चार्वाक कोण होते?
चार्वाक म्हटलं की ‘नास्तिक’ किंवा ‘भोगवादी’ अशीच एक चुकीची ठसवलेली प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. पण खरंच चार्वाक एवढेच होते का? धर्म, कर्मकांड, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म यांना प्रश्न विचारत प्रत्यक्ष अनुभव, तर्क आणि मानवी स्वातंत्र्याला महत्त्व देणाऱ्या या विचारपरंपरेचा इतिहास नेमका काय आहे, हे समजून घेणं आजही महत्त्वाचं आहे. ज्येष्ठ अभ्यासक जगदीश काबरे यांच्या ‘चार्वाक कोण होते?’ या पुस्तकातून चार्वाक विचारांचा इतिहास, त्यांचं झालेलं विकृतीकरण आणि आजच्या विज्ञाननिष्ठ समाजातील त्यांचं महत्त्व समोर येतं. हेरंब कुलकर्णी यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने केलेला हा परिचय चार्वाकांनी विचारलेले प्रश्न आजच्या काळातही का जिवंत आहेत, याची आठवण करून देतो.
भारतातील चार्वाक किंवा लोकायत तत्वज्ञान वैदिक यज्ञसंस्थेवरील सर्वात प्राचीन विरोधकापैकी एक मानला जातो. पण चार्वाकाविषयी फार माहिती नसते. केवळ नास्तिक विचार किंवा भोगवादी समर्थक असे विपर्यस्त चित्रण माहीत असते. पण चार्वाक विचार नेमका काय होता? चार्वाक विचारांचे पुढे काय झाले? आज त्या विचारांचे स्थान नेमके काय आहे? याबाबत सविस्तर विवेचन करणारे पुस्तक ज्येष्ठ अभ्यासक जगदीश काबरे यांनी लिहीले आहे. यातून चार्वाक विचार नेमका काय आहे याची सुस्पष्ट कल्पना येते.
मी माझ्या मुलाचे नाव चार्वाक ठेवले आहे. ते काही फार अभ्यास न करता केवळ त्या विचारांचे आकर्षण म्हणून हे नाव ठेवले होते. त्यामुळे हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता होती. पुस्तक वाचल्यावर हे नाव ठेवल्याचा तो निर्णय किती दूरदृष्टीचा होता हे लक्षात आले आणि स्वतः चीच पाठ थोपटली...!!!
सुरुवातीला लेखक चार्वाकांची विचारधारा याची तुलना बौद्ध, जैन, या विचारासोबत करतात. ती या दोघांच्याही काळाच्या आधीपासून समाजात प्रभावी होती. चार्वाक, बौद्ध आणि जैन हे तिन्ही विचारप्रवाह वैदिक धर्माला विरोध करणारे होते; परंतु त्यांचे उद्देश भिन्न होते. चार्वाक त्या सर्वात जास्त क्रांतिकारी होते. त्यांनी धर्म नाकारला, परलोक नाकारला, देवकार्य नाकारले. आत्मा, पुनर्जन्म आणि मोक्षही नाकारले. त्यामुळे वैदिकांचा मुख्य संघर्ष बौद्ध आणि जैन धर्माशी नव्हे तर चार्वाकांशी झाला. त्यामुळे चार्वाक यांची प्रस्थापित धर्म व्यवस्थेने का बदनामी केली व कशी बदनामी केली, हे लेखक सांगतात. परिणामी या तत्वज्ञानाचे ब्राह्मण्यग्रंथांमध्ये नकारात्मक चित्रण केलेले आहे. चार्वाक असुर प्रवृत्तीचे दाखवले आहेत. बदनामीची उदाहरणे सांगताना ते लिहीतात की रामायण, महाभारतातील चार्वाकांचा अपमानजनक उल्लेख हा सामाजिक संघर्षाचे प्रतिबिंब आहे. कारण चार्वाक विचार वैज्ञानिक तर्कवादी आणि सामाजिक बदल घडवणारा होता. त्यामुळे पुरोहितशाही आणि राज सत्तेच्या हितांवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने चार्वाक यांना सर्वाधिक दमन सहन करावे लागले.
