स्त्री चळवळ नाबाद पन्नास : खंड १
स्त्री चळवळीचा प्रवास हा केवळ घटनांचा किंवा टप्प्यांचा इतिहास नाही, तर अनेक स्त्रियांच्या जगण्याशी, त्यांच्या लढ्यांशी आणि बदल घडवण्याच्या सातत्याशी जोडलेली एक जिवंत प्रक्रिया आहे. आसावरी काकडे या लेखातून ‘स्त्री चळवळ नाबाद पन्नास..!’ या ग्रंथाच्या निमित्ताने या प्रवासाकडे पुन्हा एकदा पाहण्याची संधी देतात. या लेखातून ग्रंथाची ओळख तर होतेच, पण त्यामागची विचारधारा, विविध क्षेत्रांमध्ये उमटलेले परिणाम आणि चळवळीची पुढची दिशा याबद्दलही आपल्याला शांतपणे विचार करायला भाग पाडते. हे वाचन म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर आपल्या सभोवतालच्या बदलांकडे नव्याने पाहण्याची एक संधी आहे. आज आसावरी काकडे आपल्यात नाहीत. मिळून साऱ्याजणीतर्फे हा लेख त्या वेळी प्रकाशित करता आला नव्हता, ही खंत आहे. मात्र, या निमित्ताने त्यांच्या लेखनाला पुन्हा एकदा उजाळा देत, त्यांच्या स्मृतींना आदरपूर्वक अभिवादन!!
स्त्री चळवळीच्या सर्वस्पर्शी कार्यकर्तृत्वाचा इतिहास लिहिणं ही फक्त चळवळीची गरज नाही तर ती समाजाचीही गरज आहे. हे महत्त्वाचं काम विद्या बाळ अध्यासनातर्फे चालू आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे ‘स्त्री चळवळ नाबाद पन्नास ! : स्त्रियांच्या संघर्ष आणि यशाची गजब कहाणी खंड १’ चे प्रकाशन. अमित प्रकाशन, पुणे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. याचे समर्पक मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांचे आहे. गीताली वि. म. यांनी या महत्त्वाच्या ग्रंथाचे संपादन केलेले असून या संपादनामागची भूमिका त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केलेली आहे. डॉ. गोपाळ गुरू यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या ग्रंथाला लाभलेली आहे. या सातशे पानी खंडात गेल्या दोन वर्षात मिळून सार्याजणी मासिकात प्रकाशित झालेले एकूण ६२ लेख असून लेखांच्या विषयानुसार त्याचे चार विभाग केलेले आहेत. ग्रंथाच्या सुरुवातीला या सर्व लेखांतील मर्मग्राही भावाशय अधोरेखित करणारं डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या कवितांशांचं कोलाज पाहायला मिळतं. ते या ग्रंथाचं मूल्य वाढवणारं आहे.
या ग्रंथात समाविष्ट केलेले लेख, गेल्या पन्नास वर्षांत स्त्री चळवळीत काय काय घडलं? स्त्री चळवळीचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, शेती, कायदे माध्यमं, साहित्य… इत्यादी क्षेत्रात प्रभाव पडला आहे का? कसा? किती? याचा सखोल अभ्यास करून वेगवेगळ्या अभ्यासकांनी लिहिलेले आहेत.
पहिल्या विभागात चळवळीतील अभ्यासू कार्यकर्त्या अरुणा बुराटे यांचा ‘समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी स्त्री-संघर्षाची पाच दशके - काही नोंदी १९७५-२०२५’ हा सहा भागातील लेख, ‘समतेच्या दिशेने न संपणारा प्रवास’ हा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्या शास्त्रज्ञ विनिता बाळ यांचा लेख, कादंबरीकार मिलिन्द बोकील यांचा ‘स्त्री मुक्ती चळवळ आणि मी’ हा स्त्री-चळवळ पुरुषविरोधी नसून पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध आहे हे सांगणारा स्वानुभवकथनपर लिहिलेला लेख, निशा शिवूरकर यांचा ‘स्त्री चळवळीच्या प्रभावाने झालेले कायदे आणि इतर बदल’ हा सहा भागातील लेख… असे महत्त्वाच्या विषयांवरचे आठ लेख आहेत.
