होता. वेळेआधीच आपले कपडे उतरवले जावेत असं म्हणणारी मुलगी परंपरेला किती समर्पित झाली आहे, असं त्यांनी दाखवलं. पण त्याला कडव्या धर्मांधतेचा वास येत होता. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी त्यांचे बरेच मित्र गमावले. त्याबद्दल आपल्या आई-वडिलांनी आपल्याला कधीही क्षमा केली नाही हे पुढे एकदा चिडिमाने एजेमला सांगितलं होतं.
एजेमचं एक मन तिला कायम असं सांगत होतं की, त्या दोघींना एकाच वेळी कुणीतरी मागणी घालून त्यांच्यावर हक्क सांगेल. पण चिडिमाला पत्नीचा पेहराव ती वीस वर्षांची असतानाच मिळाला आणि एजेम तिची प्रमुख मदतनीस झाली. पुढे चिडिमाला मुलगा झाला. त्यापाठोपाठ दोन मुली झाल्या. चिडिमाने जर ठरवललं असतं तर त्या दोघीही आयुष्यभर कपड्यात सुरक्षित राहू शकल्या असत्या. हे सगळं घडत असताना एजेम मात्र कुणी हक्काची मागणी न घातल्याने विवस्त्रा राहिली होती. कालपरत्वे तिची निवड होण्याची शक्यताही मावळत गेली.
तिने एका पेल्यात वाइन भरून घेतली आणि एका घोटातच ती संपवून टाकली. आणखी एक रिचवल्यावर तिने काल आलेली पत्रं तपासली. जे पाकीट उघडण्याचं ती टाळत होती, ते अखेर तिने उघडलं. त्यात तिच्या सदनिकेच्या भाडेकराराचं नूतनीकरण आणि त्याचबरोबर महिन्याचं भाडं वाढवल्याची सूचना होती. तिला आज जितके पैसे मिळाले होते, ते फार तर पुढचे दोन महिने काढण्यासाठी पुरेसे होते. परंतु वाढलेल्या भाड्यामुळे खर्चाचं सगळं गणितच धोक्यात आलं होतं, आणि चिडिमाने तिला सोडून दिल्यामुळे एजेम तिच्या श्रीमंत स्त्री वर्गालाही आता काही विकू शकणार नव्हती. जर अर्थार्जनाचा इतर कोणताही मार्ग सापडू शकला नाही, तर इथून एखाद्या लहानशा गावात स्थलांतरित होणं तिच्यासाठी गरजेचं ठरणार होतं.
जेव्हा तिने ही सदनिका प्रथम भाड्याने घेतली होती, तेव्हा ती एका मोठ्या खासगी आर्किटेक्चर कंपनीच्या मुख्य कार्यालयात काम करत होती. तिच्या नग्नतेमुळे जरी काहींचं तिच्याकडे लक्ष जायचं, तरी तिथे मागणी न घातली गेल्याने विवस्त्र राहिलेल्या इतर स्त्रियाही होत्या, आणि एजेम आपले काम उत्तम प्रकारे करणारी असल्यामुळे तिची प्रगती झाली होती. एका तपापेक्षा थोडा कमी काळ लोटल्यानंतर, ती तिशीपलीकडे पोचल्यानंतर, तिथल्या वरच्या व्यवस्थापन वर्तुळात विवस्त्र राहूनही काम करणारी ती एकमेव विवस्त्रा उरली होती.
तीन महिन्यांपूर्वी एजेम एका संभाव्य ग्राहकाला संगणकावर एक व्यावसायिक सादरीकरण करून दाखवत होती. नेहमीप्रमाणे त्या खोलीत ती एकमेव स्त्री होती. त्या ग्राहकाचं तिच्या पॉवरपॉईंटकडे अजिबात लक्ष नव्हतं. एक अविवाहित नि म्हणून विवस्त्र राहिलेली स्त्री कामावरून इतरांचं लक्ष विचलित करते आहे हे त्याच्या दृष्टीने अनुचित होतं आणि त्याचं लक्ष तिकडेच होतं. एजेमला अशा गोष्टींची सवय असल्यामुळे तिने त्यांचं संभाषण बजेटकडे वळवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्या ग्राहकाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा तिच्या सहकार्यांपैकी एकानेही त्याला हरकत घेतली नाही, उलट ते हातातल्या कागदांमध्ये आपलं हसू दाबत राहिले. ती त्या खोलीतून बाहेर पडली.
एजेम तोपर्यंत मानव संसाधन विभागाकडे कधीही तक्रार घेऊन गेली नव्हती. ती नेहमीच मूग गिळून गप्प बसत आली होती. तिच्या मानव संसाधन विभागाची प्रमुख कपडे घातलेली, पन्नाशीला पोचलेली एक स्त्री होती. तिने कंटाळवाण्या चेहर्याने एजेमचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर एजेमच्या अनावृत्त उरोजांकडे रोखून बघत ती म्हणाली, ‘‘ खोलीमध्ये सहज उपलब्ध होऊ शकणारी स्त्री असताना, तिथल्या पुरूषांनी पाय-चार्टकडे किंवा तत्सम बाबींकडे गंभीरपणे लक्ष द्यावं अशी अपेक्षा तू करू शकत नाहीस. जर तू विवस्त्र नसतीस तर कदाचित असं काही घडलं नसतं. आता तुला वस्त्र मिळेपर्यंत आम्ही तुला ग्राहकांच्या समोर पाठवू शकणार नाही.’’
एजेम त्या इमारतीच्या बाहेर पडली आणि तिथे पुन्हा कधीही परत गेली नाही. तिने स्वत:ला आपल्या घरात कोंडून घेतलं. मात्र एके दिवशी चिडिमा हातात व्होडकाची बाटली व कमरेवर तिची सर्वात धाकटी मुलगी घेऊन तिच्या दारावर टकटक करत आत शिरली. घरी बसून सौंदर्यप्रसाधने विकण्याचा प्रस्ताव देणारी जाहिरात तिच्या हातात होती.
आता ती जीवनरेषाही तुटली होती. वाचवलेले पैसे कधी संपणार हे आता काळच ठरवणार होता. एजेमने टीव्ही सुरू केला आणि चॅनल बदलत असताना तिला एक तरुण विवस्त्र स्त्री बातम्या देताना दिसली. ओनिटशा गावातील एका इमारतीला लागलेल्या आगीबद्दलची बातमी पार्श्वभूमीवर चालू असताना एजेमने आपलं रात्रीचं जेवण तयार केलं. कापलेली भाजी तव्यावर परतत असताना ‘मागणी न घातलेल्या विवस्त्र स्त्रिया’ हे शब्द अनेक वेळा ऐकल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने टीव्हीचा आवाज वाढवला.
बातमी देणार्या स्त्रीबरोबर वडीलकीची झाक असलेला एक वयस्कर गृहस्थ बोलत होता. त्याने आणखी जास्त तपशील पुरवला - ‘‘ती इमारत म्हणजे मागणी न घातली गेल्याने विवस्त्र राहिलेल्या स्त्रियांची लपून राहण्याची जागा होती, अशी अफवा होती. कापड तयार करण्याच्या आपल्या जबाबदारीपासून पळ काढून त्या स्त्रिया तिथे राहत होत्या. रस्ता चुकलेल्या त्या स्त्रियांना योग्य मार्गावर वळवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल या आशेने आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाला वरिष्ठांनी आग विझवण्यापासून थांबवलं. अखेर तिथल्या राखेत निदान तीन स्त्रियांचे मृतदेह सापडले. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.’’