वैदिक धार्मिक विधी, यज्ञकर्म ब्राह्मण सत्तेचे वर्चस्व, जात व्यवस्था, वेदाधारीत अर्थशास्त्रीय राजकीय व्यवस्था, यामुळे सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धा वाढत असताना लोकायत तत्वज्ञानाने प्रतिपादन केले की, ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असले पाहिजे. इंद्रियांना जे जाणवते ते सत्य जगण्याचा मूळ उद्देश सुख प्राप्त करणे. कारण मृत्यूनंतर काहीही उरत नाही. या विचारांनी वैदिक धर्माला... ब्राह्मण धर्माला तसेच शोषणात्मक धार्मिक सत्तेला आव्हान दिले. त्यामुळेच त्यांची बदनामीकारक आणि त्यांना अनितीमान ठरवणार्या स्वरूपातील वर्णने त्यांच्यावरील टिकात्मक ग्रंथात आढळतात. तसेच त्यांचा हळूहळू होणारा ऱ्हास या सर्व प्रक्रिया सामाजिक राजकीय प्रक्रियांशी घट्ट जोडलेल्या आहेत. ब्राह्मण ग्रंथात यज्ञ, स्वर्ग, देव यासारखी तत्वे सामाजिक आर्थिक नियंत्रणाची साधने म्हणून वापरली जात होती. यज्ञ संस्थेमध्ये सामान्य लोकांच्या श्रमावर भार वाढत होता. अशावेळी एखादी विचारसरणी देव नाही, भोग हाच जीवनाचा ध्येय, प्रत्यक्ष अनुभूती हेच ज्ञान आणि तेच सत्य, असे सांगत असेल तर ती केवळ तात्विक उलथापालथ नसून सामाजिक बंडखोरी ठरत होती, असे लेखक अचूक विश्लेषण करतात.
ब्राम्हणवाद व चार्वाक याविषयी ते सांगतात की चार्वाकांचे मूलभूत विधान प्रत्यक्ष प्रमाण एकमेव हा ब्राह्मणी कल्पनांवर स्पष्टपणे हल्ला होता. त्यामुळे ब्राह्मण ग्रंथांनी चार्वाक यांना अनितीमान पाखंडी व निंदक ठरवले. तरीही शिक्षण, गुरुकुल ग्रंथ निर्मितीची प्रणाली ब्राह्मण नियंत्रण करीत होते; त्यामुळे चार्वाकानी तत्वज्ञान निर्मिती केली असली तरी त्यांच्या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित झाले नाही. भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात चार्वाक किंवा लोकायत ही विचारसरणी एक आगळीवेगळी तरीही दीर्घकाळ दडपण्याची धारणा म्हणून दिसते. वेद, ब्राह्मण, उपनिषद स्मृती आणि नंतरचे बौद्ध, जैन तसेच वेदांत सांख्य, न्याय इत्यादी सर्वच दर्शनांनी टीका करण्यासाठी आणि आपले विचार ठसवण्यासाठी चार्वाकसूत्रांचा पूर्वपक्ष म्हणून उल्लेख केला आहे. इतिहासकारांच्या दृष्टीने चार्वाकांचा उदय बौद्ध, जैन धर्मापूर्वी मानण्यास दखलपात्र कारणे आहेत.
सर्व वेगवेगळी दर्शने व चार्वाक यांची तुलना करताना लेखक सांगतात की, चार्वाक धर्म इसवी सन पूर्व आठव्या शतकापासून असले तरी सामाजिक पातळीवर मुख्य प्रवाह बनवू शकले नाही. याचे कारण चार्वाकांचे ग्रंथ नष्ट झाले किंवा अप्रचलित झाले. त्यांची वैचारिक भूमिका सामर्थ्यवान धार्मिक वर्गांच्या आर्थिक हितसंबंधांवर थेट वार करत होती. कारण त्यात देव, स्वर्ग, कर्म, पूर्वजन्म, पुनर्जन्म या कल्पनांना स्पष्ट नकार होता. असे करून त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय सत्ता यज्ञधिष्ठित अर्थव्यवस्था आणि आदी भौतिक नैतिकता यांना त्यांनी आव्हान दिले होते.. भारतीय तत्वज्ञानातील संख्य, वैशेशिक, बौद्ध आणि जैन या चार प्रमुख तत्व प्रणालींच्या मध्यवर्ती संकल्पना सर्जकांच्या भौतिकवादी आधाराशी मूलतः विसंगत आहेत. चार्वाकानी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मानव केंद्र सांसारिक केंद्र प्रधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला तर उर्वरित दर्शनांनी आदीभौतिक माहिती अध्यात्मिक व मोक्ष प्रधान मार्ग दाखवला. म्हणूनच चार्वाक दर्शन हे प्रस्थापित सर्व दर्शनांना एकाच वेळी विरोध करणारे स्वतंत्र व अभिनव विचारसरणीचे तत्वाज्ञान ठरत होते. इतर सर्व तत्त्वज्ञानाचे सार म्हणजे विश्व एकादृश्य किंवा सूक्ष्म नियमानुसार चालते. लोकायतमध्ये विश्व फक्त भौतिक आहे आणि नियमानुसार चालते. परमेश्वर, स्वर्ग, नरक, वगैरे कल्पनांनी बुद्धी विचारित होऊ न देता जीवनाचे सौंदर्य भोगण्याचे ते आवाहन होते.
