संस्कृती संवर्धनात महिलांचा हातभार

संस्कृती म्हणजे केवळ परंपरा किंवा रीतिरिवाज नाहीत, तर समाज जगण्याची पद्धत, मूल्ये आणि विचारांची सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत महिलांचा वाटा सुरुवातीपासूनच महत्त्वाचा आणि निर्णायक राहिला आहे. आदिम काळापासून शेती, कुटुंब, कला, भाषा, शिक्षण, आरोग्य, भक्ती, निसर्ग आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करत महिलांनी संस्कृती जिवंत ठेवली आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली. पुरुषप्रधान समाजरचनेमुळे त्यांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित झाले, तरीही महिलांनी संस्कृती संवर्धनाचे काम कधी थांबवले नाही. या लेखातून संस्कृतीच्या विकासात महिलांनी दिलेल्या बहुआयामी योगदानाचा, त्यांच्या संघर्षांचा आणि त्यांनी घडवलेल्या परिवर्तनाचा सुस्पष्ट मागोवा घेतला आहे. समाज आणि संस्कृती समजून घेताना स्त्रियांच्या भूमिकेशिवाय ही समज अपुरी ठरते, हेच या लिखाणातून ठळकपणे पुढे येते.

संस्कृती आणि समाज यांचा अन्योन्य संबंध असतो. संस्कृतीचा मानववंशशास्त्र या शाखेशी जसा संबंध आहे तसाच भाषेतल्या व्युत्पत्तीशास्त्राशीही नाते आहे. एका व्यक्तीमुळे केव्हाही संस्कृतीची वाढ होत नाही. व्यक्तींच्या समूहाने समाज घडतो. समाज हा विशिष्ट परंपरा, चालीरिती यांच्या मजबूत रज्जूंनी विणलेला असतो. आदिम काळात माणसाला भाषेचा अडसर जाणवत होता. लिपीच्या अज्ञानामुळे एकमेकांशी संपर्क व्यवस्था सांधता येत नव्हती;त्यावेळेस आपापसात व्यवहार करण्यासाठी खाणाखुणांचा वापर होऊ लागला. त्यातूनच चित्रलिपी उदयास आली. चित्रांच्या माध्यमातून लोकं एकमेकांशी व्यवहार करू लागले. मनातील भावभावनांचे आणि कलेचे प्रदर्शन गुहाचित्रांतून होऊ लागले. त्यानंतर हजारो वर्षांनी भाषेचा उगम झाला. जसजसे मानवी बुद्धीमंडल विकसित होऊ लागले; तसतसे पेहराव, चालीरिती, परंपरा, नितीनियम, क्रीडा, ज्ञानविज्ञान, अर्थशास्त्र, धर्म यांचा विकास टप्याटप्याने होऊ लागला. या सर्वांचा परिपाक म्हणजे संस्कृती होय. संस्कृती केवळ समाजापुरती मर्यादित न राहता तिची व्याप्ती एकेका विशिष्ट प्रदेशापर्यंत वाढली. अशा संस्कृतीला त्या त्या भाषेची व वेषभूषेची ओळख मिळाली. जागतिक स्तरावर जर पाहायला गेलं तर आफ्रिकी संस्कृती, ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती, इजिप्त संस्कृती, सिंधू आणि मोहेंजोदडो-हडाप्पा संस्कृती असे तिचे भाग पडतात. प्रत्येक संस्कृतीची वेगळी भाषा, लिपी, वेशभूषा, खाद्यसंस्कृती, चालीरिती व परंपरा आहेत. आर्थिक व्यवहार, दळणवळणाची साधने, आहार पद्धती, निवासस्थानांची बांधणी वेगवेगळी आहे. टुंड्रा प्रदेशाच्या बर्फाळ प्रदेशातील माणसांची घरे वाळवंटात निवास करणाऱ्या समाजसमुहापेक्षा वेगळी असतात.अशारितीने विविध प्रकारच्या संस्कृतीवर त्या त्या भूप्रदेशाच्या वातावरणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो.