एजेम मोठ्या शहरात राहण्याचं हे आणखी एक कारण होतं. छोटी गावं विवस्त्र राहिलेल्या स्त्रियांबाबत जास्तच असहिष्णू होती. ओसू जातीतील कामवाल्या बायका सोडून इतर विवस्त्र स्त्रियांना बेकायदेशीपणे तिथून हाकलून लावलं जात असे. एजेमने विचार केला की ओसू स्त्रियांना थोडं तरी स्वातंत्र्य होतं. या ओसू स्त्रिया इतरांकडे घरकाम करत असताना ओसू पुरूष तिने एके काळी डिझाइन केलेल्या घरांच्या बांधकामावर किंवा खाणीत मोलमजुरी करत होते. पण पुढे विचार करताना त्या स्वातंत्र्याचा उगम असंबद्धतेतून झाला होता हे लक्षात आल्यामुळे एजेमच्या मनातील असूया कमी झाली. तथापि ज्यांना मागणी घातली गेली नव्हती अशा बहुतेक सगळ्या विवस्त्र स्त्रियांसाठी एकच जागा होती. ती म्हणजे मोठमोठ्या कापड गिरण्या - जिथे त्यांच्यापेक्षा जास्त नशीबवान स्त्रियांसाठी कापड विणण्याचं काम करणं त्यांना शक्य होतं.
आग लागलेल्या इमारतीच्या गावाचे महापौर पत्रकार परिषदेसाठी टीव्हीच्या पडद्यावर अवतरले आणि म्हणाले,
‘‘आमचं हे सन्माननीय गाव सभ्य लोकांसाठी आहे. जर काही स्त्रियांना त्यांना कोणी मागणी न घातल्याने विवस्त्र अवस्थेत फिरायचं असेल तर त्यांनी दुसरीकडे जायला हवं. मालमत्तेच्या नुकसानाबद्दल आणि जे आगीतून बाहेर पडू शकले नाहीत, त्यांच्याबद्दल मला अत्यंत खेद होतोय. पण हे कुटुंबांचं गाव आहे. जगातील सर्वोत्कृष्ट गिरण्यांपैकी एक आमच्या गावाच्या सीमेलगत आहे. त्या स्त्रिया तिथे जाऊ शकल्या असत्या.’’ त्यानंतर कॅमेरा बातमीदारावर गेला. त्याने शहाण्यासारखी मान हलवली. त्याच्या चेहऱ्यावरील भाव नैतिक मूल्यांच्या अंमलबजावणीला मान्यता देतानाच मरण पावलेल्यांबद्दल हळहळ व्यक्त करणारेही होते.
भीतीच्या प्रचंड मोठ्या फुग्याशी एजेमच्या धास्तावलेल्या मनाचा झगडा सुरू झाला. तिचं आर्थिक बळ संपून तिला शहराच्या पलीकडील आतल्या भागात जाऊन कापड विणणार्या इतर विवस्त्र स्त्रियांबरोबर राहायला लागण्यासाठी किती वेळ लागणार होता? तिला एक नोकरी मिळणं आवश्यक होतं आणि तेही ताबडतोब.
नग्नावस्थेत एखाद्या स्त्रीला कोणत्या प्रकारची कामं करता येऊ शकतात? प्राथमिक पातळीवर काम सुरू करण्याचं एजेमचं वय आता मागे पडलं होतं. वीस वर्षांच्या तरुण मुलांच्या गराड्यात सतत काम करणं तिला अशक्य होतं. त्यांची लग्न पटापट झाल्याने ते दूर होण्याची शक्यताच जास्त असणार होती. त्याऐवजी ज्या ठिकाणी तिची नग्नता हा फार गंभीर प्रश्न नसेल अशा नोकरीच्या शोधात ती होती. एका नर्सिंग होममध्ये ती फक्त पाच आठवडे कामावर टिकली होती. पेशंटला भेटायला आलेल्या एका नातेवाईकाने तिच्या तिथे असण्याविषयी हरकत घेतली होती. एका कॉफीशॉपमध्ये अडीच तास काम केल्यावर तिला पूर्वीच्या एका सहकार्याला टाळण्यासाठी शॉपच्या मागील भागात लपून राहावं लागलं होतं. त्यामुळे दुसर्या दिवशी तिला ते काम सोडावं लागलं होतं. ती जिथे जिथे गेली तिथे तिला हे प्रकर्षाने जाणवलं की खासगी कंपनीत काम करत असताना ती किती संरक्षित होती. शहराच्या मध्यवर्ती भागापासून जास्तीत जास्त दूर असलेल्या ठिकाणी तिने नोकरीचा प्रयत्न करताच बरेचसे लोक, जेव्हा त्यांना कळून चुकलं की तिच्या अंगावर ओसू जातीची खूण नव्हती, तिच्याकडे सरळ बघत 'अजून पत्नीचे कपडे का मिळाले नाहीत' हे स्पष्टपणे विचारू लागले. एजेमने बर्याचदा ओसू स्त्रियांना कामानिमित्त काही तरी सांगून बाहेर पिटाळलेलं पाहिलं होतं. ओळखू याव्यात म्हणून त्यांचे केस भादरून टाकले गेले होते आणि त्यांच्या एका कानाच्या वर ओसू असण्याची खूण म्हणून जखम करून ठेवलेली होती. रस्त्याने जाणारे पादचारी त्या स्त्रिया म्हणजे जणू रस्त्यातील खांब वा पत्रपेट्या वा रस्त्याच्या कडेचा कचरा अशा वस्तू आहेत असं समजून त्यांना त्यांना टाळत असत. पण एजेमने त्यांना पाहिलं होतं.
तिच्या नोकरीचा शोध जसा तीव्र आणि निकडीचा झाला, तसा तिच्या अंगावरील साधा ओरखडासुद्धा तिला सुरीच्या धारेगत तीक्ष्ण वाटू लागला. अजूनही वडिलांच्या कपड्यात फिरणाऱ्या तरूण मुलींना नुसतं पाहूनदेखील एजेमला चीड येऊ लागली. तिला हसताना त्यांना हे कळत नव्हतं की त्याही लवकरच विवस्त्र होऊन आपलं संरक्षित आयुष्य गमावून बसणार होत्या. पत्नीच्या कपड्यात वावरणार्या वयस्क स्त्रियांनी दाखवलेल्या दयेचा तर तिला सर्वात जास्त राग यायचा. त्यांची कणव, त्यांचं गोड बोलणं आणि कुणीतरी अखेर तिला मागणी घालेल अशी दबलेल्या आवाजात व्यक्त केलेली आशा तिला सहनच होत नसे.
काही काळानंतर तिला एका ‘स्पा’मध्ये मसाज देण्याचं काम मिळालं. जिथे प्रत्येकजण आपले कपडे उतरवत असतो अशा ठिकाणी काम करताना तिला बरं वाटलं. कृत्रिम का होईना समानता वाट्याला आल्याने तिला आनंदी वाटलं. तिने काम सुरू केल्यानंतरच्या दुसर्या आठवड्यात एका श्रीमंत महिलेने स्पामध्ये प्रवेश केला. तिने अत्यंत उच्च दर्जाचा आणि महागडा वाटणारा पत्नी पेहराव परिधान केला होता, जो एजेमने कधीही पाहिला नव्हता. तिने स्वत:साठी स्पामधली प्रत्येक सेवा अंतर्भूत असणारं डीलक्स पॅकेज निवडलं.
‘‘आपण मला आपल्या पतीचा बँक खाते क्रमांक कृपया देऊ शकाल का?’’
‘‘माझा बँक खाते क्रमांक’’, असं जोर देऊन म्हणताना त्या स्त्रीने आपलं स्वत:चं कार्ड टेबलवर ठेवलं.
डेस्कवर काम करणार्या त्या मुलीने कार्डकडे पाहिलं, त्या स्त्रीकडे पाहिलं आणि स्पाच्या व्यवस्थापकाला बोलावण्यासाठी ती आत गेली. वेटिंगरूममधील सर्वांच्या नजरा त्या स्त्रीवर खिळलेल्या होत्या.