दुसर्या विभागात सुनीता भागवत यांचा ‘राजकारण अणि स्त्री चळवळ’ हा दोन भागातला लेख, शैला सातपुते यांचे ‘ती’चे वास्तव मांडणारे राजकारण विषयक दोन लेख, ‘फुले – आंबेडकरांचे धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा’ हा डॉ. देवकुमार अहिरे यांचा लेख, ‘जात, जनगणना आणि आरक्षणाचा प्रश्न’ हा प्रा. संजयकुमार कांबळे यांचा लेख, ‘माझ्या आयुष्यात आलेल्या गंगा जमुनी सख्या’ हा वेश्या व्यवसायातील वास्तवाचा अभ्यास करणार्या लक्ष्मी यादव यांचा लेख… असे वेगवेगळ्या अंगाने केलेला अभ्यास मांडणारे दहा लेख आहेत.
ग्रामिण वास्तव, बिनमोबदल्याचे घरकाम, मानसशास्त्र, शेतकर्यांचे वास्तव, आरोग्य, आदिवासी समाजाचे प्रश्न, विवाहसंस्था, आधुनिक तंत्रज्ञान… अशा विविध विषयावरचे अभ्यासपूर्ण लेखन करुणा गोखले, छाया दातार, मेधा पाटकर, वसुधा सरदार, वृषाली किन्हाळकर, रेश्मा ठोसर, छाया कोरेगावकर… आदी मान्यवर लेखकांनी लिहिलेल्या एकवीस लेखातून तिसर्या विभागात वाचायला मिळेल. या विभागातील ‘हॅश टॅग लैंगिकता’ हा जमीर कांबळे यांचा लेख लैंगिकतेच्या सर्व परिचीत - अपरिचीत पैलूंवर प्रकाश टाकणारा आहे.
विभाग चार मधे ‘स्त्री चळवळ आणि मी’ या शीर्षकाअंतर्गत काही लेख आहेत. यात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींनी या चळवळीमुळे आपल्यात काय आणि कसे परिवर्तन झाले त्याविषयी लिहिले आहे. या शिवाय ‘स्त्रियांची भाषा’ हा सारिका उबाळे यांचा लेख, ‘स्त्रीवाद आणि स्त्री केंद्री संशोधन’ हा नीलिमा गुंडी यांचा दोन भागातील लेख, ‘स्त्री लिखित समीक्षेचा मागोवा’ हा सुजाता शेणई यांचा दोन भागातील लेख, ‘स्त्री चळवळीची पाऊलवाट’ हा मंगला सामंत यांचा लेख, ‘भारतीय स्त्री चळवळीच्या पुढच्या दिशा’ हा माधुरी दीक्षित यांचा लेख असे एकूण तेवीस लेख चौथ्या भागात आहेत.
ग्रंथात शेवटीही डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या कवितांचं कोलाज आहे. त्यातला शेवटचा अंश आहे- ‘पौरुषेय अंधार, चुरडून बसलेल्या, शोकग्रस्त बायका, एकाएकी उठून चालू लागल्या, संहितेबाहेरच्या फटफटीत प्रकाशाकडे..!’ या ओळी वाचल्यावर स्त्री चळवळीचे भवितव्य प्रकाशमय आहे असा आशावाद हातात आल्यासारखं वाटतं..!
आसावरी काकडे २१.२.२०२६
स्त्री चळवळ नाबाद पन्नास..! स्त्रियांच्या संघर्ष आणि यशाची गजब कहाणी.. खंड १ संपादन- डॉ. गीताली वि. म. अमित प्रकाशन, पुणे संपर्क- ९९२१२७२५४६ मूल्य- २०००/- रु.