आदिम काळापासून सशक्तेच्या निकषांवर समाज हा पुरूषप्रधान व्यवस्थेवर आधारलेला होता. हिंस्त्र आणि चपळ प्राण्यांची मृगया करून कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी समाजातील पुरूष वर्गावर होती. महिलांचे आणि अपत्यांचे संरक्षण करण्याचे कार्यदेखिल त्याला पार पाडावे लागते होते. वंशसंवर्धन आणि कुटुंबाची निगा राखण्याचे उत्तरदायित्व आपोआपच स्त्रियांकडे चालत आलं. त्यामुळे संस्कृती संरक्षण व संवर्धन ही पुरूषांची मक्तेदारी असल्याची सर्वंकष भावना सामाजिक स्तरावर विस्तारित होऊ लागली. पण संस्कृतीमध्ये जे-जे काही चांगले, पवित्र, उदात्त आहे; ते सर्व स्त्रियांच्या सहभागाने साध्य झालेले आहे. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना स्त्रियांनी जास्त प्रमाणात केली आहे; परंतु हे घडत असताना स्त्रियांवर अन्याय झाला आहे. कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी आणि सांस्कृतिक मूल्य-संवर्धनासाठी स्त्रियांनीच मोठ्या प्रमाणावर त्याग केला आहे. कृषीव्यवसायास जेव्हा प्रारंभ झाला अन् मानवाचे मृगयेवरील अवलंबित्व काही प्रमाणात संपुष्टात आले; तेव्हा स्त्रीने आपल्या नाजूक हातांनी धरित्रीच्या उदरात बीज पेरण्याचे काम हाती घेतले. यथावकाश ती शेतीमधील अन्य कामांमध्ये पुरूषांच्या बरोबरीने सहभागी होऊ लागली. गर्भातला अंकुर वाढवता वाढवता ती धरणीच्या गर्भात वाढत असणाऱ्या अंकुरास जोपासण्याचे काम मोठ्या जोमाने करू लागली. शेतीची निरनिराळी अवजारे हाताळू लागली. नवजात अर्भकाला त्याच्या बोबड्या बोलामध्ये भाषेचे धडे देऊ लागली. धुळीमध्ये बोटांनी अक्षरं गिरवून आपल्या अपत्यांना अक्षरओळख करून देऊ लागली. ती महिलाच होती जी आपल्या मुलाला व मुलीला लिंगभेद न करता शिक्षणासाठी शाळेत जाण्याचा आग्रह करू लागली. त्यांच्या अध्ययनाकडे लक्ष पुरवू लागली. देव, देश आणि धर्माची उन्नती हीच संस्कृतीची उन्नती आहे; हे जाणल्यामुळेच जिजाऊसारख्या बाणेदार मातेने शिवाजी महाराजांसारखा लोककल्याणकारी राजा घडवला. आजची पिढी शिवाजी महाराजांच्या त्याच उद्बोधक कार्यापासून प्रेरणा घेऊन संस्कृतीद्धोराचे महत्कार्य करीत आहे. आपल्या मुलायम बोटांनी रांगोळीचे ठिपके जोडून त्यांतून अप्रतिम रंगावली काढू लागली. निसर्गाच्या विविध रंगांचे उपयोजन करून साजश्रुंगाराचा नवा वस्तुपाठ देऊ लागली. कौटुंबिक आहार-व्यवस्था आणि आरोग्यदायी पालनपोषण यांची सर्वंकष जबाबदारी पुरातन काळापासून स्त्रीनेच उचलेली आपणांस दिसून येते. आपल्या जीवनसंस्कृतीचं दर्शन तिने सामुहिक नृत्य पदन्यासातून घडवलं. आदिवासी पाड्यातील घराघरांवर चित्रित केलेली वारली चित्रकला हा त्या कलात्मक संस्कृती संवर्धनाचाच एक मोठा भाग होय. वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे प्रावरणे कातून, विणून त्यातून एक नवीन वस्त्रपरंपरा निर्माण करण्याचे श्रेय स्त्रियांकडे जाते. समाजातील आर्थिक बाबींचे उन्नयन करण्यात महिलांचा हातभार प्रशंसनीय आहे. औपचारिक तसेच अनौपचारिक पद्धतीने श्रमदान करून रोजगाराच्या कित्येक संधी महिला निर्माण करत असतात. भारतातील कुटिरोद्योग हे त्यांचे ज्वलंत उदाहरण आहे.

पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये जरी असमानतेचा दर्जा महिलांच्या पदरी पडला तरी नृत्य,गायन,वादन, पाकशास्त्र इ.कलांमध्ये प्राविण्य प्राप्त करून संस्कृतीवृक्ष गगनावरी नेण्याचं काम महिलांच्याच हातून झाले आहे. थोर भारतीय संस्कृतीच्या बाबतीत उल्लेख करावयाचा झाला तर मैत्रेयी, गार्गी, वैदेही इ. श्रेष्ठ विदुषींचा नामोल्लेख करावा लागेल. त्यांनी पुरूषांच्या बरोबरीने वेदाध्ययन केले. वेदिक कालखंडात महिला पौरोहित्याचं काम संभाळत होत्या. पुराणकाळातील अहल्या, सीता, द्रौपदी, तारा व मंदोदरी या आपापल्या क्षेत्रातल्या उच्चविद्याविभूषित महिला होत्या. त्यांच्या लौकिकाचा प्रभाव संस्कृती संवर्धनाच्या प्रसारावर पडला.

कालांतराने पुरूषप्रधान संस्कृतीने महिला अधिकारांची गळचेपी करण्यास सुरुवात केली. मनुवादी विचारांमुळे ती घराच्या चार भिंती, स्वयंपाकघर व अपत्य यांच्या अंधाऱ्या विवरात घुसमटून गेली. संत तुलसीदासाने तुलसी रामायणात म्हटले आहे, 'ढोल, गॅंवार, शूद्र, पशू, नारी ... सब ताडन के अधिकारी' याचाच अर्थ की महिलांना त्यासमयी पशूपेक्षाही नीच वागणूक मिळत होती. पण जसजसा समाज विचारांनी प्रगत होत गेला तसतशा महिलांना पडलेल्या बेड्या सैल होत गेल्या. आनंदीबाई जोशी, रिबेका सीमियन, कार्नेलिया सोराबजी, काशीबाई नवले, लक्ष्मीबाई टिळक यांसारख्या धैर्यशील महिला कधी स्वबळावर तर कधी नातेवाईकांच्या पाठिंब्यावर ज्ञान व सामाजिक सेवाक्षेत्रात भरारी मारू शकल्या. त्यांच्या या धडाडीने भारतीय संस्कृतीमधील साचलेपण जाऊन एक प्रकारचे नित्यनूतन प्रवाहीपण आले. जुन्या पारंपरिक चालीरितींची घुसळण हे संस्कृती संवर्धनाचे पुढचे महत्वाचे पाऊल होय. यात महिलांचा वाटा श्रेयस्कर होता.

कुटुंबव्यवस्था सांभाळणे व त्यातून भावी पिढीला संस्कृतीचे योग्य ते धडे देणे हे स्त्रियांना उपजतच ठाऊक असते. समाजाला दिशा दाखवत असतानाच महिला संस्कार घडविण्याचेही काम करीत असते. महिलांनी फार पूर्वीपासून निसर्गाचे संस्कृतीशी असलेलं नाते ओळखले होते. जगातील कित्येक कला या निसर्गाशी निगडीत आहेत. निसर्गच जर लयाला गेला तर मानवजात व त्याबरोबर संस्कृतीदेखील लयाला जाईल; हे तिला ठाऊक होते. वेगवेगळ्या वनस्पतींधील औषधी गुणधर्म तिला माहीत होते. घरासमोरील तुळशीवृंदावन हे देव, धर्म आणि निसर्गाचे प्रतीक आहे. निसर्ग आपले भरणपोषण करतो याची तिला जाण होती. आजही एकविसाव्या शतकात जागतिक स्तरावर ग्रेटा थुनबर्गसारखी अल्पवयीन मुलगी सातत्याने पर्यावरण ऱ्हासाविरूद्ध निडरपणे आवाज उठवित आहे. निसर्गातील भक्ती आणि शक्तीची रूपे महिलांमध्ये आढळून येतात. संत जनाबाई, मुक्ताई आदिसारख्या संत महिलांनी भक्तीरसात अवघा समाज न्हाऊन काढला अन् बहकलेल्या समाजमनाला आध्यात्मिक मार्गदर्शन केले. आदर्श जीवनमुल्यांवर भाष्य करणाऱ्या बहिणाबाईंच्या खान्देशी भाषेतील काव्यरचनेमुळे लोकांमध्ये अंतर्मुखता येऊन एक वेगळीच शहाणीव निर्माण झाली.