व्यवस्थापक एजेमच्या वयाची स्त्री होती. आत येताच तिने नव्या ग्राहक महिलेकडे पाहिले आणि तिच्या वागण्यातील बडेजाव गायब होऊन त्याची जागा मर्यादाशीलता आणि अपराधभावाने घेतली. ‘‘मी क्षमा मागते, ही मुलगी नवीन आहे. अजूनही वडिलांच्या कपड्यात वावरते आहे. कृपया तिला माफ करा.’’
सुंदर कपड्यातील ती स्त्री गप्प होती.
‘‘आम्ही आज अर्थातच आपल्याला दिलेल्या सेवेवर भरपूर सूट देऊ. तुमचा मसाज लगेच सुरू करण्यासाठी मारिया तयार आहे.’’
‘‘नाही,’’ ती स्त्री ठामपणे म्हणाली, ‘‘माझा मसाज हिने करावा अशी माझी मागणी आहे.’’
आपण कपाटात विविध सौंदर्यप्रसाधने नीट मांडून ठेवत आहोत, असं भासवणार्या एजेमने वळून तिच्याकडे निर्देश करणार्या स्त्रीकडे पाहिलं. थोड्याच वेळात ग्राहकांना ज्या खोलीत सेवा दिली जाते, तिथे तिने त्या स्त्रीला कपडे उतरवण्यासाठी मदत करायला सुरूवात केली. तिच्या महागड्या पेहरावाच्या तलम कापडाचा पोत किती मुलायम आहे, हे आपल्या गालावर घासून पाहिलं. तिने तो पेहराव अडकवून ठेवला, तेवढ्यातच तिथे आलेल्या व्यवस्थापिकेने तिला ओढत बाहेर नेलं आणि कर्कश्श पण खालच्या आवाजात ती म्हणाली,
‘‘तुला कळतंय का, ती कोण आहे ते? ती ओडिनाका आहे. जर ती इथून समाधानाने गेली नाही तर तुझी नोकरी गेली असं समज. मला वाटतंय, मी सगळं नीट स्पष्ट केलं आहे.’’ एजेमने मान हलवून होकार दिला खरा, पण मसाजच्या खोलीकडे परतताना भांबावल्याने ती चिंताक्रांत झाली होती. ओडिनाका ही हाताच्या बोटावर मोजता येतील अशा स्वतंत्र विचाराच्या अत्यंत श्रीमंत स्त्रियांपैकी एक होती, ज्यांनी कोणत्याही परिणामांचा विचार न करता पारंपरिक रीतिरिवाजांना तिलांजली दिली होती. कोणाचीही ‘मागणी’ न स्वीकारल्याने ती स्वतंत्र होती, परंतु तरीही तिने आपले स्वत:चे कपडे परिधान केले होते. तेही साधे कपडे न घालता डोळ्यांत भरतील अशी उंची वस्त्रप्रावरणे परिधान करून ती लोकांचे लक्ष वेधून घेत होती. जगभरातील अर्ध्यापेक्षा जास्त कापड गिरण्या तिच्या मालकीच्या होत्या. तिच्या अविश्वसनीय बंडखोरीमुळे तिच्यावर टीका झाली, पण तिच्या संपत्तीमुळे ती टीका शब्दांपुरतीच मर्यादित राहिली होती. ती कृतीत कधीच परावर्तित झाली नाही.
ओडिनाका आपले खाली सोडलेले पाय हलवत मसाज टेबलवर बसली. एजेमच्या सूचनेप्रमाणे ती आपल्या पोटावर पालथी झोपली. एजेमने तेल हातावर घेऊन किंचित कोमट केलं. तिने ओडिनाकाच्या घोट्यांवर तेल टाकलं, नंतर हातांनी ते पोटर्यांपर्यंत वर सरकवलं आणि तिचे स्नायू तळहातावरील तेलाने उबदार केले. हे करत असताना तिने ओडिनाकाला काही किरकोळ प्रश्न विचारले. तिला मसाज सुरू असताना बोलायला आवडतं की शांतपणे केलेला मसाज आवडतो हे तिला तपासायचं होतं. पण ही काळजी घेण्याची खरं तर एजेमला गरजच नव्हती. ओडिनाकाने खूप बोलून तिच्या प्रश्नांची उत्तरं तर दिलीच, शिवाय तिनेच एजेमला काही प्रश्नही विचारले. थोड्या वेळात तिने एजेमकडून तिची जीवनकथा माहीत करून घेतली : ती स्पापर्यंत कशी पोचली, आर्किटेक्ट म्हणून करिअर करायचं सोडून स्त्रियांचे स्नायू शिथील करण्याचं तिने का स्वीकारलं इ.
‘‘तुला विवस्त्र राहावं लागतं हे फारसं योग्य वाटत नाही, होय ना?’’ एजेमने आपलं मसाजचं काम सुरूच ठेवलं. अशा 'राजद्रोही' प्रश्नांची उत्तरं कशी द्यावीत हे तिला समजेना. ‘‘तुला ठाऊक आहे, तुझ्यात आणि माझ्यात खूप साम्य आहे’’, ओडिनाका पुढे म्हणाली. एजेमने तिच्या पिळदार शरीराचं निरीक्षण केलं. अनेक वर्षं व्यायाम केल्याने ती सडपातळ आणि बांधेसूद राहिली होती. तिने त्या दोघींमधल्या इतर फरकांचाही विचार केला. ओडिनाकाला तिच्या आयुष्यात कुठल्याही बिलाची काळजी करायला लागली नव्हती हा एक मोठाच फरक होता. एजेम हसली. ‘‘आपण फार दयाळू आहात, पण आपण एकाच वयाच्या असू हे सोडल्यास आपल्यात काहीही साम्य नाही.’’ तिने बोलण्यात शक्य तितकी सहजता आणत, आपल्या वाक्याचा शेवट प्रश्नाकडे झुकवत उत्तर दिलं. वयाबद्दलच्या गर्भित प्रश्नाकडे दुर्लक्ष करत एजेमकडे बघत ओडिनाका म्हणाली, ‘‘मला म्हणायचंय, आपण दोघी महत्त्वाकांक्षी स्त्रिया आहोत. नवर्यांना आपल्यावर हक्क गाजवायला नकार देऊन पुरूषप्रधान क्षेत्रांमध्ये आपला मार्ग आखण्याचा प्रयत्न करत आहोत.’’ फरक इतकाच आहे - एजेम मनात म्हणाली - तू जशी पूर्णपणे स्वतंत्र आहेस, तशी मी नाही. तुला मनाप्रमाणे पेहराव चढवून फिरता येतं आहे.
‘‘मी कपडे घालणं बेकायदेशीर असेल’’, एजेम प्रत्यक्षात म्हणाली.
‘‘बेकायदेशीर-कायदेशीर गेलं उडत. माझ्याकडे जेवढी संपत्ती आहे, ती तुझ्याकडे असेल, तर तू सगळ्या कायद्यांच्या वर जातेस. आता मला सांग, तुलाही कपडे परिधान करून जगायला आवडेल का?’’
ओडिनाका तिची तारणहार होती. तिने एजेमला तिच्या जुन्या सदनिकेतून त्वरित बाहेर काढलं. तिचा भाडेकरार रद्द करण्यासाठी जरूर ते पैसे दिले आणि स्वत:च्या मालकीच्या एका इमारतीत तिला राहण्यासाठी जागा दिली. शहरातील सर्वोत्तम रहिवासी भागांपैकी एका भागात ती इमारत होती. एजेमचं घर म्हणजे दोन बेडरूमची परिपूर्ण सदनिका होती. स्वयंपाकघर चांगलं मोठं होतं. त्या जागेला एक स्वच्छतेचा ताजेपणा होता, जणू ती बराच काळ रिकामी तरी होती किंवा तिथे पूर्वी राहणार्या माणसांचा वावर, त्यांचा गंध, त्यांचं व्यक्तिमत्त्व स्वच्छ धुऊन टाकल्याने त्या जागेला एक नितळ निर्मळपणा प्राप्त झाला होता. त्या जागेत एक स्वतंत्र इंटरकॉम होता जो त्या जागेची देखभाल करणार्या ओसू स्त्रियांशी जोडलेला होता. एजेमने फक्त गरजेनुसार स्वच्छतेसाठी सूचना देणं किंवा किराणा सामानाची मागणी करणं अपेक्षित होतं. त्या वस्तू तिच्या फ्रीजमध्ये आणून ठेवल्या जात. एजेमने जेव्हा विचारलं की तिच्या घरापासून तिची काम करण्याची जागा किती अंतरावर आहे, तेव्हा ओडिनाकाने तिला सांगितलं की एजेमला नको असेल तर तिने काम करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे स्पामधल्या कामाकडे न वळण्याचा सोपा मार्ग तिला उपलब्ध होता. तिला मिळालेला मोकळा वेळ त्या इमारतीतील इतर स्त्रियांची ओळख करून घेण्यासाठी तिला वापरता येणार होता.