चार्वाक विचार मागे का पडला हे सांगताना लेखक म्हणतात की, अंधश्रद्धा आणि दांभिकता याविरुद्ध तो एक लढा होता. पण संघटित प्रयत्नांच्या अभावी लोकायतवादी जीवनाला योग्य वळण देण्यात हवे तेवढे यशस्वी मिळाले नाही. तरीही भारताच्या वैचारिक इतिहासातील लोकायतचे स्थान व कामगिरी नाकारता येत नाही. भारताच्या सामाजिक जीवनावर या दर्शनाचा प्रभाव पडो किंवा न पडो पण ज्ञानाच्या दृष्टीने त्यांनी केलेली कामगिरी बहुमोल मानवी लागेल.
चार्वाक तत्वज्ञान आजच्या काळात महत्वाचे का आहे? हे सांगताना ते सांगतात की तुमच्या असंख्य दुःखाच्या कारणांसाठी परलोकाकडे दृष्टी न ठेवता ती कारणे तुमच्या स्वभावात शोधली पाहिजेत. ती या लोकायतमध्ये सापडतील. शेती व्यापार व नोकरी करून सुखाने जगावे. अर्थ व काम हे पोषण साधावेत. देहदंड करू नये. असा उपदेश त्यांनी केला. त्यांनी वर्णभेद, जातीभेद मानले नाहीत. स्त्रियांवरील बंधनांचा त्यांनी धि:कार केला. सत्तेच्या वापरात न्याय व विवेक असला पाहिजे असे सुचवले. त्यामुळे चार्वाक तत्वज्ञान आजच्या काळालाही तंतोतंत लागू आहे.
चार्वाक यांना केवळ भोगवादी ठरवणे चूक आहे, हे सांगताना लेखक काबरे सांगतात की, मुख्य लोकायतातील भाग बदलून केवळ कर्ज काढून तूप प्या हे वाक्य घुसडण्यात आले. चार्वाक यांचा भौतिकवाद म्हणजे अंदाधुंद उपभोग नव्हे तर इंद्रिय गोचर अनुभवाला ज्ञानाचा निकष प्रत्यक्ष अनुभव निरीक्षण आणि तर्क यांच्या आधारे जे सत्य ठरते ते स्वीकारावे, अशी त्यांची भूमिका होती. स्वातंत्र्य हाच मोक्ष हा त्यांचा दावा मानवी जीवनाला लौकिक आधार देतो. त्यांनी तत्त्वज्ञानाला सामाजिक वास्तवाशी जोडले. या लोकांचा गौरव करताना मानवी श्रम, उत्पादन आणि उपभोग यांना मान्यता दिली.
वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेले तत्त्वज्ञान असूनही या परंपरेचा वैदिक काळापासून ते दहाव्या शतकापर्यंत का आणि कसा नाश झाला? याचे कार्यकरणात्मक विश्लेषण त्यांनी केले आहे. वेद, परंपरा तर विरोधातच होती. बौद्ध व जैन परंपरेनेही शोषण व कर्मकांड विरोधात बंड केले. त्यांनी तपस्या आणि मध्यम मार्ग असे नवे मूल्यांकन दिले. जे लोकांना अधिक दीर्घकालीन वाटले. परिणामी लोकायतिकांना सामाजिक आधार कमी मिळू लागला. चार्वाकांचा संघर्ष वैदिकांशी होता. म्हणून बालवान वैदिकांनी चार्वाक विचार नष्ट करण्यासाठी चार्वाकांचे ग्रंथ जाळून टाकले. त्यातच भक्ती पंथाचा उदय होणे हा मोठा सामाजिक बदल होता. ही भावनिक भूक आणि सामाजिक आत्ममग्नता निर्माण करणारी होता. चार्वाक यांचा तर्कवाद ही भावनिक भूक भागवू शकत नव्हता. ज्या कालखंडात अध्यात्म भक्ती, तपस्या आणि अलौकिक संकल्पना जोमात होत्या. त्या काळात चार्वाक विचारसरणीचे टिकणे कठीण होते. लेखन परंपरेचा अभाव, संस्थात्मक संरचनेचा अभाव, सांस्कृतिक विकृतीकरण, विरोधकांनीच केलेले इतिहास लेखन आणि सामान्य माणसातील अध्यात्म प्रेम या सर्वांमुळे चार्वाक परंपरा खंडित झाली..
