वास्तवाला भिडणार्‍या ‘वायर’च्या पत्रकार

या वर्षी १ जानेवारी २०२२ला सगळे जग नवीन वर्षाचे स्वागत करत असताना; ‘बुली बाई’ नावाच्या वेबसाईटवर भारतातील मुस्लीम महिलांचा लिलाव करण्यासाठी बोली लावली जात होती. सोशल मीडियावर असलेले मुस्लीम महिलांचे फोटो त्यासाठी अपलोड करण्यात आले होते. इस्मत आरा या मुलीचा फोटो त्या दिवशी ‘डिल ऑफ द डे’ म्हणून जाहीर करण्यात आला होता. इस्मत आरा ही ‘द वायर’ची पत्रकार आहे.

१ फेब्रुवारी २०२१ रोजी रोहिणी सिंगला सोशल मीडियावर धमकी आली. बलात्कार आणि खुनाची धमकी राजस्थानमधील एका विद्यार्थ्याने दिली होती. रोहिणीने शेतकरी आंदोलनाच्या दिलेल्या बातम्या त्याला आवडल्या नव्हत्या.

सप्टेंबर २०२० पासून पत्रकार नेहा दीक्षितला धमक्या दिल्या जात होत्या. शेवटी २७ जानेवारी २०२१ तिने ट्विट करून सांगितले की, काही महिन्यांपासून तिचा पाठलाग केला जात होता आणि तिला बलात्कार, acid हल्ला आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. तिच्या घरातही घुसण्याचा प्रयत्न झाला.

९ ऑक्टोबर २०१७ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह याने अहमदाबाद मेट्रोपॉलिटन न्यायालयात ‘वायर’ विरोधात फौजदारी दावा दाखल केला आणि त्यात ‘वायर’च्या वाचक संपादक पामेला फिलिपोज यांनाही टार्गेट करण्यात आले. हा इतिहास नाही. हे वर्तमान आहे. हे वर्तमान भारताचं आहे. हे वर्तमान पत्रकारितेचं आहे. स्वतंत्र पत्रकारितेचं आणि महिला पत्रकारांचंदेखील!

या सगळ्या जणी ‘द वायर’मध्ये काम करतात, किंवा ‘द वायर’शी जोडलेल्या आहेत. हा देश भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा बनाव करून ‘अण्णा आंदोलन’ उभे राहिले. देश एका विशिष्ट दिशेने नेण्यात आला. एक आभासी वातावरण तयार झालं आणि त्याची परिणती म्हणून नवी सत्ता आली. ही केवळ दुसऱ्या पक्षाची सत्ता नव्हती. ही दुसरी संस्कृती होती. ही द्वेष संस्कृती होती आणि ती रीतसर आणण्यात आली. स्वातंत्र्यलढ्यातून निर्माण झालेली भारताची एक संकल्पना होती, ती उद्ध्वस्त करण्यात आली. देश दोन भागांमध्ये विभागला गेला. आणि ज्यांच्याकडून अपेक्षा करायची ती भारतामधली माध्यमं मात्र सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेली. याच काळामध्ये इंटरनेट घराघरामध्ये पोहोचलं आणि सोशल मीडिया फुलू लागला. सोशल मीडियावर आलेली माहिती वेगात पसरू लागली. वास्तवता, सवंगता आणि खोटेपणा एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळून गेला. काय खरे आणि काय खोटे याचे एक धूसर चित्र तयार झाले. इतके खोटे पसरू लागले की, तेच खरे वाटण्याचे सत्योत्तर सत्याचे युग आले. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र माध्यम म्हणून ११ मे २०१५ मध्ये सिद्धार्थ वरदराजन, सिद्धार्थ भाटिया आणि एम. के. वेणू यांनी एकत्र येऊन ‘द वायर’ सुरू केलं. ज्यांना खऱ्या अर्थाने पत्रकारिता करायची होती, असे सगळे एक-एक करून ‘द वायर’शी जोडले गेले. महिला पत्रकारांची संख्या त्यात मोठी आहे. कौटुंबिक मालकीची, कॉर्पोरेट भांडवलावर चालणारी आणि नियंत्रित किंवा जाहिरातीवर आधारित वृत्तपत्रे, वेबसाइट्स आणि टीव्ही चॅनेलच्या पारंपरिक मॉडेलऐवजी; पत्रकार, वाचक आणि संबंधित नागरिक यांच्या सहभागातून ‘द वायर’ उभं राहिलं. आणि पहिला तडाखा दिला रोहिणी सिंग हिनं! ८ ऑक्टोबर २०१७ रोजी तिनं स्टोरी केली की, अमित शाह यांचा मुलगा- जय शाह याच्या कंपनीचा महसूल कसा एकदम १६ हजार टक्क्यांनी वाढला. कंपनीचा महसूल ५० हजार रुपयांवरून एकाच वर्षात ८० कोटींवर कसा गेला? व्यावसायिक हितसंबंध आणि मोदी सरकार यांच्या एकामागोमाग बातम्या रोहिणी करत गेली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आपली कंपनी मंत्री झाल्यानंतर पिरामल नावाच्या फर्मला कशी विकली होती, याची मोठी स्टोरी केली. रोहिणीने सीबीआयचे दोन संचालक आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) सत्तेसाठीच्या लढाईचे कव्हरेज केले. यानंतर रोहिणीला बदनाम करण्यासाठी मोहीम सुरू झाली. तिला धमक्या यायला सुरुवात झाली. ती काँग्रेससाठी काम करते, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तिला एक आलिशान फ्लॅट भेट दिला. ती मुस्लिमांची बाजू घेते. ती डावी आहे, अशा अनेक बदनामीच्या पोस्ट फिरवण्यात आल्या, येत आहेत; पण रोहिणीही तितक्याच उत्साहात दररोज ट्विटरवर ट्रोलगँगची धुलाई करते.