तिथे राहणार्यांमध्ये एक होती डिलायला, जी कपडे आणि वागण्या-बोलण्याच्या पद्धतीमुळे ओडिनाकाची छोटी प्रतिकृतीच वाटे. परंतु तिच्यात ओडिनाकाच्या निम्मासुद्धा आत्मविश्वास नव्हता. तिथे असलेली डोरीन ही चाळिशीजवळ आलेली स्त्री एजेमची आवडती झाली होती. ती एका पुस्तकाच्या दुकानाची मालकीण होती. पुस्तक विक्रीच्या दृष्टीने पाहता तिचं दुकान नीट चालत होतं. ती अशी एक स्त्री होती जिला आपण कोण आहोत याची अगदी नीट कल्पना होती, आणि तिला ते आवडतही होतं. कपडे घालण्याचा पर्याय तिने स्वच्छेने नाकारला होता.
वाइनचे काही पेले रिचवल्यावर डोरीन म्हणे, ‘‘बघू दे त्यांना, माझं हे शरीर म्हणजे एक कलाकृती आहे.’’ ती आपले उरोज हातांनी आधार देत उचलून धरी. ते पाहून एजेम आणि इतर जणी नशेत हसू लागत.
तिथल्या बाकीच्या स्त्रिया - मोरायो, मुकासो आणि मर्यम - वागण्यात नम्र पण सर्वांशी अंतर ठेवून वागणार्या होत्या. कोणीही उद्धटपणाचा आरोप करू नये इतपत काळजी घेणारी सामाजिक देवाणघेवाण त्या करत इतकंच. एजेम आणि डोरीन त्यांना ‘थ्री एम’ म्हणत किंवा काही पेग पोटात गेल्यानंतर त्यांच्या हट्टीपणाबद्दल ‘एम्एम्एम्...नको’ असं म्हणत. काही वेळा त्या ओडिनाकाच्या रात्रीच्या कॉकटेल पार्टीत सामील झाल्या होत्या; परंतु काही आठवड्यातच त्यांनी येणं बंद केल्यानं पार्टीत फक्त चारच जणी उरल्या - ओडिनाका, डिलायला, डोरीन आणि एजेम.
स्त्रियांच्या ह्या गटामध्ये एजेमच्या नग्नतेवर कोणतेही तिरकस अभिप्राय कधी व्यक्त झाले नाहीत. तिला एखाद्या - किंवा कोणत्याही - पुरूषाशी, जो तिच्या भूतकाळातील चुका दुर्लक्षित करू शकेल, ओळख करून देण्याचे डोकेबाज प्रस्ताव दिले गेले नाहीत. ओडिनाका तिच्या प्रचंड मोठ्या व्यवसायाबद्दल बोलत राही, तर डोरीन तिच्या छोट्याशा पुस्तकाच्या दुकानाबद्दल. त्या एकमेकींना भयंकर व्यावसायिक सल्ले देत जे त्या दोघीही कधी स्वीकारत नसत. एजेम तिने सोडून दिलेल्या करिअरबद्दल थोडंसं बोले, पण त्यात भर घालण्यासारखं तिच्याकडे काही नसे. असं पहिल्यांदाच होत होतं की तिचा बुजरेपणा केवळ बुजरेपणाच होता. तिला कुणी मागणी न घातल्याचा तो पुरावा नव्हता किंवा तिने स्वत:मध्ये कशी सुधारणा करायला हवी यासाठी सल्ले द्यायचं ते निमंत्रणही नव्हतं.
इतरांना मध्येच थांबवून आणि प्रत्येक विषयावर आपलं वर्चस्व गाजवत ओडिनाका प्रत्येकीसाठी पुरेसं बोलत असे. एजेमला त्याबद्दलही काही हरकत घ्यावीशी वाटली नव्हती कारण त्या सर्वांपेक्षा ओडिनाकाचं आयुष्य जास्त रोचक असल्यामुळे त्याबद्दल त्यांना ऐकावंसं वाटत असे. तिच्या जन्मापासून ती वैभवात वाढली होती. साधारण एक दशकापूर्वी तिचे वडील निवृत्त झाल्यानंतर तिला वारसाहक्काने त्यांची कापड निर्मिती करणारी कंपनी मिळाली होती. त्यामुळे खरं तर त्या वेळी खूप मोठं वादळ उठलं होतं. परंतु जर एखाद्या अतिश्रीमंत घराण्याला त्यांच्या कुटुंबातील एका स्त्रीला कंपनीच्या प्रमुखपदी नेमायचं असेल तर ही चैन पैशाच्या जोरावर त्यांना सहज विकत घेता येणार होती. आणि जर त्या स्त्रीने लग्न न करताही कपडे परिधान करण्याचं ठरवलं आणि मागणी न घातली गेल्याने विवस्त्र राहिलेल्या इतर स्त्रियांना एकत्र करून त्यांची काळजी घेतली तर तिला थांबवण्याची हिंमत कुणाकडे असणार होती?
‘‘मी अशा जगाची निर्मिती करण्याची कल्पना करते आहे,’’ ओडिनाका नेहमी म्हणे, ‘‘ज्यात शरीरावरील कपडे उतरवणं ही कृती प्रत्येक स्त्री फक्त स्वत:च्या मर्जीने आपली निवड म्हणूनच करेल.’’
त्या इमारतीतील एजेमच्या पहिल्याच रात्री ओडिनाकाने एक वस्त्र आणलं आणि ती तिची भेट आहे, असं समजून एजेमने तिला हवं असेल तेव्हा ते घालावं असं सांगितलं. एजेम अनेक तास त्या कापडाकडे नुसती बघत राहिली होती. त्या इमारतीच्या आतमध्ये, स्वत:च्या घराच्या चार भिंतीतही ते कापड अंगावर घालण्याचं धैर्य तिला होत नव्हतं. ओडिनाकाच्या रात्रीच्या कॉकटेल पार्टीत तिच्या शेजारी बसून डोरीन मोठ्याने जाहीर करत असे, ‘‘एजेम, इथे या पार्टीत कपडे घालून मज्जा करणार्या स्त्रियांच्या विरुद्ध आपण दोघी विवस्त्रा असा सामना आहे.’’ सर्वांचा समाचार घेत ती खोडकर संध्याकाळची सुरूवात करून देत असे.
‘‘तू खरंच अशी विवस्त्र तुझ्या स्टोअरमध्ये जातेस काय?’’ एके दिवशी दुपारी एजेमने डोरीनला विचारले. ‘‘तू कपडे चढवून का जात नाहीस? तू ओडिनाकाच्या अखत्यारीतली स्त्री आहेस, हे कळल्यावर तुला कोणी काहीही म्हणणार नाही, खरं ना?’’ खरं तर हे म्हणत असताना एजेम स्वत:लाच पटवून देण्याचा प्रयत्न करीत होती की, तीसुद्धा तिला मिळालेलं वस्त्र अंगावर घालून मनात भीती न बाळगता लोकांमध्ये वावरू शकेल.