सध्या चार्वाक विचारसरणीचे पुनरुज्जीवन भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यामध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे औषध शास्त्रामध्ये त्याचे महत्त्व दिसते आहे. समाजशास्त्रातही चार्वाकांचा प्रभाव जाणवतो. मानवाला बौद्धिक स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. माध्यमशास्त्र, तत्त्वज्ञान, आर्थिक विश्लेषण, आधुनिक शिक्षण यामध्येही चार्वाकांचे महत्त्व आपल्याला जाणवते. आज वैज्ञानिक पद्धती तर्कशुद्ध निर्णय प्रक्रिया, डेटा आधारित विश्लेषण, पुराव्यांवर आधारित मतप्रणाली, संशयवादी बौद्धिकता, या सर्वांमध्ये चार्वाकांच्या वादाचा वारसा उतरलेला दिसत आहे.
धर्म आणि विज्ञान या दोन्हीचे सविस्तर विश्लेषण करून लेखकाने धर्माच्या मर्यादा स्पष्ट करून आजच्या जीवनात वैज्ञानिक पद्धतीच कशी उपयुक्त आहे ते साधार पटवून दिले आहे. आधुनिक समाजाची गरज ही विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकनिष्ठ जीवन हेच आहे. विवेकनिष्ठ जीवन म्हणजे मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक क्षेत्रात तथ्यनिष्ठ कारण, निष्ठा आणि परीक्षणक्षम वृत्तीचा वापर करून निर्णय घेण्याची प्रक्रिया होय. विवेकनिष्ठ जीवनाची पहिली पायरी म्हणजे वास्तविकतेचा स्वीकार करणे आणि त्याचे महत्त्व लक्षात घेणे. विवेकाने निर्णय घेणे आणि स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारणे हे होय. पुस्तकाच्या समारोपात लेखक म्हणतात चार्वाक परंपरा हीच पुढे भ्रातृहरी, चक्रधर, कबीर, तुकाराम, नानक, मुक्ताई, ज्ञानदेव, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा मानवतावादी विचारवंतांपर्यंत सामाजिक बंडखोरीच्या स्वरूपात पोहोचली.
वैदिकांच्या विचारसरणीऐवजी चार्वाकांच्या विचारसरणीप्रमाणे जर भारताने वाटचाल सुरू केली असती तर भारतात विज्ञान युग केव्हाच अवतरले असते आणि आज भारत जगाच्या पुढे गेला असता, असे स्पष्टपणे ते नोंदवतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य हे चार्वाकांच्या विचारांना पुढे नेते आहे असे सांगत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे हौतात्म्य विचारांसाठी किंमत चुकवणारे होते असे ते सांगतात. चार्वाक यांनी विचारलेले प्रश्न आजही जिवंत आहेत हा विचारांचा धागा अखंड आहे आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग याच धाग्याने विणलेला आहे. चार्वाक तत्त्वज्ञान आजही समाजाला सांगते की, अंधश्रद्धेच्या व देवाच्या भीतीद्वारे चालणारा धर्म हा खरा धर्मच नाहीच; तर बौद्धिक स्वातंत्र्य, ज्ञान, मानवी स्वातंत्र्य, वैज्ञानिक तर्क हीच खरी मानवी मूल्ये आहेत. जोपर्यंत शोषण आहे, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत भीती आहे, तोपर्यंत चार्वाक विचार जिवंत राहील आणि राहायला हवा, असा आशावाद लेखन शेवटी व्यक्त करतात.
चार्वाक विचार काय होता? त्या विचाराचा इतिहासातील वेगवेगळ्या विचारसरणींशी तुलनात्मक अभ्यास जगदीश काबरे यांनी करून हे दाखवले आहे की, आजच्या काळात चार्वाक विचार कशाप्रकारे संक्रमित होतो आहे. त्या विचारांची वाटचाल भारताला खऱ्या अर्थाने महासत्ता बनवू शकेल असे स्पष्ट प्रतिपादन केले आहे. असे हे मराठीतील विचारसाहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे.
पुस्तक : चार्वाक कोण होते? लेखक : जगदीश काबरे प्रकाशक : विवेकजागर प्रकाशन किंमत : ₹ 110 संपर्क : 93590 80820