(रोहिणी सिंग)

इस्मत आरा. ही जामिया मिलिया या विद्यापीठातून नुकतीच शिक्षण घेऊन पत्रकारितेत आलेली. शिकत असतानाच पत्रकारिता करू लागली. २०१८ पासून तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आता ‘वायर’ची धडाकेबाज पत्रकार आहे. १ जानेवारीला ‘बुली बाई’ नावाच्या वेबसाईटवर ‘डिल ऑफ द डे’ म्हणून जाहीर करण्यात आल्याचे इस्मतला तिच्या एका मैत्रिणीने सांगितले. ती घाबरली नाही. तिने सरळ तिच्या मैत्रिणीने पाठवलेल्या मेसेजमधील फोटो उचलला आणि ट्विट केलं. असं काही भयानक चालल्याचं तिनेच जाहीर केलं आणि दिल्ली पोलिसांमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. एवढेच नाही, तर तिने ‘द वायर’मध्ये बातमी दिली आणि लेखही लिहिला. नंतर ट्रोल करणाऱ्या नराधमांना पोलिसांनी अटक केली; पण त्यात अनेक मुलीही आरोपी म्हणून पुढे आल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलं. पण त्या सगळ्यांना इस्मतला ट्रोल करावं वाटलं, यामध्येच तिने आपले राष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्याचे सिद्ध झालं.
२६ जानेवारी २०२१ रोजी शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर मोर्चा नेला होता. त्यात गोळीबार झाला आणि त्यात नवरीत सिंग या युवकाचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात त्याच्या आजोबांशी बोलून इस्मतने त्यावर एक वृत्तान्त तयार केला. तो वायरमध्ये ३० जानेवारीला प्रसिद्ध झाला. हे वृत्त प्रसिद्ध होताच उत्तरप्रदेश सरकारचे पित्त खवळले. त्यांनी तिच्या विरोधात २ फेब्रुवारीला थेट गुन्हा दाखल केला. मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकाची प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्याबद्दल गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना होती. २०१४ नंतर बदललेल्या परिस्थितीत अशा अनेक घटना पहिल्यांदाच घडत होत्या आणि त्यात इस्मत पत्रकारिता करत आहे.
(इस्मत आरा)

तिनं ‘पिंजरा तोड’ चळवळीच्या बातम्या दिल्या. जामिया मिलिया विद्यापीठाला तिनं फोटोमधून उभं केलं. सीएए-एनआरसीच्या बातम्या तिनं दिल्या. शेतकरी आंदोलनाच्या बातम्या दिल्या. अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाच्या बातम्या दिल्या. कोविड साथीत उत्तरप्रदेशात झालेल्या रुग्णांच्या भयानक परिस्थितीचे तिनं वर्णन केले. २०१४ नंतर भारतामधील परिस्थिती बदलली आहे. तिला त्याचा प्रत्यय येत आहे. तिला छळण्यासाठी ट्रोलगँग उतरली आहे. तिला हरप्रकारे त्रास देण्यात येत आहे. मात्र, हाथरस बलात्कार प्रकरणामध्ये तिने केलेल्या बातमीदारीला २०२१ मध्ये ‘लाडली पुरस्कार’ मिळाला आणि उत्तर प्रदेश सरकारच्या द्वेषालाच एक प्रकारे प्रत्युत्तर मिळाले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली नेहा दीक्षितही ‘द वायर’शी जोडलेली आहे. ती राजकारण, लिंगभाव आणि सामाजिक न्याय या विषयावर बातम्या करते. ती अशोका विद्यापीठात शिकवतेही. अतिशय उत्साही आणि डेअरिंगबाज असणाऱ्या नेहा दीक्षितला सतत ऑनलाइन छळवणुकीचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर नेहाच्या जोडीदाराचे फोटो प्रकाशित करण्यात आले, तिला अपमानास्पद असे मेसेज पाठवण्यात आले. त्याचे ट्विट करण्यात आले. तिला अटक करण्याची मागणीही करण्यात आली. कारण, तिचे व्यवस्थेला हादरवणारे वृत्तांकन ! २०१९ मध्ये, नेहाने पोलिसांकडून बेकायदेशीर हत्या कशा केल्या जातात, याचे अहवाल प्रसिद्ध केले. कठोर कायद्यांतर्गत नागरिकांना बेकायदेशीरपणे कसे ताब्यात घेतले जाते, याचे वृत्तांत प्रसिद्ध केले, त्यातील राजकीय हितसंबंध उघड केले. २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये तीने ‘द वायर’मध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ‘एन्काऊंटर राज’ कसे आहे, यावर एक सविस्तर वृत्तान्त लिहिला. भारतातील रोहिंग्या शरणार्थींची स्थिती, रोहिंग्या महिलांची स्थिती, बुंडेलखंडातील दलित महिलांचे जगणे, मुस्लिमांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा कसा वापरला जातो, अशा अनेक वृत्तान्तातून नेहाने अनेक प्रश्न पुढे आणले. अशा बातम्यांमुळे सत्तेला धोका निर्माण होतोच. मग, नेहाला धमक्या येणे सुरू झाले. तिला दिवसातून पाच-सहा धमक्यांचे फोन येऊ लागले. ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने यात भारतीय तपास यंत्रणांना यात लक्ष देण्याचे आवाहन केले. तिने २९ जुलै २०१६मध्ये तिने ‘ऑपरेशन बेटी उठाओ’ ही वृत्तमालिका लिहून आदिवासी मुलींना कसे हिंदू बनवण्याचा घाट घातला जात असल्याचे पुढे आणून संघ परिवाराचा बुरखा फाडला होता. तिच्यावर भाजप पदाधिकाऱ्याने आणि आसाम सरकारने दावा दाखल केला असून, गेली ५ वर्ष ती आसाम न्यायालयात चकरा मारत आहे. तिला २०१६मध्ये प्रतिष्ठेचा चमेली देवी जैन पुरस्कार आणि २०१९ मध्ये इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता ती इतरांची आणि स्वतःची लढाई एकत्रितच लढत आहे. (नेहा दीक्षित)