एजेमच्या म्हणण्याकडे लक्ष देता यावे म्हणून हातातल्या पावत्या पाहण्याचं थांबवून डोरीन म्हणाली, ‘‘हे बघ, आपल्याला अशा वस्त्रहीन स्थितीतच राहायला हवं. मी दहा वर्षांची असताना माझे कपडे उतरवले गेले. तुला कळतंय ना, इतक्या लहान वयात असं अनावृत्त झाल्यावर कसं वाटतं ते? मी जवळजवळ दशकाचा काळ सर्वांपासून लपून राहून काढला आहे. नंतर मला मी स्वतः, माझा अभिमान, माझं स्वत्व सापडलं. आता मला माझ्या स्वतःच्या त्वचेत कुणीही अस्वस्थ करू शकणार नाही. मी ठरवलंय की जिवंत असेपर्यंत मी कोणालाही माझी निवड करून माझ्यावर हक्क सांगू देणार नाही आणि आहे तशी विवस्त्रा राहीन. मला त्याबद्दल एक शब्दही कुणी बोलू शकणार नाही. ओडिनाका तिच्या पद्धतीने बंडखोरी करते, तर मी माझ्या पद्धतीने! कपड्यांच्या सुरक्षिततेसाठी मी तळमळत नाही. जर कायदा मी नग्न राहावं अशी अपेक्षा करीत असेल, तर मी नग्नच राहीन. आणि त्यांच्या कायद्यासाठी जर ते मला अस्वस्थ करू पाहात असतील तर त्यासाठी देवाने मला नरकात धाडलं तरी हरकत नाही.’’
स्वतःच स्वतःला सापडल्यानंतरचं स्वातंत्र्य अनुभवत काही आठवडे गेले. त्यानंतर एके रात्री एजेम जेव्हा ओडिनाकाच्या घरात इतर स्त्रियांच्या उपस्थितीत शिरली, तेव्हा तिने तिला मिळालेल्या वस्त्रात स्वत:ला लहान मुलीसारखं झाकून घेतलं होतं कारण ती एकच पद्धत तिला माहीत होती. तिचं अभिनंदन करणारी पहिली स्त्री होती डोरीन. तिने एजेमला मिठी मारली आणि हलक्या आवाजात पण हसत तिला म्हणाली, ‘‘तुझा विद्रोह तुझ्या पद्धतीनेच कर’’. मात्र तिच्या हास्याला दु:खाची झालर होती.
ओडिनाका तर आनंदाने ओरडलीच, ‘‘ही पाहा आणखी एक! आपण आता पार्टी केलीच पाहिजे.’’ तिने झटपट सगळी व्यवस्था केली. इंटरकॉमवरून तिच्या ओसू स्त्रियांना काय हवे याविषयी सूचना दिल्या. एजेमने आतापर्यंत ओसू स्त्रियांना तिथे प्रत्यक्ष काम करताना कधी पाहिलं नव्हतं. परंतु जेव्हा जेव्हा ती ओडिनाकाच्या किंवा डोरीनच्या जागेतून आपल्या राहत्या जागेत परत आली होती तेव्हा तेव्हा तिला बिछाना नीट आवरलेला आहे, बाथरूममधील आरशावरील डाग नीट पुसलेले आहेत, बेसिनमध्ये पडलेले टूथपेस्टचे अंश स्वच्छ केले आहेत असं आढळलं होतं. आणि तिच्या खोल्यांमध्ये तिथून नुकतंच कुणीतरी निघून गेलं असावं अशी शब्दांपलीकडची भावना जाणवली होती.
एजेम आणि इतर रहिवासी स्त्रियांना पार्टीसाठी तयार होण्यासाठी तासाभरापेक्षा कमीच वेळ लागला. सगळ्याजणी येऊन पोचताच ओडिनाकाचं घर पूर्णपणे भरून गेलं. पुरूष आणि स्त्रिया आपापले पेहराव मिरवीत एकमेकांत मिसळून बोलत होते. फक्त डोरीनच विवस्त्र होती. डोरीन सेटीवर बसून वाइनचे घोट घेत, लाजाळू स्मितहास्य करत बसली होती.
एजेमने त्यांच्यात मिसळण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु आयुष्यभर वस्त्रहीन राहिल्यामुळे स्वत:चे वस्त्र परिधान करूनही तिच्या मनात घर करून राहिलेली नग्नतेची भावना तिच्या मनातून जाऊ शकली नव्हती. ओडिनाकाने तिला स्त्रियांबरोबरच्या संभाषणात ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु एखाद-दुसरा शब्द बोलण्याखेरीज तिला फारसं बोलता आलं नव्हतं. स्वत:ला आणखी पंचाईत होण्यापासून वाचवलेलं बरं म्हणून ती दूर झाली. अखेर एका कोपर्यात उभे राहून सगळा सोहळा बघत ती थांबून राहिली.
एक माणूस तिच्या शेजारच्या भिंतीवर रेलून उभा राहीपर्यंत एजेमला मुळीच कल्पना नव्हती की, तिलाही कुणीतरी पाहात असेल. याच माणसाला तिने ओडिनाकासमोर उभं राहून नाटकीपणे झुकून अभिवादन करताना पाहिलं होतं. तो तिला म्हणाला,
‘‘तर तूच ती नवीन स्त्री, बरोबर?’’
‘‘होय. मला वाटतं मीच ती.’’
‘‘तू तर अगदी व्यवस्थित दिसते आहेस. तुझ्यावर कुणी हक्क कसा सांगितला नाही?’’ एजेम एकदम अस्वस्थ झाली. तिने विचारलं, ‘‘व्यवस्थित शब्दाचा अर्थ काय होतो?’’ त्याने तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. ओडिनाकाकडे निर्देश करत तो म्हणाला, ‘‘तुला ठाऊक आहे, मी ती मुलगी होती तेव्हापासूनच तिच्यावर हक्क सांगण्याचा प्रयत्न करतोय. आम्हा दोघांचं एकत्र येणं एक महान आख्यायिका झाली असती. सर्वश्रेष्ठ कापड उत्पादक आणि सर्वश्रेष्ठ कापूस उत्पादक दोघांचं एकत्र येणं! तुला काय वाटतं?’’
एजेम आणखी आकसून गेली. खरं तर तिचा त्या गोष्टीशी काहीच संबंध नव्हता.
‘‘त्याऐवजी ती असा राडारोडा गोळा करीत बसलीय.’’
त्याच्या उद्धटपणामुळे अवाक् होऊन एजेम तिथून वळली, पण तो फक्त हसला आणि खोलीच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या कुणाला तरी त्याने हाक मारली. त्यामुळे एकाएकी प्रत्येकाचं हसणं जणू तिच्यावरच केंद्रित झाल्यासारखं एजेमला वाटलं. प्रत्येक जण तिच्याकडे बघत कुत्सितपणे हसत होता. तिला वाटलं की ती पुन्हा मागे जाऊन एक लहान मुलगी झालीय. ताठ मानेने चालता यावं म्हणून चिडिमाच्या घट्ट आधाराची गरज असलेली लहान मुलगी. घरी परतण्यासाठी ती हळूच तिथून बाहेर पडली.
वाटेत तिची डिलायलाशी गाठ पडली. तिच्या हातामध्ये कोरीव नक्षीकाम केलेली एक लाकडी पेटी होती. ही मौल्यवान दुर्मिळ वस्तू तिला वारसाहक्काने मिळाली होती. एजेमने त्यांच्या आधीच्या भेटीत ती पेटी पाहिलेली असल्याने तिला ती लगेच ओळखता आली. ओडिनाकाला प्रचंड असूया वाटे अशा काही गोष्टींपैकी ती एक होती. तिला ती मिळवता आली नव्हती कारण ती कुठे मिळेल हे तिला कळू शकलं नव्हतं. त्यामुळे ओडिनाकाने अनेकदा आग्रहपूर्वक मागणी केली होती की डिलायलाने ती आणून सर्वांना दाखवावी, म्हणजे ओडिनाकाला ती नीटपणे न्याहाळून तिचं कौतुक करता येईल. डिलायलाने त्याला नकार दिला होता. आपला मौल्यवान खजिना हे एक गूढ रहस्यच राहण्यात तिचं समाधान होतं.