अठरा विद्या व चौसष्ट कला यापैकी शास्त्रीय गायन क्षेत्रातील हिराबाई बडोदेकर, मोगुबाई कुर्डीकर, केशरबाई केशरकर, बेग़म अख्तर आदि महिलांनी लोकापवादाची पर्वा न करता अभिजात गायनाला घराघरांत पोहोचवून भारतीय संस्कृतीच्या एका महत्वाच्या उपांगात मोलाची भर टाकली. लता मंगेशकर, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे यांसारख्या जगत् विख्यात गायिकांनी हा वारसा अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवला आहे.

अहिल्याबाई होळकर, कित्तूरची राणी चेनम्मा, झांशीची राणी लक्ष्मीबाई आणि विजापूरची राणी चांदबीबी यांनी स्वराज्य आणि संस्कृतीच्या उद्धारासाठी प्रसंगी युद्धभूमीवर अतुलनीय शौर्य गाजवले. अहिल्याबाई होळकरांची सामाजिक व धार्मिक कार्ये तर तमाम महाराष्ट्राला ठाऊक आहेतच. राज्यकारभाराचे शकट हाकताना या सर्व राज्यकर्त्या महिलांनी संस्कृतीच्या विविध अंगांचा विस्तार केला. जागतिक स्तरावर सत्ताकारण करतानाच व्यापार, शिक्षण, सामाजिक सुधारणा, कला, साहित्य व विज्ञान क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठता येते हे भारताच्या श्रीमती इंदिरा गांधी, श्रीलंकेच्या सिरिमाओ बंदरनायके, इस्त्रायलच्या गोल्डा मायर व ग्रेट ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रियांनी दाखवून दिले. त्याचबरोबर सरोजिनी नायडू, कल्पना चावला, सानिया मिर्झा, अरुंधती रॉय, अमृता प्रीतम, महाश्वेतादेवी, सुनिता विल्यम्स, मीरा बोरवणकर यासह कित्येक महिलांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर संस्कृती संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे. सितारादेवी, मल्लिका साराभाई, सुलोचना, माधुरी दीक्षित आदि महिलांनी नृत्य व कलाक्षेत्रात भारतीय तसेच जागतिक स्तरावर केलेले योगदान वादातीत आहे.

वेदिक काळानंतर संस्कृती संवर्धनाच्या कार्यावर पुरूषप्रधान समाजव्यवस्थेचा जो वाईट प्रभाव पडला होता; त्यात लक्षणीय बदल झाला तो अठराव्या शतकात घडून आलेल्या वेगवेगळ्या क्रांती, समाजसुधारणा यामुळे पुन्हा एकदा महिलांना विविध कायद्याद्वारे समानतेच्या अनेक संधी मिळाल्या. त्यामुळे विविध ज्ञानशाखांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी अमोघ यश प्राप्त केले आणि खंडित झालेल्या संस्कृती संवर्धनाच्या चक्राला गती प्राप्त करून दिली.

प्रसिद्ध लेखिका व कवयित्री अरुणा ढेरे म्हणूनच एके ठिकाणी लिहितात की इतिहासाच्या मंचावर उमटणारा कर्तृत्ववान स्त्रियांचा पदन्यास, त्यांचा स्वर, त्यांचे शब्द आणि त्यांची कृती यामुळे आमच्या कलेची, संस्कृतीची आणि समाजाची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलली. त्यांचे ऋण आमच्या वर्तमानावरच नव्हे, तर भविष्यावरही आहे.