‘द वायर’ सुरू झाल्यापासूनच पारदर्शक राहण्याचा आणि वाचकांप्रती उत्तरदायी राहण्याचा वायरचा प्रयत्न राहिलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पामेला फिलिपोज यांची लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या वाचक संपादक म्हणूनही ओळखल्या जातात. फिलिपोज या वरिष्ठ आणि अत्यंत प्रतिष्ठित पत्रकार आहेत. इंडियन एक्सप्रेससह विविध वृत्तपत्रांमध्ये पत्रकार आणि संपादक म्हणून त्यांचा दशकांचा अनुभव आहे. त्या ‘द वायर’च्या कर्मचारी नाहीत आणि त्या ‘द वायर’च्या संपादकीय रचनेपासून स्वतंत्रपणे काम करतात. ‘द वायर’च्या वृत्तांकनाबद्दल वाचकांना असणार्याआ तक्रारी आणि समस्यांची तपासणी करण्याचं काम त्या करतात. शिवाय, त्यांची मतं कोणत्याही संपादकीय कात्रीशिवाय वायरमध्ये प्रसिद्ध केली जातात. अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘चमेली देवी जैन पत्रकारिता पुरस्कार’ त्यांना मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या फिलिपोज यांनाही जय शाह प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न झाला. (पामेला फिलिपोज)

अत्यंत अनुभवी असणाऱ्या अरफा खानुम शेरवानी राष्ट्रीय प्रश्नांवर भाष्य करतात. संगीता बरुआ पिशारोत्ती पूर्वोत्तर भारतातील प्रश्न, सैन्य कायदा, सीएए-एनआरसी, अशा विषयांवर सातत्याने लिहीत आहे. सुकन्या शांताने तुरुंगातील भयानक परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. जान्हवी सेन, सुमेधा पाल दररोज वायरचे काम सांभाळतात, व्हिडिओ बनवतात, प्रत्यक्ष फील्डवर जातात. या सगळ्या मुलींचे अनुभव वेगवेगळे आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या आहेत. या सगळ्यांच्या प्रयत्नांतून ‘द वायर’ हे आघाडीचे स्वतंत्र माध्यम झाले आहे. केवळ ६ वर्षांच्या काळामध्ये ‘वायर’ने मोठे काम केले आहे. अनेक प्रश्न पुढे आणले, वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडली, महिलांच्या मुद्द्यांना राष्ट्रीय माध्यमांमध्ये जागा करून दिली. अल्पसंख्याक, दलितांच्या स्थितीला पुढे आणले. या सगळ्या महिला पत्रकारांमध्ये काही गोष्टी समान आहेत. त्यांना त्रास दिला जातो. स्त्री म्हणून त्यांची मानखंडना केली जाते. सोशल मीडियावर त्यांना छळाला सामोरे जावे लागते. त्यांच्यावर चिखलफेक केली जाते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, त्या दररोज नवे मुद्दे घेऊन पुढे येतात आणि भारतीय पत्रकारिता पुढे नेतात. या महिला पत्रकारांचे हे वृत्तान्त म्हणजे केवळ बातमीदारी नाही, तर भारताचे वास्तव आहे.

नीतीन ब्रह्मे
brahmenitin@gmail.com
(लेखक ‘द वायर मराठी’चे समन्वयक आहेत.)
फोटो सौजन्य : इंटरनेटवरून साभार