एजेमला डिलायला फारशी आवडत नव्हती. ती ओडिनाकाची छोटी प्रतिकृती वाटत असलेही कदाचित, परंतु डिलायला वागण्याबोलण्यात आपल्या उच्च कुळाचा वृथा बडेजाव मिरवत असे. एजेमची घालमेल इतकी स्पष्ट दिसत होती की डिलायला थांबली. एजेम आणि पार्टीचा आवाज बंद करणारा दरवाजा यांच्या दरम्यान कुठे तरी ती बघत राहिली.
‘‘सगळं ठीक आहे ना?’’ तिने विचारलं.
एजेमने मान हलवली. परंतु तिची ती हालचाल इतकी किंचितशी होती, की जणू तिने सांगितलं -काही ठीक नाहीये. तिने ओळखलं की डिलायलाला तिच्याविषयी काळजी वाटतेय पण दुसरीकडे तिला पार्टीचाही आनंद घ्यायचाय. या दोन्हीमध्ये संघर्ष होतोय. डिलायलाने तिचे खांदे एका विशिष्ट पद्धतीने हलवले, मूठ आवळून धरली व डोक्याला झटका देऊन डोकं वाकवलं. या तिच्या हालचालींमुळे एजेमला एकाएकी बसमधल्या त्या ओसू स्त्रीची आठवण झाली. एजेमच्या चेहर्यावरील भाव बदलले असावेत. कारण डिलायलाने आपला हात चोरट्यासारखा पण जाणीवपूर्वक वर करून तिच्या डोक्यावरचे केस सारखे केले - अगदी अशा ठिकाणी जिथे तिची ओळख पटावी म्हणून एखाद्या सरकारी सुईणीने ती सहा महिन्यांची असताना केलेला व्रण असू शकला असता. असा व्रण जो दर दोन वर्षांनी, ती अठरा वर्षांची होईपर्यंत पुन्हा करण्यात आला असेल. एजेमचं ओसू लोकांबद्दलचं ज्ञान या पद्धतीपुरतंच मर्यादित होतं. तिच्या घरचे लोक ओसू लोकांशेजारीच राहात होते, पण त्यांना एकमेकांविषयी काहीही माहीत नव्हतं.
डिलायलाच्या हातातली पेटी पाहून एजेमच्या मनात विचार आला : जर एखादी ओसू मुलगी खरोखर फार हुशार आणि धीट असती, तिच्या डोक्यावरचे केस खूप दाट असते तर ती तिच्याकडे असणारी सर्वात मौल्यवान वस्तू - उदा. पिढ्यानपिढ्या घरात असलेली एखादी कोरीव काम केलेली पेटी - घेऊन मध्यरात्री खूप दूर पळून जाऊ शकली असती. आजपर्यंत तिने आयुष्यात कधीही न केलेल्या प्रवासापेक्षा जास्त प्रवास करून ती एखाद्या शहरात पोचली असती जिथे तिला ओळखणारं कुणी नसणार होतं. आणि ती हुशार असल्यामुळे तिथल्या लोकांच्या तिला माहीत असणाऱ्या जगात ती अगदी अलगदपणे एकरूप झाली असती कारण आयुष्यभर तिला त्यांची सेवा करावी लागणार होती.
हा विचार तिच्या मनाचा पूर्ण ताबा घेण्यापूर्वीच डिलायलाच्या चेहर्यावरील अनिश्चिततेचं एका कृत्रिम चांगुलपणात परिवर्तन झालं आणि एजेमच्या खांद्याला हलकेच स्पर्श करत ती म्हणाली, ‘‘तर मग छान विश्रांती घे.’’ आणि तिने पार्टीत सहभागी होण्यासाठी स्वत:ची सुटका करून घेतली.
पार्टीचा आनंद लुटणार्या मंडळींपैकी शेवटची व्यक्ती पहाटेच्या सुमारास निघून गेल्यानंतर एजेमला जाग आली. आठ वाजेपर्यंत ती आपल्या खोलीतच राहिली. नंतर ओडिनाकाच्या दार सतत उघडं ठेवण्याच्या शिरस्त्याच्या फायदा घेत एजेम तिच्या उपकारकर्तीच्या घरात शिरली. तिने स्वत:च्या डोळ्यांनी पार्टीला आलेल्या लोकांची गर्दी पाहिली नसती, तर आत शिरताच आदल्या रात्री तिथे पार्टीचा धुडगूस सुरू होता यावर तिचा विश्वासच बसला नसता. तीन तासात कुणी तरी एकीने किंवा अनेकजणींनी तिथे आलेल्या पन्नास पाहुण्यांनी मागे ठेवलेल्या प्रचंड नासधुसीचा पसारा पूर्णपणे आवरून टाकला होता. एजेमच्या आठवणीप्रमाणे तिथे निदान दोन पेल्यातली वाइन जमिनीवर सांडली होती आणि एका बुटक्या माणसाने टेबलाच्या कडेवर चढून भाषण ठोकण्याचा प्रयत्न केला होता. जगातल्या सर्वात श्रीमंत स्त्रियांपैकी एकीला आवडणाऱ्या स्वच्छ, आधुनिक पद्धतीनुसार सगळं व्यवस्थित करून ठेवलं गेलं होतं. अशी स्त्री, जिने वरकरणी पाहता एजेमसारखा ‘कचरा’ गोळा केला होता. या संदर्भात आपल्याला ओडिनाकाला नक्की काय सांगावंसं वाटतंय, याविषयी तिची तिलाच खात्री नव्हती. ओडिनाकाच्या पाहुण्यांपैकी कुण्या एकाने तिचा अपमान केला होता अशी लहान मुलीसारखी तक्रार ती करू शकणार नव्हती. परंतु तिला जखम झाली होती आणि त्यावर छोटीशी फुंकर घातली जावी अशी तिची अपेक्षा होती.
कंबरेपर्यंत पांघरूण ओढून घेतलेली ओडिनाका तिच्या बिछान्यात लोळत पडली होती. ‘‘तुला पार्टीत मजा आली ना, एजेम? मी तुला अजूशी बोलताना पाहिलं होतं. तो आत्ताच तर गेला,’’ भुवया उडवत ओडिनाका म्हणाली.
आता एजेम त्याच्या विरोधात फारसं बोलू शकणार नव्हती.
‘‘आमचा संवाद खूप छान झाला,’’ ती म्हणाली.
‘‘फारच छान,’’ ओडिनाका म्हणाली, ‘‘मला माहीत आहे त्याच्याशी बोलणं अवघड असतं. तो जे
बोलला असेल, त्याकडे लक्ष देऊ नकोस.’’
ओडिनाकाने इंटरकॉम दाबला आणि ब्रेकफास्टचा ट्रे मागवला. नंतर तिने आदल्या रात्रीबद्दल बोलायला सुरूवात केली. पार्टीतल्या काही प्रसंगांवर हसताना त्या प्रसंगी एजेम तिथे नव्हती, हे तिच्या लक्षातही आलं नाही.
दहा मिनिटांनंतर तिने इंटरकॉम पुन्हा दाबला आणि जवळजवळ ओरडूनच विचारलं, ‘‘माझा ट्रे कुठे
आहे?’’ एजेमच्या चेहर्यावरील भाव पाहून तिने आपले डोळे गरागरा फिरवले.
‘‘आता तूही त्यांची बाजू घेऊन बोलू नकोस.’’
एजेमने ओसू स्त्रियांची बाजू घेण्यासाठी उघडलेलं तोंड लगेचच मिटलं. ती जे बोलू बघत होती त्यातल्या अनाकर्षक क्रांतीकारकपणामुळे आणि त्यातून आपण स्वतःचाच बचाव करतो आहोत असं वाटल्यामुळे एजेमला शरमिंदं व्हायला झालं.
‘‘तू त्या डोरीनसारखीच आहेस’’, ओडिनाका पुढे म्हणाली, ‘‘हे बघ, या स्त्रियांची एक पलटण मी नोकरीला ठेवली आहे. त्यांना दिलेलं काम त्यांनी करायला हवं. तुला आठवत असेलच हे कसं होतं, होय ना?’’
ओडिनाकाने टीव्ही सुरू केला. पर्यटनाची एक जाहिरात सुरू होती. त्या टूरमध्ये मुलांना कापड कसं तयार होतं हे कळावं म्हणून कुटुंबासाठी एका टेक्स्टाइल संग्रहालयाच्या प्रवेशिका देण्यात आल्या होत्या. ती जाहिरात बघून एजेमला शाळेत असताना पाहिलेला एक माहितीपट आठवला. त्यात कुणाही पुरूषाने न निवडल्याने विवस्त्र राहिलेल्या स्त्रियांना अतिशय वाईट परिस्थितीत एका भकास वसतिगृहात डांबून ठेवलं होतं. तिथे त्यांना रेशनवरचं अन्न दिलं जाई. पहारेकरी त्यांना शिव्या देऊन जे ‘संरक्षण’ देत ते संरक्षण सोडून सर्व काही होतं. आपल्याला अशा भयंकर जागी ठेवलं जाईल, ही भीती स्त्रियांच्या मनात ठसवण्यासाठी तो माहितीपट तयार करण्यात आला होता आणि त्याचा उद्देश सफलही झाला होता.
जेव्हा टीव्हीवर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला, तेव्हा ओडिनाकाने टीव्हीचा आवाज आणखी वाढवला. एजेमसाठी ती तिथून निघून जाण्याची ती सूचना होती.
एजेमने ठरवलं की नवीन कपडे घालून सर्वप्रथम डोरीनला तिच्या दुकानात जाऊन भेटायचं. तिच्या मनात खदखदत असलेलं दुःख कमी करण्यासाठी तिच्याशी काय बोलायचं हे डोरीनला नक्की ठाऊक असणार याची एजेमला खात्री होती. शिवाय डोरीनला कदाचित डिलायलाचा पुरेसा इतिहास माहीत असण्याची शक्यता होती. त्यातून ती एजेमच्या मनातला अनियंत्रित संशय शांत करू शकली असती. डोरीनने तिला बऱ्याचदा बुक स्टोअरला भेट देण्यासाठी निमंत्रित केलं होतंच. - ‘‘तू इथं काही कायमची राहू शकणार नाहीस. ये. मी काय केलं आहे ते पाहा. पुरूषाने न निवडलेली विवस्त्र स्त्री स्वत:च्या हिंमतीवर काय निर्माण करू शकते ते बघच.’’
ओडिनाकाच्या संरक्षणाखाली स्वत:चे कपडे अंगावर घालणं ही वेगळी गोष्ट होती. एजेमने आरशासमोर उभं राहात, स्वतःकडे पाहात निरीक्षण केलं. तिच्या पोटाचा मऊपणा, ज्याचा तिला अभिमान होता ते तिच्या पायाचे बळकट स्नायू, किंचित ओघळणारे उरोज. तिने वस्त्र उचललं आणि स्वत:समोर धरलं. छान होतं ते. तिला भेटलेल्या उच्चभ्रू वर्गातील स्त्रियांनी ते परिधान करून पट्ट्याने कसं बांधलं असतं याची तिला जमेल इतकी नीट नक्कल करत तिने ते साध्या पद्धतीने अंगाभोवती लपेटलं.
वयात आल्यापासून आजपर्यंतच्या तिच्या आयुष्यात प्रथमच तिच्याकडे कुणीही निरखून पाहिलं नव्हतं. रस्त्याच्या कडेने, पादचारी मार्गावरून चाललेल्या एका माणसाच्या नजरेला नजर देऊन पाहण्याचं धैर्य जेव्हा तिने दाखवलं, तेव्हा त्याने आदराने मान झुकवली. ते पाहून धक्का बसल्यानं ठेच लागून ती पडणारच होती. हे काही चुकूनमाकून घडलं नव्हतं. प्रत्येक पुरूषाने आणि स्त्रीने तिला वेगळी वागणूक दिली होती. बहुतेकांनी 'रस्त्यावरील आणखी एक देह' म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. पण जेव्हा त्यांनी तिची दखल घेतली, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया मित्रत्वाच्या होत्या. एजेमला वाटलं की आजवर सुरक्षित वाटण्यासाठी सवयीचं झालेलं तिचं खांद्याला पोक काढून चालणं आता सरळ होऊन सर्वसामान्यांसारखं झालं होतं, जणू काही तिला आता मोकळेपणाने वागण्याची परवानगी मिळाली होती. ती प्रत्येक पाऊल उत्साहाने टाकत होती. तिच्या चालण्यात सळसळ जाणवत होती. कपड्यांची ढाल मिळाल्याने तिच्या शरीराचा प्रत्येक भाग प्रत्येक पावलागणिक जणू नाचत होता. वस्त्रात लपेटलेल्या तिला आजपर्यंत कधी नव्हे इतकं स्वतंत्र असल्यासारखं वाटत होतं.
एजेम इतकी आनंदात होती की, तिने जेव्हा एका ओळखीच्या व्यक्तीचा चेहरा पाहिला तेव्हा त्या व्यक्तीने काही महिन्यांपूर्वीच आपल्याशी असलेली मैत्री तोडली होती हे आठवण्याच्या आतच तिने हसून हात हलवला होता. ती व्यक्ती होती चिडिमा. तिने दोलायमान अवस्थेतच हात उंचावला, पण लगेचच ती हसत एजेमजवळ आली.
‘‘तू कपडे घातले आहेस! तुला कुणी तरी मागणी घातली आहे! जरा वळ बघू, मला बघू दे. तुझं पत्नी-वस्त्र छान आहे. तुझ्या मागणी समारंभाला मला बोलवलं नाहीस! वाईट वाटतंय मला...’’ तिचे शब्द मित्रत्वाचे होते, पण तिच्या स्वरात ताण होता, त्यांच्या शेवटच्या भेटीतले शब्दांचे पडसाद अजूनही हवेत तरंगत होते.
‘‘तसा कसलाही समारंभ झाला नव्हता. तुला निमंत्रित करण्यासारखं काही झालंच नव्हतं.’’ चिडिमाचं हास्य निवळलं. ‘‘खोटं बोलायची गरज नाहीये. मला ठाऊक आहे, मी तुझ्याशी वाईट वागले. मला माफ कर.’’
‘‘नाही, खरंच तसं काही झालं नव्हतं.’’ सगळं सांगण्याच्या अनावर इच्छेने एजेम तिच्याजवळ सरकली. त्यांची पूर्वीची जवळीक तिला पुन्हा मिळवायची होती. ‘‘हे माझं वस्त्र असून मीच ते माझ्या अंगावर चढवलं आहे.’’
हे चिडिमाला समजायला एक क्षण जावा लागला. नंतर तिला राग आला. मनात शिल्लक राहिलेल्या मायेपासून तिने स्वत:ला मागे खेचलं. तिच्या हसण्यात आता कृत्रिम सभ्यपणा डोकावत होता. ‘‘तू तुझ्या नवऱ्याबरोबर अगदी आनंदात असशील?’’
‘‘चिडिमा, मला नवरा वगैरे कुणी नाहीये. मी स्वत:च माझं शरीर झाकलं आहे.’’ चिडिमाचा चेहरा इतका क्रूर दिसू लागला की एजेम मागे सरकली. इतकी की मागून जाणार्या एका माणसाला तिचा धक्का लागला. पण त्यानेच तिची माफी मागितली. ‘‘हे तू करते आहेस? हे खरंच तुझे कपडे आहेत? तुझ्यासारख्या चांगल्या कुटुंबातील मुलीनं हे करावं? माझा विश्वासच बसत नाही.’’ एजेमप्रमाणे चिडिमाने स्वत:चा आवाज खाली केला नव्हता. त्यामुळे शेजारच्या पादचार्यांनी त्यांच्याकडे विस्मयाने पाहिलं. एजेमने तिला आवाज खाली करायला सांगितलं. ‘‘अरेच्चा, तुला आता लाज वाटतेय का? तुला अभिमान वाटणार नाही असं काही मी केलं की काय?’’ एजेम तिथून निघून जाण्यासाठी वळली. चिडिमाने तिच्या वस्त्राला पकडून तिला थांबवलं आणि आवाज खाली करत ती म्हणाली, ‘‘तुला वाटतंय तू कपडे घातले आहेस, पण तू अजूनही नग्न, विवस्त्रच आहेत. तू कितीही महागडे कपडे घातलेस तरी त्यात बदल होणार नाही. कसला मूर्खपणा आहे हा!’’
तिचं हे बोलणं द्वेष आणि आकसानं भरलेलं होतं. तसं बोलून एजेमला दुखवायचा तिचा हेतू स्पष्ट होता, आणि तो साध्य झाला होता. एजेमने आपलं वस्त्र आपल्या जुन्या मैत्रिणीच्या मुठीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण चिडिमाने ते सोडलं नाही. ती पुढे बोलतच राहिली जरी तिचा आवाज अश्रूंमुळे तुटल्यासारखा होत होता.
‘‘काही तरी गमावल्याखेरीज तू स्वत:ला अशी कपड्यात झाकून घेऊ शकत नाहीस. तुला असं करता येणार नाही. हे बरोबर नाहीये. मी तुझ्यासाठी एवढं सगळं केल्यानंतर तर हे अजिबातच बरोबर नाहीये.’’
चिडिमाला आता अश्रू आवरत नव्हते आणि तिच्या सैल झालेल्या पकडीचा संधी म्हणून उपयोग करत एजेम जेव्हा एकदम वळली, तेव्हा तिच्याही डोळ्यांत अश्रू तरळत होते. एजेमच्या मनात आलं, वैभवात न्हाऊन निघालेल्या ओडिनाकाच्या घरात आपण कायदा झुगारून देऊन जगतोय हे विसरणं सोपं होतं. रात्रीमागून रात्री हातातले ग्लासेस किणकिणवत वाइन पिणंदेखील सोपं होतं. एजेमला हे वस्त्र मिळणं शक्य व्हावं, म्हणून कुठल्या स्त्रीने काय सोडून असेल? ती स्वत:च्या इच्छेने विणकाम करत होती की वेठबिगार होती? वयाचा भर ओसरल्यानंतर सरकारच्या मदतीवर अवलंबून असलेली? एजेमला आता त्या वस्त्रामुळे खाजल्यासारखं वाटायला लागलं होतं, जणू ते वस्त्र धातूच्या तारांनी विणलेलं होतं.
एजेम जशी आली होती तशीच ओडिनाकाच्या इमारतीमधल्या सुरक्षित जगण्याकडे परतली होती. धास्तावल्यामुळे खाली कोसळण्याच्या बेतात असलेली एजेम घराची किल्ली शोधताना गोंधळून गेली होती. एकदा आत आल्यावर तिने आपल्या अंगाचं ओझं दारावर टाकलं आणि श्वास घेत ती खाली जमिनीकडे सरकली. तिला काहीतरी जाणवलं म्हणून तिने इकडेतिकडे पाहिलं तेव्हा तिला कोपर्यात उभी असलेली ओसू स्त्री दिसली. तिची उजळ कांती भिंतीच्या काळसर-तपकिरी रंगात मिसळून गेली होती. तिच्या डोक्यावर एका बाजूला व्रणाचा मांसल गोळा दिसत होता. ती एजेमच्याच वयाची किंवा तिच्याहून थोडी मोठी असावी. तिच्या हातात सफाई करण्याच्या द्रावणाची बाटली आणि पुसण्यासाठीचं एक फडकं होतं. ती नग्न होती. तिचे पडलेले खांदे आणि डोळ्यातले सावध भाव सांगत होते की तिचं नग्न असणं तिला सुखाचं वाटत नव्हतं. हे असे भाव एजेमने किती वर्षांपासून स्वत:च्या चेहर्यावर बाळगले होते! ती ज्यात जवळजवळ बुडून मेली होती ती लाज कितीतरी वर्षापासून तिला छळत होती.
तिने वडिलांनी दिलेले कपडे गमावले त्याच दिवशी तिने वडिलांना असं करू नका म्हणून खूप विनवलं होतं. जेव्हा ते तिच्या अंगावरील कपडे दूर करत होते तेव्हा ती त्यांच्याशी खूप झगडली होती. तिची आई तिला ओरडून सांगत होती की तिने हे सगळं समजून घ्यावं, पण एजेमचं डोकं फिरलं होतं. आपल्या वस्त्राचं टोक तिने बोटांनी घट्ट धरून ठेवलं होतं. त्यांनी सर्व ताकदीनिशी तिची बोटं सोडवून घेऊन उरलंसुरलं कापडही दूर केलं होतं. जेव्हा तिच्या वडिलांनी तिचे सगळे कपडे उतरवले तेव्हा एजेमने तिच्या हातापायांनी स्वत:चं शरीर झाकून त्यात स्वत:ला गुंडाळून घेतलं होतं. त्या दिवसापासूनचा तिचा प्रत्येक दिवस मनाला धास्तावणार्या भीतीशी झुंजण्यात गेला होता. ती भीती तिने गिळून टाकून पोटात खोलवर साठवली होती. तिथून उद्रेक होऊन ती कधीच बाहेर पडू शकणार नव्हती.
त्या ओसू स्त्रीने मानेनेच तिला अभिवादन केलं आणि नंतर भिंतीत असलेल्या फळीसदृश पॅनलमधून आत जात ती अदृश्य झाली. पॅनल आवाज न करता आपल्या मूळ जागी सरकलं आणि स्थिर झालं. जेव्हा एजेम त्या भिंतीजवळ गेली तेव्हा तिला तिथे कुठलीही फट दिसली वा जाणवली नाही. तिने तिथे खरवडून पाहिलं. नखं घुसवायचा प्रयत्न करताना तिची नखे तुटल्यासारखी झाली. तिच्या बाजूने कुठलंच प्रवेशद्वार न सापडल्याने तिने दार ठोठावलं आणि आपल्याला स्वागतपूर्वक आत घ्यावं म्हणून हाका मारल्या.
लेस्ली नेका अरीमा
अनुवाद : विलास साळुंके
(लेस्ली नेका अरीमा ही नायजेरियन लेखिका जागतिक साहित्यात स्वतःचा ठसा उमटवू पाहणारी लेखिका आहे. द न्यू यॉर्कर, हार्पर्स, ग्रँटा अशा नावाजलेल्या प्रकाशनांमधून तिचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. तिच्या कथांना नॅशनल मॅगझिन अॅवॉर्ड, कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राइज, ओ. हेन्री अॅवॉर्ड इत्यादी पारितोषिकं मिळाली आहेत. लिंगाधारित विषमतेचा, वांशिक भेदभावाचा भयचकित करणारा 'डिस्टोपिया' मांडणारी 'स्किन्ड' ही वाचक-समीक्षकांनी नावाजलेली तिची कथा. आफ्रिका खंडातील लेखकांनी लिहिलेल्या मूळ इंग्लिश किंवा प्रादेशिक भाषेतून इंग्लिशमध्ये अनुवादित झालेल्या कथांपैकी सर्वोत्कृष्ट कथेस दरवर्षी 'केन' पुरस्कार दिला जातो. हा मान २०१९ साली 'स्किन्ड'ला मिळाला होता.)
Image Credit - Designed by Freestockcenter / Freepik